Friday, October 18, 2019

भेट । शांता शेळके

#आवडलेल्या_कविता

भेट अटळ जी आहे
  कोठे कशी ती होईल
येईल का अकस्मात
   किंवा देईल चाहूल

डोळा भिडेल डोळ्याशी
  किंवा खालती झुकेल
हात होईल कां पुढे
  देह खिळून राहील

काय होईल कळेना
  येते दाटुनिया रक्त
उगाच ही तगमग
  उगाच हा वेडा हट्ट

इंदिरा संत

स्विकार , मग तो प्रेमाचा असो किंवा मृत्यूचा .. नेहेमीच कठीण असतो. मनातली तगमग, हो आणि नाही च्या मधला पॉज , नको तिथे खेचल्या जाणाऱ्या मनाला थांबवण्याचा अयशस्वी चाळा सगळे किती सोप्या शब्दात बाहेर आलय ...
आणि तरीही किती कठीण आहे ...

(आयुष्याच्या उताराला लिहिलेली ही कविता आहे)

Wednesday, October 16, 2019

अमिताभ। ।। पद्माकर पाठकजी

चित्रपटसृष्टीचे महानायक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर हा जन्मदिन . त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘आदमी जो कहता है’ या गीताचा...
............
‘सुनहरे गीत’मध्ये अभिनेत्री रेखा आणि तिच्या गाण्याबद्दल लिहीत असताना ‘अमिताभ’ हा उल्लेख अपरिहार्य होता. तेवढा उल्लेख करून थांबावे, अशी नियतीची इच्छा नसावी. १० ऑक्टोबर (रेखाचा जन्मदिवस) झाल्यानंतर ११ ऑक्टोबर येणे अपरिहार्य आहे; पण ११ ऑक्टोबरला अमिताभ यांचा जन्मदिवस येणे हा एक विलक्षण योगायोग नाही का?

अमिताभ, एक महानायक. अमिताभ हे एके काळी वादग्रस्त असलेले व्यक्तिमत्त्व. अमिताभ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील शतकाचा अभिनेता. जसे लता मंगेशकर यांच्याबद्दल आजपर्यंत बरेच काही लिहून आले आहे, तसेच अमिताभ यांच्या बाबतीत आहे. त्यांचे चित्रपटसृष्टीतील आगमन, त्यांचे सुरुवातीचे फ्लॉप चित्रपट आणि ‘जंजीर’नंतरची लोकप्रियता! आणि नंतर पडलेला ‘अँग्री यंग मॅन’चा शिक्का. त्यानंतर राजकारणात प्रवेश. त्याआधी त्यांचे मोठे आजारपण. आणि त्या सर्वांमधून बाहेर येत असताना फ्लॉप झालेले जादूगर, महान, लाल बादशहा, इत्यादी चित्रपट.

अमिताभ संपला ही आवई उठली. वयोमानानुसार बदललेला त्याचा चेहरा, त्याची चित्रपट संस्था... हे सगळे एक मोठी उडी घेण्यासाठी नियतीनेच मागे मागे घेतलेली धाव होती. त्या ठिकाणी एक जोर लावून धाव घेतली गेली आणि मग जो विक्रम झाला तो अद्वितीय ठरला.

‘ब्लॅक’सारख्या चित्रपटातून अभिनयसंपन्न अमिताभ लोकांपुढे आला. खरे तर तो त्यापूर्वीच बेमिसाल, कभी कभी, सिलसिला अशा काही चित्रपटांमधून आपल्या अभिनयसंपन्नतेचे दर्शन घडवून गेला होता; पण पब्लिकला ते तितके भावले नव्हते. आणि या सेकंड इनिंगमध्ये स्टार अमिताभपेक्षा अॅक्टर अमिताभ एक एक वरची पायरी चढत गेला आणि अजूनही जातो आहे. एके काळी रेखा आणि अमिताभ यांच्यावर बोलणे, लिहिणे सहज घडून जायचे; पण आज अमिताभ यांच्या वयाच्या ७६व्या वर्षी अॅक्टर अमिताभ हाच विषय महत्त्वाचा ठरतो. कारण २००१नंतर आलेले त्यांचे चित्रपट त्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहेत.

आणि फक्त अॅक्टर अमिताभ हा त्यांच्या बद्दलचा विषय राहतो, असे नसून, हे व्यक्तिमत्त्व गेल्या १६-१७ वर्षांत भारतीयांपुढे कसे आले आहे, तेही पाहणे फार आवश्यक आहे. दूरदर्शनचा प्रभाव वाढू लागला, तेव्हा चित्रपट कलावंत आता या पडद्यावरही दिसतात म्हणून लोक अप्रूपाने पाहू लागले. हा छोटा पडदाही अमिताभ यांनी गेल्या १६-१७ वर्षांत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने काबीज केला. या छोट्या पडद्याने अॅक्टर अमिताभचे अनेक चित्रपट दाखवले व आजही दाखवले जात आहेत; पण या छोट्या पडद्यावर अमिताभ अॅक्टर म्हणून जेवढा लोकप्रिय झाला, तेवढाच तो ‘अँकर’ म्हणून लोकप्रिय ठरला. कार्यक्रम सादर करण्याची आकर्षक पद्धती, वाक्यातील चढ-उतार, अशा अनेक गोष्टींमधून अमिताभ यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधून हा कलावंत छोट्या पडद्यावरही लोकप्रिय ठरला.

