Sunday, February 23, 2020

पिशी मावशी आणि भुतावळ । विंदा करंदीकर

 उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे....
.........
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई
स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्टर
दोन पोरे लठ्ठत मठ्ठे
पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,
डोक्यावरती हॅट बीट,
तुम्ही फसाल! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय?
नागोबाचा लंबा टाय!
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आले आले थातूमातू ;
हे खाते रोज सातू
जर सातू नसले घरात 
तर बसते नखे खात.
रोज रात्री मांजरावरुन 
हे येते जग फिरुन,
हे भूत आहे मुत्रे,
तरी त्याला भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आले आले अरेतुरे;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.
जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण कारे म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरून
भुते घेतात स्वैपाक करून
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.
किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला पिंपळावरून
एक मुंजा संध्या करून.
त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्तातसारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.
तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करू,
पोथीवाचन झाले सुरू;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले!

- विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के । विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी...
........
जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भुते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढिले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
तुम्ही पेरा तुम्ही कापा
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामध्ये 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
जिकडे टक्के तिकडे टोळी
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त । रोहित कुलकर्णी

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त !*

           *{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी. }*

#Cinemagully
**********************************
*'वक्त'* ... ! या 1965 साली आलेल्या आणि रवी यांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटाच्या नावाला अत्यंत साजेसं असं हे गीत ... आशाताईंच्या 'आशादायक' स्वरातील या गीताचे गीतकार... शायर साहिर लुधियानवी !

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू"* ...
**********************************
      *'वक्त'*.... काळ हा एकाचवेळी अनादि, अनंतही असतो आणि त्याचवेळी तो क्षणभंगूरही असतो !
      'वक्त' ... वेळ ही कधी अगदी सरता सरत नाही आणि कधी तीच वेळ वाळूसारखी ओंजळीतून निसटून जाते तेव्हा हातात उरता उरत नाही !
      वक्त के 'सितम' आणि 'करम' दोन्ही भोगलेल्या साहिरसारख्या शायरने हे सगळं तत्त्वज्ञान इतक्या सहज आणि सोप्या शब्दात सांगितलंय की ते अक्षरशः  'Timeless Classic' होऊन मनामनात रूजलं आहे !
**********************************
*आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू जो भी है, बस यही एक पल है*

      एखाद्या जीवाच्या जिवलगाने सहज खांद्यावर हात ठेवून सांगावं; इतक्या सहजतेने साहिर हे कालातीत सत्य सांगून गेले आहेत ! यातील 'जाने ना तू' हे शब्द खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. कारण या हातातून निसटलेल्या काळावर...क्षणावर जसं आपलं काहीच नियंत्रण नाही, हक्क नाही... तसंच येणाऱ्या वेळेवरही कुठलीच मालकी नाही, विजय मिळवलेला नाही.
      'आपला' म्हणता येईल असा एकच क्षण असतो; तो म्हणजे चालू वर्तमान काळातील चालू क्षण ! आधीच्या क्षणाचा मृत्यू...आणि पुढील क्षणाचा जन्म... यामध्ये खऱ्या अर्थाने 'जिवंत' असलेला एकमेव क्षण...आत्ता श्वास घेत असलेला क्षण ! आपल्याला जे काही करायचंय, जगायचंय, उरायचंय... ते फक्त आणि फक्त याच एका क्षणात... याच एका क्षणासाठी ! "जो भी है, बस यही इक पल है !"
**********************************
*अन्जाने सायों का, राहों में डेरा है*
*अनदेखी बाहों ने, हम सबको घेरा है*

      या सावल्या... काळाच्या असीम मार्गावर आयुष्याच्या वाटेत येणाऱ्या या सावल्या... सुखदुःखांच्या, भावभावनांच्या, जय-पराजयांच्या...तसंच एक सावली जन्माची आणि एक सावली मृत्यूचीही !
      यातील एखादी सावली अथक प्रवासातील शीतल विसावा होऊनही येते, सुखावून... ताजंतवानं करून जाते. आणि एखादी दु:खाची छाया; सगळं जगणंच गोठवून, वठवून जाईल की काय असंही वाटतं.
      पण यातील काहीच आपोआप किंवा उगाच होत नाही. त्या 'नियंत्याला' जरी कुणीच प्रत्यक्ष पाहिलेलं नाही... तरी 'नियती' मात्र तिचं अस्तित्व पदोपदी जाणवून देते. त्याच नियतीच्या हातातले आणि काळाच्या पटावरील आपण सगळेच मोहरे ! ती खेळवेल तसं आणि तोपर्यंतच खेळायचं... "अन्जानी बाहों ने हम सबको घेरा है"
**********************************
*ये पल उजाला है, बाक़ी अंधेरा है*
*ये पल गँवाना ना, ये पल ही तेरा है*

      'छाया-प्रकाशाच्या' या खेळात; त्या स्वच्छ, शुभ्र प्रकाशाने उजळलेले असे किती क्षण येतील, कधी येतील आणि कुठवर टिकून राहतील... हे आपल्या हातात तर नाहीच. मग असा तेजाळलेला क्षण जर आत्ता असेल तर तुही स्वतःला त्या क्षणाच्या हवाली कर, उजळून जाऊ देत या क्षणात आयुष्य !
      पुढच्या प्रवासात जरी कधी अंधार दाटून आला तर निदान हा प्रकाशित क्षण निसटून गेल्याचं दु:ख तरी होणार नाही. उलट त्या आठवणींचे लुकलुकते काजवे; अंधाराचीही शोभा वाढवतील ! म्हणूनच हा क्षण तरी झाकोळू देऊ नकोस... *"ये पल ही तेरा है !"*
**********************************
*जीनेवाले सोच ले,*
*यही वक़्त है कर ले, पूरी आरज़ू*

      'जीनेवाले' ... हा खरोखरच वरवर पाहता साधा वाटला तरी फार महत्त्वाचा शब्द आहे. ज्याला खऱ्या अर्थाने जगायचं आहे, जिवंतपणाची सारी नैसर्गिक लक्षणं मिरवत पुढे जायचं आहे आणि जगण्याची केवळ सक्ती न होता; सोहळा साजरा करायचा आहे; त्यालाच उद्देशून साहिरजींनी ही साद घातली आहे...'जीनेवाले' ... आत्ताच विचारपूर्वक ती समरसून जगण्याची इच्छा पूर्ण करून घे !
*"यही वक्त है कर ले, पूरी आरजू"*
**********************************
*इस पल के जलवों ने, महफ़िल संवारी है*
*इस पल की गर्मी ने, धड़कन उभारी है*
*इस पल के होने से, दुनिया हमारी है*
*ये पल जो देखो तो, सदियों पे भारी है*

      'क्षणभंगूर' म्हणून कायमच हिणवल्या गेलेल्या त्या क्षणाचं...'पल' चं ते क्षणिक असणंही किती लाक्षणिक आहे; हे साहिरजींनी अतिशय सुचकतेने मूर्तीमंत समोर उभं केलं आहे !
      क्षणभंगूरतेलाही...क्षणसुसंगत कसं करता येईल; हा दृष्टीकोन तेव्हाच समजेल जेव्हा सगळ्या आयुष्याची एक स्वानंदी  'मैफल'  करण्याची इच्छा असेल. इथे साहिरजींनी अगदीच नजाकतीने हा  'महफ़िल' शब्द वापरला आहे.... 'जलसा' नाही... 'महफ़िल' !
      जी मैफल  'सोबती काही जीवाचे'  बरोबर असतानाच रंगते, समेवर दाद देते-घेते आणि त्या जीवाभावाच्या सोबतीनेच  'संपन्न'  होते !
      याच क्षणी ह्रदयातून रक्तात मिसळलेला श्वास फक्त आपला आहे. पुढच्या क्षणी तो सुद्धा निरोप घेऊन निश्वास झालेला असेल. जिथे तुझाच श्वासही पुढच्या क्षणी परका होऊन पाठ फिरवणार आहे; तिथे बाकी जग तर परकंच आहे... त्या दुनियेकडून कसली अपेक्षा ! म्हणून तुझ्या या क्षणात जे काही आणि जे कुणी बरोबर आहेत... तेच खरं तुझं विश्व आहे.
      असा हा विश्वरूप दर्शन घडविणारा क्षण जेव्हा साहिर दाखवतात... तेव्हा तो  'सदियों पे भारी है' ... हे अगदी मनापासून पटतं ! मनात पुन्हा पुन्हा त्याच शब्दांचे प्रतिध्वनी उमटत राहतात... *"जीनेवाले सोच ले..." !*
**********************************
*इस पल के साए में, अपना ठिकाना है*
*इस पल के आगे की, हर शय फ़साना है*
*कल किसने देखा है, कल किसने जाना है*
*इस पल से पाएगा, जो तुझको पाना है*

      'उद्या', 'नंतर कधीतरी', 'पुढच्या वेळी',  'आयुष्यात अजून प्रगती केल्यानंतर'..... असे अनेक पुढच्या मृगजळांचे वायदे आपण स्वतःला आणि इतरांनाही नेहमीच करत राहतो.
      जणू काही काळावर विजय मिळवला आहे... अशीच आपली समजूत असते.  पण  'जहा पे सवेरा हो, बसेरा वही है' ... हे विसरतो आपण सगळेच.
      जे या क्षणात नाही, ते पुढच्या क्षणात...काळात असेल असं मानणं ही एकप्रकारे स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक आहे. धुक्यातील धुसर आकृती किंवा ढगातील पोकळ चित्रांचे आकार खरे मानण्यासारखंच आहे हे.
      अर्थात याचा अर्थ माणसाने  'आशावादी'  असू नये; असा नकारात्मक नक्कीच नाही ! उलट  'आशा'  आणि  'अपेक्षा'  यातील फरक समजून घेतला तर संपूर्ण तत्व नीट उमलून येईल.
      जर आपल्याला कधीतरी सावलीची  'आशा'  असेल; तर त्या वृक्षाचं बीज अगदी आजच , आत्ता... चालू क्षणात लावलं पाहिजे... ही त्या 'क्षणाची' अपेक्षा असते आपल्याकडून !
      चालू क्षणाची अपेक्षा आपण पूर्ण केली; तरच तो आपल्या आशा पल्लवित करत राहिल... !

*"जो भी है, बस यही इक पल है !"*

*{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी }*
**********************************

मी एक 'चहा'ता l डॉ. शंतनू अभ्यंकर

मी एक 'चहा'ता 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रिसूत्री होती, 
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा 
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                               
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं. 
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. आम्हां चहाबाजांच्या घड्याळात चार वाजत नाहीत, चहाच वाजतात. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घरचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा असं यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच! 
  …आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. अशा  आनंदाच्या उकळ्या फुटल्यावर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यंत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्यासरशी गिळणारी मंडळी पाहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर काटा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे. 
टी टाईम ही पंचेंद्रीयांनी अनुभवायची वेळ आहे.  चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो. मग तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी!  चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून, गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वयात तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चहाते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल. 
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे. 
सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होतं. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं न पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. ‘असा तीर्थासारखा वारंवार घेतलेला चहा उन्हाळ्यात शीतकारक असतो’, असे चरकमुनी (जर चहा पीत असते तर) म्हणाले असते. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच. सवाष्ण बायका जसं कुंकवाला नाही म्हणत नाहीत तसं हे कधी चहाला नाही म्हणत नाहीत.   
 शिवाय चहात्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. शंभर पासून शून्यापर्यंत वेगवेगळ्या तापमानचा चहा आहे. त्यामुळे   ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फयुक्त, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, ‘वामांगी कॉफीबाई दिसे दिव्य शोभा’, असा  रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय असा  बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे, मैत्रिणीबरोबरचा पहिलावाहिला,  नवथर, मितभाषी,  चहा आहे आणि मित्रांच्या मैफिलीतला चहाटळ चहा आहे. शिवाय या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे. घोटभर चहा बरोबर इराण्याकडे पोटभर गप्पा फ्री मिळतात.      
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात, तरंगत, तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. चहा पकवण्यात जे सुख आहे ते चहा खपवण्यात नाही, हे त्याला  उमजलेलं असतं.   इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा, चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराने छू मंतर करावे  तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते मंतरलेलं पाणी सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा तामसतीर्थाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काही ना काही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यायलाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. पोटातले कावळे देखील उपाशी ओरडून ओरडून  गप्प झालेले असावेत.  मग कधीतरी, उतरत्या कातरवेळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. मांडी ठोकावी. आपोआप पाय चेपले गेल्यानेच ते दुखत होते याची जाणीव व्हावी.  आता  चार बिस्किटे घेऊन  एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. कषायपेयपात्रपतित बिस्किटाचा तुकडाही मखमाली चिमटीने तोंडात टाकावा.   डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल. 
चहा हे फार महत्वाचं पेय आहे. त्याचा आदर करा. चहा आणि पोहे न घेता लोकांची लग्नं  कशी ठरली असती? चहा नसता तर किरिस्तावांच्या घरी चहा आणि भिस्कुटे खाण्याबद्दल लोकमान्यांना माफी मागावी लागली नसती. चहा नसता तर   फिल्मवाल्यांना  सगळी चहाच्या मळ्यातली गाणी उसाच्या मळ्यात चित्रित करावी लागली असती. चहा नसता तर  सरकारी सेवकांनी चहापाण्यासाठी चिरीमिरी कशी बरं मागितली असती? चहा नसता तर लांबून नुसतं बोट वर करताच कँटीनवाल्यानं आपल्याला काय आणून दिलं असतं बरं?  जाऊ दे. नकोच ते.  बिनचहाच्या जगाची कल्पनाही करवत नाही. 
कुणीतरी म्हंटलंच आहे   
                                               
आहे चहा तंवर प्या चहा,   
नाही चहा तर नुसतंच अहा,                                                 
हा हा हा; हा हा हा!!!
(शेवटचं हा हा हा हे हास्य माझे आहे. ही फालतू कविता वाचण्याबद्दल मी तुम्हाला हसतोय.)

Tuesday, February 18, 2020

जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल। चारुदत्त

[07/02, 4:41 am] Charudatta: मित्रांनो,  "जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल' हे  गाणे सर्वांनाच आवडते, 'गुलामी' चित्रपटातील गुलज़ार यांनी लिहिलेले हे गीत अशीच याची ओळख, पण मुळात हे गाणे ७०० वर्षापूर्वीचे आहे, १४ व्या शतकात अमीर खुसरो यांनी हे लिहिले आहे, इतकी वर्ष या गाण्याने अनेक पिढ्यांना भूरळ पाडली आहे, विशेष म्हणजे सांगितले तर आश्चर्य वाटेल पण हे गीत म्हणजे हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या संम्मीलनाचे आगळे वेगळे प्रतीक आहे, कारण हे गीत दोन भाषेत आहे, फ़ारसी आणि ब्रज या त्या दोन भाषा, मूळ गीतातील पहिले कडवे फ़ारसी भाषेत आहे तर दुसरे अस्सल भारतीय अशा ब्रज भाषेत, ७०० वर्षांपूर्वी काही कलावंत दोन भिन्न संस्कृतीला भाषेच्या सहाय्याने एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करीत होते, त्याअर्थी या गीताचे मोल अधिक आहे, अनेक ख्यातनाम गायकांनी हे गीत गायले आहे, नव्हे त्यांना तो मोह आवरला नाही इतके ते अप्रतीम आहे ! सोबत सम्पूर्ण मूळ गीत देत आहे, नक्की वाचा ! 

