Thursday, July 4, 2019

गाण्याच्या जन्मकथा

कधीपासून मनात होतं आपण गाण्यांच्या जन्मकथांवर एखादा लेख लिहावा किंवा
गाण्यांच्या गमती जमतीं विषयी लिहावे.
ह्यातले बहुतेक सर्व किस्से शैलेंद्रजींचे सुपुत्र दिनेश शंकर यांनी मुलाखतीत, एखाद्या भाषणात सांगितले आहेत. खूप आधी पासून शैलेंद्रजींना रोज डायरी लिहायची सवय होती. ते सर्व अमूल्य टिपण दिनेशजी कडे आहे. त्यातून काही निवडक गाण्यां विषयी माहिती जमली आणि जे काही पुढे आलंय ते आपल्या समोर ठेवायला मला आनंद होतोय.

"मुडमुडके ना देख मुडमुडके"  एकदा शंकर  जयकिशन, एस जेंचे सहाय्यक दत्ताराम, गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी गाडीतून चेंबूरला चालले होते. तेव्हा मुंबईत बैठी घरेच जास्त होती.रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकामं चालली होती आणि दत्तारामजी सारखे मागे वळून पहात होते. ते पाहून शंकरजींनी विचारले," अरे दत्तू बार बार मुडमुडके क्या देख रहा है" पुन्हा थोड्या वेळाने तोच प्रसंग रिपीट झाल्यावर  बाजूलाच बसलेले शैलैंद्र म्हणाले, अरे इसपर तो गाना बन सकता है..आणि शैलेंद्रजींनी लिहिले *मुडमुडके ना देख मुडमुडके*....

कालाबाजार* च्या गाण्यांच्या सिटींग्ज चालल्या होत्या. सचिनदांची ट्यून तयार होती. दोन दिवस शैलेंद्रजी लिहिण्याचा प्रयत्न होते पण मनासारखे गाणे होत नव्हते. शेवटी त्रासून सचिनदा शैलेंद्रजीं ना म्हटले आज कुठल्याही परिस्थितीत गाणे लिहून झाले पाहिजे आणि "पंचम" ना शैलेंद्रजींबरोबर पाठवून म्हणाले गाणं घेतल्याशिवाय याला सोडू नकोस. दिवसभर आरे कॉलनी, नॅशनल पार्क
अशी आवडीची ठिकाणे पालथी घातली
पण मनासारखं गाणं सुचलं नाही. शेवटी रात्री दोघे जुहूला आले आणि समुद्राच्या सान्निध्यात, नीरव शांततेत, वरती चंद्राकडे एकटक पहाताना शैलेंद्रजींना शब्द सुचले. जवळ कागद नसल्याने सिगरेटच्या पाकिटावर अप्रतीम गाणे अवतरले.....*खोया खोया चांद खुला आसमान, आंखोमें सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी...

"ओ सजना बरखा बहार आई" हे "परख"
चित्रपटातलं अप्रतिम गाणं जन्मालाच आलं नसतं! धक्का बसला ना? बिमल  रॉय यांनी हा चित्रपट करायचा ठरवलं तेव्हा त्यात एकही गाणं नसेल असं ठरलेलं होतं. त्यांनी  सलिल चौधरींना स्क्रीन प्ले लेखनाची आणि शैलेंद्रजींना संवाद लेखनाची जबाबदारी दिली होती. हा असा एकमेव चित्रपट आहे ज्याचे पूर्ण संवाद शैलेंद्रंनी लिहिले आहेत. पण गाण्याशिवाय चित्रपट ही कल्पनाच कोणाला रुचेना आणि ते ही समोर उत्तम गीतकार, संगीतकार असताना? नंतर पुढे बिमलदांची समजूत काढण्यात सगळे यशस्वी झाले आणि "ओ सजना, मिला है किसिका झूमका या सारखी सुंदर गाणी  रसिकांना मिळाली.

