Saturday, September 14, 2019

बटाट्याची चाळ। विनय भालेराव

बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे.

त्रिलोकेकर सोमण गुप्ते च्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.

असामी असा मी मधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.

लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नांव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.

कोकणातल्या अंतू बर्वा सुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.

मुलाच्या घरची सगळी अपसव्य त्याला आता मान्य झाली आहेत, ना जातीची ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.

नामू परटान् आता लौंड्रि घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.

नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायण देखिल त्याला एटिकेट्स शिकवित असतो.

हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.

लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड  साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.

आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखिल पटकावतो.

सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नितीमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.

नंदा प्रधान पहिल्या पासून जरा फॉरवर्डच होता, त्यानेही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.

नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.

बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅनसेलर सुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.

पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहित आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहित.

नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.

ऑनलाईन टिचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टिचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.

भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांच्या वेश चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.

दोन तत्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणा बरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.

पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.

त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असामी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.

त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते कि आज मी स्वीकारलेली हि आधुनिक संस्कृती सुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.

पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.

बदलत्या काळाची पाऊले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.

काळ बदलला, संस्कृती बदलली, वेशभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.

त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.

भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.

नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.

पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.

पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरक हि दाखवून दिला.

आणिबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.

खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.

त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

या व्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं नाटकं पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहिच शंका नाही.

या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम.

~ विनय भालेराव.

आशा भोसले। शिरीष कणेकर

*काही आवर्जून वाचावे असे...!*
*********************
*दुसरी महाराणी*

शिरीष कणेकर

‘लता म्हणजे ब्रॅडमन, आशा म्हणजे सोबर्स. अष्टपैलू.’ इति आर. डी. बर्मन.

‘जगात दोनच भोसले झाले. एक शिवाजीराव आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले.’ इति मी.

‘मला आयुष्यभर एक सल आहे. मी कायम ‘नंबर टू’ राहिले.’ इति आशा भोसले.

‘आमची आशा भन्नाट गाते. मला सगळ्यात आवडणारं तिचं गाणं म्हणजे रोशनचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ इति लता मंगेशकर.

मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इतक्या लोकांशी बोलल्यावर माझं असं इम्प्रेशन झालंय आणि ते चुकीचं नाही की आशा लतापेक्षा काकणभर जास्तच लाडकी आहे, पण कमी नाही. हे आशालाही माहित्येय, पण तिच्या हातातला केशरी दुधाचा प्याला ओठांपर्यंत जाईपर्यंत त्यात मिठाचा खडा पडतोच. तो अहेतुकपणे टाकणारी कोण तर सख्खी थोरली बहीण. तिनं काय केलं? काही नाही, फक्त गायली, गायली आणि गायली. लता आधी आली, मोठी झाली व मोठीच राहिली. आम्ही कानसेनांनी स्वेच्छेनं तिची गुलामी पत्करली. आशा हतबुद्ध झाली आणि तरीही दिमाखदार चौकार आणि षटकार मारत राहिली. हार मानणं तिच्या रक्तातच नव्हतं. मास्टर दीनानाथांचं रक्त. तेच थोरलीत होतं, तेच धाकटीत होतं. लता लता असेल तर आशा आशा होती. फक्त आम्ही लताचे होतो आणि आशाचे होण्याचा प्रयत्न करीत होतो. माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसतायत आता आता..

आशा लताच्या शिफारसीनं, पाठिंब्यानं व प्रोत्साहनानं या क्षेत्रात आली नाही. हे रोपटं स्वतंत्र रुजलं, स्वतंत्र वाढलं व स्वतंत्र फोफावलं. बाजूलाच एक महावृक्ष फोफावला होता. हा ना त्या रोपट्याचा दोष ना त्या वृक्षाचा. सुरुवातीची पाच-दहा वर्षे आशाच्या वाट्याला क्लब डान्सर, सहनायिका व दुय्यम स्त्रीभूमिकांच्या वाट्याला असलेली फुटकळ, उडती गाणी आशानं गायली हा फार मोठा गैरसमज आहे. ‘रामन’मध्ये लताच्या विनोदनं आशाला दहापैकी आठ गाणी दिली होती. ती गाजली नाहीत म्हणून त्यांना उडती व फुटकळ म्हणायचं वाटतं? ‘ठोकर’मध्ये सरदार मलिकनं आशाला आठपैकी सहा गाणी, ‘पापी’मध्ये एस. मोहिंदरनं आठपैकी सहा गाणी व ‘राजमहल’मध्ये पं. गोविंदरामनं सातपैकी सहा गाणी आशाला दिली होती. रोशन (९९ गाणी), सी. रामचंद्र (१३२), खय्याम (९०), हेमंतकुमार (७८), एस. डी. बर्मन (१४०), मदनमोहन (१९०), कल्याणजी आनंदजी (२९७), लक्ष्मीकांत-प्यारेलाल (४८५) या दिग्गजांनी वेचून फालतू गाणी आशाला दिली असं कोणायला म्हणायचंय का?

लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्‍वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं. एरव्ही इतक्या दाणेदार व पल्लेदार आवाजाच्या मालकिणीला कसली आल्येय डर?

हा आत्मविश्‍वास तिला ओ. पी. नय्यरनं दिला. शमशाद व गीता दत्त यांना बाजूला सारून आपण ओ.पी.च्या प्रमुख गायिका झालोय या विचारानं तिच्यातली खरी आशा बाहेर आली. तिला मोकळं रान मिळालं. (ओ.पी.कडे लताच्या स्पर्धेचा प्रश्‍नच नव्हता.) आशाच्या पंखांना गरुडाचं सामर्थ्य देण्याची किमया नि:संशयपणे ओ.पी.च्या ठसकेबाज संगीतानं केली. ओ. पी.नं आशा घडविली हे जितकं खरं आहे तितकंच आशानं ओ.पी.च्या संगीताला चार चाँद लावले हेही तितकंच खरं आहे. दोघांनाही एकमेकांची नितांत आवश्यकता होती आणि कानसेनांना या दोघांची! ‘छम छम छम’ (१९५२) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७३) या एकवीस वर्षांत ५१ चित्रपटांत ओ.पी.नं आशाला १६२ ‘सोलो’ व १५४ द्वंद्वगीते दिली. त्यातल्या या थोड्यांवर नजर टाका – ‘जाइये आप कहाँ जायेंगे’ (‘मेरे सनम’), ‘आँखों से जो उतरी है दिल में’ (‘फिर वही दिल लाया हूं’), ‘यही वो जगह है’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘आओ हुजूर’ (‘किस्मत’), ‘कुछ तो ऐसी’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (‘रागिनी’), ‘आइये मेहरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’, (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’), मैं शायद तुम्हारे लिए’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘जरासी बात का हुजुरने’ (‘मुसााफिरखाना’), ‘जादूगर सावरिया’ (‘ढाके की मलमल’), ‘बेईमान बालमा’ (‘हम सब चोर है’), ‘छुन छुन घुंगरू बोले’ (‘फागून’), ‘पूछो न हमें’ (‘मिट्टी में सोना’), ‘मेरी जान तुमपे सदके’ (‘सावन की घटा’), ‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’)…
बघता बघता आशा महाराणी झाली. थोरली आधीच होती.

आशा दत्तपाड्यात (बोरिवलीला) एका लहान घरात राहत होती तेव्हा तिला भेटायला तिची आई-माई आली. आशा तेव्हा घरातील कामे करीत होती. ते पाहून माई म्हणाली, ‘या असल्या कामांसाठी तुझा जन्म झालेला नाही. लक्षात ठेव, तुम्ही महाराण्या आहात.’

ओ. पी. नय्यर कधीही भेटला की तिरकसपणे मला विचारायचा, ‘क्या कहेती है वो पेडर रोड की दो महारानीयाँ?’
गाण्याच्या ‘रॉयल्टी’वरून रफी व लता यांचा वाद विकोपाला गेला तेव्हा लताच्या समोरच रफी मुकेशला म्हणाला, ‘जाहीर है, आप तो महारानी के साथही होंगे.’
‘मैं हूँही महारानी.’ लता उसळून म्हणाली, ‘लेकिन उससे आपको क्या तकलीफ है?’