                  

"जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल, 

 दुराय नैना बनाय बतियाँ। 

किताबे हिज्राँ, न दारम ऐ जाँ, 

न लेहु काहे लगाय छतियाँ।। 

शबाने हिज्राँ दराज चूँ जुल्फ बरोजे वसलत चूँ उम्र कोताह। 

सखी पिया को जो मैं न देखूँ तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ। 

यकायक अज़दिल दू चश्मे जादू बसद फरेबम बवुर्द तस्कीं। 

किसे पड़ी है जो जा सुनावे पियारे पी को हमारी बतियाँ 

चूँ शम्आ सोजाँ, चूँ जर्रा हैराँ, हमेशा गिरियाँ ब इश्के आँ माह। 

न नींद नैंना, न अंग चैना, न आप आये न भेजे पतियाँ।। 

बहक्के रोजे विसाले दिलबर के दाद मारा फरेब खुसरो। 

सपीत मन के दराये राखूँ जो जाय पाऊँ पिया की खतियाँ।   

        - अमीर खुसरो 
[07/02, 4:41 am] Charudatta: लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवून, निरनिराळ्या कहाण्या रचून
माझ्या ह्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करण्याचा तुझा प्रयत्न मला कळतो आहे!

( खरे तर ही माझी अवस्था तुझ्या विरहामुळेच झाली आहे!)

प्रिये , माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होत आहे,
अशा स्थितीत तू मला हृदयाशी का कवताळत नाही आहेस?

तुझे लांब कुरळे केस म्हणजे जणू विरहाच्या प्रदिर्घ रात्री
आपल्या मिलनाचा वेळ जवळ जवळ काहीच नाही!

सखी प्रिया ची साथ नसेल तर ह्या  अंधाऱ्या रात्री कशा बरे कटतील?
तुझ्या शेकडो विभ्रमांनी माझी आधीच दुर्दशा झाली आहे!

कोणाला माझी  इतकी काळजी पडली आहे,
जो माझी अवस्था प्रियेला जाऊन सांगेल!

एखाद्या मिणमिणत्या पणती प्रमाणे,
मी प्रेमाच्या वण्यव्यात भटकतो आहे!

बैचेन मन , थकलेली काया,
ती येत नाही,तिचा निरोपही येत नाही!!

ती मला एकदा तरी भेटावि ह्या आशेनं मी व्याकुळ आहे,
ती तुला खूप काळ नुसती झुलवत आहे खुसरो!!

हे शापित जीवन मी असाच जगत राहीन,
कारण कधीतरी मिलनाची वेळ येईल अशी आशा आहे !!!

अनुवाद- चारुदत्त

Tuesday, February 11, 2020

बाबा आमटे। विकास आमटे

*बाबा आमटें* ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा...

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

१९९९ सालचा जानेवारी महिना. त्या दिवशी तापमान असेल ५-६ डिग्री सेन्टीग्रेड. बाबांचा पोशाख मात्र नेहमीचाच. खादीची बनियन आणि चड्डी. कंबरेला पट्टा. *पंतप्रधान अटलजी* मला बाजूला घेत म्हणतात,

_‘‘विकास, तेरे बाप को ठंड नहीं लगती क्या?’’_

मी त्यांना म्हणालो, _‘‘नहीं अटलजी, ये पैलवान आदमी है!’’_

पुढे बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला. भारताने नुकतीच पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. अणुकार्यक्रमाचे जनक *डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम* या पुरस्कार सोहोळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यादरम्यान त्यांच्याकडे जात बाबांनी त्यांना सुनावलं,

*_‘‘Dr. Kalam, we don't need bombs, we need toilets! ‘National Highways’ have become national toilets! If you say we are a nation of Mahavir, Buddha, Guru Nanak and Gandhi, we don't need bombs!’’_*

डॉ. कलाम अचंब्याने पाहतच राहिले! (आजच्या परवलीच्या *‘स्वच्छ भारत अभियाना’*ची नीव बाबांनी कधीच रचली होती.)

_‘मेरा बाप पैलवान आदमी था..’_ असं मी कायम म्हणतो याचं कारण- जसे बाबांनी अनेक प्राणघातक हल्ले, अपघात, आजारपणं पचवली, तशी त्यांनी विधायक कार्य असो वा संघर्ष- ‘ठाम भूमिका’ ही घेतलीच. त्यांनी कधीही कचखाऊ धोरण अवलंबलं नाही. त्यामुळे बाबांचं शारीरिक अस्तित्व संपल्यानंतर माणसं रडली निश्चित; पण खचली मात्र नाहीत.

ब्लड कॅन्सरशी लढता लढता बाबांनी ९ फेब्रुवारी २००८ ला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या या अखेरच्या आजारपणात रात्रीचा दिवस करत उपचार करणारे डॉ. विजय पोळ आणि विलास मनोहर त्यावेळी बाबांसोबत होते. बाबांची मनोभावे सेवा करणारे देवानंद सलामे, कमल उमरोटकर होते. इंदू, रेणुका, मी आणि भारतीही आनंदवनातच होतो. प्रकाश-मंदा लोकबिरादरी प्रकल्पावर. आमची पोरं बाहेर होती.

रात्रीपर्यंत सर्वजण आले. तो पूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा बाबांना बघण्यासाठी लोकांची रीघ कायम होती. दोन किलोमीटरची माणसांची रांग. कुठलाही आवाज नाही. फक्त बाबांना बघून हात जोडण्याची आस असलेली, सर्वदुरून आलेली ही माणसं. हजारोंची गर्दी लोटली होती.

केळीच्या पानात गुंडाळून आणि वरनं मीठ टाकून आपलं दफन केलं जावं, ही बाबांची इच्छा होती. त्याला दोन वैज्ञानिक कारणं होती. बाबा म्हणत, *_‘‘एका मृतदेहाचं दहन करायला जेवढी लाकडं लागतात तेवढ्यात हजार माणसांचा तीन-चार दिवसांचा स्वयंपाक होऊ शकतो!’’* (हा विचार अहमदाबादच्या ‘सद्विचार परिवारा’ने रुजवला होता. म्हणून बाबा-इंदूने त्यांचे फॉर्म्स भरत दहनाऐवजी दफन जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं.)_

दुसरं म्हणजे _‘पशूपंछी भोजन करे, तन भंडारा होएँ’_ या संत कबिरांच्या दोह्याप्रमाणे, मर्त्य शरीरावर पशुपक्ष्यांचा, किड्यामुंग्यांचा अधिकार असतो. तेव्हा मृतदेह त्यांच्या हवाली केला जावा; जेणेकरून हे शरीर भंडाऱ्याप्रमाणे विरून जाईल! त्याप्रमाणे बाबांच्या देहाचं दफन केलं गेलं. ही तीच अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिलेची जागा- जिथे बाबांच्या जिवाला जीव देणारे त्यांचे शेकडो कुष्ठमुक्त सोबती वास करत होते.

९ फेब्रुवारी काय किंवा १० फेब्रुवारी- आनंदवनाला सुट्टी नव्हती. त्या दिवशीही काम सुरूच होतं. पॉवरलूम्स तशाच धडधडत होत्या. हातमाग खट्खट् आवाज करत चादरी-टॉवेल्स विणत होते. वेल्डिंग मशीन्स चरचर आवाज करत जोडणी करत होत्या. आनंदवन थांबलं नव्हतं.

२०१४ हे बाबा आमटेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष कसं ‘साजरं’ करणार, याबाबत नेहमीच कुणी ना कुणी विचारत. अशी विचारणा करणाऱ्यांना मी सांगत असे की, आनंदवनात साजरं होतं ते *‘कार्याचं गुणात्मक विस्तृतीकरण’!* समाजातील जास्तीत जास्त दुर्बल घटकांपर्यंत कार्याचा विस्तार हाच आमच्यासाठी सोहोळा. आनंदवनाच्या इतिहासात कधी कुणाची जयंती, पुण्यतिथी साजरी झाल्याचं मला स्मरत नाही. आणि भविष्यातही असं होणं नाही.

*बाबा आमटे* या व्यक्तीशी किती माणसं जोडली गेली होती याचा प्रत्यय आम्हाला ते गेल्यानंतर आला. बाबांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सुमारे तीन लक्ष तारांचा खच आनंदवनात पडला! अक्षरश: पोती भरभरून तारा येत होत्या.

असं काय होतं बाबांमध्ये ज्याने ही माणसं त्यांच्याकडे ओढली गेली आणि कायमची जोडली गेली? यात जशी राजकारण, प्रशासन, उद्योग, कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान-तंत्रज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांतली नावाजलेली मंडळी होती, तशीच देश काय आणि विदेश काय, समाजातल्या प्रत्येक स्तरातली लाखो सर्वसामान्य माणसंही होती. या अनुषंगाने मला काही छोटे-मोठे प्रसंग आठवतात ते सांगतो...

ते बहुधा १९५९ साल असावं. जबलपूरच्या ‘नवभारत’ दैनिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करणारी *चंद्र मोहन जैन* नावाची एक व्यक्ती आनंदवनात येते आणि काम बघून प्रभावित होत बाबांना म्हणते,

_‘‘बाबा, आपके हाथों को सेवा कि खुशबू आती है.’’_ परत जाऊन जैन ‘नवभारत’मध्ये बाबांबद्दल विस्तृत लेख लिहितात. या लेखावरून जैन यांचा दैनिकाच्या मालकाशी वाद होतो. मालक म्हणतात,

_‘‘तू माझं दिवाळं काढणार! राजकारण, हत्या, भानगडी यांच्या बातम्या सोडून असे विधायक कार्याविषयीचे लेख छापून आले तर माझं दैनिक लवकरच बंद पडेल.’’_

यावर जैन उत्तरतात, _‘‘जगात खून, आत्महत्या, अत्याचार यांव्यतिरिक्त चांगल्या गोष्टीही खूप घडत असतात. बाबा आमटेंनी आपलं आयुष्य कुष्ठकार्यासाठी वेचलं आहे. या माणसाचं काम सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. बाबा आमटेंविषयी छापल्यामुळे दैनिकाचं सक्र्युलेशन वाढणार नाही हे मला माहिती आहे. पण काळजी नसावी. मी बाहेर पडतो. तुम्ही तुमचं सक्र्युलेशन वाढवा,’’_ असं म्हणत तत्क्षणी ते आपला राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकतात.

*हीच चंद्रमोहन जैन नावाची व्यक्ती पुढे जाऊन सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारक बनते... ज्यांना आपण सर्व ‘रजनीश-आचार्य- भगवान- ओशो’ म्हणून ओळखतो.*

जेआरडी टाटांना बाबांविषयी प्रचंड स्नेहादर होता. मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान बाबा मुंबईला असताना जेआरडींनी त्यांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, _‘‘मी आनंदवनाला काय मदत करू शकतो?’’_

बाबा उत्तरले, _‘‘मी आपला ऋणी आहे. पण आनंदवनाला मदतीची गरज नाही. उलट, समाजाने नाकारलेल्या ज्या माणसांच्या कष्टांतून आनंदवन उभं राहिलं आहे, त्यांच्यात आज समाजातल्या मूलभूत समस्यांवर मात करण्याची जिगर आहे!’’_

२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

_‘‘क्या है?’’_ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!

चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, _‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है?’’_

मला झेपलंच नाही. मी म्हणालो, _‘‘जी हाँ, क्यूं नहीं?’’_

गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, _‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत!’’_

हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो.

एवढ्यात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, _‘‘आईये.’’_ *दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता!*

आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढयात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले!

मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, _‘‘ये आपने क्या किया?’’_

मला जवळ घेत ते म्हणाले, *_‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना!’’_*

मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक *विजयकुमार चोपडम* पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात,

*_‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे!’’_*

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि _‘का अडवली?,’_ असं विचारलं की म्हणत,

*_‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’_*

यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली.

इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत,

*_‘‘Great heroes of history are nothing to me. The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life...’’_*

याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा *‘साधा’* माणूस होता, सर्वासाठी _‘Accessible’_ आणि _‘Approachable’_ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता.

न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण *_‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे,’_* असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, *_‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढया सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं.’’_*

एकूणात काय, तर _‘देव’_ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं.

बाबा आमटे हा _‘घाईतला’_ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता.

_‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे,’’_ असं ते म्हणत.

बाबांना *‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढ्य इंजिन’* असं संबोधणाऱ्या *कवी कुसुमाग्रजांनी* बाबांवर *‘संत’* नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

_सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात..._
_भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या_
_विराट वृक्षावर_
_अपराजित कुऱ्हाड मारणारा तू -_

_वणव्याच्या समोर_
_घनघोर पाऊस होणारा_
_दु:खाच्या समोर_
_फक्त निर्भेळ माणूस होणारा_

_दुबळ्या दयेच्या चिखलातून_
_माणुसकीला बाहेर काढणारा तू -_

_अरे आम्ही आहोत असे करंटे_

_की आमच्या पेठेत लागतात पताका_
_फक्त मंत्री आले तर_

_सोनेरी अंबारीचे ऐरावत_
_जेव्हा रस्त्याने झुलू लागतात_

_तेव्हा आमचे हिशेबी हात_
_जुळून येतात छातीवर_

_आणि तुझ्यासारखे संत_

_ऐहिकाच्या प्रपंचातील_
_ईश्वरी अंशाचे रखवालदार_
_निघून जातात_
_गस्त घालीत अंधारात_

_उद्ध्वस्त मनांच्या मोहल्ल्यातून_
_आसवांच्या दलदलीतून_
_दु:खानं उसवलेल्या दुनियेवर_
_अमृताचं सिंचन करीत..._

_हे यात्रिका,_
_विस्कटलेल्या शरीरांचा_
_चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन_
_तू तुझ्या मार्गानं जा_

_मागे वळून पाहू नकोस_

_जो हिशेब कधी केला नव्हतास_
_तो यापुढेही करू नकोस_

_तुला साथसोबत आम्ही करणार नाही_

_आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश_
_तुझ्या रात्रीवर पडणार नाही_

_तुझ्या अलौकिक वेदनेसाठी_
_आम्ही रडणार नाही_

_आमच्या जयघोषांच्या जमावातही_
_तू राहणार आहेस एकटा_

_दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा_
_अगदी एकटा_

_पण असेच एकाकीपण_
_लाभले होते ख्रिस्ताला_

_ज्याच्या हाताचा ठसा_
_मला दिसतो आहे तुझ्या हातावर_

_असेच एकाकीपण_
_लाभले होते बुद्धाला_

_ज्याच्या प्रज्ञेचे किरण_
_मला दिसताहेत तुझ्या पथावर_

_हीच तुझी सोबत_
_आणि हेच तुझे संरक्षण..._

_‘जेथे जाशी तेथे.._
_तो तुझा सांगाती_
_चालवील हाती- धरोनिया..’_

🙏🙏🙏

~ *विकास आमटे*
vikasamte@gmail.com

forwarded as received

Friday, January 10, 2020

मॅटीनी

*मॅटीनी*                        

परवा एका फॅमिली गेट टूगेदरला 'मॅटिनी' शब्द ऐकला आणि पन्नास वर्षांपूर्वीच्या काळा (१९७०-७१) च्या सुमारास पोहचलो.                                    