"जिस देशमें गंगा बहती है" या चित्रपटा ची कथा ऐकवण्यासाठी राजकपूर यांनी
त्यांच्या टीमला राजकुटीर वर बोलावले
होते. कथा ऐकल्यावर शंकरजींनी  हातातला चहाचा कप टेबलवर दाणकन
आदळला,एक कचकचीत शिवी हासडली आणि रागाने रुमबाहेर गेले. ते शीघ्रकोपी होतेच. राजजींनी पटकन, "अरे देख तो पहलवानको क्या हुआ" असे म्हणून कोणालातरी त्यांच्या मागे पाठवलं
झालं असं की डाकूंवर पूर्ण चित्रपट तिथे संगीताला काय स्थान म्हणून ते भडकले
होते. पण शेवटी ते "राजकपूर" होते. एक नाही, दोन नाही तब्बल नऊ गाणी त्यांनी अशी चपखल बसविली आहेत कि बस्स! त्यातले फक्त एक गाणे "हो मैंने प्यार किया हाय हाय क्या जुल्म किया हसरत
जयपुरींचे आहे बाकीची  शैलेंद्रजींची! शेवटचे "आ अब लौट चले" च्या रेकॉर्डिंग ला स्टुडियोच्या रुमच्या बाहेर
ही खुर्च्या टाकून वादक बसलेले इतका मोठ्या संख्येने ऑर्केस्ट्रा आणि कोरस होता.

लेख टंडनजींचा चित्रपट "आम्रपाली"च्या एका सिटींगची गोष्ट! एक गाणं शैलेंद्रजीं नी ऐकवलं. तेवढ्यात राजजींचा फोन आला क्या हो रहा है ? लेखजी म्हणाले गाना लिखकर तैयार है!  राजजी
म्हणाले फोन पर सुना तो! त्यांनी गाणे एकले आणि म्हणाले ये गाना तो मुझे चाहिये तू दूसरा लिखवा ले!लेख टंडनजी त्यांचे पहिल्यांदा असिस्टंट होते. ते नाही म्हणू शकले नाहीत. शेजारीच लताजी होत्या त्यांनी समजावले अरे गानेका क्या है हम दूसरा लिखवाएंगे! त्यांनी पेटीवर काही सुरावट वाजवली. शैलेंद्रजींनी
शब्द लिहिले,"जाओरे जोगी तुम जाओरे
........ पण काही केल्या अंतरे सुचेनात.

शेवटी रात्री ३ वाजता पुन्हा जमायचे ठरले. लता जी पण तयार झाल्या. दोन वाजून गेले तरी अंतरे तयार नव्हते. ठरल्या प्रमाणे लताजी आल्या. तिकडे कोणाचीही हिंमत होईना लताजींना हे सांगायची. लेखजींनी शैलेंद्रनाच आत पाठवले.ते आत गेले आणि लताजींशी संभाषण सुरु झाले. बाहेर सर्व हैराण परेशान! नेमकं काय चाललय? लताजी काय बोलताहेत? शेवटी न राहवून लेखजींनी आतला माईक सुरु केला तर लताजी हसून शैलेंद्रना म्हणत होत्या "अरे बास बास शैलेन्द्र जी ! और कितने अंतरे सुनाएंगे? कदाचित समोर साक्षात गान सरस्वतीला पाहून त्यांच्या प्रतिभे लाही ऊर्जा मिळाली असेल! होय ना?

शंकर जयकिशन ना एका साऊथच्या निर्मात्याचा चित्रपट या अटीवर मिळाला की गीतकार त्यांच्या पसंतीचा असेल. तो पर्यंत हा अलिखित नियम होता कि एस जेंचे संगीत असेल तर गीते हसरत किंवा शैलेंद्रजींची ! जेव्हा शैलेंद्रंना हे कळले तेव्हा ते रागाने हसरतजींना घेऊन
एस जेंच्या रेकार्डिंग रुमवर आले. दोघेही
न सापडल्यामुळे एका कागदावर त्यांनी खरडले,"छोटीसी ये दुनिया पहचाने रासते हैं, तुम कभी तो मिलोगे कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल" ही गोष्ट राजजींना कळल्यावर त्यांनी चौघांनाही जुहूला बोलावले आणि समुद्राच्या साक्षीने दिलजमाई झाली. पुढे हे गाणे एस जेंनी शैलेंद्रजींकडून अंतरे लिहून  घेऊन "नौकरी" या चित्रपटात वापरले.