त्याचबरोबर भारत सरकारच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत, स्वच्छता अभियानातही सहभाग घेऊन त्यांनी आपण केवळ कलावंत नसून सामाजिक बांधिलकी जपणारे भारतीय आहोत, हेही दाखवून दिले आहे. महाराष्ट्रावर किंवा भारतातील कोणत्याही भागात विविध स्वरूपाच्या आपत्ती आल्या, तेव्हा केलेल्या आर्थिक मदतीचा गाजावाजा न करणारा अभिनेता, हे अमिताभचे एक वेगळे रूप आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्याच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन त्याच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे वळू या.

अमिताभ यांनी पडद्यावर गायलेल्या गीतांमध्ये प्रेमगीतांचेच प्रमाण कमी आहे. अर्थात तो १९७०नंतरच्या बदललेल्या काळाचा परिणाम होता. हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ १९५० ते १९६० हा मानला जातो. परंतु १९६०नंतरच्या पुढील दहा वर्षांत या सुवर्णयुगाचे अनेक सुवर्णकण कित्येक गीतांमधून ऐकायला मिळाले. एखादा काळ असा एकदम संपुष्टात येत नाही. त्याच्या काही खुणा पुढील काळाच्या काही टप्यांपर्यंत दिसतच राहतात. त्याप्रमाणे १९६० ते १९७० या दशकातील चित्रपटगीते तशी पूर्ण टाकाऊ नव्हती. कित्येक गीते आशयपूर्ण व सुमधुर होती.

परंतु १९७०नंतर चित्रपटांची कथानके बदलली. ओघानेच त्याचा परिणाम चित्रपटगीतांवर झाला. सूडपटांची लाट आली, तेव्हा त्यामध्ये भावपूर्ण गीते कशी आढळावीत? अमिताभ यांच्या लोकप्रियतेचा काळ तो हाच - १९७० ते १९८०चा. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली गीते कामचलाऊ संगीताची व शब्दांची जुळवाजुळव केलेलीच आहेत. परंतु त्यातही काही अप्रतिम, तसेच आशयपूर्ण अशी गीते त्यांच्या वाट्याला आली. ती त्यांनी अप्रतिमपणे पडद्यावर साकार केली. अशा काही मोजक्या गीतांपैकी एक गीत होते १९७४च्या ‘मजबूर’ चित्रपटातील.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत, आनंद बक्षी यांचे शब्द व किशोरकुमार यांचा स्वर या सगळ्या मिश्रणातून निर्माण झालेली गीते तद्दन व्यावसायिकच होती. परंतु मध्येच केव्हा तरी आनंद बक्षी यांच्यातील प्रतिभावंत शायर असे अप्रतिम लिहून जायचा, की ते गीत मनामध्ये कायमचेच ठाण मांडायचे.

अशा प्रकारच्या त्यांच्या काही गीतांमधील हे एक आशयपूर्ण गीत. मजबूर चित्रपटाच्या कथानकानुसार नायकाला आपण मृत्यूच्या जवळ आलेलो आहोत, हे कळते आणि ओघानेच तो मानवी जीवनाबद्दलचे भाष्य करणारे गीत गातो. अर्थात आनंद बक्षींनी हे गीत एकूण मानवी जीवनाबद्दल भाष्य करणारे व छानपणे मार्गदर्शन करणारे लिहिले आहे. त्यामुळेच मला ते सुनहरे वाटते.

बघा. काय आहे त्या गीतात - किशोरदा सुरुवात करतात - पडद्यावर अर्थातच ऐन तारुण्यातील अमिताभजी -

कभी सोचता हूँ के मैं कुछ कहूँ
कभी सोचता हूँ के मैं चूप रहूँ

कधी मला वाटते, की मी काही सांगावे (तर) कधी मला वाटते, की मी गप्प बसावे, चूप राहावे (पण आता मात्र सांगतोच, की)

आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है
जिंदगीभर वो सदायें पीछा करती है
आदमी जो देता है, आदमी जो लेता है
जिंदगीभर वो दुवाएँ पीछा करती है

माणूस जे बोलतो, माणूस जे ऐकतो, त्याचा प्रतिसाद (प्रतिध्वनी) आयुष्यभर त्याचा पाठलाग करत असतो. माणूस जे देतो, जे घेतो, त्यामुळे मिळणाऱ्या सदिच्छा (अगर शाप, तळतळाटसुद्धा) आयुष्यभर त्याचा पाठलाग करत असतात. (त्याच्या वाट्याला येतात.)