लता व रफी यांच्या एकापेक्षा एक सरस द्वंद्वगीतांइतकेच (नेमका आकडा ४४७) हे ‘रॉयल्टी’वरून झालेलं द्वंद्व मनोज्ञ आहे.
ओ. पी.व्यतिरिक्तही इतर संगीतकारांकडे आशाची उत्तम गाणी आहेत. (संख्या अर्थातच कमी) नमुना म्हणून ही काही गाणी बघा – ‘दिल श्याम से डूबा जाता है’ ‘संस्कार’ अनिल विश्‍वास, ‘दिल लगाकर हम ये समझे’ ‘जिंदगी और मौत’ – सी. रामचंद्र, ‘सबासे से कहे दो’ – ‘बँक मॅनेजर – मदन मोहन, ‘निगाहे मिलाने को’ (कोरस) – ‘दिल ही तो है’ – रोशन, ‘पान खाये सैंय्या’ – ‘तिसरी कसम’ – शंकर-जयकिशन, ‘काली घटा छाये’ – ‘सुजाता’ – एस. डी. बर्मन, ‘किस जगह जाये’ – ‘लाइट हाऊस’ – एन. दत्ता, ‘मेरा कुछ सामान’ – ‘इजाजत’ – आर. डी. बर्मन, ‘पिया तू’ – ‘कारवान’ आर. डी. बर्मन, ‘नजर लागी राजा’ – काला पानी’ – एस. डी. बर्मन, ‘दम मारो दम’ – ‘हरे राम हरे कृष्ण’ – आर. डी. बर्मन, ‘मुझे गले से लगा लो’ – ‘आज और कल’ – रवी, ‘मेरे जीवन में आया है कौन’ – ‘प्यासे नैन’ – एस. के. पाल. ‘दिल चीज क्या है’ – ‘उमराव जान’ – खय्याम, ‘झूठे नैना बोले’ – ‘लेकिन’ – हृदयनाथ मंगेशकर, ‘तन्हा तन्हा यहाँ पे जीना’ ‘रंगीला’ – रहेमान, ‘इन आँखो की मस्ती के’ – ‘उमराव जान’ – खैय्याम.

एकदा मी आशाच्या घरी गप्पा मारीत बसलो असताना आशा मला म्हणाली, ‘माझ्या ‘ये है आशा’ या कार्यक्रमात मी तुमच्या ‘माझी फिल्लमबाजी’तले गाजरका हलवा वगैरे किस्से सांगते.’
‘काही हरकत नाही.’ मी म्हणालो, ‘मीदेखील माझ्या एकपात्री कार्यक्रमात तुमची काही गाणी म्हणतो. लोक म्हणतात की, मी जास्त चांगला गातो.
लोक म्हणतात, बाबा!’
आशा खळखळून हसली. इतक्या वैयक्तिक निर्घृण आघातानंतर आशा इतकी निर्मळ व खळखळून हसू शकत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सिंहाचं काळीज लागतं. आशा जन्मजात लढवय्यी आहे.
जुग जुग जियो, आशाजी. अशाच लढत राहा, हसत राहा, गात राहा.
म्हणा पाहू –

‘पत्ता पत्ता यहां राजदा है मेरा,
जर्रे जर्रे में रख दी है मैंने जुबाँ
पूछते है सभी मुझसे ये हर घडी
भूल बैठे है क्या प्यारको मेहेरबाँ‘
भूल जाओ जो तुम तो मुझे गम नही है
सभी गम के मारे मुझे जानते है
मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ
मगर चांदतारे मुझे जानते है…’