एकदा अशीच राजजींची टिम खंडाळ्या ला चालली होती. वाटेत ढाब्यावर थांबले    पाणी देणारा मुलगा आंध्र प्रदेशातला होता. शंकरजींचे बालपण तिथेच गेल्याने त्यांना ती भाषा येत होती. तिथे काही मागवताना ते म्हणत "रमैया वस्तावैया" म्हणजे रमैया इकडे ये. ते सारखं कानावर पडत होते. जेव्हा पुन्हा शंकरजींनी म्हटलं रमैया वस्तावैया तेव्हा शैलेंद्रजींनी म्हटले "मैंने दिल तुझको दिया..असं म्हणत म्हणत सगळे मुंबईला येईपर्यंत पूर्ण गाणं तयार झालं. लगेच राजजींना ऐकवण्यात आले. त्यांनाही ते आवडले. अशी या गाण्याची मजेशीर निर्मिती झाली.

"गाईड" चित्रपटात सचिनदांनी एक प्रयोग केलेला जो शंकर जयकिशननी या आधी केलेला. अंतर्यापासून गाण्याची सुरुवात! *कोणी शंकर जयकिशनचे गाणे ओळखू शकेल कां? मीओळखलंय! तुम्ही सांगा! सचिनदांनी "कांटोंसे खींचके ये आंचल" पासून गाणे सुरु केले पण मुखडा आहे "आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा हैं"...

"आवारा" चित्रपटाची लोकप्रियता तर साऊथ एशिया आणि सोव्हिएट युनियन, आफ्रिका, मध्यपूर्वेचे देश अशी सगळीकडे झाली. "शैलेंद्र"जींचे "आवारा हूं" हे गीत रशिया, टर्की, अफगाणिस्तान या सर्व देशात कमालीचे लोकप्रिय झाले. कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये The most successful film of the time  या विभागात nominate  झाला होता. "श्री ४२०" या चित्रपटाची लोकप्रियता पण इतकी  की "बेल्जियम" मध्ये एका कंपनीने असा जग बनवला होता की त्यातून पाणी ओतताना "मेरा जूता है जापानी" ह्या गाण्याची ट्यून वाजायची.

जाता जाता "जीना यहां मरना यहां" या  अप्रतीम गीताविषयी! शैलेंद्रजींनी याचा फक्त मुखडा लिहिला होता. अंतरे बाकी होते. दुर्दैवाने त्या दरम्यान त्यांचे निधन झाले ते राजजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच! राजजींना त्यांच्या अजीज दोस्ताची आठवण अश्या रितीने राहिली कधीही न विसरता येण्यासाठी! त्या गाण्याचे अंतरे त्यांचे सुपुत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले आहेत.

अजून खूप काही लिहायला आहे. तूर्तास एवढेच...

बार बार। मेघा कुलकर्णी

खूप पूर्वी आचार्य रजनीशांच्या प्रवचनांची कॅसेट ऐकली होती. तो काळ कॅसेट्सचा होता.

शब्दांचा उच्चार, अधून मधून घेतलेला पॉज, एका पाठोपाठ येणारे समानार्थी शब्द.. विषय फारच सुरेख मांडला जायचा. ऐकत होते ते समजत होतं. असे शिक्षक असायला हवे होते कॉलेजला, असं वाटायचं. परीक्षेचा वेगळा अभ्यास कधी करायलाच लागला नसता.

ती शैली ऐकतांना समजलं की एकाच शब्दाचा पाठोपाठ पुनरुच्चार केल्याने वाक्य वजनदार होतं. जो शब्द श्रोत्यांच्या मनावर ठसवायचा आहे, त्याचा परत परत उच्चार, त्या शब्दाचे पाठोपाठ समानार्थी शब्द वापरणे, अगदी हिंदी बोलतांना इंग्लिश प्रतिशब्दही वापरणे; यामुळे वक्त्याला जे सांगायचे आहे ते अगदी पक्के श्रोत्याच्या मनावर कोरले जाते.

परवा एका गृपवर पाठोपाठ एकच शब्द असलेली गाणी शोधण्याचा कार्यक्रम झाला. काही तरी नवनवीन मजा चालू असते वेगवेगळ्या गृपांवर. परत गृपच्या नियमांप्रमाणे १९८० च्या आतली गाणीच अलाउड होती. नवी गाणी बाद म्हणजे बाद. ते असो. पण गाणी शोधतांना लक्षात आलं की या रीपीटेशनमुळे नादमधुरताही वाढते. एक वेगळाच आयाम मिळतो त्या गाण्याला. एक प्रकारचा चुरचुरीतपणा येतो.