मल्टिप्लेक्स हे नावही कोणी ऐकले नव्हते. पण नवीन चित्रपट एका पेक्षा जास्त थिएटर्स मधे लागत होते. पुण्यात कोणताही नवीन चित्रपट लागायचा तेव्हा एक मुख्य थिएटर असायचे आणि तेव्हा नुकत्याच विकसित झालेल्या उपनगरांमधील थिएटरमध्येही तो लागायचा. मुख्य थिएटरमध्ये दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ असे तीन शो दाखवले जायचे. दुपारी बारा वाजताच्या शो ची वेळ - मॅटीनी शो साठी - मुद्दाम जुन्या सिनेमासाठी राखून ठेवली जायची. उपनगरांमधील थिएटरमध्ये मात्र दुपारी बारा वाजता मॅटीनी शो च्या वेळीही नवीनच सिनेमा दाखवीत असत.           
दुपारी बाराचा मॅटीनी शो हे जादूभरे शब्द होते. मॅटीनी शो ची मोहिनी जबरदस्त होती. त्या काळी ५ ते २५ वर्षे जुने असलेले चित्रपट म्हणजे साधारण १९४५ ते १९६५ या काळातील चित्रपट मॅटीनीला दाखवले जायचे. त्यामुळे या मॅटीनी शो ला अबाल वृद्धांची गर्दी असायची. तेव्हाची प्रौढ पिढी ५०/५५ वयाची अंदाज, बरसात, अनारकली,  बैजूबावरा, बाझी, नागिन वगैरे चित्रपटांना गर्दी करून आपल्या तेव्हाच्या आठवणी ताज्या करीत असे. साधारण ३०/४० वयोगटातील पिढी पेईंग गेस्ट. मधुमती. अनाडी. तुमसा नहीं देखा मधील गाण्यांवर ताल धरण्यासाठी, उजाला, शरारत मधील "मोरा नादान बालमा" "तेरा तीर ओ बे पीर" गाण्यांवरील कुमकुमच्या डान्स वर शिट्ट्या मारायला या चित्रपटांच्या वार्या करीत. नंतरची नवीन पिढी एक मुसाफिर एक हसीना, चायना टाऊन, जंगली, मेरे मेहेबूब, राजकुमार, हम दोनों या चित्रपटांवर फिदा होती. देव आनंद, शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार हे मॅटीनी आयडॉल होते. त्यांचे चित्रपट मॅटीनी शो ला गर्दी खेचत असत.                               

या मॅटीनीला आणखी एक प्रेक्षक वर्ग होता. तो म्हणजे वाड्यातील १४/१५ जणांचा निरनिराळ्या वयांच्या व्यक्तींचा पण एकत्र असलेला कंपू. वर्षातून पाच वेळा तरी हा कंपू एकत्र यायचा. एकदा नदीला पाणी आले की ते पहायला लकडी पुलावर (आताचा संभाजी पूल - तेव्हा पुण्यात नदीवर तीनच पूल होते लकडी पूल नवा पूल आणि संगम ब्रिज) हा कंपू जाणार. दुसरे म्हणजे वाड्यातील जो कोणी (अकरावी) मॅट्रिकला असेल त्याला बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी डबा घेऊन भेटायला हा कंपू जाणार. (तेव्हा एका दिवसात अकरा ते दोन आणि तीन ते सहा असे दोन पेपर असत. त्यामुळे या परीक्षार्थीला मधल्या वेळात डबा देत असत) तिसरे म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत दुपारी चार वाजता जाऊन भरपूर खेळणार आणि भेळ खाऊन रस पिऊन घरी येणार. चौथी वेळ म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत शनिवार /नारायण पेठेतून वाड्यातूनच डबे घेऊनच निघून अरण्येश्वर पद्मावती किंवा विठ्ठलवाडी पर्यंत पायी जाऊन दिवस भराची ट्रीप एन्जॉय करायचा. हाच कंपू वर्षातून एकदा मॅटीनीला जात असे. काका काकू मावशी दादा ताई मुले सर्व असल्याने जागृती. चलती का नाम गाडी. 'भाभी', 'छोटी बहन' यासारखे चित्रपट निवडले जात.                              

युवकांमध्ये मॅटीनीचे वेड जास्त होते. मधुबाला मीना कुमारी माला सिन्हा शकीला साधना यांच्या चित्रपटांना तर तोबा गर्दी होत असे. शिवाय मॅटीनीचे तिकीटाचे दरही कमी असत.
जुने सिनेमे पहायला भाग्य लागायचे. आज केव्हाही नेटवर हवा तो सिनेमा पाहता येतो. तेव्हा तसे नव्हते. "आहें ना भरी" ही हिंदी सिनेमातील पहिली कव्वाली ज्या मधे होती आणि नूर ए तरन्नुम नूरजहाँ नायिका होती (आंधियां गमकी यूं चली) तो "झीनत" नावाचा सिनेमा माझ्या आठवणीत फक्त एका रविवारी मॅटीनीला एका शो पुरता विजयानंद ला दाखवला होता. तोपर्यंत नूरजहाँचा एकही चित्रपट पाहिला नव्हता. अर्थातच ती संधी आम्ही सोडली नाही हे वेगळे सांगणे नलगे । पण सांगायची गोष्ट अशी की हे फक्त मॅटीनी मुळे  शक्य झाले.                                 

मॅटीनीला जायचे ठरवणे हा एक प्रोग्रामच असायचा. चार पाच जणांचे टोळके त्यावर चर्चा करीत. "परवा कुठला टाकायचा?"  कोणी तरी विषयाला तोंड फोडत असे. "असली नकली" ला जाऊ. कोणी तरी 'आपली आवड' सांगायचा. ('तेरा मेरा प्यार अमर' गाण्यातली साधना पुन्हा एकदा पाहण्याचा मोह त्याला झालेला असायचा. तेव्हा सिनेमा शिवाय गाणे पाहण्याची दुसरी काहीच सोय नव्हती). तिसरा म्हणायचा 'दिल देके देखो' ला चला यार शम्म्याला बरेच दिवसात पाहीले नाही. आता हा ठराव पास होणार तेवढ्यात एक जण म्हणायचा "हे सगळे नंतर बघता येतील." निशात "ला" बावरे नैन "लागला आहे तो बघू." बाकीचे सगळे प्रश्नार्थक चेहरे करतात. तो पुढे स्पष्टीकरण द्यायचा "अरे मुकेशचे तेरी दुनिया में, खयालों में किसी के, राजकुमारी चे सुन बैरी बलम गाणी आहेत त्यात. आणि राज कपूर हीरो आहे आणखी काय हवे?" मंडळींना त्याचे म्हणणे पटायला लागले असते पण थोडे साशंक असतातच. पण तो संशय  दूर करण्यासाठी "आणि पिक्चरमध्ये गीता बाली नऊवारी मध्ये आहे बरं का " असे तो शेवटचे अस्त्र काढतो. लगेच 'बावरे नैन' वर शिक्कामोर्तब होते आणि रविवारी अंमलबजावणी होते.        
दुसऱ्या ग्रुपला वेगळीच चिंता लागलेली असायची. फण्डस ची! पक्या म्हणायचा "विष्ण्या, (याचे खरे नाव सुधीर) च्यायला, खूप दिवसात लेका तू पिक्चरची सोय केली नाहीस. यावेळी काही तरी कर". (जुन्या नोटा चलनातून बाद होतात तसे च्यायला, लेका हे शब्द बाद होत आहेत.) तो देखील ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे स्वीकारून "बघतो. करतो काही तरी" असे आश्वासन द्यायचा. (ही वेळ प्रत्येकावर कधी तरी यायचीच). रविवारी सकाळी अकरा वाजता आळीच्या तोंडाशी पारावर ग्रुप त्याची वाट बघत बघायचा. खिशात हात घालून शिट्टी वाजवत येणारा विष्ण्या दिसला की काम फत्ते झाले हे कळायचे. "कुठून जुगाड लावलंस रे?" कोणाची तरी उत्सुकता बाहेर पडायचीच. "होती घरात तीन महिन्यांची रद्दी. आपलं काम झाले. ठरवा कुठे जायचं आहे ते." उत्तर मिळायचं "ठरवा काय? बंड्या गेलाय आधीच लायनीत नंबर लावायला " मग सर्व मंडळी आधीच ठरलेल्या "चौदहवीं का चांद" पहायला जायची.                                       

तेव्हाच्या तरूणीही मॅटीनीला जाण्यात मागे नव्हत्या. चार पाच मैत्रिणी प्रत्येकीच्या घरी जाऊन तिच्या आईला "काकू आम्ही सिनेमाला जातो ना. संध्या सुनंदा शैला सगळ्यांच्या आईनी परवानगी दिली आहे. तुम्ही पण रंजनाला पाठवा ना" असं सांगून सर्व आयांची परवानगी घेत. सिनेमाला जायचे ठरले, सिनेमा, थिएटर सर्व ठरले आता प्रश्न एकच. "एवढ्या गर्दीत तिकिटाच्या लायनीत तास भर उभे राहून तिकीट कोण काढणार? मग त्यातली रंजना - म्हणजे माझी ताई - मला म्हणायची, "आम्हाला तिकीटे काढून दे ना" मग मी - इयत्ता दहावी - पांढरा शर्ट खाकी हाफ पॅन्ट मधे खोचून ताईने दिलेले सहा रुपये संभाळत थिएटर मध्ये तिकीटांच्या लायनीत तास सव्वा तास आधीच जाऊन उभा रहायचो. त्यातून ग्लोब (श्रीनाथ) किंवा मंडईतले मिनर्ह्वा (आता वाहनतळ) थिएटर असले तर विचारूच नका. तिकीट खिडकी पर्यंत जाण्यासाठी संपूर्ण लायनीलाच लाकडी खुराड्यातून जावे लागे. पावणे बारा वाजता ताई आणि तिच्या मैत्रिणी आल्या आणि माझ्या कडून तिकीटे मिळाली की माझी रवानगी घरी व्हायची. "मैत्रिणींमधे तू कशाला?" म्हणून मला कन्नी दिली जायची.  तिच्या साठी मेरे सनम, तीसरी मंजिल ची तिकीटे काढलेली पक्की लक्षात आहेत. पण पुढे आणखी मोठे झाल्यावर याच ताईने मला मॅटीनीलाच नेऊन मिस मेरी, शबाब आणि नई दिल्ली हे सुंदर चित्रपट दाखवले हे ही तितकेच खरे!                           

'नव्या ओळखी' करण्यासाठी मॅटीनी तिकिटांची लाईन हे एक व्यासपीठ होते. एखाद्या मुलीला हेरून एखाद्या दिवशी थिएटर मध्ये तिला लायनीत उभे राहिलेले पाहून तेव्हाची सर्व कामे विसरून तो मॅटीनी शो पाहणारेही काही वीर होते. तसेच स्त्रियांच्या रांगेत उभे असलेल्या हव्या त्या मुलीला "मिस, एक्सक्यूज मी पण जेन्टस लाईन फारच मोठी आहे. तिकीट मिळेल असे वाटत नाही. प्लीज आमची दोन तिकीटे काढता का?" असं म्हणून तिच्या हातात पैसे देणारे वीरही होते. आणि त्यात जर पलीकडून प्रतिसाद मिळाला तर मग काय- बहार ही बहार!          

या नवीन झालेल्या ओळखी वाढवण्यासाठीही मॅटीनी फार उपयोगी पडत. 'कोहरा', 'आरती', 'बात एक रात की' वगैरे चित्रपट मॅटीनीला लागत, पण रविवार आणि सुटी सोडून इतर दिवशी त्यांना फारशी गर्दी नसे. त्यामुळे असे चित्रपट, झालेल्या ओळखी वाढवण्यासाठी सोईस्कर असत.                                          

मॅटीनी वरून एक गंमत आठवली. घरी पाहुणे आले होते. वडीलांना रात्रीच्या शो ची तिकीटे काढून आणायला सांगितले होते कारण थिएटर त्यांच्या अॉफीस जवळ होते. संध्याकाळी साडे पाच वाजता ते आले आणि मला तिकीटे दिली. तिकीटे पाहून मी चुकलो. "काका ही तर संध्याकाळी साडे सहाच्या शो ची तिकीटे आहेत. तेही गोंधळले, म्हणाले, "अरे पण मी तर सेकंड शो चीच तिकीटे मागितली होती." 
मग मी म्हणालो "काका दुपारी तीन चा शो पहिला, संध्याकाळी सहाचा शो दुसरा आणि रात्रीचा शो तिसरा असतो "ते म्हणाले" असं होय?  आमच्या वेळी संध्याकाळी पहिला आणि रात्रीचा शो दुसरा असायचा "मग सर्वांनी धावपळ करत संध्याकाळी साडे सहाचा शो गाठला आणि सुरूवाती पासून पूर्ण पाहीला. हेमा मालिनी चा "मीरा". पण उत्सुकता म्हणून मी काकांना विचारले" मग दुपारच्या शो ला तुमच्या वेळी काय म्हणायचे?"
त्यांचे उत्तर होते "अरे तो मॅटीनी शो असायचा".                                 

काळ कसा बदलत गेला. वडिलांच्या वेळी दुपारी मॅटीनी संध्याकाळी पहिला रात्री दुसरा शो होता. नंतरच्या काळात दुपारी बारा वाजता मॅटीनी तीन वाजता पहिला सहा वाजता दुसरा आणि नऊ वाजता तिसरा शो असे झाले. आज आता एका थिएटर मधे किती चित्रपट असतात आणि किती शो होतात त्याला गणतीच नाही. सकाळी साडे नऊ पासून रात्री साडे अकरा पर्यंत कोणत्याही वेळेला चित्रपट सुरू होतात आणि संपतात. आजच्या काळात ते सोईस्कर आहे. आजची पिढी त्यात रूळली आहे, खूष आहे. एन्जॉय करते.     
मॅटीनी या शब्दाचा खरा अर्थ काय असेल तो असो, पण आमच्या लेखी मॅटीनी म्हणजे दुपारी बारा वाजता पाहीलेला सिनेमा - कधी करमणूक प्रधान, कधी संगीत प्रधान, कधी कथा प्रधान तर कधी अभिनय प्रधान सिनेमा! तेव्हाची थिएटर्स, तेव्हाचे मित्र मैत्रिणी, तेव्हाचे दिवस आणि तेव्हाच्या असंख्य आठवणी!          

ही किमया आहे 'मॅटीनी' ची!          
*विलास करंबळेकर नवी मुंबई*

Wednesday, January 1, 2020

बाजे मुरलिया बाजे। प्रफुल कुलकर्णी

#Cinema_Gully

बाजे रे मुरलिया बाजे

काही कलाकृती अशा असतात की, त्यांना दैवी स्पर्श लाभलेला असतो. त्यांची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. आपल्याकडे चित्रपट, नाट्य, संगीत या क्षेत्रांत अशा अनेक कलाकृती झालेल्या आहेत. 'राम श्याम गुणगान' ही अशीच एक अद्वितीय कलाकृती. जिथे साक्षात दोन भारतरत्नं (स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर) एकत्र येतात, तिथे कोणताही भारतीय संगीतप्रेमी केवळ हात जोडून नतमस्तक होऊ शकतो. त्यात जर तो मराठी असेल, तर त्याला अजूनच आनंद होईल, कारण या दोन दिग्गजांना एकत्र आणणारा मणिकांचन योग साधलाय तो आपल्या श्रीनिवास खळे यांना. तसे तर त्यांनी या दोहोंसोबत स्वतंत्रपणे अभंगरचनांचे अल्बम्स ही केलेत, पण या अल्बमची गोष्टच निराळी. १९८५ मध्ये हा अल्बम रिलीज झाला होता. 

