Monday, June 18, 2018

मनां डे। शिरीष कणेकर

ना खंत ना खेद
शिरीष कणेकर
‘न किसीकी आँखका नूर हूँ, न किसीके दिलका करार हूँ’ हे रफीच्या तोंडचं गाणं वास्तविक मन्ना डेची शोकांतिका सांगते. तसा तो सगळ्यांनाच आवडायचा, पण लाडका असा कोणाचाच नव्हता. पार्श्‍वगायनातील संजीवकुमार म्हणा ना. मन्ना डे व संजीवकुमार जर एवढे लोकप्रिय होते तर ते अनुक्रमे पार्श्‍वगायनाच्या व अभिनयाच्या प्रांतात नंबर वन पदावर का विराजमान होऊ शकले नाहीत? कारण एकच. ते सगळ्यांना पसंत होते, पण कोणाच्याच गळ्यातले ताईत नव्हते. असं का?
सगळ्याच ‘का’ना उत्तरे नसतात.
नौशाद व ओ. पी. नय्यर यांच्या संगीतात अनुक्रमे ‘मदर इंडिया’ व ‘कल्पना’ वगळता मन्नाला स्थान का नव्हतं? ज्यांच्याकडे मन्नाने तुफान लोकप्रिय गाणी म्हटली त्या शंकर-जयकिशननाही त्याला सातत्यानं गाणी द्यावीशी का वाटली नाहीत? ‘चोरी चोरी’मधली राज कपूरच्या तोंडची मन्नाची तिन्ही द्वंद्वगीते तुफान गाजल्यानंतर ‘नाइंटीन फिफ्टीसिक्स’ (अनाडी) व ‘ए भाई जरा देखके चलो’ (मेरा नाम जोकर) ही दोनच गाणी नंतरच्या काळात शंकर-जयकिशनने राज कपूरच्या तोंडी का टाकली? गाणी गाजली नसती तर आपण समजू शकतो, पण गाजल्यावरही ही उपेक्षा?
मन्नाला मात्र या गोष्टीचं जरासंही वैषम्य नव्हतं. ‘मी गायचो ते रफी आणि किशोरही गाऊ शकायचे.’ मन्ना त्याच्या जुहूच्या बंगल्यात बसून मला म्हणाला होता, ‘पण ते गायचे ते मी गाऊ शकायचो नाही.’
ना खंत ना खेद. ना अढी ना असूया!
‘पडोसन’मधल्या ‘एक चतुर नार’ या किशोरबरोबरच्या द्वंद्वगीताचा किस्सा सांगताना मन्ना खुलला होता.
‘‘गाण्याचा क्लासिकल ‘बेस’ असल्यानं मी मूडमध्ये होतो. माझी तयारी पण चांगली झाली होती. मनात म्हटलं, अब आ जाओ बच्चू! मी गाण्याला सुरुवातही झोकात केली. क्लासिकलमध्ये मला कोण हरवणार? पण सांगू महाराजा, मध्येच अत्यंत अनपेक्षितपणे ‘अरे घोडे’ असे म्हणत किशोर जो गाण्यात घुसला तो अख्खं गाणं खाऊन टाकूनच थांबला. व्हॉट टॅलंट!’’
मी अविश्‍वासानं ऐकतच राहिलो. किशोरच्या टॅलंटला दाद द्यावी की मन्नाच्या दिलदारपणाला हेच मला कळेना.
मन्ना आता रंगात आला होता, ‘लतानेही माझी एकदा अशीच छुट्टी करून टाकली होती’ तो म्हणाला, ‘‘आम्ही ‘मधुमती’मधलं ‘बिछुआ’ रेकॉर्ड करीत होतो. गाणं क्लासिकल स्वरूपाचं असल्यानं मी निर्धास्त होतो. समोर लता असली म्हणून काय झालं? ये मेरा फिल्ड था. पण ती लंबीचौडी तान भिंगरीसारखी घेत लता जी गाण्यात उतरली ती गाणं स्वत:चं करूनच गेली. मी बघतच राहिलो. अरे, हे गाणं माझं होतं ना?...’’
सुरुवातीच्या काळात मन्नाची गायकी आवडल्यामुळे म्हणा किंवा ‘बंगाली तितुका मेळवावा’ या वृत्तीतून म्हणा, अनिल विश्‍वास (‘तेरा हाथ हाथ में आ गया’- ‘हमदर्द’), एस. डी. बर्मन (‘सोचके ये गगन झुमे - ज्योती), सलील चौधरी (एक समयपर ‘दो बरसाते’ - ‘झुला’) यांनी अधूनमधून त्याला गाणी दिली. त्याचा जास्त उपयोग शंकर-जयकिशननी केला. त्यांच्याकडे चित्रपटांची रेलचेल असल्यानं रफी, मुकेश, किशोर, तलत व मन्ना डे सगळ्यांनाच गाणी देणं त्यांना शक्य झालं. तरीदेखील मन्नाच्या कारकीर्दीत शंकर-जयकिशनचा मोठा वाटा आहे हे मान्य करावंच लागेल. त्यांनी रफीला १९६ ‘सोलो’ गाणी दिली यात आश्‍चर्य नाही, तर मन्नाला आठवणीनं २७ गाणी दिली हे विशेष. ‘तू प्यार का सागर है’ (सीमा), ‘भय भंजना’ (बसंत बहार), ‘अब कहॉं जाये हम’ (उजाला), ‘चलत मुसाफिर’ (तिसरी कसम), ‘कालका पहिया’ (चंदा और बिजली), या ‘सोलो’ गाण्यांत व ‘तेरे बिना आग’ (आवारा), ‘प्यार हुवा इकरार हुवा’ (श्री ४२०), ‘नैन मिले चैन कहॉं’ (बसंत बहार) या द्वंद्वगीतात मन्ना शंकर-जयकिशनकडे बहारदार गायलाय. ‘चोरी चोरी’मधील तिन्ही द्वंद्वगीतांत - ‘ये रात भीगी भीगी’, ‘जहॉं में जाती हूँ’, ‘आजा सनम’ मन्नानं अशी काही धमाल केल्येय की इथे मुकेश हवा होता हा विचारही मनात येत नाही. 