जसं की, 'देखो कसमसे कसमसे कहते है तुमसे हां..' यात एका 'कसमसे' मध्ये ती मजा नाही. तो नखरा नाही. तो खटका नाही. वो वाला नामक नहीं| दोनदा दिलेल्या कसमने गाण्याची शान एकदमच वाढली आहे.

'बार बार देखो, हजार बार देखो..' एकबार देखनेसे दिल नहीं भरेगा, हे अधोरेखित होतंय डबल बार ने.

'बार बार दिन ये आये..' हिरोची उत्कट इच्छा, त्या शुभेच्छेमागचा प्रामाणिकपणा स्पष्ट दर्शवतो.

'बार बार तोहे क्या समझाये..' परत परत सांगूनही कसं रे तुला समजत नाही?.. अगदीच कसा तू 'हा' आहेस? हा भाव सांगते ना ती ओळ?

'बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा..' त्या बंजाराची फरपटत दूरवर चालत जाणारी पावले डोळ्या समोर येतात.

'जिया ओ जिया ओ जिया कुछ बोल दो..' हे जिया शब्दाने हाक मारणे काहीच्या काहीच गोड आहे. आणि त्याची पुनरावृत्ती अक्षरशः जीव घेते. ती आळवणी थेट हृदयापर्यंत पोहोचते.

'कुहू कुहू बोले कोयलिया..' ते स्वर गुंजायला लागतात कानात. वसंत फुलतो मनात. एका लांबवलेल्या कुहूss पेक्षा जास्त मजा येतो दोन वेळा म्हटलेल्या कुहुने.

'पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है..' या अस्तित्वातल्या सगळ्यांना माहित आहे.. एक तू सोडून. ही आर्तता अचूक व्यक्त होतेय.

'मै हुं झूम झूम झूम झूम झुमरू..' स्वत:च्या मस्तीत मस्त असलेला आवारा हुबेहूब डोळ्या समोर येतो. तेवढ्यासाठी दोनदा नाही चारदा वापरलाय तो शब्द. अर्थ गडद होतोय.

'इशारों इशारों में दिल लेनेवाले..' तुझे सतत चाललेले प्रयत्न कळताहेत मला..पण आवडतंय मला ते. असा मस्त रोमांटिक भाव आहे या द्विरुक्तीला.

'सायोनारा सायोनारा..' आता मात्र जायला हवंच हं मला.. हा निग्रह जाणवत नाही शब्दांतून या?

'ढुंडो ढुंडो रे साजना, ढुंडो रे साजना..' काढच तू शोधून! असा मिश्कील आव्हानात्मक आग्रह जाणवतो.

'साजन साजन पुकारू गलियोमें..' प्रियकराला हाकांवर हाका मारत हिंडणाऱ्या प्रेयसीची अगतिकता आहे यात.

'चोरी चोरी जो हमसे मिले तो लोग क्या कहेंगे..' भेटावसं वाटतं पण चोरून भेट घेणं पटत नाही मनाला. आणि ती चोरी कळेल लोकांना मग बदनामी होईल.. ही भीती स्पष्ट दिसते.

'क्या क्या न सहे हमने सितम आपकी खातीर..' किती किती त्रास देणार आहेस आणखी? काय काय केलं नाही आजवर?.. बराच त्रास सहन केलाय या माणसाने हे लक्षात येतं आपल्या पण. प्रियकराने कळवळून केलेली प्रार्थना पोहोचते या शब्दांनी.

'पिया पिया पिया मेरा जिया पुकारे..' बिनधास्त प्रेयसीची दिलखुलास हाक ऐकू येतेय.

'भिगा भिगा प्यार का समा बता दे तुझे जाना है कहा..' या अशा ओल्या क्षणी तू कुठेही जाऊ नयेस.. सरळ न सांगता उलट बोलतोय.