एकवचनी, एकपत्नी, मर्यादा पुरुषोत्तम इ. नावांनी विख्यात असलेला दशरथ-कौसल्यापुत्र राम आणि कृष्ण...त्याची ख्याती काय वेगळी सांगावी! बाल, किशोर, तरुण, प्रौढ या चारही रुपांमध्ये वंदनीय असलेला हा एकमेवच. फक्त हाच एक देवत्वाच्या पलीकडे जाऊन प्रियकराच्या रूपातही जनमानसात रुजला अन त्याचं ते रूपही आज सर्वत्र पुजलं जातं. सर्वोच्च प्रेमाचा मापदंड म्हणून राधेवरच्या त्याच्या प्रेमाला पाहिलं जातं. या दोन हरीरुपांची एकत्रितपणे स्तुती करणारा कदाचित हा एकमेव अल्बम असेल. या अल्बमची सगळी गाणी सुंदरच आहेत, पण त्यातलं एक गाणं जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे बाजे मुरलिया बाजे.

राधा-कृष्णाच्या प्रेमावर विविध प्रकारची गद्य-पद्य रचना विविध भाषांमध्ये आजवर झालेली आहे. अनेक कवींनी वेगवेगळ्या प्रकारे या दोघांच्या प्रेमाचं चित्रण केलं आहे. असंच हे एक गीत. कृष्णाच्या बासरीनं वेड लावलं नाही अशी एकही गोष्ट गोकुळात, वृंदावनात नव्हती. अगदी पशुपक्षी, वृक्षवेली, पानाफुलांनाही त्या सुरांची मोहिनी होती मग माणसं तर सोडाच. या गाण्यातही त्याच सुरांनी मोहित झालेली राधा बाकी सर्व विसरून श्यामरंगी रंगली आहे. 

पं. नरेंद्र शर्मा यांची शब्दरचना असलेल्या या गीताची सुरुवात भीमसेनजींच्या आवाजातील दोह्याने होते.

विमुख शिखर से धारा धाये
राधा हरि सम्मुख लाये
बाँसुरिया हरि साँवरिया की 
राधा गोरी सुनवा ले

आणि मग गाणं सुरु होतं. भजनी ठेक्यासह येणारी बासरीची सुरावट अपेक्षित वातावरणनिर्मिती करू लागते अन लतादीदींच्या अमृतमय गळ्यातून शब्दसुधेचे तुषार पाझरू लागतात. काय सुंदर वर्णन आहे पहा! 

बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे
बाजे मुरलिया बाजे

हरे-हरे बाँस की बनी मुरलिया
मरम मरम को छुए अंगुरिया
चंचल चतुर अंगुरिया जिसपर
कनक मुंदरिया साजे

इथे मुंदरिया म्हणजे मुद्रिका (अंगठी). वेळूपासून बनलेल्या बासरीवर हरीच्या कोमल ओठांचा स्पर्श व्हायचा अवकाश, की जे काही त्यानंतर घडतं, ते केवळ अद्वितीयच. बासरीच्या छिद्रांवर हरीची बोटं इतक्या सहजपणे फिरत आहेत की, त्यातून एक एक मधुर सुरावटी निघत आहेत. 

पीली मुंदरी अंगुरी शाम
मुंदरी पर राधा का नाम
आकर देखे सुने मधुर स्वर
राधा गोरी लाजे

इथं कृष्णाच्या हातातल्या त्या अंगठीचं वर्णन आहे. त्याच्या बासरीच्या सुरांनी मुग्ध झालेली राधा त्या ठिकाणी येते. भावविभोर होऊन त्या सावळ्याला पाहत असतानाच अचानक तिचं लक्ष त्याच्या बोटातल्या त्या सोन्याच्या अंगठीकडे जातं, ज्यावर तिचंच नाव कोरलेलं असतं. ते पाहून ती लाजून चूर होते. 

भूल गई राधा भरी गगरिया
भूल गये गोधन को साँवरिया

माधवाच्या वेणूनादात राधा इतकी तल्लीन झालेली असते की, आपण येथे कशासाठी आलो होतो, याचेही स्मरण तिला राहत नाही. तिने पाणी नेण्यासाठी आणलेली घागर भरली, आणि तशीच ठेवली. इकडे या नंदकिशोरालाही विसरच पडलाय की आपण आपल्या सवंगड्यांबरोबर गाईवासरं चरायला घेऊन आलो होतो. तो आपला मुरलीतच रममाण. त्या दोघांची ही प्रेमलीला अशी रंगली आहे, की त्याची समाप्ती कधी होऊच नये असंच तिथल्या प्रत्येकाला वाटत आहे. 

हे गाणं पटदीप रागात बांधलेलं आहे. याच रागातली अजून काही गाणी म्हणजे लतादीदींचंच 'शर्मीली' मधलं 'मेघा छाये आधी रात' किंवा मग मराठीमधलं 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या'. 'मर्मबंधातली ठेव ही' हे मराठी नाट्यगीतही याच पटदीपमधलं.(ही गुगल गुरुजींची कृपा, हे मी नमूद करतो.) असो, आपली गाडी उगाच भरकटू नये. 

श्रीनिवास खळे यांच्यासारख्या प्रयोगशील संगीतकाराची चाल अन साक्षात स्वरभास्कर व स्वरसम्राज्ञी यांचा आवाज लाभलेल्या गीताचा परिणाम काय असेल, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तसा तो आहेदेखील. शब्दागणिक आपोआप चित्र डोळ्यासमोर साकारत जातं, ही गायनाची किमया. खरंतर हे गाणं म्हणे फक्त दीदींच्याच आवाजात होतं, पण अचानक खळे यांना वाटू लागलं की, आपण याचं ड्युएट करावं म्हणून मग ते पंडितजींच्या आवाजातही रेकॉर्ड करण्यात आलं. म्हणूनच हे गाणं ऐकताना आपल्या कानाला थोडा फरक जाणवतो, तो यामुळे. मला मूळ गाणं तर आवडतंच, पण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनीही एका कार्यक्रमात हे गाणं सादर केलं होतं, तेही माझं तितकंच प्रिय आहे. या दोन्ही लिंक मी खाली शेअर करतोय. 

जाता जाता अजून एक, शंकर महादेवन यांचं अजून एक नातं आहे या अल्बमसोबत. ज्यांनी हा संपूर्ण अल्बम ऐकलाय, त्यांना ते कळेल. यात जेवढे वीणेचे पीसेस ऐकू येतात (विशेषतः राम भजन कर मन मध्ये), ते सगळे शंकर महादेवन यांनी वाजवले आहेत, आणि तेसुद्धा वयाच्या १७-१८ व्या वर्षी. आहे की नाही कमाल! तुम्हांला माझं हे लिखाण कसं वाटलं, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगालच. अजून एक नम्र विनंती, जर काही चुका, कमी आढळल्यास ती शांतपणे वाद न घालता निदर्शनास आणून द्यावी. 

पुन्हा भेटू, एखाद्या नव्या गाण्यासह... तोपर्यंत सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!😊

Original song link -
https://youtu.be/GP6dt_qW5qE

Shankar Mahadevan version link - 
https://youtu.be/-TglJafPXYw

Tuesday, December 24, 2019

नौशाद। मानसी पटवर्धन

तू कहे अगर जीवनभर मैं गीत सुनाता जाऊँ .....
                                       मन-बीन बजाता जाऊँ...!

"सप्तसुर"  त्याच्यावर प्रसन्न होते...."संगीत" हाच त्याचा "श्वास"...त्याच्या मनवीणेवर नित्य नव्या गीतांचे सृजन साकारत असे... कोणताही  अनुवंशिक सांगितिक वारसा त्याला लाभला नव्हता..."अल्लाताला" मेहरबान झाला आणि "मौसिकी ची सौगात" त्याला बहाल करून गेला...!!! तिसऱ्या वर्षी आजारपणात त्याचा श्वास अचानक बंद पडला ...पण रहमदिल खुदाची कृपा झाली आणि  तो बचावला...कुटुंबावरील मृत्यूचे सावट टळले....अल्लाच्या मर्जीनेच श्वासाचे आरोह अवरोह पुन्हा पूर्ववत झाले ...कुटुंब आनंदले .. ..पुढे याच मुलाने आपल्या सदाबहार ,अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित सुरावटीनी अनेकांच्या  मनात सुरांचे नंदनवन फुलविले....!!!! त्याची जिद्द,भगीरथ प्रयत्न, संगीतावरील नितांत प्रेम सारेच अलौकिक होते..."सैगल ते हरिहरन" आणि "अमिरबाई ते अनुराधा" पर्यंत सगळ्याच गायकांचे स्वर संगीतरुपी धाग्यात गुंफून त्यांनी  संगीताचा सुवर्णकाळ अजरामर केला...हा मुलगाच पुढे नामवंत संगीतकार बनला... "संगीतकार नौशाद"...!!!  आज त्यांची जयंती...!!!त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन....!!!!

त्यांचा जन्म लखनौ चा...कर्मठ मुस्लिम कुटुंबात जन्मल्याने तिथे गाणे निषिद्ध होते...लहानपणी आपल्या मामूजान बरोबर ते "देवा शरीफ" मध्ये "हजरत वारीस अली शाह"च्या उरुसाला जात...दहा दिवस उरुसात चाललेल्या  मैफलीतील गझल,नात,कव्वाली यांनी त्यांचे कान आणि मन दोन्ही तृप्त होई...!!!"उस्ताद नसरुद्दीन" यांची गझल त्यांना विशेष आवडत असे...

छुटे असीर तो बदला हुआ जमाना था
न फूल थे,न चमन था,न आशियाना था...

या शब्दसुरांनी ते जणू भारले जात...तसेच  तिथे येणाऱ्या एका बासरीवाल्याच्या वादनाने ते मंत्रमुग्ध होत ..त्या मधुर सुरांत स्थळकाळाचा  विसर पाडण्याचे सामर्थ्य होते... तो सूर,त्यातील राग त्यांच्या मन मंदिरात रुजत असे...!!!पुढे  त्यांच्या संगीतात बासरीचे सूर घुमू लागले त्याची हीच नांदी होती का..?? आठवा "दूर कोई गाये"(बैजू बावरा), मुरलीवाले मुरली बजा(दिल्लगी),आज मेरे मन में सखी (आन)सारखी गोड गीते...!!!

लखनौ च्या "रॉयल सिनेमा" मध्ये तेव्हा मूक चित्रपट दाखवले जात..हा चित्रपट साथीच्या वाद्यवृंदाबरोबर पुढे सरकत असे..दृश्याला अनुरूप संगीत असे..गंभीर वातावरणनिर्मिती साठी गझल,नृत्याच्या वेळी तसे संगीत वाजवले जाई. "नवाब लड्डन साहेब" वाद्यवृंदाचे प्रमुख असायचे..."उस्ताद कल्लन" तबला तर "बाबुलाल "क्लेरोनेट वाजवत असे...!!हे सारे नौशादजींना खूप आवडे...आपणही वाद्य वाजवावे.. संगीत द्यावे असे त्यांना वाटे.पुढे त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताची सुरवात इथूनच झाली असावी...!!!

लखनौ च्या "लाटुश रोड" वरील "गुरबत अली" यांच्या वाद्यांच्या दुकानाचे त्यांना खूप कुतूहल वाटे..धीर करून त्यांनी त्या दुकानाची सफाई करण्याचे काम मिळविले आणि दुकानाच्या सफाई बरोबर वाद्यांवरही त्यांचा हात अलगद फिरत असे.."रॉयल थिएटर "मध्ये ऐकलेली धून इथे हार्मोनियम वर प्रकट होई आणि मग अलौकिक नाद ब्रह्म साकारत असे...गुरबत अलींच्या हे लक्ष्यात आल्यावर त्यांच्या हातातील जादूने तेही अचंबित झाले आणि  त्यांना हार्मोनियम भेट देते झाले...पुढे "लड्डन मियाची" हार्मोनियम,"उस्ताद बब्बन खान "यांचे शास्त्रीय संगीत आणि "युसुफ अलिखान" यांची सतार शिकण्याचा योग नौशादजींना आला आणि संगीतातील हुनर हळूहळू त्यांनी काबीज केले...!!!!

"मॉडेल हाऊस" मधील सुलतान साहेबांच्या ड्रामा क्लब मधील गाण्यांना नव्याने रचण्याचे काम त्यांनी सुरू केले...त्यात त्यांचे मन रमले...जणू याच साठी त्यांचा जन्म झाला होता..पुढे न्यू ड्रामा कंपनीबरोबर त्यांनी दौरा केला..दुर्दैवाने कंपनीचे दिवाळे निघाले आणि त्यांना घरी परतावे लागले...वडिलांनी "घर किंवा संगीत" यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले...त्यांना नौशाद यांचे गाणे मुळीच पसंत नव्हते...बाजाची पेटी भिरकावून त्यांनी आपला निषेध नोंदविलाच होता...अल्लातालाने दिलेला हा जन्म केवळ संगीताचीच सेवा करण्यासाठीच असा दृढ विश्वास असलेल्या नौशाद यांनी घर सोडले आणि मुंबई गाठली...!!!

मुंबईत आल्यावर अथक परिश्रमाची मालिका सुरू झाली.महत्प्रयासाने "पियानो वादक" म्हणून एका कंपनीत  त्यांना ४० रुपये पगाराची नोकरी मिळाली....कामासाठी वणवण,अपार कष्ट,मनातील जिद्द यामुळे मार्ग मिळत गेले आणि  अगदी अर्जुनाप्रमाणे ते आपल्या ध्येयाप्रत ते वाटचाल करत राहिले...दादरमधील अख्तर साहेबांच्या दुकानात रात्री पथारी पसरल्यावर त्यांना समोरच्या  ब्रॉडवे टॉकीजमधील लुकलुकणारे दिवे खुणावत....हा रस्ता ओलांडायला त्यांना तब्बल "१५ वर्षे" लागली..."बैजू बावरा" च्या रौप्यमहोत्सवी त्यांना सन्मानाने आमंत्रित केले होते...गत स्मृती जाग्या झाल्या... तेव्हा त्यांच्या एका डोळ्यात  "हसू "आणि एकात "आसू" दाटले होते...अखेर  त्यांनी यशश्री मिळविली होती...!!!!
तसा "प्रेमनगर " हा नौशाद यांचा प्रथम चित्रपट...त्यानंतर "माला"(क्यू नैना भर आये...श्रीमती घोष),"दर्शन"(ज्यात दुरानी यांनी  पार्श्वगायनात पदार्पण केले आणि "पीहर में पिया छेडे "हे गीत मीरा बरोबर म्हटले),"स्टेशनमास्तर"(राजकुमारी,सुरैय्या,अमिरबाई,प्रेम अदिब अभिनित "चलो चलो री सखी मधुबन में" हे गीत गाजले),"नई दुनिया"(ज्यात सुरैय्या चे पहिले  गीत होते..."बूट करू मैं पॉलिश बाबू"),"शारदा"(पंछी जा ..सुरैय्या हे गीत खूप गाजले)या गीतात नौशादजींनी मटका रिदम प्रथम वापरला...!!!मधोक यांच्याबरोबर घोडा गाडीतून सैर करताना   दोघांच्या डोळ्यावर पेंग आली आणि गाडीवान गाडी थांबवून निघून गेला..पण जाग आली तेव्हा "पंछी जा" ही सुंदर धून मिळाली होती...!!!