– shireesh.kanekar@gmail.com
*********************
पोस्ट शिरीष कणेकर

Sunday, September 8, 2019

आशा भोसले।

द्वारकानाथ संझगिरी

...के दिल अभी भरा नहीं

आज आशाताईंना ८६ वर्षे पूर्ण झाली. ८ सप्टेंबर १९३३ चा त्यांचा जन्म. शारीरिक वय कुणालाच थांबवता येत नाही. कॅलेंडरची पानं झपझप पुढे सरकतात, पण त्यांचं मनाचं आणि विचारांचं तारुण्य कुणीतरी ‘स्टॅच्यू’ खेळ खेळताना एकाच जागी थांबवून ठेवलंय. त्यांचं गाणं कधीच म्हातारं झालं नाही. कदाचित या क्षणीही त्या तरुणाईच्या सर्वांत आवडत्या गायिका असाव्यात. माझी आठ वर्षांची ऑस्ट्रेलियातली नात आजच्या कुठल्याही गायिकेपेक्षा कॉम्प्युटरमध्ये पेनड्राइव्ह टाकून आशाताईंचं ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ ऐकत बसते. या गाण्यांबद्दल मी समजू शकतो पण तिला ‘पिया तू बावरी’ मोहित करते तेव्हा आशाताई ही जादू उमगते.
माझी एक आवडती तुलना आहे. लता मंगेशकर सर डॉन ब्रॅडमन असतील तर आशा भोसले सर गारफिल्ड सोबर्स आहेत. गाण्यातल्या अष्टपैलूत्वाचा शेवटचा शब्द!
किती वेगवेगळे मूडस्.
कधी भजन तर कधी कॅब्रे
कधी गझल, कधी कव्वाली
कधी उडतं,  खेळकर गाणं
कधी सुखी, आनंदी, कधी दु:खी
कधी लहान मुलांची गाणी तर कधी सेक्सी गाणी
कधी शास्त्रीय तर कधी रॉक अ‍ॅण्ड रोलवर आधारित गाणी
हे सर्व मूडस् एकाच गळ्याने पेलले आहेत. त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. बरं,  हे नुसतं पेलणं नाहीए तर तिथे शिखर गाठणं आहे. जे हिंदीत तेच मराठीत आणि इतर भाषांमध्ये!  त्यांच्या कारकीर्दीचा कालखंडही पहा! १९४३ पासून थेट कालपर्यंत. आणि हे सर्व गाण्याचं तारुण्य सांभाळत. त्यांचे मोठेपण विविध गाण्यांतून जाणवतं. त्यांचं ‘जिवलगा’ गाणं मी किती तरी वेळा ऐकतो. आणि प्रत्येक वेळा वासलेला आ लवकर मिटत नाही. ‘जिवलगा’ हे ५ मिनिटं २१ सेकंदांचं गाणं आहे. जवळपास एका श्वासात गायलेलं! अंतर्‍यावर  जाताना मधे जो संगीताचा पिस वाजवला जातो तो न टाकता हृदयनाथांनी बहिणीकडून सरगम गाऊन घेतली आहे.
दीनानाथ मंगेशकरांच्या नाट्यसंगीताच्या रेकॉर्डस् अस्तित्वात असतानाही आणि त्या नाट्यगीतांची जागा कुठल्या उंचीवर आहे हे जाणूनही त्यांनी वडिलांचं नाट्य संगीत गायलंय. आणि नव्या पिढीला नाट्य संगीत कसं गावं हे शिकवलं. सुरेलपणा, लयबद्धता, शब्दोच्चार आणि अर्थाप्रमाणे  भावाचा  आविष्कार ही त्यांची खासियत, वडिलांनाही अभिमान वाटावा अशी!
शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी गाण्यांमध्ये मन्ना डे हे एक वजनदार नाव आहे. पण आशाताई आणि मन्ना डेंचं ‘लाल पत्थर’मधलं ‘रे मन सूर में गा गा’ हे गाणे ऐकलंय? नक्कीच ऐकलं असेल. त्या गाण्याला १९७२ सालचं बेस्ट क्लासिकल फिल्म गाण्याचं अ‍ॅवॉर्ड मिळालं. त्यावेळी शास्त्रीय संगीतातले तज्ज्ञ जी. एन. जोशी म्हणाले होते, ‘‘अशा गाण्यात मन्ना डेंचा वकुब आहे, पण राग ‘यमन’ ज्या पद्धतीने आशाताईंनी गायलाय ते ऐकून मी स्तिमित झालो. आशाताईंच्या गळ्याचा लवचिकपणा, काही वेळा मन्ना डेंच्या तोडीचा तर काही वेळा मन्ना डेंवर मात करून गेलाय.’’
मराठीत सुधीर फडके आणि हिंदीत ओ. पी. नय्यर आणि बर्मन पिता-पुत्र यांनी आशा भोसलेंना स्वत:चं वेगळं राज्य स्थापण्यात मदत केली. ओपीने आशाताईंच्या मनातला लता फोबिया काढून टाकला. तिला सहनायिकेच्या गायिकेवरून नायिकेची गायिका बनवलं. ओपींना तिच्या संगीताच्या भक्कम पायाचं आणि बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. ओपी म्हणाले, ‘‘तिला अर्धा तास आधी गाणं दिलं तरी नंतर लगेच गाणे रेकॉर्ड करता यायचे.’’ इतर संगीतकार आशाताईंना वरच्या पिचवर गायला लावत. ओपींनी त्यांना खालच्या पिचवर आणलं. ओपी सांगे, ‘‘तू खालच्या सुरात गा. तुझ्या दीर्घश्वासाचा उपयोग कर.’’ खय्यामने तिला ‘उमरावजान’मध्ये दीडसूर खाली आणलं. ओपींनी आशाताईंना विविध प्रकारची गाणी दिली. त्यातली नशिली इतकी उत्तम होती की मॉल्ट व्हिस्कीची नशाही फिकी ठरावी.
बर्मन दा तसे लतामय संगीतकार. तरीही उडत्या चालीची गाणी आशाताईंकडे आली. १९५७ साली बर्मन दा - लतामध्ये काहीतरी गैरसमज झाले. त्यानंतर थेट ‘नौ दो ग्यारह’पासून ‘बंदिनी’पर्यंत १४ चित्रपटांत बर्मन दांनी आशाताईंना ५१ गाणी दिली. ‘चलती का नाम गाडी’, ‘कालापानी’, ‘काळाबाजार’, ‘सुजाता’ वगैरे सिनेमा त्या काळातले. आशाताईंच्या आवाजातल्या खेळकरपणाचा फार सुंदर वापर बर्मन दांनी केला. कधी हुंकार, कधी कुजबुजणं, कधी गोड आलाप.
आर्डीने त्यांना ‘दम मारो दम’ हे कल्ट (ण्ल्त्ू) गाणं दिलं. तिथून लतापेक्षा वेगळं असं आशाताईंचं सार्वभौम राज्य सुरू झालं. लोकप्रियतेच्या दृष्टीने त्यानंतर लता आणि आशा समांतर धावल्या. १९७० च्या दशकात हे राज्य त्यांनी आर्डीच्या मदतीने उभं केलं. एका वेगळ्या राज्याची ती सार्वभौम राणी होती. पुढच्या प्रत्येक संगीतकाराने तिला कुर्निसात केला. मग तो बप्पी लहरी असो किंवा आणि कुणी. आशाताईंच्या साम्राज्यावरचा सूर्य अजून मावळलाय असं वाटतच नाही. त्याने थोडा रंग बदललाय. संध्याकाळचा रंग घेतलाय.
चंद्रावर दोन अंतराळवीर उतरले. पहिला आर्मस्ट्राँग, दुसरा ऑल्डरिन. लता-आशा त्यांच्याप्रमाणे आहेत. लतादीदींनी चंद्र प्रथम पाहिला. मग आशाताईंनी. पण आजही आशाताईंचा उत्साह पाहून म्हणावंसं वाटतं,  ‘...के दिल अभी भरा नहीं.’
..।।।।।।।।।।।।।।।।।।
*अष्टपैलू आशा*
                     ✍      सुहास किर्लोस्कर