'सुन सुन सुन सुन जालीमा..' ऐकून तर घे, मग हवं तर असा दुष्टासारखा अबोला धरून बस.. विनवणी करताना पण जालीम वगैरे बोलून घेतेय. एक तर विनवण्या करण्याचे काम प्रियकराचे म्हणजे तुझे. ते पण मलाच करावे लागते आहे हा रुसवा दिसून येतोय.

'जा जा रे जा बालमवा..' तू जाच आता.. नको तोंड सुद्धा दाखवूस तुझं. संताप स्पष्ट आहे. त्याने तत्काळ जावे म्हणून दोनदा.. नाही तीनदा.. त्रिवार जा.

'जा जा जा मेरे बचपन..' यात पण त्रिवार जा आहे. आता तारुण्याची नवलाई समोर दिसत असतांना हवंय कशाला बचपन?

'रोज रोज मेरी गली आना है बुरा..' रोज येऊन मला बघून जातोस ते माझ्या लक्षात आले आहे.. आवडतंय मला ते.. पण नुसतंच गल्लीत चक्कर मारणं बरं नाही. कधी बोल पण ना माझ्याशी... उघड आव्हान आहे हे.

'गोरे गोरे ओ बांके छोरे कभी मेरी गली आया करो..' हे तर आणखीनच भारी आवताण आहे.

'अकेले अकेले कहा जा रहे हो..' एकटीच? अरे मी आहे एवढा सोबत करायला तयार आहे..एका पायावर धावत येईन बोलावलस तर. तरी एकटीच हिंडते आहेस? काय म्हणावं तुला?.. प्रचंड आश्चर्य आहे या अकेले अकेले मध्ये.

'धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार..' नुसत्या त्याच्या आठवणीने देखील जोरदार धावणाऱ्या हृदयाची धडधड स्पष्ट जाणवते आहे या शब्दांतून. हळू.. हळू.. असं सांगून त्या धडधडीला संयम शिकवतांना होणारी तारांबळ लक्षात येतेय.

'ओ कोई आएगा आएगा आएगा हमरे गाव कोई आएगा..' आशा.. जबरदस्त आशा.. येणार आहे तो. भेटणार आहे मला.

'ना ना ना ना ना ना मेरी बेरी के बेर मत तोडो' अज्जिबात नाही म्हणजे नाही. स्पष्ट नकार. दोनदा त्रिवार नकार.

'झीर झीर बरसे सावनी अंखीया..' उर फुटून रडता येत नाहीये. झीरपल्या सारखं हळू हळू येत राहतंय सारखं रडू.. कमालीची अगतिकता जाणवतेय या झीरझीरीतून.

'रातने क्या क्या ख्वाब दिखाये..' एक का स्वप्न होतं विसरून जायला? किती तरी स्वप्नं बघितली. पण स्वप्नच ती. सकाळ झाल्यावर संपली...हताशा..

'रंग रंगके फुल खिले मोहे भाये कोई रंग ना..' किती तर्हेचे मनोरंजन समोर आहे. पण मला एक तूच हवास. वैविध्य, विपुलता दर्शवणारी द्विरुक्ती. त्या पार्श्वभूमीवर हवंय ते एकच आहे हे उठून दिसतंय.

'ये नयन डरें डरें..' प्रचंड भीती दाटली आहे तुझ्या डोळ्यांत. मी असतांना? काढून टाक ती भीती...एक आश्वासन! एक दिलासा!! एक जवळीक!!!

'खोया खोया चांद..' पार हरवून गेला आहे तुझ्या मुखचंद्रावरचा आनंद.. कुठेही मागमूस नाही त्याचा. झाकोळला आहे हा चंद्र.. दोनदा खोया मुळे दाटपणा वाढलाय नसतेपणाचा.

'मन आनंद आनंद छायो..' माझा आनंद मनातच नाही तर आता गगनात पण मावणार नाही असा झालाय.. त्या आनंदाचे तुषार उडतात अंगावर आपल्याही.

'चूप चूप खडे हो जरूर कोई बात है..' चूप चूप मध्ये जी मजा आहे ती गुपचूप मध्ये नसती आली.

'आ गुपचूप गुपचूप प्यार करे..' इथे मात्र चूप चूप चालणार नाही. चूप राहून प्यार कसं करणार? त्यातही गुपचूप प्यार मधली मजा दोनदा गुपचूपने आणखी वाढवली आहे.