पण नौशादना कीर्तीच्या शिखरावर नेणारा चित्रपट होता "रतन."...!!!त्यातील सर्व सामान्यांना गुणगुणता येणाऱ्या  रचनांनी रसिकांवर भुरळ घातली .. लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले....!!!अवघा भारत  "रतन"च्या गाण्यांनी वेडा झाला ..."मिलके बिछड गयी अखियां"(अमिरबाई),"रुमझुम बरसे बदरवा"(हे सावन गीत असून कोरस चा उत्तम वापर दिसतो..."पिया घर आजाss मधील अजीजी मनाला भिडते..),अँखियां मिलाके(जोहरा बाई),जब तुम ही चले परदेस( शाम कुमार आणि अमिरबाई यांचे हे गीत) , हे गीत त्यावेळी संगीतकार सचिन देव बर्मन यांचा  नोकर गुणगुणत होता...त्यांना आश्चर्य वाटले ,नोकर माझा आणि गाणे म्हणतोय नौशाद यांचे... "सुलभ गेयता"...म्हणजेच सामान्यांना सहज म्हणता येईल असे गीत असावे याचा वस्तुपाठ नकळत नौशादजींनी दिला होता.) "सावन के बादलो"(जोहराबाई आणि करण दिवाण) यातील विरह भाव हृदयस्पर्शी होते... एकंदरीतच "रतन" मधील  "उत्तर भारतीय संगीताचा लहेजा" रसिकांना भावला होता...!!

नौशाद यांनी "रतन" मधील गीतात प्रथमच बासरी आणि सतारीचा एकत्रित वापर केला."ढोलक" त्यांचेच सहायक गुलाम मुहम्मद वाजवत...तसेच "एको इफेक्ट्स" साधण्यासाठी एक माईक  स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये ठेवला जाई..आश्चर्य म्हणजे जेव्हा नौशाद यांचे "रतन" चे संगीत गाजत होते ,तेव्हा त्यांच्या लग्नाच्या वरातीतही बँड वाले "अँखियां मिलाके "आणि "रुमझुम बरसे बदरवा" वाजवत होते...रतन चे संगीत इतके गाजले की जेमिनी दिवाण यांना पहिल्या वर्षीच्या  नुसत्या  रॉयल्टी चे साडेतीन लाख मिळाले होते...

१९४६ मध्ये आलेल्या "अनमोल घडी" या चित्रपटानेही अशीच लोकप्रियता मिळविली...यात नौशादजींनी  "नूरजहाँ "  यांच्या अविस्मरणीय स्वरास आपल्या मधुर  संगीताचे कोंदण दिले ...संगीत मलिका "नूरजहाँ "यांचे "आवाज दे कहा है" (सुरेंन्द्र बरोबर)आणि मिश्र पहाडीवर आधारित "जवा है मोहोब्बत" हे सदाबहार गीत म्हणजे या चित्रपटाचे वैभव होते..."आवाज देss" या गीताची धून मनाप्रमाणे जमेना, थकून झोपल्यानंतर स्वप्नात हार्मोनियम वाजवत असताना एक धून अंतरी ठसली ,त्यानंतर "तिला आवाज दे कहा है "असे मूर्त रूप प्राप्त झाले...!!जाणकार या गीतास अलौकिक कलाकृती मानतात...याचप्रमाणे "धरती को आकाश पुकारे"(मेला),"लेने को आये कहार"(बाबुल)या गाण्याच्या चालीही त्यांना स्वप्नात सुचल्या असा मोहोळकरांच्या "मोहोळ" पुस्तकात उल्लेख आहे.
"अनमोल घडी" या चित्रपटात "सोचा था क्या ,क्या हो गया," मन लेता है अंगडाई","मैं दिल में दर्द बसा लाई" ही "सुरैय्या" यांची तर "आजा मेरी बरबाद मोहोब्बत के सहारे" , विशेष ओढीने गायलेले "मेरे बचपन के साथी मुझे भूल ना जाना" ही नूरजहाँ यांची गीते होते...याशिवाय "उडन खटोले पे उड जाऊ"(जोहरा,शमशाद),"क्यू याद आ रहे है"(सुरेंद्र),"तेरा खिलौना टूटा बालक (हे रफी यांचे "पहिले" नौशादजींबरोबरचे स्वतंत्र गीत होते)."आजा मेरी बरबाद" या गीताच्या संगीतात दिग्दर्शक मेहबूब खान सूचना देऊ लागले...दुसऱ्या दिवशी गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नौशादजींनी लाईटमन ना सूचना देण्यास सुरुवात केली ,तेव्हा मेहबूब यांनी त्यांना संगीतावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले...नौशाद हसून म्हणाले की काल मी हेच सांगत होतो....!!!आपल्या कृतीतून नौशाद यांनी आपले म्हणणे चलाखीने पटवून दिले.

१९४७ मधील "शाहजहान" चित्रपटात दस्तुरखुद्द "कुंदन लाल सैगल "यांच्या स्वरास नौशाद यांच्या संगीताची महिरप लाभली आणि जन्मली अवीट गोडीची गीते..."जब दिल ही टूट गया" ही  अजरामर भैरवी याच चित्रपटातील...जी सैगल यांनी भाव विभोर होऊन गायली आहे ,हेच गीत आपल्या अंत्यसमयी गायले जावे अशी सैगल यांची इच्छा होती...!! गीतकार मजरुह यांचा हा  पदार्पणातील चित्रपट..त्यांची "गम दिये मुस्तकील "(झिंझोटी राग, दिप चंदी ताल)ही गझल आजही एक "नायाब नगीना" मानतात...!!!"चाह बरबाद करेगी"(बागेश्री),"ए दिले बेकरार झूम"(बिहाग),"कर लिजीए चलकर", "मेरे सपनों की रानी रुही रुही "(यात रफिंनी त्यांची साथ दिली होती)...नौशाद यांनी सैगल ना ते "काली पांच"(शराब)शिवाय ही गाऊ शकतात हे सिद्ध करुन दाखविले...!!!खरच नौशाद आणि सैगल या दिग्गजांची भेट थोडी आधी झाली असती तर....!!!

"दर्द" या चित्रपटापासून "शकील बदायुनी" या गुणी गीतकाराची साथ नौशादजींना लाभली ती थेट शकील यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत .."शकील आणि नौशाद" यांचे मैत्र दृष्ट लागण्यासारखे होते,त्यांनी २५० च्या हून अधिक गाणी रसिकांना दिली.खरं तर "दर्द" हा सुरैय्या यांचा चित्रपट ...पण यातील नवी गायिका "उमादेवी" म्हणजेच "टुनटुन" यांच्या दर्दभऱ्या "अफसाना लिख रही हूँ "या गीताची लोकप्रियता आजही तशीच  आहे...आजही जणू आनंद लहरींवर तरंगत लहरणारे हे गीत मनास आनंद देते...

१९४८-४९मध्ये "मुकेश" यांच्या स्वरास नौशाद यांनी प्राधान्य दिलेले दिसते.."मेला","अंदाज","अनोखी अदा" या चित्रपटात त्यांनी "मुकेश" यांचा स्वर वापरला.तर "दिल्लगी","दुलारी","चांदनी रात" यासाठी त्यांनी "रफी" यांचा स्वर वापरला...!!"अनोखी अदा" मधे "सुरेंद्र आणि मुकेश" यांची जणू जुगलबंदीच आढळते.."बडे भोले भाले है" ,"जले न क्यू परवाना","क्यू उन्हे दिल दिया" (शमशाद बरोबर...यात व्हायोलिनचा हमिंग सारखा वापर केला होता)ही सुरेंद्रची तर मुकेश यांना "मंझील की धून में"( भैरवी),गंभीर प्रकृतीचे "कभी दिल दिल से टकराता तो होगा","दर्दभरे भूल गये क्यू दे के सहारा"(शमशाद सह)अशी गीते दिली.

"मेला" मध्ये नौशादनी मुकेश यांना अविस्मरणीय गीते दिली."आई सावन ऋत आई"(मुकेश,शमशाद),"मैं भवरा तू फूल"(शमशाद सह..सुंदर प्रेमगीत),"मेरा दिल तोडने वाले" (शमशाद सह म्हटलेले "आसावरी" थाटातील गीत), "गाये जा गीत मिलन के"(मुकेश)ही गीते तर लोकप्रिय झालीच ,पण "शिववरंजनी" तील "धरती को आकाश पुकारे"मधील "आना ही होगा"मधील विलक्षण ओढ,गीतातील स्वरांचा ठेहराव,मुकेशजींच्या स्वरातील दर्द  सारेच सुंदर होते...!!!!

"अंदाज "हा मेहबूब खान यांचा संगीतमय चित्रपट...यात "लता" नामक स्वर्गीय सुरांची साथ नौशादजींच्या संगीताला लाभली आणि त्यांच्या संगीताच्या कक्षा रुंदावल्या...."sky is the limit "अशी स्थिती झाली..नौशाद फोन वर बोलत असता एक तरुणी मंजुळ स्वरात गुण गुणत गेली ,तो स्वर नौशादजींच्या कानात घुमू लागला...हाच लताजींचा स्वर होता..."उठाये जा उनके सितम" हे "केदार"च्या सुरावटीने बहरलेले गीत , ज्याच्या अनेक रिहर्सल झाल्या,"राजू भारतन "यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हे २०ते३०वेळा नौशादजींनी त्यांच्याकडून वाचून घेतले...शब्दांचे वजन,उच्चार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार त्यांना सांगितला...आजही हे गीत रसिकांना मोहित करते ,तसेच "तोड दिया दिल मेरा"(लता)...हे गीत पहाडीच्या सुरांनी नटलेले ,काळीज दुभंगून टाकणारे,काहीसे नूरजहाँ स्टाईलने गायलेले..."कोई मेरे दिल में खुशी बन के आया(लता)" हे आनंद तरंग निर्मिणारे तर "ना दीर दारा "असे सुरवातीचे  तराण्याचे शब्द वापरून रचलेले "मेरी लाडली  री बनी है"(लता)...हे ही शब्द, नाद ,सुरांची आगळी सैर घडविणारे...!!!!"डर ना मोहोब्बत कर ले" हे शमशाद आणि लता यांच्या स्वरातील सुंदर गीत...!!
"अंदाज" मुळे लताजींचे नौशादांच्या संगीतातील स्थान बळकट झाले......लताजींच्या यशाच्या मालिकेत नौशाद यांच्या "अंदाज","दुलारी "यांचाही सिंहाचा वाटा आहे..("अंदाज" मध्ये मेहबूब खान यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दिदींकडून नायिकेची सर्व गाणी गाऊन घेतली. )लतादीदी नौशादजींच्याकडे गायला लागल्यावर  अमिरबाई,जोहराबाई,राजकुमारी या  गायिका त्यांच्या संगीतातून बाद झाल्या...शमशाद सुद्धा सहनायिकांपुरत्याच राहिल्या..

"अंदाज" मध्ये मुकेश यांची  "हम आज कहीं दिल खो बैठे"(झिंझोटी),"झूम झूम के नाचो आज","टुटे ना दिल टुटे ना"(भैरवी),आणि यावर कडी म्हणजे पियानो च्या साथीने बेहोष होऊन म्हटलेले भैरवीच्या सुरावटीतील "तू कहे अगर जीवन भर"हे पहिले पियानो गीत अशी सुंदर गीते होती...तसेच रफी आणि लता यांच्या स्वरातील "यु तो आपस में बिघडते है खफा होते है"...हे गीतही श्रवणीय होते..
दुलारी,बाबूल,चांदनी रात,दीदार,आन,बैजू बावरा ,मुघल-ए-आझम ,शबाब,अमर,उडन खटोला,मदर इंडिया,गंगा जमना,मेरे मेहबूब,पालकी,सन ऑफ इंडिया अशी कितीतरी देखणी स्वरदालने नौशादजींच्या संगीतमहालात दिमाखाने लखलखतात..५०वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द...काय काय लिहावे हा प्रश्न....नौशादजींची अवघी कारकीर्द एवढ्या  छोट्याशा लेखाच्या चिमटीतून  रेखाटणे हे अति कठीण...!!!
नौशाद यांची काही रेशमी युगलगीते...जी आजही रसिकांना भुरळ घालतात...
१.मिल मिल के गाएंगे...लता -रफी -दुलारी
२.नदी किनारे,साथ हमारे...लता-रफी-तलत-बाबुल
३.मिलतेही आँखे दिल हुआ दिवाना..तलत-शमशाद
४.झुले में पवन के आई बहार.. लता-रफी-बैजू बावरा
५.दो सितारोंका जमी पर है मीलन..लता-रफी-कोहिनूर
६.मन की बीन मतवारी.. लता-रफी-शबाब
७.चंदन का पलना..हेमंतकुमार-लता-शबाब
८.दिल-ए-बेताब को सिने से..सुमन-रफी-पालकी
९.मतवाला जिया..लता-रफी-मदर इंडिया
१०.तू मेरा चांद मैं तेरी चांदनी..सुरैय्या-श्याम-दिल्लगी
११.तारारीरारी ये सावन ऋत..रफी-सुरैय्या-दास्तान
१२.आए जवानी जाये जवानी..सुरैय्या-श्याम-कानून
नौशाद यांच्या काही गीतांच्या आधी असलेला "शेर "हे त्यांचे सौंदर्य होते,बहुधा बुजुर्ग संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे  अल्पकाळ सहायक म्हणून कार्यरत असल्याचे ते द्योतक असावे...!!!त्यांच्या "आयेगा आनेवाला" या गीताच्या आधी  असाच शेर आहे..)