महाराष्ट्र टाइम्स - संवाद - ८ सप्टेंबर २०१९

*“तोरा मन दर्पण कहेलाए” अशा भावपूर्ण गाण्यापासून “खल्लास” पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणाऱ्या आशा भोसले यांनी भक्तीगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत, नझरुल गीते, लोकगीते, पॉप असे अनेक संगीतप्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे.  आज ८ सप्टेंबर रोजी त्या ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू गायकीची झलक.*

चित्रपट संगीतामधली सिनेमातील प्रसंगाप्रमाणे असतात त्यामुळे गाणी गाताना गायक कलाकाराला स्वराइतकेच भाव व्यक्त करण्याला महत्व द्यावे लागते, आवाजामधून अभिनय करावा लागतो.  हिंदी चित्रपटामध्ये गाण्यासाठी तयार केलेल्या एकापेक्षा एक अनोख्या प्रसंगामध्ये उत्कट अभिनय स्वरामधून व्यक्त करणाऱ्या, कमावलेल्या अष्टपैलूत्वामधले वैविध्य प्रदीर्घ काळात निरंतर जपणाऱ्या एकमेव गायिका म्हणजे आशा भोसले.  स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आल्यावर आपले वेगळेपण काय याचा शोध घेताना कोणाचीही नक्कल न करता मिळतील त्या गाण्यामधील साभिनय गायन करत आपली वेगळी ओळख निर्माण करून त्यावर स्वतःचा ठसा उमटवला. त्याचा दाखला द्यायचा झाल्यास तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल इतकी त्यांच्या गाण्यांची संख्या आहे आणि तितकीच विविधता सुद्धा.  

*भक्तिगीते* 

“प्रभाती सूर नभी रंगती”, “उठा उठा सकळ जन”, “पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती” या भक्तीगीताने सकाळ प्रसन्न होण्याचे संस्कार रेडियोने केलेले आहेत.  “देवरूप होऊ सगळे”, “धागा धागा अखंड विणूया” अशा भक्तीगीतामधला आशा भोसले यांचा आवाज वेगळा जाणवतो.  “मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय” अशी मनाची अवस्था वर्णन करणा ऱ्या साहीर यांच्या शब्दाना रवी यांनी भजनाचे कोंदण दिले आणि “तोरा मन दर्पण कहेलाए” या गाण्यामधला पवित्र भाव त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. मनाचीच वेगळी अवस्था वर्णन करताना “मना तुझे मनोगत कळेल का” या गाण्यात लावलेला आवाज वेगळा आहे. 