'तुम्हारी भी जय जय, हमारी भी जय जय..' दोघांची दोनदा जय. कटकट नको. तेवढ्यावरून परत भांडण नको. पूर्ण कॉम्प्रमाईज.

'मूडमुडके न देख मूडमुडके..' मुडके ना देख मध्ये ही ठासून सांगण्याची लज्जत आली नसती. मूडमुडके कसं नादमधुर ठणकावणे आहे.

'रुमझुम रुमझुम चाल तिहारी..' रुणझुणत्या पाखरा ऐकल्यावर हा रुमझुम शब्द गजगतीसाठी किती चपखल वापरलेला वाटतो ना? दोनदा रुमझुम म्हणजे या पायावरून त्या पायावर करत डोलणारा हत्ती अचूक डोळ्यासमोर येतो.

बापरे! म्हणता म्हणता किती गाणी मिळाली. आणखी किती तरी असतील. कवी मंडळीनी हे नादमधुर शब्द वापरून कसले बहारदार भाव प्रत्यक्ष उभे केलेत नाही?
-मेघा कुळकर्णी

दिल की आरजू ठी कोई पद्माकर पाठकजी

पत्रकार आणि प्रतिभासंपन्न शायर, गीतकार हसन कमाल यांचा आज (एक जुलै) अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘दिल की ये आरजू थी..’ या गीताचा...
........
आज एक जुलै! या दिवसाचे चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्व पाहू या. हा दिवस बासरीवादक व संगीतकार पं. हरिप्रसाद चौरसिया, दिग्दर्शक मेहुलकुमार आणि लेखक-गीतकार हसन कमाल यांचा जन्मदिवस आहे. निर्माता-दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांचा स्मृतिदिवस आजच असतो. गायक सुरेश वाडकर एक जुलै १९९८ या दिवशी विवाहबद्ध झाले होते.

या दिवसाचे औचित्य साधून ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या गीतकार हसन कमाल यांच्या एका गीताचा. त्याआधी या प्रतिभासंपन्न शायराच्या जीवनप्रवासावर एक धावता कटाक्ष टाकू या! एक जुलै १९४३ रोजी लखनौमध्ये जन्मलेल्या हसन कमाल यांनी आज त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. अमृतमहोत्सवी हसन कमाल यांनी लखनौच्या विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आणि ते पदवीधर झाले. १९६५मध्ये पत्रकारिता क्षेत्रात त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुंबईतील ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकात ते उपसंपादक म्हणून काम पाहू लागले. यामधून आलेल्या अनुभवातून, मिळालेल्या ज्ञानातून आणि घेतलेल्या परिश्रमातून १९७४मध्ये ते ‘उर्दू ब्लिट्झ’चे संपादक झाले. हे वृत्तपत्र खूप लोकप्रिय बनले आणि त्यामुळे हसन कमाल या नावाला एक वजन प्राप्त झाले. या वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत आणि ते लोकांना आवडतही असत.

हसन कमाल
पत्रकारिता करत असतानाच हसन कमाल शायरीही करत असत! त्यांच्या अप्रतिम शायरीमुळे त्यांनी कवी म्हणून परदेशातही काही कार्यक्रम केले. परदेशातील शेरोशायरीच्या कार्यक्रमांमध्ये शायरी सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रणेही येत असत! त्यामधून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘बंबई रात की बाहो में’ या चित्रपटापासून चित्रपटांचे गीतकार म्हणून हसन कमाल यांची वाटचाल सुरू झाली. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिलसिला’ चित्रपटाकरिता त्यांनी ‘सर से सरके सरके चुनरिया ...’ हे गीत लिहिले होते व ते लोकप्रिय झाले होते. त्यानंतर त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ चित्रपटाची सर्व गीते लिहिली आणि ती सर्व देशभर लोकप्रिय ठरली. त्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाला प्रतिष्ठा लाभली. बी . आर. चोप्रांनी आपल्या चित्रसंस्थेतील पुढील कित्येक चित्रपटांसाठी हसन कमाल यांचीच निवड केली.