रागदारीतील गाणी आली की संगीतकारांना हटकून मन्ना डेची आठवण व्हायची. रोशन (‘लागा चुनरी में दाग’ - ‘दिलही तो है’), मदन मोहन (‘कौन आया मेरे मनके द्वारे’ - ‘देख कबीरा रोया’), अनिल विश्‍वास (‘आसने कितने दीप जलाए’ - ‘मेहमान’), एस. डी. बर्मन (‘पुछो न कैसे मैने’ - ‘तेरी सूरत मेरी आँखे’), एस. एन. त्रिपाठी (‘सप्त सुरन तीन ग्राम’ - ‘संगीतसम्राट तानसेन’), शंकर-जयकिशन (‘तू प्यार का सागर है’ - ‘सीमा’), लक्ष्मीकांत - प्यारेलाल (‘तुम गगन के चंद्रमा’ - ‘सती सावित्री’), डी. दिलीप (‘जा रे बेइमान तुझे’ - ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’), जयदेव (‘चले जा रहे है’ - ‘किनारे किनारे’) यांनी मन्नाला शास्त्रोक्त बैठक असलेली गाणी दिली. अनिल विश्‍वासनं ‘हमदर्द’मधील चार रागांवर आधारित ‘ऋतू आये ऋतू जाये सखी रे’ हे अप्रतिम द्वंद्वगीत लता व मन्नाला दिलं. त्यानंतर तेरा वर्षांनी सहासष्ट साली ‘सौ साल बाद’ या चित्रपटातील ‘एक ऋतू आये इक ऋतू जाये’ या चार रागांतील गाण्यासाठी लक्ष्मीकांत -प्यारेलाल लता-मन्ना यांच्याकडेच धावले. लताला पर्याय नव्हता तसा मन्नालाही नव्हता.
विदूषकी घाटणीची विनोदी अंगाने जाणारी रागदारीतील गाणी हीदेखील मन्नाची ‘स्पेशॅलिटी’ होती. उदाहरणार्थ - ‘बनाओ बतिया हटो काहेको झूटी’ - ‘मंझिल’ - एस. डी. बर्मन), ‘प्यार की आग मे तनबदन’ (‘जिद्दी’ - एस. डी. बर्मन), ‘किसने चिलमनसे मारा’ (‘बात एक रात की’ - एस. डी. बर्मन), ‘फूल गेंदवा न मारो’ (‘दूज का चांद’ - रोशन), ‘हाय रे मैं तो प्रेमदिवाना’ (‘बेदाग’ - रोशन), ‘लपकझपक तू आरे’ (‘बूटपॉलीश’ शंकर-जयकिशन) या मार्गाने का होईना, रागदारी सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचत असेल तर वाईट, असे मन्ना डे म्हणत असे.
तयारीची गायची असलेला गळा असा लौकिक पसरल्यामुळे मन्नाला शास्त्रोक्त गाणी आपसूक मिळाली, पण अन्य प्रकारची अनेक गाणी त्याच्या वाट्याला आलीच नाहीत याची खंत वाटल्यावाचून राहत नाही. तो किती हरहुन्नरी गायक होता याची दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. ‘याल्ला याल्ला दिल ले गयी’ (‘उजाला’), ‘सांझ ढली दिल की कली’ (‘कालाबाजार’), ‘प्यार हुवा इकरार हुवा’ (‘श्री ४२०’), ‘मस्ती भरा है समा’ (‘परवरिश’), ‘मेरे दिल में है इक बात’ (‘पोस्ट बॉक्स नं. ९९९’), ‘नैन मिले चैन कहॉं’ (‘बसंत बहार’), ‘ऐ मेरी जोहराजबीन’ (‘वक्त’) यासारखी रोमंँटिक गाणी कमालीची यशस्वी झाल्यानंतरही रोमँटिक गाणी हा मन्ना डेचा प्रांत नव्हे हा अन्यायकारक प्रवाद कायम राहिला. आयुष्यभर हे ओढणं गळ्यात घेऊन तो गात फिरला. तो कोणा संगीतकाराचा लाडका गायक नव्हता (जसे नौशाद-रफी, शंकर-जयकिशन-मुकेश, एस. डी. बर्मन - किशोर कुमार) तसा कोणा नायकाच्याही गळ्यातला ताईत नव्हता. ‘माझ्यासाठी मन्नाच गाईल’ अशी ठाम आग्रही भूमिका घेणारा नायक मन्नाला लाभला नाही.
मन्नाच्या आवाजाची जातच अशी होती की सर्व प्रकारच्या नायकांसाठी ती सूट होण्यासारखी नव्हती असं मन्नाच्या अवमूल्यनाचं कारण सांगितलं जातं. खोटं आहे हे. तलत मेहमूदच्या र्‍हासाचं नेमकं हेच कारण सांगितलं गेलं होतं तेही खोटं होतं. व्ही. शांतारामपासून (‘परछाई’), शशी कपूरपर्यंत (‘प्रेमपत्र’) व दिलीपकुमारपासून (‘दाग’) मनोजकुमारपर्यंत (‘रेशमी रुमाल’) सर्वांना तलत मेहमूदचा रेशमी मुलायम आवाज कसा काय सूट होत होता? कोत्या, किरट्या आवाजाच्या आशा पारेख व सायरा बानू यांना काय लताचा आवाज शोभतो? ये सब बाते है, बातों का क्या! मन्नानेच हे गाऊन सांगितलंय.
कोणाकोणाच्या तोंडी मन्नाची गाणी गाजली आहेत यावर एक नजर टाकूया. राज कपूर (‘चोरी चोरी’), देव आनंद (‘कालाबाजार’), बलराज सहानी (‘काबुलीवाला’), अशोककुमार (‘मशाल’), अनुपकुमार (‘देख कबीरा रोया’), मेहमूद (‘पडोसन’), राजकुमार (‘मेरे हुजूर’), राजेश खन्ना (‘आनंद’), प्राण ‘(उपकार’), डेव्हिड (‘बूटपॉलीश’), शशी कपूर (प्यार किये जा), शम्मी कपूर (उजाला), शेखर (हमदर्द)..
मन्ना डे मुंबईत राहत होता तेव्हा फोनवरून त्याची भेटीची वेळ ठरविल्यावर मी विचारलं, ‘कसं यायचं?’
‘अमिताभ बच्चनचं घर माहीत आहे ना?’ मन्ना निर्विकारपणे म्हणाला, ‘तिथून समोर हाकेच्या अंतरावर आहे.’
मन्नानं आत्मचरित्राचं नाव ‘ना खंत ना खेद’! हे ठेवणं समर्पक झालं असतं.