*बालगीते*

“नाच रे मोरा”, “चंदा राणी”, “एक झोका, चुके काळजाचा ठोका” “नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू”, सारख्या गाण्यांमधून आशा भोसले यांनी बालसुलभ भाव व्यक्त केले आहेत.  “दादी हम तुमको मनाते रहेंगे” असे जेव्हा त्या “दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ” गाण्यात लहान मुलांच्या आवाजात म्हणतात तेव्हा कोणती दादी गुस्सा सोडणार नाही? 

*नाट्यगीत, शास्त्रीय संगीत*

“युवती मना दारुण रण”, “विलोपले मधु मिलनात या”, “शूरा मी वंदिले”, “रवी मी” अशी नाट्यगीते आशा यांनी गायल्यामुळे तो ठेवा प्राणपणाने जपला आहे.  त्यामधल्या ताना गाताना नाट्यगीताचा बाज राखला आहेच शिवाय काही जागा खास आशा शैलीच्या आहेत. “परवशता पाश दैवे” लाइव्ह गाताना “असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला” या ओळीचा संदर्भ देत त्या ब्रिटीश राज्याचा संदर्भ देतात ते खासच असते.  दिनानाथ मंगेशकर यांनी सिनेमामध्ये गायलेले “सुहास्य तुझे मनास मोही” आणि त्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेले रुपांतर “मी मज हरपुन बसले ग” दोन्ही गीते आशा भोसले त्या गाण्याच्या भावदर्शनासह गातात तेव्हा त्याची खुमारी वेगळीच असते.   जोग रागावर आधारित “रस बरसत अमृत वीणा” हे गाणें त्यांनी पं भीमसेन जोशी यांच्याबरोबर फार सुरेख गायले आहे. केदार रागावर आधारित "ही कुणी छेडिली तार" हा वसंतराव देशपांडे  यांच्याबरोबर केलेला असाच वेगळा अविष्कार आहे.  उ. अली अकबर खां यांनी तानसेन यांच्या पारंपारिक बंदिशी सरोद वादनासह गाण्यासाठी लिगसी आल्बम करिता आशा भोसले यांचीच निवड केली.  विलायत खान यांनी संगीतबद्ध केलेले आणि अमृता प्रीतम यांनी लिहिलेले गीत “अंबर की एक पाक सुराही, बादल का इक जाम उठाकर” शायरी, संगीत आणि गायकीचा तर त्रिवेणी संगम आहे.   दिल पडोसी ही या आल्बममधील  “झुठे तेरे नैन” हे गीत साडे आठ मात्रांमध्ये बाधलेले आहे.  हे गाण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात येते की हे शिवधनुष्य पेलणे कसे अवघड आहे परंतु आशा भोसले यांच्या आवाजात आपण गाणे ऐकतो तेव्हा त्या लीलया समेवर येतात.  बोसा नोवा रिदमवर बेतलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले गाणे  “मार डालेगा दर्द ए जिगर” ऐकताना हेच वैशिष्ट्य जाणवते  राहुल देव बर्मन यांच्या “घर जाएगी तर जाएगी” या गाण्यात लग्नाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नायिकेच्या मनातली चलबिचल व्यक्त करण्यासाठी प्रत्येक शब्दातल्या स्वरांचे चढउतार ऐकतानाच दमछाक होते. कारवां चित्रपटातील “दैय्या दैय्या मै कहां फसी” या गाण्यात प्रत्येक ओळीला गाण्याचे स्केल बदलते. अशी अनेक गाणी आपल्याला ऐकायला सोपी वाटतात आणि लक्षात येते की अशी गाणी कोणी म्हणण्याचा प्रयत्न का करत नाही.    