१.इन्सान किसीसे दुनिया में एक बार मोहोब्बत करता है.इस दर्द को लेकर जीता है,इस दर्द को लेकर मरता है
प्यार किया तो डरना क्या...लता मुघल-ए-आझम
२.खुशी के साथ दुनिया में हजारो गम भी होते है ।
   जहाँ बजती है शहनाई वहां मातम भी होते है।
    मेरा जीवन साथी बिछड गया...तलत...बाबुल
          
३.अकेली मत जईयो राधे जमुना के तीर..ओ जी ओss
   तू गंगा की मौज मैं जमुना की धारा..रफी..बैजू बावरा
४.लागा गोरी गुजरिया से नेहा हमार
   हुई गवा सारा चौपट मोरा रोजगार
    नैन लड गयी है...रफी -गंगा जमुना
"दुलारी" हा संगीतमय चित्रपट होता."मिल मिल गाएंगे दो दिल यहां..एक तेरा एक मेरा" ...यानंतर चे "हुहू...हाहा" हे किती गोड होते."मोरे सैय्याजी उतरेंगे पार" (पिलू)आणि "ओ दूर के मुसाफिर" (पहाडी)या गीतात त्यांनी "कोरल व्हॉइस" चा वापर केला आहे..लहानपणी उस्ताद युसुफ कडून ऐकलेल्या "झम झमा झम पानी भरेरी"या दादऱ्यावरून "हमारे दिल पे ना जाना" हे गीत त्यांनी रचले.."मदर इंडिया "आणि" गंगा जमुना" मध्ये त्यांनी पुरबी ढंगाच्या लोकसंगीताचा वापर केला.."दुख भरे दिन"(मन्नाडे ,शमशाद,रफी,साथी)ही "मेघ मल्हारा"तील उत्तम समूह गीत प्रस्तुती म्हणता येईल तर त्यातीलच  "गाडीवाले गाडी धीरे हाक रे ss"मधील कोरस अप्रतिम..
खट खुट करती, छम छुम करती गाडी हमारी जाये
फर फर भागत, सब से आगे कोई पकड ना पायें
या कोरस मध्ये आपणही रंगून जातो.. त्यांनी"तन रंग लो"(कोहिनूर),"होली आई रे कन्हाई "(मदर इंडिया)सारखी होळी गीते,"छोड बाबुल का घर,आज पी के नगर"(बाबुल),"पिलू "मधील "पी के घर आज प्यारी"(मदर इंडिया )ही पारंपरिक बिदाई गीते,"इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के"(गंगा जमुना),"नन्हा मुन्हा राही हूँ"(शांती माथुर-सॅन ऑफ इंडिया),"अपनी आझादी को हम हरगीज "(रफी-लीडर)यासारखी देशभक्तीपर गीते दिली.मुघल-ए - आझम मध्ये "'तेरी मेहफिल में किस्मत आजमाकर हम भी देखेंगे"(लता-शमशाद)  ही सुंदर कव्वाली सुद्धा दिली.१९५१मधील "जादू" या चित्रपटातील त्यांची गीते "जिप्सी स्पॅनिश लोकशैली" वर आधारित होती."जब नैन मिले नैनों से" या गीतात त्यांनी "ला रा लू रा रा" हा स्पॅनिश रिदम मोठ्या कौशल्याने वापरला.."बैजू बावरा" या संगीतमय चित्रपटातील "तू गंगा की मौज में मधील "ओ जी ओsss" ही रफीनी घातलेली साद हृदयाला भिडते...पुरबी शैलीचा सुंदर वापर,भैरवीची सुरावट आणि रफीजींचा गगन भेदी काळजाला भिडणारा स्वर यांचा सुंदर संगम म्हणजे हे गीत...!!!!
"बैजू बावरा","शबाब" आणि "मुघल-ए-आझम" ही त्यांच्या संगीत कारकिर्दीतील लखलखती झुंबरे...!!!नौशादजी वर्षात फक्त एक चित्रपट करत...(केवळ वीस दिवसाची मुदत असल्याने त्यांनी "आझाद" चित्रपट सोडला होता)एक लाखाची बिदागी घेत असले तरी प्रत्येक गीताला ,त्यातील शब्द सुरांना पटकथेनुसार   पारखून त्याप्रमाणे ते  संगीत रचना करत ..म्हणूनच लताजी त्यांना "स्लोएस्ट संगीतकार" म्हणत. "मन तडपत हरी दरसन को आज"ही मालकंस रागावर आधारलेली अजरामर रचना ...!!! त्यातील कृष्ण दर्शनाची लागलेलीआस, व्याकुळ मनाची ओढ  सारेच सुंदर...! तिन्ही सप्तकात  लीलया फिरणारा स्वर ही तर रफीजींची खासियत,अफाट रेंज असलेला हा सोनेरी स्वर नौशादजींना खूप भावत असे ...  "ओ दुनिया के रखवाले ही  दरबारी रागातील रचना...!!!हा  "अकबराचा" आवडता राग मानला जातो म्हणून त्यात त्यांनी ह्या गीताची  बांधणी केली.हे गीत लिहिण्यास शकिलजींना ८ते१०दिवस लागले होते.गीताचा शेवटचा अंतरा "तार "स्वरात घेऊन जणू दु:खाची परिसीमा सूचित केली आहे.  रफी यांनी गायलेल्या या  दोन्ही भजनांनी इतिहास रचला आहे ,ती रसिकांच्या  मनावर कोरली गेली आहेत..."मेरे मेहबूब तुझे" हे मुशायऱ्यात गायलेले मोजक्या ५-६ वाद्यांच्या साथीने बहरलेले गीत(शकिलजींच्या काव्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.)  ,"नैन लड गयी" चा अप्रतिम ठेका ,"आज पुरानी राहो में" मधील निराशा,"सुहानी रात ढल चुकी" या पहाडीवर आधारित रचनेतील इंतजार,"मधु बन  में राधिका नाचे रे "मधील स्वर फिरत पाहिली की मन थक्क होते,ही ठेवणीतील सोलो गीते रफिजींच्याच  स्वरस्पर्शाने अमर  झाली आहेत. "मोहे भूल गये सावरीया" मधील लताजींच्या स्वरातील विरह वेदना डोळे ओलावून टाकते... "अमर" मधील "तेरे सदके बलम" हे असेच अवीट गोडीचे गीत ...यातील एका मुरकीने लतादीदींना हैराण केले होते...अखेरीस नौशादजींच्या मनाप्रमाणे ती मुरकी दिदींच्या गळ्यातून उतरली , गीत खूप गाजले...नौशाद-लता ह्या द्वयीने अनेक अवीट गोडीची गीते दिली आहेत...तेव्हाचा दिदींचा स्वर ऐकणे हाही स्वर्गीय आनंद होता..."शबाब" मधील "मन की बीन मतवारी बाजे"हे "बसंत बहार" मधील तीन तालात बांधलेले गीत म्हणजे सुरांची मेजवानीच होय...!!"जोगन बन जाऊंगी" ही "वृंदावन सारंग "मधील मिठी वेदना तर मरना 'तेरी गली में ही पहाडीतील कैफियत कशी विसरावी...??

के असिफ यांचा "मुघल-ए-आझम" हा नौशादजींच्या सांगीतिक  कारकिर्दीतील  रत्नजडित मानाचा तुरा....!!!अभिजात शास्त्रीय संगीतातील देखणेपणाची,मुघल राजवटीतील संगीताची अनुभूती त्यांच्या या अजरामर कलाकृतीतून मिळते....!!! एकेक गीत म्हणजे नौशादजींच्या संगीतातील अनमोल जड जवाहिर आहे...!!!चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक लच्छू महाराज  यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या सोहोळ्यासाठी "वाजिद अली शाह" च्या दरबारात व्हायची त्या बाजाची दादरा-ठुमरी अंगाची रचना पेश व्हावी अशी फर्माईश केली आणि नौशादजींनी १९व्या शतकातील लखनौ चे नवाब वाजीद अली यांच्या दरबारातील नर्तक "बिंदादिन महाराज" यांची प्रसिद्ध रचना "मोहे पनघट पे नंदलाल" ही "गारा" मधे  बांधली .लच्छू महाराज गहिवरले कारण ते बिंदादिन यांचे नातू होते...असिफ साहेबांच्या म्हणण्यानुसार गीतास कोरस ची साथ दिली गेली..चित्रीकरणाच्या वेळी  रोज हजेरी लावणारा एक उमदा तरुण मधुबालेच्या सौंदर्यावर मोहित झाला होता,त्याचे नाव होते "झुल्फिकार अली भुट्टो"...!!!!

मुघल वैभवाची पार्श्वभूमी असल्याने गीतेही तशीच  हवीत... सलीम अनरकलीच्या प्रेमगीतासाठी "बडे गुलाम अली खान" या संगीत सूर्याला पाचारण केले गेले आणि "मुहमांगी बिदागी"(२५०००,प्रत्येक गीतास) देऊन राजी केलेल्या बडे गुलाम अलींनी "सोहोनी" तील "प्रेम जोबन बनके सुंदरी" ही रचना अशा काही  नजाकतीने पेश केली की गीतातील रोमान्स त्यांच्या मृदू तानांनी बहरला...!!!!या गीताने खुश झालेल्या असिफ आणि नौशाद यांनी "शुभ दिन आयो राजदुलारा"(रागेश्री)हे तानसेनच्या तोंडी असलेले गीतही त्यांच्याकडून गाऊन घेतले.."मोहोब्बत की झूठी कहानी पे रोये" सारखे विरहगीत,"बेकस पे करम किजिये "सारखी अल्लाला साकडे घालणारी "नात(परमेश्वराला साकडे घालण्यासाठी म्हटलेले गीत,याला उर्दू भाषेत "नात" म्हणतात)"ए मोहोब्बत झिंदाबाद" हे रफीचे गीत अशी एकापेक्षा एक बहारदार गीते यात होती..
पण अनारकली भर दरबारात अकबरापुढे आपल्या प्रेमाची कबुली देते हा होता चित्रपटाचा उत्कर्ष बिंदू...आणि त्यासाठी नौशादजी आणि शकील मावळत्या सूर्याच्या साक्षीने बसले ,पण काही केल्या मनासारखे गीत जमेना.शेवटी नौशाद यांना बालपणी पुरबी भाषेत ऐकलेल्या एक गीताचा मुखडा आठवला.."प्रेम किया का चोरी चोरी" आणि शकिलजींना शब्द गवसले ,"प्यार किया तो डरना क्या..."उगवत्याने भास्कराने वरदान दिले होते... एक इतिहास प्रसिद्ध गीत साकारले होते ...शेवटचा अंतराही शकिलजींनी अकबर बादशहाचा आब राखत उत्तम रचला आहे...(आज कहेंगे दिल का फ़साना जान भी ले ले चाहे जमाना )..यातील एको इफेक्ट्स साठी एक माईक बाथरूम मध्ये ठेवला होता आणि या गाण्यात पुन्हा पुन्हा येणारे तुकडे त्यांनी दोन वेळा रेकॉर्ड केले,लताजींच्या आणि कोरसच्या आणि मग त्यांचे मिक्सिंग केले ...चित्रपट खूप गाजला ,याच्या रौप्यमहोत्सवी आणखी  एका गीताचा समावेश करण्यात आला ,"हमे काश तुमसे मोहोब्बत ना होती"आणि सुवर्ण महोत्सव झाल्यावर  असिफने "ये इष्क ये दुनियावाले,सब बेकार की बाते है" हे गीत घातले...

"भारतीयत्व" हे नौशादांच्या संगीताचे मर्म होते...गहन राग अवघ्या तीन मिनिटातील गीतात नावाजलेल्या शास्त्रीय गायकांकडून त्यांनी  सुलभ रित्या गाऊन घेतला...(बैजू आणि तानसेनसाठी डी व्ही पलुस्कर आणि अमीर खान)आपल्या संगीतातील हुनर ने त्यांनी संगीत दिग्दर्शकासही नायक ,दिग्दर्शक यांच्या तोडीची प्रतिष्ठामिळवूनदिली.खंजिरी,तबला,ढोलक,व्हायोलिन
क्लेरोनेट,अलगद बहरणारा पियानो,बासरी ,सतार या वाद्यांच्या साथीने त्यांनी अवघे संगीत फुलवले... शास्त्रीय संगीतांच्या पायावर लोकसंगीताचा सुगंध लेवून त्यांच्या रचना साकारत...पण कालांतराने हे त्यांचे  संगीत साचेबद्ध,एकसुरी वाटू लागले...लगन मोरे मन की(बाबुल),उलझ गया जिया मोरा(जादू),जोगन बन जाऊंगी (शबाब),घुंघट नहीं खोलुंगी(मदार इंडिया)यातील एकसुरीपणा नजरेत येऊ लागला"जादू" आणि "साथी "या चित्रपटाच्या संगीतात त्यांनी  शास्त्रीय संगीताची चाकोरी सोडली आणि पाश्चिमात्य ढंग घेतला ,पण ते त्यांना पटले नव्हते..."साथी"  चे  दिग्दर्शक श्रीधर यांच्या मागणीनुसार त्यांनी पाश्चिमात्य संगीत दिले खरे ,पण याबाबत त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले..

       दिल रोता है तो रोने दे
        गम सहता है तो सहने दो
        छिड जायेंगें फिर लाखो किस्से
        ये बात यही तक रहने दो

तरीही नौशादजींनी जो मधुर गीतांचा खजिना रसिकांना दिलाय ना ,तो अविस्मरणीयच आहे..लतादीदी आणि नौशादजी असा अल्बम केला तर काळीज दुभंगून टाकणाऱ्या कित्येक संगमरावरी रचना मिळतील...

१.ए दिल तुझे कसम है..दुलारी
२.दो हंसो का जोडा...गंगा जमना
३.जानेवाले से मुलाकात..अमर
४.बेकस पे करम..मुघल-ए-आझम
५.मरना तेरी गली में ..शबाब
६.उठाये जा उनके सितम..अंदाज
७.तोड दिया दिल मेरा... अंदाज(नूरजहाँ स्टाईल)
८.फिर 'तेरी कहानी याद आई..दिल दिया दर्द लिया
९.ना मिलता गम तो बरबादी... अमर
१०.ना शिकवा है ना कोई गिला..अमर

एस यु सनी यांच्या सहकार्याने नौशाद यांनी "उडनखटोला","पालकी" सारखे चित्रपट निर्मिले.शबाब,मेला,बाबुल,दीदार,पालकी ,साज और आवाज यांचे कथानक त्यांचे होते."हम तुझसे बिछडकर सावरीया" या "दिल दिया ,दर्द लिया" मधील गीतात सर्दी झाल्याने लताजींचा स्वर अधिक अनुनासिक येऊ लागला,तेव्हा त्यांनी गीताचा मुखडा लगेच बदलला आणि फिर 'तेरी कहानी याद आई या गीताचा जन्म झाला.(मुखडा त्यांचा होता ,बाकी गीत शकील यांनी लिहिले.)शास्त्रोक्त संगीताचा बाऊ करणाऱ्या रसिकांना त्यांनी ते सुलभ करून ऐकवले आणि विविध रागांची ओळख करून दिली.)आणि भारतीय अभिजात संगीताचा अनमोल ठेवा जतन केला. "आन" या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम १००वादकांचा ताफा वापरला... त्याचे बॅक ग्राउंड म्युझिक त्यांनी लंडन मधेच रेकॉर्ड केले.."आन" चा प्रीमियर मोठ्या धामधुमीत लंडनच्या रियालटो थिएटर मध्ये झाला होता."आन" मुळे प्रथमच भारतीय चित्रपटांना पाश्चात्य बाजारपेठेत स्थान मिळाले..
झुळझुळ वाहणारे झरे,सागर लहरींची गर्जना,वाऱ्याचा घोंघाट ,पक्षांची किलबिल या साऱ्यात नौशादजींना संगीत ऐकू येई...त्यांच्या संगीतात सुकून होता,मेलडी होती,ठेका होता...!!!"संगीत" ही त्यांची ईबादत होती...साधना होती...त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले...आपल्या सूर साधनेने त्यांना यशाच्या अत्युच्च शिखरावर नेले पण  त्यांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर स्थिर राहिले...एक सच्चा संगीताचा पुजारी...आपल्या सृजनाचा मिडास टच त्याने संगीताला दिला आणि  "चालीस करोड में एक नौशाद" हे बिरुद खऱ्या अर्थाने सिद्ध केले...आजही "दूर कोई गाए" च्या सुरांनी मन हरखून जाते ...."जवा है मोहोब्बत" म्हणत आनंद  लहरींवर झुलते... एका संगीत सम्राटाने उभारलेला हा सुरांचा ताजमहाल थक्क करुन टाकतो...त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते...