Shireesh.kanekar@gmail.com

 

 

 

Sunday, June 17, 2018

Rajesh Khanna: The dark star

एक तारा विझताना ("राजेश खन्ना: द डार्क स्टार")
सत्तरदशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आम्हाला सिनेमा या पदार्थाची लज्जत हळूहळू समजायला लागली, तेव्हा अमिताभ बच्चन त्रिखंड व्यापून राहिल्यागत होता. इतर अभिनेते खिजगणतीत नव्हते. प्राथमिक शाळासोबत्यांमध्ये पंखे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचे असत. मोजके काही चाहते बलदंड धर्मेंद्रचे किंवा नृत्यनिपुण जितेंद्र-मिथुनचे. राजेश खन्ना हा सामान्यतः विनोदाचा विषय मानला जाई. त्याचे दिवस फार अगोदरच फिरलेले होते.
मुळात मुंबईपासून कोसों दूर अशा कोकणातल्या लहान गावांत मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबातील मुलांना सिनेमा पाहायला मिळणे हे विरळ (टीव्हीचा शोध वैज्ञानिकांनाच लागलेला नसावा बहुतेक! आम्हाला तर नव्हताच नव्हता). सिनेमे मुंबईत रिलीज झाल्याच्या किमान आठदहा महिन्यांनंतर गावांत पोहचत. तोवर दूध-पाणी वेगळं झालेलं असे. कोणता सिनेमा पहायचा, ही निवड आईबाबांच्या हातात. अशात खन्नाच्या सिनेमांचा नंबर लागणं दुष्प्राप्य होतं. आम्हां पोरांनाही राजेश खन्नाला पहायची फार हौस नव्हती. सुरुवातीच्या सहासात शालेय वर्षांत खन्नाचा 'थोडी सी बेवफाई' हा एकमेव सिनेमा आईबाबांनी थेटरात नेऊन दाखवल्याचं आठवतं. त्यात अजिबात मारामारी नसल्यामुळे तीन तासानी बाहेर पडताना घोर निराशेने तोंड वाकडं झालं होतं एवढंच लक्षात आहे. कारण शाळेत सिनेमाची ष्टोरी हाणामारीसकट सांगून भाव खायचा स्कोप उरला नव्हता.
हळूहळू वय वाढू लागलं, तशी अधूनमधून एकट्याने जाऊन सिनेमा पहायची परवानगी घरातून मिळू लागली. (बरेचसे सिनेमे खरोखरच एकट्याने पाहिले हे खेदजनक सत्य नमूद करणे आवश्यक!). तोपर्यंत थेटरांच्या जोडीने व्हिडिओ सेंटरं सुरू झालेली होती. पण त्याही वेळी कधी खन्नाचा सिनेमा जाऊन पाहिल्याचे आठवत नाही. अमिताभ सिनेमात यायच्या आधी खन्ना 'नंबर वन' होता हे फिल्मी मासिकांत कुठेकुठे लिहिलेले असायचे. त्यापलीकडे कधी शालेय वयात त्याची दखल घेतली नाही. सिनेमाची भक्कम भुरळ पडलेली असली तरी आम्हा पोरांच्या दृष्टीने खन्नाचा यू. एस. पी. काहीच नव्हता.
पुढे अमिताभलाही मागे सोडून, आधी अनिल कपूर, गोविंदा, सनी देओल, मग खानत्रय, राहुल रॉय (होय!), अक्षयकुमार, देवगन असा मानसिक प्रवास करत यथावकाश हिंदी सिनेमा नामक मायावी इंद्रजालातून बाहेरही पडलो.
अशा प्रकारे, राजेश खन्ना या नावाशी भावनिक बंध कधीच निर्माण झाले नसले, तरी त्याला एकेकाळी डोळे दिपून जावेत अशी लोकप्रियता मिळालेली होती हे माहीत होतं. मुली त्याला रक्ताने पत्रं लिहीत, त्याच्या फोटोशी लग्न करीत वगैरे सांगोवांगीच्या कथा ऐकल्या होत्या. पुढे टीव्हीवर पाहिलेले त्याचे 'आराधना', 'आनंद' वगैरे काही जुने चित्रपट आवडलेही होते. त्यामुळे हे नक्की काय रसायन होतं, हे कुतूहल मनात राहून गेलं. २०१२मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा अंत्ययात्रेला दुतर्फा उसळलेली तोबा गर्दी पाहून, आपण सपशेल दुर्लक्ष करण्याइतका हा कलाकार मामुली नव्हता हे समजून चुकलं.
पत्रकार गौतम चिंतामणी यांनी लिहिलेलं 'The Loneliness of Rajesh Khanna- The Dark Star' हे पुस्तक हातात घेतलं ते मोठ्या उत्सुकतेनेच. सांगण्यास आनंद होतो की एका अस्सल चाहत्याने विषयाशी समरस होऊन अभ्यासपूर्वक लिहिलेलं हे पुस्तक फारच वाचनीय झालेलं आहे.
वास्तविक चिंतामणी यांना खन्ना किंवा त्याचे कुटुंबीय यांच्यापैकी कुणाशीही बोलता आलं नाही. त्यामुळे पुस्तक एकांगी किंवा अपुरे ठरण्याचा मोठा धोका होता. पण तसं होत नाही. १९६६ ('आखरी खत') ते २०१२ ('वफा') या खन्नाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचं ते वर्षवार आणि चित्रपटवार सखोल मूल्यमापन करतात. खन्नाच्या विस्मरणात गेलेल्या अनेक चित्रपटांबद्दल विस्ताराने लिहितात. तो तो काळ संदर्भासह दाखवतात. हे सर्व करताना एक माणूस म्हणून खन्नाचं शक्य तितकं परिपूर्ण चित्रही उभं करतात.
राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७० या इनमिन तीन वर्षातल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. (सुरुवात झाली अर्थातच 'आराधना'पासून). पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ती तीन वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. साध्या रेल्वे कंत्राटदाराचा हा मुलगा कुणाच्या -त्याच्याही- ध्यानीमनी नसताना लोकप्रियतेच्या, डोळे फिरावेत इतक्या प्रचंड उंचीवर जाऊन पोचला. त्याच्या नावावर थेटरबाहेर तुडुंब गर्दी उसळू लागली. निर्माते वाटेल ती किंमत मोजायला तयार होऊ लागले. मुलींचे थवे त्याच्या मोटारीला वेढे घालत. देशभरातून ढिगांनी प्रेमपत्रे येत. त्याचं ओझरतं दर्शन घडावं याकरिता लोक तासनतास तिष्ठत असत.
असा दैवी, अकल्पित चमत्कार आयुष्यात घडल्यावर, खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. वैभवाचे दिवस सरले तरी तो मनाने तिथंच राहिला. चित्रपट उद्योग बदलला. प्रेक्षक बदलले. अमिताभ बच्चन नावाच्या नव्या वादळाने जुने हिशेब उधळून टाकले. खन्ना मात्र अखेरपर्यंत पुनरागमनाचे प्रयत्न करत राहिला.
अभिनेता म्हणून तो फार उच्च दर्जाचा होता असं मला कधीही वाटलेलं नाही. पण चिंतामणींच्या पुस्तकात, या कलावंताने जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका, चित्रपटांतून केलेले प्रयोग यांचे तपशील वाचताना मी अचंबित झालो. व्यावसायिक चित्रपट तेव्हा संपूर्ण त्याज्य मानत होता असे अनेक विषय आणि मुद्दे खन्नाच्या चित्रपटांतून वारंवार येतात. हे चित्रपट यशस्वी झाले नसतील. पण म्हणून त्यांचं महत्व कमी होत नाही. आता त्याबद्दल वाचताना या माणसाची दुर्दम्य आशा आणि स्वप्ने पाहण्याची ताकद हीच लक्षात राहतात.
चिंतामणींची भाषा सोपी आणि सौम्य आहे. टीका करतानाही ते अनुचित शब्द वापरत नाहीत. खन्नाच्या जीवनात विशेष स्थान असलेल्या शक्ती सामंता, आनंद बक्षी, राहुलदेव बर्मन, जॉनी बक्षी, डिंपल कपाडिया, अंजू महेंद्रू, हृषिकेश मुखर्जी, किशोरकुमार या निकटवर्तीयांनाही ते पुरेशी जागा देतात.
विस्मृतीत गेलेले अनेक लहान लहान किस्से आणि घटना पुस्तकात जागोजागी भेटतात. त्यापैकी काही इथे देण्याचा मोह आवरत नाही:
- राजेश खन्ना ज्या नवोदित अभिनयस्पर्धेच्या पुरुष गटात विजेता ठरला, त्यात पहिली आली होती फरीदा जलाल. द्वितीय स्थानी होते विनोद मेहरा आणि लीना चंदावरकर.
- 'सत्यम शिवम सुंदरम'चा नायक म्हणून खन्नाला घेण्याचा राज कपूरने निर्णय घेतला होता. पण कपूर कुटुंबीयांनी हट्ट धरल्यामुळे तिथे शशी कपूरची वर्णी लागली.
- दिग्दर्शक मोहनकुमार यांच्या 'अवतार'साठी अमिताभने आधीच होकार दिलेला होता. पण कुमार यांच्या मनात त्या भूमिकेत खन्नाच दिसत होता. अखेर त्यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकला.
पुस्तक संपल्यावर एक प्रश्न रेंगाळत राहतो (ते खरंतर लेखकाचं यशच आहे) तो म्हणजे, हा अवलिया नक्की होता कोण? अफाट पैसे, अफाट प्रसिद्धी, प्रेक्षकांचं असीम प्रेम हे सर्व लाभूनही तो काहीसा निःसंगच राहिला. सुपरस्टार काका आतून कसा होता हे अखेरपर्यंत कुणालाच ठामपणे सांगता आलं नाही. कुणी त्याला दिलदार म्हणतं, कुणी उद्धट, कुणी हेकेखोर, कुणी साधाभोळा, कुणी संशयी. पण हे सर्व काही एकच माणूस एका वेळीही असू शकतो..
All said and done, Khanna was a good man.
खन्नाची समकालीन शर्मिला टागोर हिने लिहिलेल्या छोटेखानी पण नेमक्या प्रस्तावनेने पुस्तकाच्या मूल्यात भर पडते.
खन्नाच्या चाहत्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं हे सांगायची गरज नाही. पण त्याला कधीही गंभीरपणे न घेतलेल्या माझ्यासारख्यांनी तर ते मुळीच चुकवू नये. टीव्हीवर खन्नाचा चित्रपट चालू असेल तर मी आता रिमोटचं बटन दाबणार नाही हे पक्कं.
प्रतिक्रिया
राजेश खन्नावर बॉम्बे सुपरस्टार नावाने यू ट्यूब वर एक व्हिडीओ उपलब्ध आहे. जरूर पाहा
https://www.youtube.com/watch?v=fWmucHoZN3U
 