*गाण्यामधला अभिनय*

“या सुखानो या” हे सदाबहार गाणे दरवेळी पुनःप्रत्ययाचा वेगळा आनंद देते यामध्ये अर्थात संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाचे कौशल्य आहेच पण ते त्यावर आशा ही मोहोर आहे त्यामुळे आपण दिवसभर ते गाणे गुणगुणत राहतो.  “आज कुणीतरी यावे” हे गाणे ऐकल्यावर त्या येणाऱ्याला “विचारल्याविन हेतू कळावा” कारण त्या गाण्यातले भाव. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या “जहा मे ऐसा कौन है” या गाण्यात “दिलाऊ किस तरहा यकीन, के तुमसे मै जुदा नही, मुझसे तुम जुदा नही”  या ओळीमधली “दिलाऊ” ही जागा  ऐकल्यावर खात्री पटते.  जयदेव यांच्याच “मांग मे भर ले रंग सखी री” या गाण्यात  “कोई चांदी के रथ मे आया है” या ओळी ऐकल्यावर त्यांच्या गायकीला अनोखी का म्हणायचे याचे उत्तर मिळते.  “प्यार के मोड पर छोडोगे जो बाहे मेरी” हे गाणे ऐकल्यावर कोण प्रेयसीला सोडून जाईल? लगान चित्रपटातील ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या “राधा कैसे ना जले, आग तन मन मे लगे” या शब्दात नायिकेची जलन अप्रतिमरीत्या व्यक्त झालेली आहे.  “लोगो न मारो इसे”, “रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी”  अशी खोडकर, रुसव्या फुगव्यासह अनेक भाव असलेली गाणी ऐकल्यावर आपण दुसऱ्या कोणत्याही गायिकेचा विचार करू शकत नाही. अशा गाण्यात किशोरकुमार साथीला असल्यास सोने पे सुहागा.  “मेरा नाम है शबनम” अशा बोल असलेल्या गाण्यात शब्दातील भाव आणि गायन याची कसरत करावी लागते.  “बैल तुझे हरीणावाणी” हे गाणे गात असतानाच “हे सर्जा आहा आहा”,  “हात नका लावू माझ्या साडीला” या गाण्यात  “अंगाला हात लावायचं काही कारण होत का?” किंवा “नाव सांग सांग गाव सांग” या गाण्यात “अरं जा रं” असं कोल्हापुरी ठसक्यात म्हणून पहावं म्हणजे अवघड काय आहे हे लक्षात येते.  “हाल कैसा है जनाब का” या गाण्यातला आवाज त्यांचा आहे की मधुबालाचा असा प्रश्न पडतो.  वेगवेगळ्या भाषांचा लहेजा “मै बंगाली छोकरा”, “ता थै तत थै” सारख्या गाण्यात जाणवतो.   बंगाली आणि इतर भाषातील त्यांची गाणी हा वेगळाच अभ्यासाचा विषय आहे.

*कव्वाली, गझल*

ये इश्क इश्क है, है अगर दुश्मन, पल दो पल का साथ हमारा, अशा कव्वालीमध्ये त्यांचे आगमन गाण्यात वेगळी जान आणते. रोशन यांच्या “निगाहे मिलाने को” या  यमन रागावर आधारित  गाजलेल्या कव्वालीमध्ये गायलेली सरगम गाण्याची रौनक वाढवते. “सलोना सा सजन है और मै हुं”, “करू न याद मगर किस तऱ्हा भूलाऊ उसे”  अशा एकापेक्षा एक सरस शायरीला आशा लाभल्यावर त्याचे सोने झाले. “युं सजा चांद के छलका तेरे अंदाज का रंग” या गझल मध्ये रंग मधली जागा ऐकावी आणि ऐकत रहावी.  मिराज ए गझल या आल्बममध्ये गुलाम अली आणि आशा भोसले यांनी गझलला वेगळे आयाम दिले आहे. ‘गये दिनो का सुराग लेकर”, “रोदाद ए मुहोब्बत क्या कहिये” या  युगुल  गझल गायनाबद्दल गुलजार यांच्या शब्दात सांगायचे झाले तर “हे दोघे दिग्गज एकत्र गायले आणि गझल अपने मिराज पर पहुची”.  खय्याम यांच्या आग्रहास्तव खालच्या स्वरामध्ये गायलेल्या उमराव जान मधल्या सर्वच गजल आपल्या परिचयाच्या आहेत. “मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है” अशा ओळी गाताना स्वराप्रमाणे त्यातले भावदर्शन अधोरेखित झाले आहे.