जैसी करनी, वैसी भरनी, करावे तसे भरावे, चांगले करा चांगलेच होईल, वाईट करा वाईट होईल, या सर्व तत्त्वज्ञानाचा आशय सांगणाऱ्या या वरील चार ओळी हे या गीताचे ध्रुवपद आणि मग पुढे कवी सांगतो -

कोई भी हो हर ख्वाब तो सच्चा नहीं होता
बहुत जादा प्यार भी अच्छा नहीं होता.
कभी दामन छुडाना तो मुश्कील हो
प्यार के रिश्ते टूटे तो, प्यार के रस्ते छूटे तो
रास्तो में फिर वफाएँ पीछा करती है

(या जगात) कोणीही असू दे, त्याचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरत नाही. (पाहिजे त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळतातच असे नाही. काहीतरी उणीव प्रत्येकाच्या जीवनात राहतेच.) अति प्रेमही चांगले असत नाही. (कारण जीव मग त्या मायापाशात गुंतत राहतो, हे प्रतिकात्मक रूपाने सांगताना कवी लिहितो) प्रेमाची नाती तुटली, प्रेमाचा मार्ग सुटला, तरी जीवनाच्या वाटचालीत त्या निष्ठा (ते विचार) पाठलाग करत राहतातच.

हे तत्त्वज्ञान सांगून कवी पुढील कडव्यात मानवी मनाचा लहरीपणा, विक्षिप्तपणा सांगताना म्हणतो, की -

कभी कभी मन धूप के कारण तरसता है
कभी कभी फिर झूम के सावन बरसता है
पलक झपके यहाँ मौसम बदल जाये
प्यास कभी मिटती नहीं, एक बूंद भी मिलती नहीं
और कभी रिमझिम घटाएँ पीछा करती है

कधी कधी हे मानवी मन सूर्यकिरणांचा उबदारपणा मिळावा म्हणून व्याकूळ होत असते. मग कधी कधी श्रावणसरी चिंब भिजवून टाकतात. या दुनियेत पापणी लवण्याच्या कालावधीतही ऋतू बदलून जातो. क्षणात सुख संपते, परिस्थिती बदलते. जीवनात तृष्णा कधी शांत होत नाही. (एक झाली, की दुसरी इच्छा डोके वर काढतेच.) पाहिजे तेव्हा सौख्याचा एक थेंब मिळत नाही आणि नंतर मात्र कृष्णमेघ बरसतात.

असे हे बेभरवशाचे मानवी जीवन आहे. म्हणून हे मानवा, तू सत्कृत्य करीत जा, असा गर्भितार्थ या काव्यात दडला आहे. अमिताभ यांनी पडद्यावर गायलेल्या काही मोजक्या ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी हे एक गीत आहे. आणि तत्त्वज्ञानही चित्रपटगीतांमधून सांगितले गेले होते, हे दर्शवणारे असे हे ‘सुनहरे’ गीत आहे.

रात्र काळी घागर काळी

गळा मोती एकावळी काळी वो माय...!

काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.

एखादी सभ्य शांत, मराठी मध्यमवर्गीय वस्ती असावी, रेडीयो वाजण्याचे दिवस असावेत, संध्याकाळची वेळ असावी घरात पिवळे बल्ब लावलेले असावेत आणि हे गाणे कानी पडावे. या गाण्याची चालही तशीच, सभ्य आणि शूचिर्भूत. हे गाणं जुन्या प्रेमळ शिक्षकाच्या घरातच जणू काही शोभावे. आता ही विशेषणे गाण्याच्या चालीला लागत नाहीत हे मला ठावूक आहे. पण तरीही हे गाणं ऐकताना असंच वाटतं. या अविस्मरणीय गाण्याविषयी आणखी काही वेगळं वाटत राहतं. ज्यांनी ही रचना केली ते विष्णूदास नामा आणि आपले नामदेव महाराज एकच का हे मला माहित नाही. मात्र ही रचना मला शंकराचार्यांच्या केवलाद्वैताची आठवण करून देते.

केवलाद्वैताची आठवण आली की संस्कृतचे वेदान्ताचे वर्ग आठवतात. वेदान्ताची परीक्षा दिली नाही. कारण तेवढे धाडस नव्हते. पण आम्हाला वेदान्त शिकवणार्‍या प्राध्यापिका डॉ. शकुंतला गावडे यांच्या वर्गात जाऊन बसत असे. तेथे ब्रह्म, माया, अध्यास, साधन चातुष्ट्य, केवलाद्वैत, मध्वाचार्य, निंबार्क, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, विशिष्टाद्वैत सत्य, मिथ्या, विवर्तवाद, सत्कार्यवाद, सांख्य, योग, बौद्धमत यांच्याबद्दल ऐकले. या विषयात रस होताच. पण सुदैवाने माझ्या असंख्य शंकांना शांतपणे, समाधान होईपर्यंत उत्तरे देणार्‍या शकुंतला मॅडमसारख्या शिक्षिका मला लाभल्या.

त्या जुन्या काळच्या शिक्षकांप्रमाणे आपल्या विषयाची चौफेर आणि परिपूर्ण तयारी करून येत असत त्यामुळे त्या वेदान्त शिकवत असताना मला एखादी सस्पेन्स फिल्म पाहिल्याचा फिल येत असे. शंकराचार्यानी कुणाचे मत कसे खोडले त्याबद्दल आधी पूर्व पक्ष मांडल्यावर शंकराचार्य त्याचे खंडन कसे करतात याची उत्सुकता लागून राहात असे. मग एखादे कोडे उलगडावे त्याप्रमाणे त्याचा उत्तरपक्ष त्या सविस्तरपणे मांडत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य जबरदस्त होते. या वेदान्ताच्या वर्गाचा कंटाळा कधी आलाच नाही. "रात्र काळी..." गाणे ऐकल्यावर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आठवल्या.