Collected from net.

Tuesday, June 5, 2018

आळशी बायका - रेणुका खोत

एवढा मोठा पोस्ट मी चक्क वाचला🤭

आळशी बायका
..
घरकामात आळशी असलेल्या बायका मला खूप आवडतात. त्यांच्याकडे बोलायला वेळ असतो. आपणही बडबडत बसलं तर ते सारं ऐकायलाही चिक्कार वेळ असतो. बरं कामसू बायकांप्रती त्यांच्या मनात अपार आदर असतोच. कामसू बायकांचा आदर्श ठेवत आपणही एक दिवस म्हणजे एखाद्या वेळेपुरतं तरी किमान त्यांच्यासारख्या बनूनच दाखवू, अशी त्यांच्यात जिद्द असते. त्या काही सकाळी पाचला उठत नाहीत. त्यामुळे लौकर उठून घसाघसा काम करत जगावर करवादणार्या बायांमधे केवळ लौकर उठून सारे वेळेत आटोपल्याने जो एक अहंकार वाढीस लागतो तो आळशी बायकांमध्ये नसतो. आढ्यताखोर आणि हेकेखोर कामसू बायकांप्रमाणे चिकार वेळ असूनही उगाच लौकर उठून खुडबूड खुडबूड करीत काम करून घराला डोक्यावर घेण्याचा आळशी बायकांचा मुळी स्वभावच नसतो. आळशी बायका गोड्या स्वभावाच्या असतात. स्वत: झोपतात इतरांना झोपू देतात. उशिरा उठणार्यांना त्या कधी टोमणे मारत नाहीत. पांघरूण ओढून अनेक तास डोळे उघडे ठेऊन अमिबासाखं पसरून राहण्याची त्यांनी कमावलेली ताकद कामसू बायकांमधे नसते. कामसू बायका आळशी बायकांप्रमाणे मॅगी हेच पूर्णब्रम्ह असं समजून घेणार्या नसतात. त्यांना जरा म्हणून तडजोड करणं हे झेपतच नाही. कामसू बायका ह्या सासवा झाल्यावर सुनांना छळतात. मुलांना त्रास देतात. घरात भांडणं लावतात. :P