गुंजते हैं तेरे संगीतसे अमिरों के महल
झोपडों में भी गरिबो के तेरा संगीत है
अपनी मौसिकी पे सब को फ़क्र होता है मगर
आज मौसिकी को तुझपर नाज है...!!!

*लेखिका-कै.मानसी पटवर्धन.*

Wednesday, December 11, 2019

दिलीप कुमार । खुशवंत सिंग कोहली

दिलीपसाब
कुलवंतसिंग कोहली

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

आज १ एप्रिल. आजची तारीख जगभरात मस्तपकी ‘सेलिब्रेट’ केली जाते. कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला तरी गंडवत असतो, फिरकी घेत असतो आणि मजा लुटत असतो. वर्तमानपत्रांत विशेष सदरं असतात, टीव्ही वाहिन्यांवर मस्ती चालू असते. मीही ते मनसोक्त एन्जॉय करत असतो. फक्त कोणाची फिरकी कधी घेत नाही! दुसऱ्यांच्या आनंदात मी आनंद मानत राहतो. त्यांची मस्ती पाहात राहतो. धमाल चाललेली बघून बरं वाटतं.

तसा मी अंतर्मुख, कुटुंबवत्सल माणूस आहे. आम्ही सारे सण साजरे करतो- आम्हा पंजाबी मंडळींचे आणि आपल्या मुंबईतलेसुद्धा! काही दिवसांतच सुरू होणारी बसाखी आणि नुकताच झालेला गुढीपाडवासुद्धा! प्रत्येक सणाचं महत्त्व आपल्या घरातल्या लहानांना समजावून देणं हे मला आद्य कर्तव्य वाटतं. जी माणसं आपल्या परंपरा विसरतात ती उत्तम भविष्यापासून वंचित राहतात, अशी माझी धारणा आहे. जे आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत, त्यांना कुटुंब करण्याचा हक्क नाही. तुमच्या दिवसभरातल्या काही क्षणांवर तुमच्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क असतो, तो त्यांना द्यायला हवा.

माझी टोनी, गोगी, डॉली ही मुलं लहान असताना त्यांना घेऊन मी शिवाजी पार्कवर, समुद्रावर जात असे. ती मुलं पुळणीवर खेळत असत. मी व पत्नी बाजूला बसून मुलांना खेळताना पाहात असू. त्या विशाल पश्चिम समुद्राकडे पाहताना कित्येकदा माझ्या मनात विचार येई- कुठे होतो अन् कुठे आलो? डोंगरदऱ्या, सकस जमीन, बारमाही नद्यांच्या प्रदेशातून आलेल्या माझ्यासारख्या लहानग्याचं रोपटं उद्योगक्षम मुंबईत लावलं गेलं आणि ते सहजपणे रुजलंही. त्याचं कारण सर्वसमावेशक महाराष्ट्रभूमी! या भूमीनं खूप काही दिलंय. जगायला तर दिलंच, परंतु त्याबरोबर ते जगणं समृद्ध करणारी माणसंही दिली.

मला नेहमी वाटतं, आपल्या देशाला तीन व्यसनं आहेत- चित्रपट, क्रिकेट आणि गाणी! त्यातल्या चित्रपटांनी तर भारतीय मनाला पार वेडं करून सोडलंय. चंदेरी दुनियेतले सितारे लोकांना नेहमीच दुष्प्राप्य असतात, ते सितारे माझ्या आयुष्यात सहजपणे आपल्या पायांनी चालत आले. ज्यांनी भारतीय चित्रपट कलेला घडवलं ते कपूर परिवार, व्ही. शांताराम परिवार, चोप्रा परिवार, कारदार परिवार.. या परिवारांतली माणसं माझ्या जगण्याचा एक भाग बनली. परंतु मुलांना घेऊन दादर चौपाटीवर गेलं, की मनातल्या मनात मी अरबी समुद्राला सांगायचो, ‘भई, ये सब तो अपने दोस्त बन गये लेकीन तो अजब कलाकार अजून आपल्यापासून दूरच राहिलाय..’ तो कलाकार म्हणजे- दिलीपकुमार! त्यांच्या संवेदनशील अभिनयानं साऱ्या भारतीय मनावर गारुड केलंय. त्यांनी त्यांचा खाली झुकलेला चेहरा जरासा वर केला, डोळे किलकिले करून पाहिलं, उजव्या हाताच्या अंगठय़ानं कपाळावर जरासं चाचपडलं की जगातलं सारं दु:ख, जगातली सारी वेदना तिथं पाझरायला लागते. असा हा प्रतिभावान अभिनेता चित्रपटांत भेटतो, परंतु आपल्याला अजून भेटायचा आहे, याची रुखरुख मनात होती.

आणि एके दिवशी अरबी समुद्राच्या साक्षीनं ते मला भेटले! १९५५ चा सुमार असेल. मरीन ड्राइव्हवर अनेक जिमखाने आहेत, त्यांपकी एका जिमखान्यावर कोणत्या तरी कौन्स्युलेटने एक पार्टी ठेवली होती. अनेक निमंत्रितांपकी मी एक होतो व दिलीपकुमारही. पार्टी संपता संपता मी निघालो आणि दिलीपकुमार समोरून आले- ‘‘अरे कुलवंत, कसा आहेस? तुझ्याबद्दल, ‘प्रीतम’बद्दल बरंच ऐकून होतो. ‘प्रीतम’चं जेवणही जेवलोय, पण ते बनवणारा आज पहिल्यांदा भेटतोय. वैसे तो अपना खाने का रिश्ता हैही!’’ असं म्हणत ते हसले, त्यांनी मला छानशी मिठी मारली, पाठीवर थोपटलं आणि म्हणाले, ‘‘चलो मेरे साथ.’’ मी त्यांच्या मर्सिडिजमध्ये बसलो. काही क्षणानंतर स्थिरावलो. ज्यांना भेटायची उत्सुकता होती ते दिलीपकुमार साक्षात समोर होते! आम्ही गप्पा मारत होतो. मला म्हणाले, ‘‘कुलवंत, सारखं दिलीपसाब दिलीपसाब काय करतोस? आपण एका भागातले आहोत. मला युसूफ म्हणून हाक मार!’’ मी कसाबसा म्हणालो, ‘‘दिलीपसाब, तुम्ही माझ्यासमोर सर्वार्थाने मोठे आहात. तुम्हाला युसूफ कसं म्हणू? दिलीपसाबच ठीक आहे.’’ त्यांनी ‘समजलं’ अशा अर्थानं मान हलवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एवढे बारीकसारीक तपशील इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात कसे राहतात? आपण आपलं जगणं भरभरून जगलो व महत्त्वाच्या क्षणी मन जागं ठेवलं, तर सारं काही लक्षात राहत. इथे तर खुद्द ‘दिलीपकुमार’ होते!

त्यानंतर मात्र दिलीपसाब व माझ्या दोस्तीचा सिलसिला सुरू झाला. मी अंतर्मुख व तेही अंतर्मुख. आम्ही दोघंही कमी बोलणारे. एकमेकांची पर्सनल स्पेस सोडून आम्ही आमचं नातं जपलं. दिलीपसाब हे टिपिकल फिल्मी नव्हते. त्यांना पाटर्य़ाना जाणं आवडत नसे. फार मोजक्या ठिकाणी ते जात. आमच्याकडच्या डिनर पार्टीनाही ते क्वचित येत. एकदा मी त्यांना याविषयी विचारलं तर ते म्हणाले, ‘‘रात्रीची अशी जागरणं तुमच्यातल्या अभिनेत्याला झोपवतात. पार्टी अ‍ॅनिमल बनण्यापेक्षा मला रुपेरी पडदा जास्त महत्त्वाचा वाटतो.’’ महान अभिनेता बनल्यावरही दिलीपसाब या पद्धतीनं विचार करतात, हे पाहून मला एक धडा मिळाला.

दिलीपसाब व आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयांवर चालत असत. अर्थात, तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्ही कधीच बोलत नसू. तसे ते गंभीर प्रकृतीचे होते. ते ज्या प्रकारच्या भूमिका करत असत, त्या भूमिका ते प्रत्यक्षात मनात वागवून जगत असत. अनेक ट्रॅजिक भूमिका केल्यानंतर ते एकदा मला म्हणाले, ‘‘यार, इन सब चीजोंने मुझे पुरी तरहसे थकाया है। अब मैं ब्रेक लेता हूँ।’’ दिलीपसाब फार कमी चित्रपट करायचे. वर्षांला एक किंवा दोन. मी त्यांना त्याविषयी विचारलं तर म्हणाले, ‘‘कुलवंत, काम थोडंच करा, पण असं करा की जग लक्षात ठेवेल. मी जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा ती शंभर टक्के नाही तर दीडशे टक्के देऊन करतो.’’ मला ते पटलं.

ते बालपणीच्या आठवणींत कधी कधी हरवून जात. ते त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. तिच्या अवतीभवती घुटमळायचे. अशीच एक आठवण त्यांनी सांगितलेली : ते एका जागी कधी स्थिर नसत. अनपेक्षित असं काही तरी करत. पेशावरला असताना एकदा थंडीच्या दिवसांत त्यांनी घराजवळ असलेल्या व गोठून गेलेल्या तळ्यातल्या बर्फाळ पाण्यानं तोंड धुतलं. त्यामुळे सारं तोंड रक्ताळलं. छोटा युसूफ आईकडे गेला. तिनं बदामाचं तेल लावलं. हळूहळू तो बरा झाला. दिलीपसाहेबांनी हळवेपणानं ही आठवण सांगितली होती.

त्यांच्या बालपणीचा काळ अतिशय धामधुमीचा होता. स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. पेशावरच्या बाजारात पोलिसांनी जमावावर अचानक गोळीबार केला. लहानगा युसूफ बाजारात फिरत होता. घाबरून तो रडायला लागला व जमिनीवर आडवा पडला. थोडय़ा वेळाने सर्व शांत झाल्यावर तो उठला. उठताना त्याच्या लक्षात आलं, की ज्याच्या अंगावर तो हात टाकून आडवा झाला होता ते गोळीबारात मृत्यू पावलेलं एक प्रेत होतं. त्यानंतर अनेक रात्री तो दचकून जागा होत असे.. एकदा लहानग्या युसूफला बाजारात दूध आणायला पाठवलं होतं. तिथं एक पिसाळलेला कुत्रा त्याच्या मागे लागला. कुत्र्याने त्याच्या पायाचे लचके तोडले. त्या लचक्यांचे व्रण कायम राहिले होते.

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. ती आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

एकदा दिलीपकुमार यांचा वाढदिवस होता. मी काही मित्रांना घेऊन त्यांच्याकडे गेलो. हातात सुंदर पुष्पगुच्छ होता. त्यांच्या खोलीत दिलीपसाब एकटेच होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सारी भावंडं घरात गोळा झालेली होती. आनंदी वातावरण होतं. पुष्पगुच्छ दिल्यावर काही वेळानं हसून म्हणाले, ‘‘मुझे और थोडा बुढा क्यूँ बनाते हो भाई?’’ ते त्यांच्याच विचारात मग्न होते. काही क्षण शांततेचे गेल्यावर, मग एकदम खळखळून हसून त्यांनी जोरात कोणाला तरी हाक मारली, ‘‘अरे, माझ्या मित्रांसाठी मिठाई आणा. आम्हाला मजा करू दे.’’ नंतरचे धमाल करणारे दिलीपसाब काही वेगळेच होते!

मी पंजाब असोसिएशनचं काम करायचो. प्राणसाहेब आमचे आधारस्तंभ होते. एकदा मी दिलीपसाबना पाहुणे म्हणून याल का, असं विचारलं. ते लगेच तयार झाले. त्यांनी त्या वर्षीच्या आमच्या संमेलनात अस्खलित पेशावरी पंजाबीमध्ये भाषण करून सगळ्यांना खूश करून टाकलं. सर्वाना भेटले, फोटो काढून दिले. आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडण्याची ती संधी त्यांनी साधली.

एक गमतीदार आठवण. ‘प्रीतम’मध्ये एक नौजवान पंजाबी गायक उतरला होता. तो भारतीय नागरिक नव्हता. बर्मिगहॅमला राहत असे. त्याचं नाव मलकित सिंग. ‘तुतक तुतक तुतीया आय लव्ह यू’ या त्याच्या गाण्यानं तेव्हा सर्वत्र लोकप्रियता मिळवली होती. माझ्या एका कर्मचाऱ्यानं तो आपल्या इथं राहिलाय असं सांगितलं. मी त्याच्या रूममध्ये फोन करून, ‘‘मला तुम्हाला भेटायचंय,’’ असं म्हणालो. तर तोच मला म्हणाला, ‘‘तुम्ही येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो.’’ तो माझ्याकडे आला. मला वाटलं होतं, की तो चाळिशीचा असेल. परंतु तो जेमतेम सव्वीस वर्षांचा तरणाबांड जवान होता. मला परीपौना केलं. मग गप्पा मारत बसला. बोलता बोलता मला म्हणाला, ‘‘पापाजी, मी तीन दिवसांनी बर्मिगहॅमला जाणार आहे. मला दिलीपकुमार साहेबांना भेटायची इच्छा आहे.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. ही इच्छा पुरी करण्याचा आपण प्रयत्न करू या.’’ त्याचा विश्वास बसेना. मी लगेच दिलीपसाबना फोन केला. त्यांना मलकित सिंगबद्दल सांगितलं व त्याची इच्छाही सांगितली. त्याला घेऊन घरी येऊ का म्हणून विचारलं. दिलीपसाब म्हणाले, ‘‘क्यूँ भई, मंही आता हूँ उसे मिलने। मी त्याचं गाणं नेहमी ऐकतो. त्याला विचार, मला काही गाणी ऐकवशील का?’’ मलकित सिंग एका पायावर तयार झाला.

ज्या पहाटेच्या विमानानं मलकीत सिंग परत जाणार होता, त्या रात्री नऊ वाजता मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली. प्राणसाहेब, कपूर परिवार, चोप्रा परिवार, रामानंद सागर परिवार अशा काही जवळच्यांना निमंत्रण दिलं. दिलीपसाब एकटेच येणार होते. रात्री साडेआठ वाजताच मलकित सिंग तयार होऊन खाली आला होता. पांढरे कपडे व पांढरंच जाकीट त्यानं घातलेलं. सारखं मला विचारत होता, ‘‘दिलीपसाब येणार आहेत ना नक्की?’’ साधारण पावणे दहाच्या सुमारास दिलीपसाब आले. त्यांना पाहून मलकित सिंगचा चेहराच बदलला. देव पाहिल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुरुवातीला मी दोन नवोदित गायकांना गाण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दिलीपसाब आल्यानंतर दहाच्या सुमारास मलकित सिंगनं गायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक सगळ्या थाटाची गाणी गात त्यानं सर्वाना धुंद करून सोडलं. मौजेची गोष्ट ही की, स्वत: दिलीपसाब त्याच्याबरोबर गात होते, नाचत होते. दिलीपसाबनी चित्रपटांत गाणी गायली आहेत हे मला माहिती होतं, परंतु त्यांची गाण्याची समज व माहिती पाहून आश्चर्य वाटलं. अखेरीस गीत-संगीतानं रंगलेली ती रात्र विमानाची आठवण झाल्यानं संपली. रात्री तब्बल दीड वाजता सर्वानी जेवण केलं. मलकित सिंगचं सामान मी आधीच एका कारने पुढे पाठवून त्याचं चेक इन करून ठेवलं होतं. पहाटे साडेचारची फ्लाइट पकडायला मलकित सिंग कसाबसा पोचला. त्यानंतर त्याचे व माझे ऋणानुबंध असे काही जुळले की जणू आमचं नातं देवानं घडवून पाठवलंय. परंतु आमच्यातला समान धागा म्हणजे- दिलीपसाब!