जगात दिसणार्‍या यच्चयावत गोष्टींमागे एकच एक तत्त्व आहे. आणि मिथ्या याचा अर्थ खोटे असा नसून अशाश्वत हा जास्त योग्य अर्थ अहे हे सांगणार्‍या केवलाद्वैताचे तत्त्वज्ञान यात सांगितले आहे असे वाटत राहते कारण, रात्र, घागर आणि यमुनाजळ या तिन्हींचा रंग काळा आहे. जी सखी पाणी भरायला गेली आहे तिचे बुंथ, बिलवर हे अलंकारही काळे आहेत. तिने नेसलेली वसनेही काळी आहेत.

आणि गाण्याच्या चरम सीमेला संत म्हणतात "कृष्णमूर्ती बहु काळी वो माय". या ओळीत हा अद्वैतप्रवास पूर्ण होतो अशी माझी समजूत आहे. हा काळीमा जणू ब्रह्मतत्त्व आहे. जे चराचराला व्यापून उरले आहे. जीव आणि जगतच नव्हे तर ज्याला आपण सगुण ईश्वर म्हणतो त्यालादेखील त्याच तत्त्वाने व्यापले आहे असेच या अभंगाच्या रचयित्याला म्हणायचे असावे.

साजणी एकलीच पाण्याला जाते आहे अशावेळी तिजसोबत सावळी मूर्ती पाठवा असे संत येथे म्हणतात. म्हणजेच जगात वावरत असताना ईश्वराचे स्मरण असावे, एकलेपणाने वावरू नये. येथे द्वैताचा आधार घेतलेला दिसतो. याचे कारण मानवी मर्यादा हे असावे. प्रत्येकाला सुरुवातीला अद्वैत झेपेलच असे नाही. मात्र हे सांगत असतानाच तात्त्विक दृष्ट्या भेद नाहीच. ज्याला मी माझी स्वामिनी मानतो ती देखील म्हणजेच भगवान कृष्णही काळाच आहे असे संत म्हणतात आणि अद्वैत सूचित करतात असे मला नम्रपणे वाटते.

अतुल ठाकुर


शरद in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 7:19 am

आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !
बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण ( पाणी भरण्याकरिता अनावष्यक पण शृंगाराला आवष्यक असे अलंकार ) बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको ? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. पटत नाही ? पंढरपूरचा विठ्ठल पहा !"
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
अवांतर १. : विष्णुदास नामा म्हणजे म्हणजे आपले नेहमीचे, विठ्ठलाला खीर पाजणारे, जानेश्वरांचे सांगाती, नामदेव महाराज नव्हेत. हे बरेच नंतरच्रे. पण गाथेत याचे अभंग पहिल्या नामदेवांच्या अभंगातच मिसळून टाकले आहेत. "कॉपी राईट" कायदा नव्हता  ना.

Log in or register to post comments


+३ छानच!
4 Oct 2010 -

शरदराव ,
4 Oct 2010 - 10:28 am | रामदास

बरीच वर्षे ही गवळण जाणकाराकडून समजून घ्यावी या प्रयत्नात होतो.
ती इच्छा फलद्रुप झाली.
सुंदर रसग्रहण .भाटकर बुवांनी लावलेली या गवळणीला सुंदर चाल दिली होती.
एकली पाणीया नच जाय साजणी ह्या ओळीला फार सुरेख वळण दिले होते.
आणखी लिहा .तुमचे विवेचन आनंददायक अनुभव आहे.



रात्र काळी.. घागर काळी
मला हे गाणे खूप आवडते. एकदा ऐकून कधीच समाधान होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकलेच जाते.
नंदनने एकदा हे गाणे काहीतरी संदर्भाने माझ्या खरडवहीत लिंकवले होते. तेव्हाही "बुंथ" म्हणजे काय, किंवा गाण्याचा एकंदर अर्थ काय हे लक्षात येत नव्हते. कधीतरी निखिलने तुमच्या उपक्रमावरील लेखाची लिंक दिली होती. तो लेख इथेही प्रकाशित केल्याबद्दल तुमचे, आणि हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.