कामसू बायका पोरांकडे अती लक्ष देतात त्यामुळे ती पोरं लाडवतात. रोज रात्री झोपवायला त्यांना आई लागते. अाळशी बायकांना त्यांची पोरच झोपवतात. आळशी बायकांची पोरं लहानाची कधी मोठी झाली ते कळतही नाही. ते आपली काळजी आपणच घ्यायला लौकरच शिकतात कारण आळशी आई लक्षच देत नाही म्हणून. ती लौकर स्वावलंबी होतात. कामसू बायकांना घरातली सारी कामे स्वत:च करायचा अत्यंत वळवळणारा कीडा असल्याने त्यांच्या घरात आयतोबे जन्माला येतात आणि पुढे जाऊन बायकोच्या डोक्याला ताप देतात. खरं तर सतत काम करत राहणार्या बायकांमुळेच घराघरांत पुरूषप्रधान संस्कृतीची माकडं जन्माला येतात. कामसू बायका आपण पोरांना वाढवण्यासाठी किती खस्ता खाल्या ह्याचा सारखा पाढा वाचत राहतात. आळशी बायकांना पाढेच पाठ नसल्याने ते वाचण्याचा प्रश्न येत नाही.

आळशी बायका बाळंतवेदना होत असतातना प्रामाणिकपणे ओरडतात किंचाळतात. कामसू बायका मात्र बाळंतकळा आम्ही कश्या हसत हसत झेलल्या हूं का चूं केलं नाही असं सांगण्याचा दांभिकपणा हटकून करतात. असं कश्यातही भाव खाण्याची कामसू बायकांची लालसा जागोजागी दिसून येते. कामसू बायका माहेरपणाला आल्या तरी माहेरी पालकांना अक्कल शिकवण्याचे प्रताप करतात. आळशी बायका पालक जे करतील ते प्रेमाने आपलं म्हणतात.

आळशी बायका कधीही आपल्या घरी आल्या तरीही आपल्याला त्याने कानकोंडं झाल्यासारखं होत नाही. त्या आपल्या घरातले इथले तिथले डाग दाखवत नाहीत. बोटाने फ्रीज टीव्हीवरची धूळ निपटून कामसू बायकांसारखी आपल्याला दाखवून ' काय हे ' असं विचारून मुद्दाम लाज काढत नाहीत. आपल्या घरातल्या पसार्यात आळशी बायका कुठेही पसरून त्या पसार्यातला एक भाग होण्याची क्षमता राखून असतात. त्यामुळे त्या कधी आल्या तरी आपण जरासं आवरलं तरीही त्या तोंडभरून एक तर त्याचं कौतुक करतात किंवा एकुणच पसार्याबद्दल काहीही बोलायचा आळस करून थेट गप्पा मारायला सुरवात करतात त्यामुळे वेळ व कामाचे नियोजन आणि त्यामुळे यश ह्यासारख्या फालतू वायफळ विषयांवर प्रदीर्घ बोलण्यातला वेळ वाचतो आणि त्यांच्यासोबत दिवस मजेत जातो.

आळशी बायका घरकाम करायला येणारी बाई न आल्यास पदर खोचून जुलाब होईपर्यंत केर लादी पोतं भांडी करत नाहीत. त्या यूज अॅण्ड थ्रो पेपर प्लेट वापरून घासायची भांडी दुसर्या दिवशी येणार्या बाईसाठीच ठेवतात आणि त्यांची हुषारीने खोड मोडतात. आळशी बायका एकदाच भरपूर भात करून फ्रीजमधे ठेवतात. मग दुसर्या दिवसापासून घरातल्यांना फोडणीचा भात, फ्राईड राईस, कोबी भात, आमटी भात, दही भात, दूध - दही- भात अश्या व्हरायटी खाऊ घालतात. कामसू बायका सारख्या ताजा ताजा स्वयंपाक करून कल्पकता गमावून बसतात आणि त्यांच्या घरातल्यांना रोज डाळ भात, आमटी भात किंवा खिचडीवर भागवावे लागते.