अलीकडे दिलीपसाहेबांची तब्येत बरी नसते. मी अनेक वर्षांत त्यांना भेटलो नाहीये. पण त्यानं काही बिघडत नाही. देवाला रोज थोडंच भेटायचं असतं, तो तर मनात असतो!

ksk@pritamhotels.com

Thursday, November 28, 2019

आफ्रीन आफ्रीन । जावेद अख्तर

मी त्याचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करत आहे


❤❤❤❤❤
तिच्या सौदर्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत
प्रभो तू धन्य आहेस (तिला निर्माण केलंस)

तू तिला बघितलंस तरी हेच म्हणशील



इतकं सुंदर कोणी पाहिलं नाही
शरीर अजंठ्याच्या मूर्तीसारखं आहे
तिचं शरीर म्हणजे नजरेवरील जादू
तिचं शरीर म्हणजे सुंदर गाणं, किंवा गोड सुगंध
किंवा रागातील सुंदर तान
किंवा बहर आलेली बाग
किंवा सूर्याचे कोवळे किरण
किंवा अप्रतिम शिल्प,हृदयाचे ठोके बंद  पडेल असे,
चंदनाचा सुवास
शुभ्र संगमरवरी



चेहरा एखादया फुलासारखा प्रसन्न,
तो चेहरा आहे का जणू चंद्र,
तिचा चेहरा म्हणजे जणू गझल , किंवा गझलेचे हृदय,
चेहरा म्हणजे उमलती कळी, किंवा कमळाचे फुल,
चेहरा म्हणजे कल्पनाशक्तीला अभ्यास,
चेहरा म्हणजे एक स्वप्न ,आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न!



चेहरा म्हणजे एक परीकथा,
क्षणात वास्तव आणि क्षणात कल्पनाविलास,
तिचा चेहरा अद्वितीय,कपाळ म्हणजे दुसरा चंद्र।।

तिच्या डोळ्यात बघितल आणि मी पाहतच राहिलो,
जसे दोन मदिरेचे प्याले, चकाकणारे,
हे दोन डोळे आहेत की मधूशाळेचे दरवाजे,
मी त्यांना माझ्या स्वपनांचे डोळे का म्हणू नये,
ते खाली पाहतात तेंव्हा साक्षात लज्जा होतात,आणि आकाशा कडे पाहताना साक्षात प्रार्थना होतात,
वरपासून खाली पाहते ती नजाकत असते, पण खालुन वर पाहते ती शिक्षा होते।।

दोन डोळ्यात पृथ्वी आणि आकाश पकडले जातात,
तिचे डोळे स्वर्गातल्या फुलाप्रमाणे, काजळ घातलेलं,

तिच्या लांब केसांची गोष्ट प्रदीर्घ आहे,
त्याच्या सावल्या माझ्या हृदयावर पडलेल्या आहेत
केस असे की चकाकणारे काळे ढग एकमेकात अडकलेले
केस असे की जणू येणारे काळे संकट,
केस गुंतायला लागले की जग परेशान होते,
केस सरळ झाले की सहज कविता सुचतात,
केस विखरले की रात्र व्हायला लागते,
केस उडायला लागले की रात्र गाऊ लागते,
केस म्हणजे एक हातकडी आहे,पण खूप सुंदर,
किती मुलायम रेशमी, आकाशा सारखे....

तिच्या सौदर्याचे वर्णन करण शक्य नाही
प्रभू तू थोर आहेस, तू तिला निर्मित केलेस

शायर.. जावेद अख्तर

अनुवाद प्रयत्न... चारुदत्त कुलकर्णी


❤❤❤❤❤❤❤❤जावेद अख्तर ने आपल्या प्रेयसीच वर्णन केले आहे


आफरीं आफरीं - Aafreen Aafreen (Nusrat Fateh Ali Khan, Sangam)

Movie/Album: संगम (1996)
Music By: नुसरत फ़तेह अली खान
Lyrics By: जावेद अख्तर
Performed By: नुसरत फ़तेह अली खान

उसने जाना की तारीफ़ मुमकिन नहीं
आफरीं-आफरीं...
तू भी देखे अगर, तो कहे हमनशीं
आफरीं-आफरीं...
हुस्न-ए-जाना...

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई
जिस्म जैसे अजंता की मूरत कोई
जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई
जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई
जिस्म जैसे मचलती हुई रागिनी
जिस्म जैसे महकती हुई चांदनी
जिस्म जैसे के खिलता हुआ इक चमन
जिस्म जैसे के सूरज की पहली किरण
जिस्म तरशा हुआ दिलकश-ओ-दिलनशीं
संदली-संदली, मरमरी-मरमरी
आफरीं-आफरीं...

चेहरा इक फूल की तरह शादाब है
चेहरा उसका है या कोई महताब है
चेहरा जैसे ग़ज़ल, चेहरा जाने ग़ज़ल
चेहरा जैसे कली, चेहरा जैसे कँवल
चेहरा जैसे तसव्वुर भी, तस्वीर भी
चेहरा इक ख्वाब भी, चेहरा ताबीर भी
चेहरा कोई अलिफ़ लैल की दास्ताँ
चेहरा इक पल यकीं, चेहरा इक पल गुमां
चेहरा जैसा के चेहरा कहीं भी नहीं
माहरू-माहरू, महजबीं-महजबीं
आफरीन आफरीन...

आँखें देखी तो मैं देखता रह गया
जाम दो और दोनों ही दो आतशां
आँखें या मैकदे की ये दो बाब हैं
आँखें इनको कहूँ, या कहूँ ख्वाब हैं
आँखें नीचे हुईं तो हया बन गयीं
आँखें ऊँची हुईं तो दुआ बन गयीं
आँखें उठाकर झुकीं तो अदा बन गयीं
आँखें झुकाकर उठीं तो कदा बन गयीं
आँखें जिनमें है क़ैद आसमां और ज़मीं
नरगिसी-नरगिसी, सुरमई-सुरमई
आफरीन-आफरीन...

ज़ुल्फ़-ए-जाना की भी लम्बी है दास्ताँ
ज़ुल्फ़ की मेरे दिल पर है परछाईयाँ
ज़ुल्फ़ जैसे के उमड़ी हुई हो घटा
ज़ुल्फ़ जैसे के हो कोई काली बला
ज़ुल्फ़ उलझे तो दुनिया परेशान हो
ज़ुल्फ़ सुलझे तो ये दीद आसान हो
ज़ुल्फ़ बिखरे सियाह रात छाने लगी
ज़ुल्फ़ लहराए तो रात जाने लगी
ज़ुल्फ़ ज़ंजीर है, फिर भी कितनी हसीं
रेशमी-रेशमी, अम्बरी-अम्बरी
आफरीं-आफरीं...

Wednesday, November 27, 2019

ऐसान होगा तेरा मुझपर

एहसान तेरा होगा मुझपर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Nov-2019  

मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते.

 

1955चा काळ. राणीखेत या प्रदेशात 'रंगीन रातें' या चित्रपडाचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचा नायक शम्मी कपूर. तेव्हा तो नवोदित होता. त्याच्यासमोर होती त्या वेळची प्रसिध्द नटी गीता बाली.

तेथील निसर्गरम्य वातावरण, त्याला शोभेशी चित्रपटात असलेली सुंदर गाणी, प्रेमकथा या पार्श्वभूमीवर ती आली, तिने पाहिले, ती जिंकली आणि हा पठ्ठया प्रेमात पडला. कसलेही दडपण न ठेवता त्याने सरळ तिथेच गीताला मागणी घातली. काही महिने वाट पाहण्यात गेले आणि जेव्हा तिचा होकार मिळाला, तेव्हा घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी मुंबईतील बाणगंगा येथील एका देवालयात पहाटे चार वाजता पुजाऱ्याला उठवून लग्न केले. नंतर घरच्यांचा आशीर्वाद घ्यायला घर गाठले. एका सिनेमात शोभेल असा हा प्रसंग. खात्री आहे की जेव्हा गीताने होकार दिला, तेव्हा याने जंगली या चित्रपटासारखीच 'याहू' आरोळी ठोकली असणार.

जशी शम्मी कपूरची प्रेमकहाणी सरळ आणि प्रामाणिक, तसेच त्याचे चित्रपट. त्यात श्रीमंत आणि गरीब यातील झगडा असायचा. शम्मीच्या वाटयाला श्रीमंत मुलाची भूमिका यायची. एवढा गोरागोमटा आणि धट्टाकट्टा, गरीब म्हणून शोभलाच नसता. सुंदर, गुणी पण गरीब नायिका, घरातून होणारा विरोध, तोंडाला लावायला खलनायक आणि या सर्वांच्या समवेत असायची सुरेल गाणी.

ही गाणी नायिकांच्या सुंदरतेची स्तुती करणारी. त्यांनी केवळ स्तुतीच केली नाही, त्यांना हृदयात बसवले, त्यांची पूजा केली, त्यांना लाडावून ठेवले, त्यांचा आदर केला, अफाट प्रेम केले आणि त्या प्रेमाने त्यांना जिंकले. चित्रपटसृष्टीत नायकाला जिथे नायिकेकडून 'अब हमें आपके कदमों मे यूं रहना होगा' हे गाणे ऐकायची सवय आहे, त्या जमान्यात शम्मी 'एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो' सहज सांगून गेला.

जंगली या सिनेमाची कथा एका वाक्यात सांगता येईल - एका करारी, कडक, अरसिक माणसात केवळ प्रेमामुळे घडलेला बदल.

 

शेखर (शम्मी) परदेशातून परत येऊन वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो. लहानपण एका करारी, शिस्तप्रिय आईबरोबर गेलेले असल्याने स्वभाव काहीसा आक्रमक आणि उध्दट.

तो काश्मीरला गेलेला असताना तेथील स्थानिक डॉक्टरची मुलगी राजकुमारीशी (सायरा बानू) त्याची भेट होते. तिचे हसणे, तिचे मार्दवी बोलणे याचा त्याला सुरुवातीला रागच येतो. चित्रपटात मात्र काही असे प्रसंग घडतात की राजकुमारी शेखरला बदलवण्याची जबाबदारी घेते. त्याचा संताप, त्याचे दुर्लक्ष करणे, ओरडणे याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. आतापर्यंत ज्या मुलींचा शेखरला अनुभव असतो, ज्या माणसांना त्याने पाहिलेले असते, त्याहून ही मुलगी वेगळी असते. तिची निरागसता, तिचे अनाघ्रात सौंदर्य, तिची आश्वासकता, तिचे आर्जव, तिचा अवखळपणा या साऱ्याच गोष्टी शेखरला आकर्षित करून घेतात. प्रेमाची ओळखही नसलेला शेखर राजच्या प्रेमात आकंठ बुडतो.

प्रेमाचा रस्ता मात्र सरळ नसतो. फुलांच्या पायघडयांवर चालताना काटयांचाही सामना करावा लागतो. शेखरची आई राजचा अपमान करते. पैशासाठी आपल्या मुलाला जाळयात अडकवल्याचा आरोप करते. तिच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालताना शेखर म्हणतो,

एहसान तेरा होगा मुझ पर

दिल चाहता है वो कहने दो

मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है

मुझे पलको की छाँव में रहने दो

 

प्रेमात कृतज्ञतेला जागा असते का? खरे तर प्रेम समान पायावर असावे, मग त्या दोघांची समाजात जागा कुठेही असो. एकाची गरज जेवढी तीव्रतेने आहे, तेवढीच जर दुसऱ्याची नसेल, जर दोन्हीकडची ओढ सारखी नसेल, तर एकासाठी ते कृतज्ञतेचे आणि दुसऱ्यासाठी उपकाराचे ओझे होते. पण इथे अहंकाराला जागा नाही. ती निष्पाप आहे, हे त्याला माहीत आहे. आईला उलटून बोलणे जरी त्याला जमत नाही, तरीही तिचा अपमान त्याला सहन होत नाही. आपल्यात तिने जो बदल घडवून आणला, त्याची त्याला जाणीव आहे. एका अहंकारी माणसाच्या मनाला प्रेमाचा स्पर्श करण्याची जादू तिने केली आहे, याबद्दल तो कृतज्ञसुध्दा आहे.

तिचा राग हा काही रूठे रूठे पियाचा हा लटका राग नाही, म्हणून तो विनवतो,


तुमने मुझको हँसना सिखाया

रोने कहोगे रो लेंगे अब

ऑंसूँ का हमारे गम ना करो

वो बहते हैं तो बहने दो

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी अनेक माणसे असतात. या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या लोकांसाठी बरेच काही करतो, त्यांनी केलेले पाहतो, मनातून सुखावतो, पण ते सुख त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही. त्यांचे असणे एवढे गृहीत धरलेले असते की मनातल्या भावना मनात राहतात.

काळ कुणासाठीही थांबत नाही. दिवसाच्या उदरात काय दडले असते, ते सांगता येत नाही. जवळच्या माणसांशी साधलेला संवाद ही खरे तर सर्वात मोठी भेट असते. नाते टिकवणारी रेशीमगाठ असते.

मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. यातला मोहब्बत हा शब्द तर रफीजींनी किती वेगवेगळया तऱ्हांनी गायला आहे.

याच चित्रपटातले 'चाहे कोई मुझे जंगली कहे' हे गीत अतिशय प्रसिध्द आहे. तरीही चित्रीकरण, शब्द, सूर आणि अभिनयाच्या अंगांनी विचार केला, तर हे गीत बाजी मारून जाते. याच गीतात लक्षात येते की, एका जंगली माणसाला प्रेमाने पूर्ण बदलवले आहे. ह्या गीतातील प्रेमाचा उघड इजहार इतका हळुवार आहे की नायिकेचा रागसुध्दा त्या सुरांनी वितळतो.

हे गीत फक्त रफीजींच्या आवाजात रेकॉर्ड होणार होते. त्या सुरांची मोहिनीच एवढी अफाट की परत लताजींच्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह शंकर-जयकिशन यांना टाळता आला नाही.

 

आईच्या हट्टापुढे नमून शेखर, राजशी लग्न न करण्याचे वचन देतो खरा, पण त्याच वेळी ती सोडून कुणाशीही लग्न न करण्याची शपथ घेतो. अशा प्रियकरावर जीव ओवाळून टाकावासा कुणाला वाटणार नाही! प्रेमाचे हे उदात्त दर्शन दिपवून टाकणारे. नवल नाही की नायिकासुध्दा त्या सुरांत सूर मिळवताना म्हणते,

 

चाहे बना दो चाहे मिटा दो

मर भी गये तो देंगे दुवाएँ

उड़ उड़ के कहेगी खाक सनम

ये दर्द ए मोहब्बत सहने दो

मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है

मुझे पलको की छाँव में रहने दो।