Friday, October 11, 2019

Amitabh l Priya Prabhudesai

१९७८ / ७९ साल असेल. शोले लागून वर्षे झाली होती. सिनेमा खूप गाजला होता. कधी नव्हे ते बाबा तिकिट्स घेऊन आले. “मारामारी खूप आहे असे ऐकले आहे. मला नाही पाहायचा”
तोपर्यंत सिनेमा पाहायची फारशी आवडही नव्हती.
मिनर्व्हाचा ७० एम एम चा पडदा आणि त्यातून जिवंत होणारी पात्रे , गब्बर, जय, वीरू, बसंती, ठाकूर …पहिल्या दहा मिनिटातच हिंदी सिनेमाशी जे नाते जमले ते जमलेच.
सिनेमाचा शेवट माहित नव्हता ते चांगलेच झाले. जय मरतो हे आधी माहित असते तर मी शोले, पूर्ण न पाहताच निघून गेले असते.
त्या आधी कधीतरी संत ज्ञानेश्वर पहिला होता ज्याच्यात ज्ञानेश्वर समाधी घेतात हे दृश्य पाहून खूप रडले होते.
“ अग , हे सगळे खोटे असते ग “ हे आजीने सांगितल्यावर सिनेमातल्या कोणत्याही ट्रॅजेडीने कधीच रडवले नव्हते ते जयने रडवले. मृत्यू एवढा अस्वस्थ करतो! हा पहिला अनुभव होता. तो इतका सुंदर असतो हे समजण्याचा सुद्धा हा पहिलाच अनुभव. आयुष्यात पहिल्यांदा , कोणी दुसरे मरायला हवे होते असे वाटले खरे. नंतर अनेकवेळा शोले पाहिला पण त्याचा शेवट नाही. प्रत्येकवेळी पाहताना हेच मनात आले, की रमेश सिप्पीचे काय घोडे मारले होते जयने!
त्या न कळत्या वयात “जय”च्या प्रेमात पडले आणि आज जवळजवळ चाळीस वर्षे होतील त्यातून बाहेर पडायची मनाची तयारी नाही.
अमिताभला प्रत्यक्ष पाहीले ते फिल्मफेअर च्या पार्टीत. तेव्हा षण्मुखानंद हॉल मध्ये हा कार्यक्रम असायचा. बाबाना पासेस मिळायचे. डॉन या सिनेमासाठी त्याला उत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाचे निर्माता नरिमन इराणी यांचे निधन सिनेमाच्या अगोदर झाले. अमिताभने हा पुरस्कार त्यांच्या पत्नीच्या हातून स्विकारला. त्यावेळेला अस्खलित इंग्रजी मधून केलेले छोटेसे भाषण आणि त्यांच्या पत्नीकडून पुरस्कार स्विकारण्याचे दाखवलेले औचित्य ह्यामुळे तो अजूनच आवडला.
काही वर्षांनी व्हिडिओ च्या जमान्यात अमिताभचे सर्व चित्रपट पाहीले. जे नवीन ते थिएटर मध्ये पण जे पाहता आले नव्हते ते घरी आणून पाहिले. देश प्रेमी , महान, बेशरम हे त्याला नाही, पण स्वतःलाच शिव्या देत संपूर्ण पाहिले; हा रेकॉर्ड मला दुसरा कोणत्याही नटाच्या बाबतीत जमला नाही. बेकारातला बेकार सिनेमा त्याच्यामुळे सुसह्य झाला.
सलग सात चित्रपटात अपयशी ठरलेल्या नायकाचा दिवार आला आणि अपयशाची भिंत भंगली. दिवार, कस्मे वादे, अभिमान, शोले, त्रिशूल, जंजीर, काला पथ्थर ...एवढ्या सर्व सिनेमांकडे फिल्म फेअर ने पाठ फिरवली. उत्कृष्ट सिने मासिकाला अमिताभ पुरस्कार द्यावा एवढे डोंगराएवढे काम हा माणूस या सिनेमात करून गेला आहे. अमर अकबर अँथोनी च्या पुरस्काराने खरेतर फिल्म फेअरची लाज राखली. नंतरचा जीवघेणा अपघात, मायस्थेनिस ग्रेव्हीसचा आजार, बोफोर्स ची चिखलफेक, राजकारणातले अपयश … आणि कळस म्हणजे ABCLचे दिवाळे .. या सगळ्यातून तो तरला, स्वतःच्या स्वकर्तृत्वावर उजळून बाहेर पडला ह्याचा नुसता लांबून जरी अभ्यास केला तरी नैराश्य हा शब्द बाद होईल.
अमिताभवर पोस्ट नाही तर पुस्तक लिहावे लागेल एवढे काम त्या माणसाने करून ठेवले आहे आणि पंचाहत्तरीत करत आहे. ज्या माणसाच्या आगमनाने हिंदी सिनेमाची मेलडी संपली असा आरोप त्याच्या इमेजमुळे केला जातो , त्याची गीते निवडणे त्यापेक्षा सोपे आहे.
प्रत्येक भारतीयांच्या मनातल्या अँग्री यंग मॅनला जिवंत करणाऱ्या अमिताभला “अभिमान” या सिनेमात गायकाचा रोल साकार करायला मिळणे ही त्याच्या करिअरच्या नजरेतून घेतलेली जोखीमच होती. त्यात त्याला फुकाच्या अहंकाराची काळी कड होती. नवरा बायकोच्या नात्यात, नवऱ्याला वाटणाऱ्या न्यूनगंडामुळे दुरावा येणे ही गोष्ट भारतीय प्रेक्षकाला आवडेल का हा विचार ऋषीकेश मुखर्जी यांनी केला नसावा किंवा असा कठीण रोल आपला हिरो उत्कृष्ट करेल यांवर त्यांचा विश्वास असावा.
यशस्वी गायक असलेला सुबीर कुमार उमाच्या आवाजावर भाळून तिच्याशी लग्न करतो. तिला गाण्यासाठी उत्तेजन देतो.
सुरुवातीला केवळ सुबीर बरोबरच गाण्याचा आग्रह धरणारी उमा , हळूहळू नवर्याच्या संमतीने स्वतंत्र गायिका म्हणून उदयाला येते. शास्त्रोक्त संगीताची बैठक असल्याने आणि अत्यंत मधुर आवाजाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान प्रस्थापित करते. तिचे यश, त्याला स्वतःच्या गायक म्हणून असलेल्या मर्यादांची जाणीव करून देते. आधी मनात आणि मग संसारात दरी निर्माण होते. सूर, बेसूर होण्याची सुरुवात असते ती.
नायक , हा सहज ,खल नायक वाटू शकेल एवढी कठीण भूमिका असूनही , त्याचे बेअरिंग अमिताभने पेलले आहे. त्याचा राग येत असूनही, त्याची कीवही येते. पुरुषाच्या मनातला अहंकार , त्याचे प्रेम असूनही , संसाराला मारक ठरू शकतो याचे परिणामकारक दर्शन अमिताभने या सिनेमात दाखवले आहे.