आळशी बायका कायम हॉटेलमधे जायला तयार असतात त्यामुळे घरी खाण्याबद्दल कुटुंबियांना वाटणारे अप्रूप कायम टिकून राहते. कामसू बायका हॉटेलमधे खाणे कसे वाईट घरीच खाणे कसे चांगले ह्याचेच भजन किर्तन अख्खा वेळ पिटत राहतात त्यामुळे त्यांच्या नवर्यांची आणि मुलांची फार आबाळ होते. त्यांना मन मारून रोज घरीच खावे लागते. चुकून बाहेर गेलेच तर कामसू बायका तिथेही बाहेर खाण्यातला मनमुराद आनंद लुटू देत नाहीत. बाहेरच्या जेवणाला घरची चव काय, हे त्या सारख्या रटत राहतात त्यामुळे इतरांनाही त्यावर बळजबरी होकार द्यावा लागतो. कामसू बायका विघ्नसंतोषी असतात. दुसर्यांच्या खाऊगिरीत त्या व्यत्यय आणतात. मीच करीन ते चांगले, अश्या हुकूमशहा मोडमधे असणार्या कामसू बायका ह्या स्तुतीलोलुप असतात. त्यामुळे त्यांचे जेवण अतिशय वाईट झाले आवडले नाही तरी त्यांचा इमोशन अत्याचार नंतर पहायला लागू नये म्हणून सगळेच कामसू बायकांची तोंडावर स्तुती करतात. आळशी बायकांना जेवणाचे काही पडलेलेच नसते त्यामुळे त्यांना एक बाळंतपण झाल्यानंतर सुगरपण करण्यात जराही रस नसतो.

आळशी बायका स्मार्टली रसगुल्ले, शिरा, गिट्स चे गुलाबजाम, जेली, खीर असे गोडाचे प्रकार करतात. कधी काही न बनवणार्या ह्या आळशी बायकांनी एक खीर केली तरी त्यांनी कित्ती काय बनवलेले आहे, असा संभ्रम निर्माण करता येतो, हे त्या चाणाक्ष आळशी बाया जाणून असतात. दूध फाडले गोळे केले पाकात सोडले की झाले रसगुल्ले... अश्या झटपट होणार्या बाबौ रेसीप्या आळशी बायकांची खरी वेळ मारून न्यायची शक्कल असते हे अनेकांना कळत नाही. असं कामसू बाईला कुणालाही सहजी गंडवता येत नाही. सर्वांसाठी करून मी कशी थकले ह्याचा दिखावा करण्यातच त्यांना जी धन्यता वाटते त्याचा मोह आळशी बायकांना जराही नसतो. पुरणपोळी सारख्या फालतू पदार्थांकडे त्या ढुंकूनही बघत नसतात. चकल्या, करंज्या, चिरोटे वगैरे अतीसामान्य प्रकार त्या बाजारातूनच सरळ विकत आणतात. हे सगळे वेळखाऊ घाम काढणारे प्रकार दिवाळीच्याआधी करण्यात जेव्हा कामसू बायका मग्न असतात तेव्हा आळशी बायका कुठल्याश्या एसी पार्लरमधे फेसपॅक लाऊन गार हवेत पडलेल्या असतात. त्या कायमच निवांत असतात.

निवांत असण्यात जी मजा असते ती केवळ आळशी बायकांना कळते. कामसू बायकांचे आयुष्य निरस असते. ते कसे इंटरेस्टिंग आहे हे सांगण्याची त्यांना जी धडपड करावी लागते ती आळशी बायकांना जराही करावी लागत नाही.

कामसू बायका साड्या नेसतात. पण आळशी बायका परकर पोलका घालून त्याला शरारा म्हणत मस्त मिरवू शकतात. आळशी बायका चप्पल कपाटात ठेवत नाही. त्यामुळे चपलेच्या कपाटातल्या गोंधळात त्यांच्या चपला हरवत नाहीत आणि त्या बाहेरच्या बाहेर फेकलेल्या चपला झटझट पायात सरकवून घरातून झटपट बाहेर पडू शकतात.

आळशी बायकांना नवर्यांबद्दल काही तक्रार नसते त्यामुळे त्या सतत कटकट करत नाहीत. आळशी बायकांची लग्नं पटपट तुटत नाहीत कारण.. जाऊ दे मरो इथून तिथून हाही पुरूष तोही पुरूषच असा विचार त्या करतात. घरं बदला नवा संसार थाटा, नव्याने नव्या नव्या पुरषांना त्यांच्या आयांनी न लावलेलं वळणं लावा, त्यांना शिकवा वाढवा हे त्यांना नकोच वाटते.

आळशी बायकांना आपण हातात चहा जरी नेऊन दिला तरी त्यांच्या चेहर्यावर इतका आनंद दिसतो की बाकीच्या सार्या कामसू आणि चंट बायका ह्या किती अल्पसंतुष्ट असतात असे वाटल्यावाचून रहात नाही. कामसू बायकांचे फक्त चहावर भागत नाही. त्यांच्याकडे गेल्यावर त्या इतके पदार्थ करून खायला घालतात की त्यांना घरी बोलवायचं म्हणजेही नकोच वाटतं. थोडक्यात कामसू कष्टाळू बायका पाहुण्या म्हणून घरी आल्या की आपण म्हणजे कर्जात बुडालेले शेतकरी आणि त्या बाया म्हणजे वसुलीसाठी आलेले दुष्ट सावकार हेच चित्र पुढे उभं राहतं आणि पोटात गोळा येतो. तुम्हीच बोलवा नी तुम्हीच खाऊ पिऊ घाला बा. आळशी बायका कश्या म्हणतात, मरो.. तू काही करू नको खायला आपण मस्त बाहेरून मागवू खाऊ नी गप्पा मारू. मला कसा कसा चारीठाव सैपाक येतोय हे दाखवून त्यांना मेडलं मिळवायची आज्जिबातच हौस नसते. त्यांच्या ह्या साध्या स्वभावानेच त्या इतर आळशी बायकांमधे प्रिय ठरतात. बाईला जिंकण्याचा मार्गही तिच्या पोटातूनच जातो ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो त्यामुळे कामसू बायकांप्रमाणे त्यांना पुरूष सैपाकाची कामं करू लागले की उगाच्च हुंदके फुटत नाहीत. जगा आणि जगू द्या ह्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या असतात.

आळशी बायकांना जग बदलायची घाई नसते. त्या कधी कुणाला उपदेश करायला जात नाहीत. सल्ले देत नाहीत. कुणाची आई व्हायचा प्रयत्न करत नाहीत. बस कधी वाटलच तर फार धाक जरब असलेल्या बापासारखं एखादं करकरीत वाक्य समोरच्याच्या चेहर्यावर फेकून त्या बाजूला होतात. जे ते जगोत त्यांच्या त्यांच्या कर्माने.. मरोत त्यांच्या कर्माने हे त्यांचं तत्व असतं. त्यांना कश्याचंही क्रेडीट नको असतं त्यामुळे त्या कधीच वैताग देत नाहीत. थटथयाट नसतो. पटलं तर घ्या नाहीतर रामराम अश्या टेचात त्या सदा राहतात. त्यांना कश्याने काही फरक पडत नसतो. त्याच जगाला त्रासलेल्या असल्याने त्या ना कुणाच्या अध्यात न मध्यात अश्या असतात. आळशी बायका पझेसिव्ह नसतात. मालकी म्हणजे आवरणे, सांभाळणे मग ती माणसं असली तरीही.. हे त्या मनोमन ओळखून असतात. कामसू बायकांना सारेच हवे असते. सारेच सांभाळायचे असते. सगळ्यावरच मालकी हवी असते. कामसू बायका कंट्रोलफ्रीक असतात त्यामुळे त्यांचे कुणाशीच पटत नाही.

आळशी बायका फारश्या कुणाचे रंग रूप वजन ह्याबद्दल बोलून स्वत:वर आफत ओढवून घेत नाही. कश्याही अवतारात एकदम उत्साहात टवटवीत राहणार्या आणि एकदम पर्फेक्ट आवरणार्या आणि सदा तेज तर्रार दिसणार्या अश्या सार्याच बायांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच असते. आळशी बायका त्यांच्या मुलांना फार त्रास देत नाहीत. पास झालात.. आनंद... हे एक सूत्र त्यांनी ठेवलेले असते त्यामुळे मुले त्यांच्याचसारखी त्यांच्या संगतीत राहून शांत आणि सुस्वभावी होतात.

ज्या आळशी बायका वाचन करत नाहीत त्यांच्याशी बौद्धीक चर्चा करण्याचे आणि त्यात गंडण्याचे भय नसते. त्या फारच सेफ असतात. आळशी बायका एकाच जागी फार काळ पडून राहतात त्यामुळे सतत उठून ह्याच्या त्याच्या घरात जा, उखाळ्या पाखाळ्या करा, लावालाव्या करा, भांडणे करा मग ती निस्तरा ह्या व्यापापासून त्या कोसो दूर असतात. त्या कधीही फार आवाज चढवून बोलत नाहीत कारण तो उतरेपर्यंत फार वेळ व्यस्त रहावे लागेल आणि बराच काळ चर्चा चर्वित चर्वण ह्यात अडकावे लागेल ह्याची त्यांना भीती असते. मोहरी नसेल तर त्या जिरे आनंदाने फोडणीस घालतात. मोहर्रीच पाहिजे असे पोके हट्ट त्यांच्यात अजिबात दिसत नाहीत. कधी कधी मोहरी जिरे असं काहीच नसेल तर तेलासमोर उभं राहून त्या दोन वेळा ही घातली मोहरी हे घातलं जिरं असं म्हणतात फक्त आणि भाजी फडफडवून मोकळ्या होतात. अडून खेटून राहण्यापेक्षा भराभरा आवरून बेडवर लडद्यासारखं कधी पडायला मिळेल ह्याकडे त्यांचे पूर्ण लक्ष लागलेले असते. ह्या बायका म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशी आहेत, असा कुठल्या पळत्या म्हैशीने टोमणा हाणला तरी त्यांना ढिम्म फरक पडत नसतो.

आळशी बायका मिनिमलिस्टिक असतात. त्या अनेकदा एक किंवा दोन रंगातल्याच लिश्टीपच लावतात किंवा त्याचाही आळस आला तर ओठांवर जीभ फिरवून  बाहेर पडतात. आळशी बायका कूल असतात. त्यांना जळमटांची डीझाईन्स खूप आवडतात. त्यांना धुळीने शिंका येत नाहीत. त्या जॉली नेचरच्या असतात. हातावर काढलेली लहानपणातली जॉलीसुद्धा त्यांच्या हातावर दिसण्याची शक्यता असते. त्या आपल्या जगात मग्न असतात व आपला मूळ स्वभाव प्रेमाने जपतात, आळस करण्याचा छंद मनापासून जोपासतात. त्यामुळे मला आळशी बायका खूपच आवडतात. 😀
- © रेणुका खोत