‘आज की आवाज’, ‘मजदूर’, ‘अवाम’, ‘दहलीज’, ‘तवायफ’, ‘प्रतिज्ञाबद्ध’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. तसेच त्यांनी ‘बटवारा’, ‘यतीम’, ‘हथियार’, ‘ऐतबार’ या चित्रपटांच्या संवादलेखनाचे काम केले. टीव्ही मालिकांचा काळ सुरू झाल्यावर त्यांनी ‘महाभारत कथा,’ ‘सौदा’, ‘ कानून’, ‘औरत’, ‘परमवीरचक्र’, ‘उसूल’, विष्णू पुराण’, ‘अकबर - दी  ग्रेट’, ‘झाँसी की रानी’, ‘महाराणा प्रताप’ अशा काही टीव्ही मालिकांचे संवाद लिहिले.

‘आज की आवाज’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी हसन कमाल यांना १९८४चा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. या व्यतिरिक्त त्यांना ‘ नेहरू कल्चरल असोसिएशन ऑफ यूपी, तसेच हिंदी उर्दू साहित्य अॅवॉर्ड ऑफ यूपी व मौलाना अबुल कलाम आजाद अॅवॉर्ड अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

१९८२च्या ‘निकाह’ चित्रपटासाठी हसन कमाल यांनी लिहिलेली सर्व गीते आशयसंपन्न होती. ‘फजा भी है जवाँ जवाँ......’, ‘बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी....’, ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये ....’, ‘दिल की ये आरजू थी.....’ ही ‘निकाह’मधील गीते आजही ऐकावीशी वाटतात. यापैकी ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये’ हे सलमा आगा यांनी गायलेले आणि संगीतकार रवी यांनी स्वरबद्ध केलेले गीत तर प्रचंड लोकप्रिय ठरले होते आणि ‘बिनाका गीतमाला’ या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या वार्षिक कार्यक्रमात १९८३चे द्वितीय क्रमांकाचे गीत म्हणून या गीताचा सन्मान करण्यात आला होता.

‘निकाह’ चित्रपटातील अशा एकापेक्षा एक सुंदर गीतांपैकी एका सुनहऱ्या गीताचा आस्वाद आज घेऊ या. चित्रपटात तसा प्रेमाचा त्रिकोणच होता. नायकाकडून प्रेमाची अपेक्षा पूर्ण न झालेली नायिका आणि नंतर तिला दुसरा नायक/सहनायक भेटतो. तिच्या सौंदर्यावर लुब्ध होतो. तिच्यावर प्रेम करू लागतो आणि त्या मन:स्थितीत आपल्या मनाचे भाव कळण्यासाठी नायिकेपुढे तो गातो! पण त्या वेळी ते पाहून नायिकेच्या मनात काय विचार येतात? पहिल्या प्रेमातील अपेक्षाभंग, तशातच दुसरे प्रेम पुढे! ती अशा मन:स्थितीत या सहनायकाला काव्यातून सांगते!

थोडक्यात काय, तर नायक आनंदी मन:स्थितीत आणि नायिका दु:खी मनस्थितीत! एक वेगळे द्वंदगीत! हसन कमाल नायकाची आनंदी मनःस्थिती वर्णन करताना लिहितात, महेंद्र कपूर गातात, संगीतकार रवी मस्त चालीतून गाण्याचा प्रभाव वाढवतात....

दिल की ये आरजू थी कोई दिलरुबा मिले
लो बन गया नसीब के तुम हमसे आ मिले

आमच्या मनाला वाटत होते, आमच्या हृदयात अशी भावना होती, की एखादी भावणारी प्रिया, मनपसंत साथीदारीण भेटावी. आणि काय बघा आश्चर्य, तुम्ही आम्हाला भेटलात आणि आम्हाला वाटले आमचे नशीब उजळले. तुम्हीच माझ्या मनाला भावणारी साथीदार आहात!

‘ती’ भेटल्यामुळे तो अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त करतो; पण या प्रीतीच्या प्रांतात तिने दाहक अनुभव घेतले आहेत. त्यामुळे दु:खी मनाने ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते -

देखे हमें नसीब से अब अपने क्या मिले
अब तक तो जो भी दोस्त मिले बेवफा मिले!

बघा ना आमच्या (फुटक्या) नशिबामुळे आम्हाला काय मिळाले? (आम्ही त्यांच्यावर भरपूर प्रेम केले, पण) आजपर्यंत जे मित्र आम्हाला मिळाले, ते प्रतारणा करणारेच मिळाले. आमच्या प्रेमाची त्यांनी जाण ठेवलीच नाही.