तेरे मेरे मिलन की ये रैना
नया कोई गुल खिलाएगी
तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना देखो ना,
एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबलेले ते सुरेल जोडपे. त्या संसारवेलीवर आता फुल येण्याची वेळ आली आहे हे किती सूचक पणे सांगितले आहे. सिनेमात हे गीत दोनदा येते. एकदा, जेव्हा ती दोघे एकमेकांत रमलेली असतात. पियानोवर तो गीताची धून तयार करत असतो. शब्द गुणगुणत असतो .. हे गीत त्यांच्या प्रेमाचे प्रतीक बनणार असते.
आणि नंतर त्यांच्या संसाराला त्यांचीच नजर लागते . घरटे मोडून जाते. त्या वादळाने ती मिटून जाते. स्वतःला हरवून बसते. तो आता मात्र भानावर येतो. तिच्या मनाचा थांग त्याला लागत नसतो . त्याच्या मदतीला हे गीत येते .
तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से
जगा के अनसुनी सी धड़कन, बलमवा भर दूंगी तेरा मन
नई अदा से सतायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना
पती पत्नीच्या मनोज्ञ नात्यावर जे काही मोजके चित्रपट आहेत त्यातला हा एक.
मारलेली मिठी हा फक्त प्रेमाचा अविष्कार नाही तर तो भक्कम आधार आहे. प्रेमाचे बंधन आहे. हे फक्त शब्दातून नाहीतर नजरेतून व्यक्त केले आहे अमिताभने.

या जोडीचा अजून एक गाजलेला सिनेमा होता “ मिली “
कॅन्सरची रुग्ण आणि एकाकी माणसाची प्रेमकहाणी. आयुष्य गुंतागुंतीचे जरी असले तरीही हास्याची एक लकेर ते सुसह्य करू शकते हा संदेश घेऊन मिली शेखरच्या आयुष्यात प्रवेश करते. त्याचा भूतकाळ काळा . त्याची काळोखी अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाही. लोकांच्या संशयाने भरलेल्या नजरा आणि स्वतःचा लाजिरवाणा भूतकाळ यात जगणे हरवून बसलेला आहे तो. तिचे निखळ हसू आणि पुढे केलेला मैत्रीचा हात मात्र तो नाकारू शकत नाही. त्या निरागस मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि त्याचा जगण्यावर विश्वास बसतो.
पण तो टिकेल का ? तिच्या आयुष्याचे मोजके क्षण शिल्लक आहेत आता. या सत्याचा आणि त्यातून परत येणाऱ्या एकाकीपणाचा सामना करणे कसे शक्य आहे ? त्याच्या ती रोमारोमांत आहे. मनाच्या अशा कोपऱ्यात रुतून बसली आहे की तिचे नसणे म्हणजे त्याचे अस्तित्व संपणे. तिच्या आठवणी त्याच्या हृदयाच्या ठोक्याशी संलग्न असताना ती त्याला सोडून जाऊच कशी शकते!

आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन
खुशबू लाई पवन, महका चन्दन

आतापर्यंत एकाकी आयुष्य जगायची सवय झालेली असताना , मनाची तयारी सुद्धा असताना ती त्याचा सारा विऱोध मोडून आत शिरली आहे. उध्वस्त मनाने परत एकदा स्वप्ने रंगवायची सुरुवातही केली आहे. त्याच्या नजरेसमोर ती येते ती नववधू बनून. पण मेहंदी रेखलेल्या हातावरील रेषा काही वेगळेच सांगत आहेत! जिस पल नैनों में सपना तेरा आए
उस पल मौसम पे मेंहंदी रच जाए
और तू बन जाये जैसे दुल्हन
आए तुम याद मुझे …

कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयशी ठरलेल्या अमिताभची साथ दिली ती जयाने. ती तेव्हा यशस्वी नायिका होती. सिनेमात तिच्या भूमिकांना प्राधान्य दिले जायचे. अमिताभच्या सिनेमात सशक्त भूमिका करायचा वाव, नंतर फार कमी नायिकांना मिळाला . अभिमान आणि मिली हा अपवाद ठरावा असे सिनेमा नंतर अमिताभने केले. ज्यांनी त्याला अपार लोकप्रियता मिळवून दिली. अँग्री यंग च्या अवताराने मात्र हळव्या प्रेमिकाला मागे टाकले. अमर, अकबर अँथोनी या सिनेमाने आतापर्यन्त हुकलेले फिल्म फेअर मिळवून दिले , आणि वन मॅन इंडस्ट्री चा जन्म झाला.. त्याने या सिनेमात काय केले नाही ! तो नाचला गायला , लढला , हरला , आरशासमोर उभा राहून स्वतःशीच बोलला… आणि परवीन बाबीला पटवण्यासाठी प्रेमाचा जुगार खेळला. हा सिनेमा म्हणजे रोलर कोस्टर राईड होती. त्याच्या जागी कोणताही दुसरा नट असता तर हे मनोरंजन , मूर्खपणा दिसला असता . केवळ अमिताभ म्हणून त्याने हा सिनेमा आपल्या करिष्म्यावर तारून नेला. मनमोहन देसाईच्या ब्रँडने चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवले.