*मादक गाणी, दर्दभरी गाणी*

मेरे अंग लग जा बालमा, ये है रेशमी जूल्फो का अंधेरा, आईये मेहेरबा, रात अकेली ही`है, हुस्न के लाख रंग अशी एकापेक्षा एक मादक गाणी फक्त आशा भोसले यांच्यासाठीच बनवली आहेत की काय असे वाटते. “असेल कोठे रुतला काटा” अशा ठसकेबाज लावण्या ही तर त्यांची खासियत होतीच.  पिया तू अब तो आजा किंवा प्रत्येक वेळी सलग ८ वेळा “आह आह आजा” असे दमश्वासासह गायलेले तिसरी मंझील मधले गाणे, एक तू है पिया, आओ हुजूर तुमको अशी नशा चढलेली गाणी (उचकीसह), पाश्चात्य शैलीमधले  दम मारो दम असे अनेक पैलू सांगता येतात. “एक तू ही है पिया”, “नाजनी बडा रंगीन है वादा तेरा” अशा ओ पी नय्यर यांच्या एकाच गाण्यात तीन चाली आहेत. “खाली हाथ शाम आई है, खाली हाथ जाएगी, आजभी ना आया कोई”, “चैन से हमको कभी, आपने जिने ना दिया”, “दर्द जब तेरी अता है” अशा गाण्यांमधून “भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले” असा दर्द आशा व्यक्त करतात तेव्हा त्याचे गहिरेपण आपल्याला भिडते.

*एकाच गाण्यात दोन भाव*

आशा भोसले यांची गाणी ऐकली की अष्टपैलुत्व म्हणजे काय याचा अर्थ समजतो. वेगेवगळ्या भावना स्वरातून त्या अशा काही व्यक्त करतात की गाण्यातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतात, मनाला भिडतात, आपण त्या माहोलमधें जातो. कारवां चित्रपटातील एकाच गाण्यात अरुणा इराणी यांचा मादक मूड आणि शेवटच्या कडव्यामधें आशा पारेख यांचा कैफियत मांडण्याचा मुड़ त्यांनी लिलया पेलला आहे.  “अब जो मिले हैं तो, बाहों को बाहों में रहने दे ए साजना” या उन्मादक गाण्याचे शेवटचे कडवे  “अब जो मिले हैं तो, मुझको निगाहों में रहने दे ए साजना” असे विरह गीत होते.  द बर्निंग ट्रेन या सिनेमातले श्रवणीय गीत भारतीय आणि पाश्चात्य अशी टिपिकल फिल्मी जुगलबंदी आहे. पाश्चात्य ढंगात  “मेरी नजर है तुझपे” आणि शास्त्रीय रंगात  “तेरे बिना जियरा मने ना”  त्याला साजेसा बदल आशा भोसले आलटुन पालटून पण लिलया करतात. “नको रे नंदलाला” हे नाव मोठे लक्षण खोटे चित्रपटातील गीत याच जातकुळीचे.

*एव्हरग्रीन*

बदलत्या काळाशी आणि तंत्राशी जुळवून घेण्यात त्या नेहेमीच पुढे असतात. इजाजत मधल्या नायिकेला पती तुकड्या तुकड्यामध्ये मिळत असतो. “कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जिने दो” या गुलजार यांनी लिहिलेल्या या शब्दाला चाल देताना राहुल देव बर्मन यांनी तुकड्या तुकड्यात गाणे रेकोर्ड केले आणि व्होईसओव्हर तंत्र वापरून गाणे जोडले.  या गाण्याला आशा भोसले यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.  सुधीर फडके ते आनंद मोडक, सचिनदेव बर्मन – ओ पी नय्यर यांच्यापासून ए आर रेहमान पर्यंत सर्वांच्या संगीताचा अविभाज्य भाग बनलेल्या, नलिनी जयवंत, मधुबाला, नूतन, तनुजा पासून काजोल, उर्मिला मातोंडकर, तब्बू यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रीना आवाज दिलेल्या आशा यांनी “बचके तू रहेना”  या संदीप चौटा यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात वयाच्या ६९ व्या वर्षी “खल्लास” असे काही गायले आहे की आपण या वयात असे युवावर्गाच्या संगीताशी जुळवून घेऊन त्याला आपला वेगळा रंग देऊ शकू का हा प्रश्न पडतो. अशी गाणी त्या ढंगाने गाण्याऱ्या कलाकाराला जनरेशन गॅप वगैरे माहित नसते, असे कलाकार जीवनाच्या चांगल्या बाजूकडे बघत असतात.  गायिका आशा भोसले  यांच्याकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणुन पहावे. विपरीत परिस्थितीमधे न खचता स्वतःची ओळख बनवणे आणि इतके वर्षे काल सुसंगत राहणे हे केवळ "आशा" च करू शकते.  सुधीर मोघे यांच्या शब्दात

*इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे*
*हे जीवन सुंदर आहे*

सुहास किर्लोस्कर
9422514910