तिच्या तोंडून तिचे हे दु:ख ऐकून तो तिला सांगतो -

आँखों को एक इशारे की जहमत तो दीजिए
कदमों में दिल बिछा दूँ इजाजत तो दीजिए
गम को गले लगा लूँ जो गम आपका मिले

माझे प्रेम स्वीकारण्याबद्दलचा एक नेत्रकटाक्ष टाकण्याचे कष्ट तुम्ही घ्या. (जहमत म्हणजे कष्ट) तुम्ही परवानगी दिली, तुम्हाला मान्य असेल, तर तुम्ही जेथे पाय ठेवाल, त्या ठिकाणी आधी मी माझे हृदय अंथरून ठेवीन! (ही उपमा, पण आशय हा, की तुम्हाला फुलासारखं जपेन!) (आणि तुमच्या जीवनात आतापर्यंत मिळालेल्या दुःखाबद्दल म्हणत असाल, तर एवढंच सांगतो की, तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केलात, की) तुमच्या दुःखाला मी मिठी मारीन, अर्थात तुमचे दु:ख केवळ तुमचे होणार नाही, तर ते माझेही होणार व त्यामुळे तुमच्या दुःखाची तीव्रता मी कमी करीन.

‘त्याने’ एवढे आश्वस्त केले, तरी ‘ती’ म्हणते -

हमने उदासियों मे गुजरी है जिंदगी
लगता है डर फरेब-ए-वफा से कभी कभी
ऐसा न हो के जख्म कोई फिर नया मिले

(काय सांगू तुम्हाला अहो) आम्ही आमच्या जीवनात उदासवाणेपणाच अनुभवला आहे. (मन निराश झाले आहे. आणि तशातच कधी कधी अशीही) भीती वाटते की, प्रेमात, निष्ठेत पुन्हा एकदा आम्हाला धोका मिळेल. (माझे प्रेमातले असे दाहक अनुभव असल्यामुळेच असे वाटते, की आता आपण पुन्हा कोणावर प्रेम करू लागलो, तर) न जाणो पुन्हा एखादी नवीन जखम आम्हाला मिळेल. (प्रेमातली पहिली जखम अद्याप ताजीच आहे.)

‘तिच्या’ मनाची अशी साशंक व उदासवाणी अवस्था ऐकल्यावर ‘तो’ तिला सांगतो. येथे चित्रपटाच्या कथानकात ते दोघे आधी एकदा भेटलेले असतात; पण पुढे त्यांना दूर व्हावे लागलेले असते. त्या अनुषंगानेच हसन कमाल हे शेवटचे कडवे लिहताना अशी शब्दरचना करतात -

कल तुम जुदा हुए थे जहाँ साथ छोडकर
हम आज तक खडे है उसी दिल के मोडपर
हमको इस इंतजार का कुछ तो सिला मिले

भूतकाळात ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यापासून अलग झालात, आमची साथ सोडली, त्याच वळणावर (हृदयातील त्याच भावनांना सांभाळत) आम्ही आजपर्यंत (तुमची वाट बघत) उभे आहोत. (तुमच्यासाठी थांबलेले आहोत.) आमच्या या प्रतिक्षेचे आम्हाला काही चांगले फळ मिळावे (अर्थात तुमची प्राप्ती व्हावी) असेच आम्हाला वाटते.

असे हे एक अनोखे द्वंदगीत! सतारीचा मधुर वापर! सलमा आगा यांचा अनुनासिक वाटणारा, पण वेगळा आवाज व जोडीला महेंद्र कपूर! संगीतकार रवींची उत्कृष्ट चाल! आणि हसन कमाल यांचे साधे सोपे, पण प्रभावी शब्द व उपमा! ‘सुनहऱ्या’ गीतात आणखी वेगळे काय हवे, नाही का? १९८०मध्ये गीतकार साहिर यांचे निधन झाल्यावर बी. आर. चोप्रांनी आपला नेहमीचा गीतकार गेल्यामुळे ते स्थान हसन कमाल यांना दिले, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. या प्रतिभासंपन्न शायराला अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३