इस्टरची पार्टी. आवडती मुलगी तिच्या बॉडीगार्ड बरोबर आहे आणि नायकाला तिला इंप्रेस करायचे कठीण काम दिलेले आहे. अशावेळी गीताचे सुंदर शब्द आणि चाल नायकाच्या मदतीला येतात पण इथे तेही नाही .
“ My name is Anthony Gonsalvis” असे धेड गुजरी शब्द घेऊन अमिताभ इस्टरच्या अंड्यातून बाहेर पडतो आणि सारा सीन नायिकेसकट खिशात टाकतो.
अभी-अभी इसी जगह पे इक लड़की देखि है
जो मुझे इशारे करती है पर किसी से शायद डरती है
प्यार करेगी क्या डराने वाली
मेरी बनेगी कोई हिम्मत वाली
जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए \-२
रूपनगर प्रेमगली खोली नम्बर चार सौ बीस.
पत्ता चार सौ बीस पण माणूस मात्र शंभर नंबरी सोने निघाला. आज पोरी चेकळायला जॉन इब्राहिमला आहे ती छोटीशी चड्डी सरकवावी लागते. आम्ही सीक्रेटली त्रिशूलमधील पांढऱ्या सुटातील अमिताभ पाहून उसासे सोडले आहेत.
मला अमिताभ -परवीन आणि अमिताभ - झीनत ह्या जोड्या आवडतात. अभिनयात राहूदे, तसेही त्याच्या सिनेमात तोच सबकुछ होता. (बाई असणे फक्त त्याच्या हातात नव्हते … त्याची कमीही लावारीस मध्ये पूर्ण केलीच.) पण दिसण्यात ह्या दोघीही अमिताभला तोडिस तोड होत्या. सणसणीत उंची आणि सोफिस्टिकेशन. ड्रेस सेन्स उत्तम. काहीही शोभायचे.
अमिताभ सुटात शोभलाच पण तोंडात विडी आणि बटन्स सोडलेला शर्ट मधला त्याचा अवतारही लोकांना आवडला. पात्राशी एकरूप होणे त्याच्याइतके कोणालाच जमले नाही. चेहरा रूढार्थाने देखणा नसणे ही देणगीच म्हणावी लागेल. जुर्मानात बड्या बापाचा रईस बेटा या भूमिकेमध्ये तो सहज वावरला. तेवढाच सौदागर मध्ये गूळ विक्या म्हणून ही शोभला.
परवीन सारखीच झीनतची पडद्यावरची इमेज काहीही असो, प्रत्यक्ष आयुष्यात त्या काळी तिच्याएवढी आर्टिक्युलेट बाई नव्हती. कपड्यांची उत्तम समज आणि इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व या गुणांचे हिंदी सिनेसृष्टीत काही मोल नव्हते. पण काही कार्यक्रमांचे तिने केलेले नियोजन मात्र त्याकाळी अतिशय गाजले होते. जिथे तिची वेस्टर्न इमेज दिग्दर्शकानी वापरली, तिथे मात्र ही जोडी खूप गाजली.
द ग्रेट गॅम्बलर हा सिनेमा हा सिनेमा फार गाजला नाही पण “ दो लफ़्ज़ों की है, दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी” हे गीत मात्र लोकप्रिय आहे. सस्पेन्स कॅटेगरी मधल्या या चित्रपटाचे चित्रण कैरो, लिस्बन, रोम आणि व्हेनिस ला झाले. नायकावर पहारा ठेवणे हे नायिकेचे काम आहे . त्याला मात्र तिची खरी ओळख नाही . प्रेम का अंतस्थ हेतूची पूर्तता या चक्रात आहे ती . उद्या नक्की काय होईल ते माहित नाही . माहित असेल तरी थांबवणे हातात नाही
दिल की बातों का, मतलब न पूछो,
कुछ और हमसे, बस अब न पूछो
जिसके लिये है, दुनिया दीवानी
या है मोहब्बत, या है जवानी
मुखवटा तर फाटला जाणार आहे, त्याची खंत आहेच तरीही प्रेम असेल किंवा तारुण्यातील वेड ..जे काय आहे ते उपभोगू का नये असे विचार करून केलेले वेडे साहस .
व्हेनिस ला येणारे भारतीय एकदा तरी ही सैर करतात ती ही जोडी आठवून. सुरुवातीला इटालियन शब्द आहेत. अर्थ तोच , स्वर तेच आणि प्रेमाची परि-भाषा सुद्धा तीच.
अमिताभ -- जया --परवीन --झीनत या प्रमाणेच आणि एक जोडी गाजली ती अमिताभ आणि हेमा ची. तेव्हा हेमा आणि धर्मेंद्र यांचे नातेही ठरल्यात जमा होते म्हणून ही जोडी विवादास्पद सुद्धा झाली नाही. आताही अमिताभ जेव्हा चरित्र भूमिकेत शिरला आहे तेव्हा त्याच्याबरोबर वीर-झारा ,बागबान आणि बाबूल या सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत हेमा फिट्ट बसली. दोघांनाही वार्ध्यक्याने स्पर्श केलेला नाही. अभिनय आणि हेमा , या बाबतीत वाद असू शकतील पण she has aged gracefuly. , So as Amitabh.
सत्ते पे सत्ता या सिनेमात एक गीत आहे “दिलबर मेरे कब तक मुझे, ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूँगा वो, के पल में पिघल जाओगे”
सात भावांपैकी रवी सर्वात मोठा . जबाबदार पण सर्व कुटुंबच जंगली. शहरी रीती रिवाज सोडाच, स्वच्छता , शिस्त या बेसिक गोष्टींचा सुद्धा अभाव असलेले त्यांचे घर. नियती त्याच्या आयुष्यात इंदूला घेऊन येते आणि प्रेम हसते.
“एक दिन आएगा, प्यार हो जाएगा” हा जबरदस्त आशावाद आहे. तिला जिंकण्याचा.
प्रेमात स्वतःला पूर्ण बदलवून तो तिच्याकडे तिचा हात मागतो. अहं , ही याचना नाही. सहा फूट देहाला शोभेल असे च हिम्मतवान मन ही आहे त्याच्याकडे.

दिल से मिलेगा जो दिल तो महकने लगोगे
तुम मेरी बाहों में आ के बहकने लगोगे
होश खो जाएगा, प्यार हो जाएगा
दिलबर मेरे..The best proposal indeed.

दहा ऑक्टोबर नंतर अकरा येतो … तारखेने त्या दोघांची गाठ एका दिवसाने चुकली आहे.
रेखा आणि अमिताभ ही दंतकथा आहे असे मी मानते , लोकांना ती खरी वाटते. 📷:)
मुकद्दर का सिकंदर आणि सिलसिला दोन पर्याय … मी पहिला घेते 📷:)

सलामे इश्क़ मेरी जा ज़रा क़ुबूल कर लो
तुम हम से प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिए

हिंदी सिनेमात प्रेमासाठी कुर्बानी देण्याची प्रथा चंद्रमुखी ने सुरु केली. जोहरा बेगम या भूमिकेत रेखाने चार चांद लावले.
“ भूल कर लो” ही वॉर्निंग मनावर घेतली मात्र अमिताभने …
नको तिथे जीव जडव ही चुकी कितीही सुंदर जादुगरणीने केली तरी चुकी ती चुकीचं.
पडद्यामागे कितीही हृदये जळो , निदान त्याचा धूर बाहेर आला नाही … त्याने काही कबुली दिली नाही .

इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन
सुनके तेरी नज़र डबडबा जाएगी
बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी
मेरा दावा है होठों पे आ जाएगी

ह्या सिनेमात तरी त्याच्या हृदयावर फक्त राखीचा हक्क होता.
मला स्वतःला राखी आणि अमिताभ यांची जोडी अफाट आवडते. कभी कभी , बेमिसाल , बरसात की एक रात, जुर्माना ,कस्मे वादे या सिनेमात प्रियकर प्रेयसी म्हणून ती वावरली. कभी कभी आणि बेमिसाल यात ते प्रेमही अयशस्वी झाले. Maturity आहे या नात्यात. एक प्रगल्भ नाते.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये

प्रेम , विरह , वेगळ्या झालेल्या वाटा , आपापल्या जोडीदाराबरोबर समजुतीने केलेला संसार आणि ती तडजोड छान अंगवळणी पडलेली असताना नियतीने परत खेळलेली चाल …
संयमाची परीक्षा आहे ही !

सिनेमाच्या सुरुवातीला एक कवी गातो हे गीत . एका प्रेमिकाचे हळवे गीत.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं
कभी कभी मेरे दिल में..
बर्फाची थंड चादर बसलेले ते दोघे आपल्या संसाराची स्वप्ने रंगवीत आहेत. निष्पर्ण वृक्षांची सावली कशी मिळणार ! मनातले मनातच राहते आणि कोणा दुसऱ्याच्या शेजेवर हेच गीत म्हणणे तिच्या नशिबी येते.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही
उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही
मैं जानता हूँ , के तू ग़ैर है, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल में...
हे गीत म्हणणारा तो आता मात्र हळवा राहीलेला नाही.
If only हे छोटेसेच दोन शब्द … आयुष्य बदलवून टाकतात …

अभिमान , सौदागर आणि कभी कभी चा नायक …. नायिकेच्या तुलनेत मूल्यांत थोडासा हिणकस असलेला रोल आहे हा. पण अमिताभने जी उंची दाखवली आहे ती पारंपरिक नायकाला जमणे कठीण.

केवळ पंच्याहत्तर वर्षे झाली म्ह्णून अमृत महोत्सव करणारे अनेक आहेत, अमृतासारखी अमूल्य कारकीर्द घडवणारा एखादाच.
श्री. अमिताभ बच्चन यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा.