Monday, May 18, 2020

डावखोरा सुनील गावसकर।द्वारकानाथ संझगिरी

*डावखोरा सुनील गावसकर*
*द्वारकानाथ संझगिरी* 

परवा कोणीतरी ‘व्हॉट्सऍप’वर मला सुनील गावसकरचा डावखोरा पवित्रा घेतलेला फोटो पाठवला. 'ओळखा पाहू' या प्रश्नाबरोबर सध्या तो फोटो ‘व्हॉट्सऍप’वर आणि ‘फेसबुक’वर जोरात फिरतोय. आजच्या पिढीसाठी तो आश्चर्याचा धक्का आहे. सुनील आणि डावखोरा? 'बाय द वे' तो पवित्रा किती मस्त वाटतो ना?

तो फोटो पाहिला आणि माझ्या जुन्या आठवणी उफाळून आल्या.  

तो १९८२ सालच्या रणजी मोसमातला मुंबई विरूद्ध कर्नाटक सामना होता. मुंबई संघ पराभवाच्या छायेत होता. खेळपट्टीवर चेंडू पडला की त्याचा भोवरा होत होता आणि तो वर उसळत होता. दुसऱ्या डावात सुनील चक्क सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने फलंदाजीसाठी थेट डावरा पवित्रा घेतला. कर्नाटक संघातल्या खेळाडूंबरोबर प्रेक्षकही अवाक झाले. तेव्हा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट गोलंदाजी टाकत होता आणि चेंडू कुरळ्या केसाचा आकार घेत होता. रघुरामने बॅटजवळ सहा क्षेत्ररक्षक लावले आणि त्याच्या भात्यातली सर्व आयुधं वापरली. फास्टर वन, आर्मर, यॉर्कर अगदी चायनामनही टाकला. ‘राऊंड द विकेट’ गोलंदाजी टाकली. पण सुनीलने कशालाही दाद दिली नाही. जवळचे क्षेत्ररक्षक हताश झाले. भट एकामागोमाग एक उर्वशी आणि मेनकासारख्या अप्सरा सूनीलकडे सोडत होता पण सूनीलचं तप काही भंग होत नव्हतं. मुख्य म्हणजे सुनील आयुष्यात प्रथमच डावखुरा खेळत होता. त्यात आणि गंमत म्हणजे ऑफस्पिनर विजयकृष्ण गोलंदाजीला आल्यावर मात्र तो उजव्या हाताने खेळायचा. असा तो एक सव्वा तास खेळला. अठरा धावा करून नाबाद राहिला आणि त्याने मॅच वाचवली. त्याच्या या खेळीबद्दल सूनीलचं कौतुकही झालं आणि त्याच्यावर टीकाही झाली.

सुनीलचं काहीतरी बिनसलं होत. मुंबईच्या काही खेळाडूंवर तो रागावला होता असं म्हणतात. त्याकाळच्या मुंबईच्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी गमावणं म्हणजे सर्वस्व गमवावं लागल्यासारखं वाटायचं. मनात कुठलीतरी जखम घेऊन सुनील फलंदाजीला आला होता हे मात्र नक्की. त्यानंतर सुनीलने एक ‘Why I Batted Left-handed’ असा लेखही लिहिला. त्यात त्याने म्हटलं होतं, 'की चेंडू काटकोनात वळत होता. भटला खेळणं कठीण होतं. त्यात उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांसाठी चेंडू उसळून बाहेर जात होता. त्यामुळे मला वाटलं की डाव्या हाताने खेळावं. ज्यामुळे चेंडू उडला तर तो शरीरावर जाईल. चेंडू खूप वळत असल्यामुळे पायचीतची शक्यता कमी होती.'

त्यानंतर काही वर्षांनी आमच्या ‘षटकार’ पाक्षिकामध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने सूनीलवरच्या एका लेखात त्याच्या ह्या डावखुऱ्या फलंदाजीबद्दल टीका केली. अर्थात सुनीलला ते आवडलं नाही. मुंबईतल्या एका रणजी सामन्याच्या वेळी त्याने मला पकडलं आणि म्हणाला, "तुमच्या 'षटकार'मध्ये माझ्या डाव्या हाताने केलेल्या बॅटिंगबद्दल आलंय. मी दीड तास बॅटिंग केली हे विसरु नका. तेव्हा खेळपट्टी कशी होती हे तुला ठाऊक आहे." त्यावेळी मी ‘षटकार’चा भागीदार आणि कार्यकारी संपादक होतो. भारतीय खेळाडूंसाठी मी ‘पंचींग बॅग’ होतो. ‘षटकार’मध्ये एखाद्या खेळाडूवर टीका झाली की पहिला गुद्दा मला मारला जायचा. तो हिंसक नसायचा, प्रेमळ असायचा. पण त्यामागे भावना असायची, "तू संपादक असताना आमच्याबद्दल असं छापून कसं येतं?"

सुनीलला मी म्हटलं, "तुझ्या महान असण्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात तीळभरही शंका नाही. अशा पद्धतीने तूच खेळू शकलास. इतरांना ते जमलं नसतं. पण मला एक विचारायचंय तुला की, अनेकदा तू मोठमोठ्या डावऱ्या फिरकी गोलंदाजांना भिंगरी खेळपट्टीवर खेळला आहेस, पण तेव्हा तुला कधी डाव्या हाताने खेळावं असं का वाटलं नाही?" मला वाटलं मी त्याला अनप्लेयेबल चेंडू टाकलाय. पण भटच्या वळणाऱ्या चेंडूएवढ्याच आरामात तो माझ्या या प्रश्नाचा चेंडू खेळला. मला तो म्हणाला, "आम्ही सामना गमावलाच होता. म्हणून मी प्रयत्न केला. We had nothing to lose. एरवी मी असा कधीच खेळलो नसतो." असं म्हणून तो गेला पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग मावळला नव्हता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मला सुनील भेटला. मी थोडा घाबरत-घाबरत हसलो. पण त्याने मला थांबवलं आणि मला म्हणाला, "मी तुला काल असं बोलायला नको होतं." मी चकित झालो. कारण सुनील बोलताना कुठे चुकला असं मला वाटलंच नव्हतं. मी त्याला विचारलं, "काय बोलायला नको होतं?” तो म्हणाला, "मी डाव्या हाताने दीड तास खेळलो अशी शेखी मी मिरवायला नको होती. मी त्याचा गर्व केला ते चुकीचं होतं. माणसाला गर्व असू नये." आणि तो निघून गेला. 

मी अवाक झालो. कोणत्याही सेलिब्रिटीला चूक कबुल करणं कठीण जातं. अलीकडे तर उथळ पाण्याला खळखळाट किती आहे ते रोज दिसतं. इथे सुनीलची काही चूक आहे असं मला मुळीच वाटलं नव्हतं. पण सुनीलच्या मनाला मात्र ते कुठेतरी वाटत राहिलं होतं. सुनील माझ्या मनात आधीच आभाळाला भिडला होता. या प्रसंगानंतर तो आभाळ छेदून वर गेला.

Sunday, May 17, 2020

डॉन। गजानन धोंगडे

*डॉनच्या स्टोरी मागची गोष्ट*
🛡️
_चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट चांगलंच फळ देऊन जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॅान (अमिताभवाला) हा सिनेमा._
 ★सिनेसृष्टीतले प्रसिद्ध छायाचित्रकार नरिमन इराणी यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी मित्रांनी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट म्हणजे डॉन ची निर्मिती.★★

 इतक्या सिनेमांचे आपण चित्रीकरण केले आहे आपण एखादा चित्रपट काढून पाहायला हरकत नाही म्हणून नरिमन इराणी यांनी जिंदगी-जिंदगी नावाच्या सिनंमाची निर्मिती केली, _तो सॉलीड आपटला आणि त्यांच्यावर १२ लाखांचं कर्ज झालं (७८ सालचे १२ लाख)._
 *यानंतर ते मनोजकुमारच्या रोटी, कपडा और मकान ह्या सिनेमाचं चित्रीकरण करत होते, त्याच वेळी टांझानियामध्ये जन्मलेला, वाढलेला नंतर लंडनमध्ये स्थायिक झालेला चंद्रा बारोट इंग्लंडला काही कामधंदा जमला नाही म्हणून मनोजकुमारकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सात वर्षांपासून काम करत होता. कॅमेर्‍यामधून प्रत्येक शॉट बारकाईने आणि अभ्यासाने पाहण्याच्या चंद्राच्या सवयीने नरीमन इराणींना चंद्रा आवडू लागला आणि त्यांची दोस्ती झाली .* 

ह्या सेटवर इराणी सोडल्यास अमिताभ, झीनत अमान आदी सगळी चंद्राच्याच वयाची मंडळी होती. आपण भलं की आपलं काम भलं ह्या वृत्तीचे पण कामात चोख असलेले नरीमन इराणी सगळ्यांचे लाडके होते. 
एके दिवशी इराणींनी चंद्राला हजार रुपये मागितले. 
चंद्राला आश्चर्य वाटले पण त्याने ते दिले. त्यांनंतर त्यांनी काही दिवसांनी दहा हजार मागितले तेही चंद्राने दिले आणि कारण विचारलं इराणींनी त्याला जिंदगी-जिंदगी ची कथा सांगितली. 
साठ हजार रुपये महीना कमावणारे इराणी बारा लाखाचं कर्ज कसं फेडायचं ह्या चिंतेत होते.

 त्यावर यातून निघण्यासाठी आपण एक सिनेमा काढू असे चंद्राने त्यांना सांगितले. त्यासाठी त्याने अमिताभ, झीनत यांना पटविले. सगळ्यांनी इराणींसाठी होकार भरला. 
*आता प्रश्न कथेचा तर चंद्राने वहीदा रहमान यांच्या मार्फत सलीम खानशी संपर्क साधला आणि सलीमने त्यांना तीन-चार वर्षांपासून पडून आहे आणि जितेंद्र, धर्मेंद्र, देवानंद, प्रकाश मेहरा इत्यादी दिग्गजांनी नाकारली आहे असे सांगून ‘डॉन वाली स्टोरी’ दाखवली. जेम्स बॉंडच्या सिनेमांवर वाढलेल्या चंद्राला सूटा-बूटातल्या खलनायकाची कथा एकदम आवडली. तोपर्यंत हिंदी सिनेमातले खलनायक धोतरं नेसून घोड्यावर यायचे. त्या तुलनेत हे धाडसच होतं. सात वर्षात चंद्रा चांगला तयार झाला आहे त्याला दिग्दर्शन सोपवायला हरकत नाही अशी ग्वाही मनोज कुमारने इराणींना दिली. सलीम खान चर्चा करतांना नेहमी ‘डॉन वाली स्टोरी’ असा उल्लेख करायचे. त्यामुळे इराणींनी ‘डॉन’ हे शीर्षक नोंदवून टाकले.* 

कल्याणजी आनंदजींना संगीताची जवाबदारी सोपवली इराणी कर्जातून बाहेर निघण्यासाठी आणखीन सिनेमा काढताहेत तेही नव्या दिग्दर्शकाला घेवून, तेही अनेकांनी नाकारलेल्या कथानकावर आधारीत यावरुन सिनेसृष्टीत लोकं चेष्टेच्या सुरात बोलायला लागले. 
त्यातून इराणी-चंद्रा जोडी फारच मजेदार होती. 
इराणी सहा फुटी धिप्पाड तर चंद्रा साधारण प्रकृतीचा, साडेपाच फुटाचा. कर्जातून निघण्यासाठी सिनेमातर काढायचा पण त्यासाठी पैसे नाहीत. 
सुरवात गाण्याच्या शुटींगने केली त्याकरीता धाकट्या भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी पैसे चंद्राच्या गायिका बहिणीने दिले. सिनेमाचं शुटींग रंगात आलं अन् प्राणला अपघात झाला तो लंगडत होता म्हणून मग कथेत बदल करुन त्याला लंगडा दाखवला ते होत नाही तर मोठा धक्का बसला खुद्द इराणींचा मृत्यु झाला. 
*जुने बारा लाख आणि हा नवीन खर्च असा सर्व बोजा इराणींच्या बायकोवर आला, पुन्हा दोस्तांनी हिम्मत बांधली. डॉन जख्मी हुआ तो क्या हुआ, आखिर डॉन है ह्या संवादाला जागत शुटींग सुरू राहीले. अमिताभ, झीनत, प्राण यांनी पैसे नकोच सिनेमा पूर्ण करु असा धीर चंद्राला दिला. सिनेमाचे रशेस पाहून सलीम-जावेद ने चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा होतोय या शब्दात अमिताभ व चंद्राचे कौतुक केले. डॉन म्हणजे क्षणाक्षणाला धक्का देणारी अशी अतिशय चोख आणि बंदीस्त मनोजकुमारच्या शब्दात एअर टाईट पटकथा होती. त्यांनीच लोकांना रिलॅक्स व्हायला उत्तरार्धात एक गाणं टाकण्याची सुचना केली आणि मुळात बनारसी बाबू या सिनेमासाठी लिहीलेल्या ‘खईके पान बनारसवाला’ या गाण्याचा डॉनमध्ये समावेश झाला.*

 चित्रपट तयार झाला. *चित्रातल्या ‘व्हाईट स्पेस’चे महत्व समजणार्‍या चंद्राने सिनेमाचे पोस्टर्स स्वतः करवून घेतले. पूर्ण पांढर्‍या पार्श्वभागावर एका रंगातली झीनत अमान आणि दिवाकर करकरे या चित्रकाराने काढलेला धावणारा अमिताभ इतकाच ऐवज असणारी ती पोस्टर्सही गाजली.*

 त्यावेळचे मोठे चित्रपट प्रत्येक विभागात साधारण नऊ लाखाला विकले जायचे. 
*डॉनला प्रत्येक टेरेटरीत एकवीस लाख अशी सॉलीड रक्कम मिळाली. एकूण ८४ लाखात तयार झालेल्या डॉनने आज पावेतो ३५० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे.*

 डॉन नंतर महीनाभरात कल्याणजी आनंदजी अमिताभला घेवून वर्ल्ड टूरला निघाले.
_त्यांच्या प्रत्येक शो ची सुरवात ‘जिसका मुझे था इंतजार ने ’ व्हायची तर शेवट ‘खईके पान बनारसवालाने’. डॉन सर्व संबधितांच्या कारकीर्दीतलं सोन्याचं पान ठरला._

 चंद्रा स्वतःही नंतर तसा चित्रपट तयार करुन शकला नाही.
 आणि हो ज्या कारणासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला ते इराणींचं कर्जही फिटलं...

© गजानन घोंगडे

Tuesday, May 12, 2020

इरफान खान । नसिरुद्दीन शहा

नमस्कार.नसिरुद्दीन शाह यांनी इरफान खान विषयी लिहिलेला एक इंग्रजी लेख गेल्या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या 'EYE' या पुरवणीत प्रकाशित झाला.अभिनय करणाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच तो महत्वाचा वाटला.त्या लेखाचे मी केलेले हे मराठी भाषांतर. खूप काही सांगून जाणारा लेख आहे.नक्की वाचा.नसिरुद्दीन शाह आणि इंडियन एक्सप्रेस यांचे मनापासून आभार. 

- कृतार्थ शेवगावकर
  
*इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. - नसिरुद्दीन शाह*

इरफानच्या जाण्याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे हे शब्दात बांधणे खरोखर अवघड आहे. त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी माझा जवळचा संबंध नव्हता, परंतु मला हेवा वाटायचा असा तो अभिनेता होता. इरफानसारखा अभिनेता होण्यासाठी किती प्रदीर्घ आणि कठीण संघर्ष करायला लागतो याची सर्वानाच कल्पना नाही. तो नावारूपाला येण्यापूर्वी त्याने टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये असंख्य छोटया मोठ्या भूमिका केल्या असतील. त्याच्यासारख्या माणसाची खासियत हीच असते की कितीतरी वर्षे नकारघंटा ऐकूनही तो थकत नाही आणि त्याच्या मनातील स्वतःवरील विश्वास कमी होत नाही.

मुंबईत स्ट्रगलसाठी आलेल्या नटांना जेव्हा मी भेटतो तेव्हा ते मला सांगतात की 'मी दोन वर्षे इथे प्रयत्न करेन अन्यथा गावी परत जाईन.' तेव्हा मी त्यांना 'तुम्ही तुमची दोन वर्षे वाया न घालवता लगेचच गावी जा.' असा सल्ला देतो.दोन वर्षात काहीच होणार नाहीये. इरफानने स्वतःला अशी कोणतीही मर्यादा (डेडलाईन) दिली नव्हती.हाच आपला आयुष्यभराचा उद्योग आहे हे त्याला ठाऊक होते. इथे तग धरण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्याचा पहिला सिनेमा 'द वॉरियर' (2001) येण्याआधी कित्येक वर्षे तो कसाबसा इथे तग धरून कष्ट करत राहिला. लगोलग यश न मिळणाऱ्या आजच्या तरुण नटांसाठी हे खरोखर प्रेरणादायी उदाहरण आहे. 

मला नेहमी जाणवतं की मृत्यू हा जगण्याचा सर्वात कमी महत्वाचा भाग आहे. माझा या गोष्टीवर विश्वासच आहे. तुम्ही कधी आणि कसे मरता याने फारसा फरक पडत नाही. तुम्ही कसे जगला आणि जगत असताना तुम्ही काय केले हे जास्त महत्वाचे. इरफानने त्याच्या जगण्याचा पुरेपूर उपयोग केला. आज मला माझ्या विश्वासाचा पुनर्विचार करायला लागतोय.  इरफानच्या जाण्याची वेळ आणि कारण दोन्हींनी खूपच फरक पडलाय. त्याच्याकडे देण्यासाठी अजून खूप काही होतं. आपण पाहिलेलं इरफानचं काम म्हणजे त्याच्या अफाट प्रतिभेची आणि बांधिलकीची केवळ एक चुणूक होती. त्याची न दिसलेली प्रतिभा पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही. समोर येऊन उभ्या ठाकलेल्या अवघड परिस्थितीला माणूस कसा भिडू शकतो हे पाहायचे असल्यास इरफानकडे पहावे. तो केवळ एक प्रतिभावान अभिनेता नव्हता. तो ज्या पद्धतीने जीवनाकडे पाहायचा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि ज्या कृतज्ञतेने तो शेवटची काही वर्षे जगला ते खरोखर विस्मयचकित करणारे आहे. त्याच्यामध्ये दुरदुरपर्यत अहंभाव नव्हता. त्याला होत असणाऱ्या वेदना त्याने कधी व्यक्त केल्या नाहीत. "हे नाजूक शरीर इतक्या प्रचंड वेदना सहन करू शकते हे आश्चर्यजनक आहे." एवढंच तो म्हणायचा. त्याचे बोलणे ऐकताना तो स्वतः या दुःखातून जातोय हे जाणवायचेही नाही. शेवटपर्यंत तो लोकांना प्रेरणा देत राहिला. ज्याप्रकारे तो या भयंकर आजाराशी लढला,सतत आशावादी राहिला आणि ज्या वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून त्याने परिस्थिती हाताळली हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते.जेव्हा त्याच्या आजाराचे निदान झाले तेव्हा त्याच्या शांततेचा भंग केलेला त्याला आवडेल की नाही याची मला कल्पना नव्हती,म्हणून मी त्याला संपर्क केला नाही.पण इरफाननेच एक दिवस मेसेज पाठवला. "Knock Knock Naseer Bhai".नंतर लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना अनेकदा मी त्याच्याशी बोललो. एक अपरिहार्य गोष्ट रोज आपल्या दिशेने पावलं टाकतेय हे त्याला ठाऊक होते. तरीही तो म्हणायचा की "किती लोकांना स्वतःचा मृत्यू असा जवळजवळ येतांना त्याचे निरीक्षण करण्याची संधी मिळते?मी ही जवळ येणारी गोष्ट पाहू शकतो आणि तिचे स्वागतही करू शकतो." त्याचे हे शब्द ऐकल्यावर मी हललो. मला जाणीव झाली की एखाद्यासाठी मृत्यूला सामोरं जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

इरफानचे काम सर्वाना माहित आहे आणि ते नेहमीच आपल्या सोबत असणार आहे. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होईल यात काहीच शंका नाही. तुम्ही त्याचा अभिनय पाहता तेव्हा जणू वाटतं की तुम्ही त्याचं मन वाचताय. तो तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी कधीच कष्ट घेत नाही. एक अभिनेता म्हणून इरफानच्या बाबतीत हा मोठा विरोधाभास होता. अभिनेता नेहमीच त्याच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी कष्ट घेत असतो. इरफानला विश्वास होता की प्रेक्षक त्याच्यापर्यंत पोहचणार आहेत. जे लोक फक्त त्याचे काम पाहून त्याच्याशी जोडलेले होते त्यांनाही तो आपलासा वाटला. एखाद्या अभिनेत्यासाठी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. प्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसांत शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वानाच दुःख झालंय. ओळख नसली तरी हा माणूस हिरा होता हे सर्वांनाच जाणवलं होतं. त्याच्या अभिनयकलेवरील प्रभुत्वाचे आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासाचेच हे द्योतक आहे. ते प्रभुत्व आणि क्षमता त्याने कमावलेल्या होत्या. त्याची बुद्धिमत्ता दुर्मिळ होती. त्याने केलेल्या भूमिकांमध्ये एक चमत्कारिक दैवी सामर्थ्य होते. बुद्धिस्ट साधू वेगवेगळया रंगातून अतिशय अवघड अशी चित्र काढतात. त्यासाठी अनेक दिवसांची तपश्चर्या लागते. चित्र पूर्ण झाले की ते लगोलग ते चित्र पुसून टाकतात. ते कोणी पाहीले किंवा नाही याने फारसा फरक पडत नाही. परंतु ती कलाकृती घडवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. इरफानचा अभिनय पाहिला की मला या लोकांची आठवण येते. इरफान कधीच स्वतःच्या कामाबद्दल बोलायचा किंवा बढाई मारायचा नाही. तो फक्त शांतपणे काम करायचा. अजून काम करण्याची संधी त्याला मिळणार नाही हे सत्य अन्यायकारक वाटून माझा संतापही होतो. आम्ही समकालीन आहोत आणि एक असा अव्वल प्रतिभेचा अभिनेता मला माझ्या काळात पाहायला मिळाला याबद्दल मला कृतज्ञता वाटते.

गोविंद निहलानी दिग्दर्शित 'जझिरे' (1991) नावाच्या टेलिफिल्ममध्ये तो, रत्ना पाठक-शाह आणि मिता वशिष्ठसोबत काम करत होता तेव्हा मी प्रथम त्याला भेटलो. हेंरीक इब्सेनच्या Little Eylof या नाटकावर ती टेलीफिल्म होती. मी ते नाटक वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला ते अतिशय अस्पष्ट, गूढ आणि दुर्बोध वाटले होते. इरफान तेव्हा अनेकदा तालिमीसाठी घरी यायचा. तेव्हा पहिल्यांदा हा उंच,हडकुळा आणि मोठ्ठया डोळ्यांचा माणूस माझ्या दृष्टीस पडला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात(NSD) मी शिकवायला जायचो परंतु त्याच्या वर्गासोबत काम करण्याची संधी कधी मला मिळाली नाही. नंतर मी 'प्रायव्हेट डिटेक्टिव्ह:टू प्लस टू प्लस वन'(1997) नावाच्या एका सिनेमात काम केले. त्यात त्याची अतिशय छोटी भूमिका होती, परंतु त्याच्या कामाच्या अस्सलतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही. कोणतीही खटपट आणि विशेष प्रयत्न न करता त्या सिनेमात तो उभा राहिला. 'द वॉरियर' पाहिला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो. तो पाहून मी पूर्णतः हललो आणि न राहवून त्याला फोन केला. त्याला खूप आनंद झाला. भारतात अनेकांनी ही फिल्म पाहिलेली नाही.
विशाल भारद्वाजच्या मकबूल(2003)पासून आमची अजून चांगली ओळख झाली. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये अनेकदा अदलबदल चालले होते. विशालला काहीतरी जाणवले आणि त्या भूमिकेसाठी त्याने इरफानला निवडले. इरफानच्या भारतातील ओळखीसाठी मकबूल सुरवात होती. तो तेव्हा अवघ्या तिशीत होता आणि सोबत ओम पुरी, पंकज कपूर आणि मी होतो. त्या सिनेमात तो स्वतंत्र उभा राहिला.

मी त्याला अभिनय करताना पाहतो तेव्हा मला मोझार्ट आणि अंटेनियो सॅलेरी आठवतो. सॅलेरी देवाला विचारतो की "तू मला इतकं सामान्य का बनवलंस?या मोझार्टने नुसत्या बसल्याबसल्या सहज केलेल्या काहीबाही संगीतरचना मी तासनतास कष्ट करून बनवलेल्या संगीतरचनांपेक्षा श्रेष्ठ का आहेत ?" मी इरफानला बघतो तेव्हा मला असेच वाटते.

तो मोझार्ट होता.

मी त्याच्या वयाचा होतो तेव्हा त्याच्याइतकं प्रतिभावंत असायला मला नक्कीच आवडलं असतं. मी खरोखर निखालस त्याचा मोठेपणा मान्य करतो. इरफानच्या सोबतीने त्याच्या बाजूला उभा राहील असा कोणताही अभिनेता मला दिसत नाही. तो केवळ उत्कृष्ठ अभिनेता नव्हता तर त्याचसोबत एक सज्जन,प्रेमळ आणि निस्वार्थी माणूस होता. त्याच्यासोबत घालवलेले मौल्यवान क्षण मी जपून ठेवले आहेत. मी स्वतःला इरफानचा प्रवास पाहिलेल्या भाग्यवान लोकांपैकी एक समजतो.

अभिनयाचे एक मोठे शिक्षक एकदा म्हणाले होते की प्रतिभा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, परंतु प्रतिभेचा अभाव मात्र नक्कीच असतो. तुम्ही योग्य वेळी योग्य जागी नसता तेव्हा प्रतिभेचा अभाव असतो. मी इतकंच म्हणेन की इरफान सुरवातीपासून योग्य वेळी योग्य ठिकाणी होता आणि त्याने ही गोष्ट ओळखली होती.त्यामुळे त्याची निराशा किंवा भ्रमनिरास झाला नाही. त्याची जागा कुठंय हे त्याला पक्के ठाऊक होते. ही विशेष प्रतिभा त्याच्याकडे होती आणि ती त्याला दैवयोगाने मिळालेली नव्हती. स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून आणि प्रचंड करूणेतुन त्याने ती कमावली होती. इरफानचा अभिनय नैसर्गिक होता असं म्हणणं सोपं आहे, परंतु नैसर्गिक असं काही अस्तित्वात नसतं. मायकल अँजेलोलासुद्धा कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी चित्रांवर तासनतास काम करावे लागायचे.मला खात्री आहे की इरफानसुद्धा भूमिकेवर प्रचंड प्रमाणात मेहनत घेत असणार. चांगला अभिनेता होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत करायला लागते. स्वतःवर सतत शंका घेत, काहीही गृहीत न धरता परत परत करून बघण्याची धमक लागते. हृदय पिळवटून सतत काम करायला लागते. तेव्हा जाऊन कुठे चांगला अभिनेता तयार होतो. इरफान हिंदी सिनेमाच्या प्रभावाखाली आला नाही हे बरेच झाले. त्याच्यावर त्याच्या स्वतः चा प्रभाव होता. इरफान कधी त्याच्या कामामध्ये हललाय असं मला कधीच जाणवलं नाही. याला काही अपवाद आहेत.लाईफ ऑफ पाय(2012) च्या काही सीन्स मध्ये त्याने अमेरिकन-कॅनेडियन लहेजामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय. ते त्याला फारसं जमलेलं नाही. मी त्याविषयी त्याला बोललो तेव्हा त्याने ते कबूल केले."मे ट्राय कर रहा था,नसिरभाई |" तो म्हणाला.

यावरून मकबुलच्या चित्रीकरणादरम्यानचा एक प्रसंग मला आठवतोय. चित्रपटात मकबूल आणि काका यांच्यात एक प्रसंग आहे. काकांची भूमिका पियुष मिश्रा करत होता. मॅकबेथला बँकोच्या भुताशी संघर्ष करायला लागतो असा लोकप्रिय शेक्सपिअरियन सीन होता. काकांचे शव जेव्हा चितेवर आणले जाते तेव्हा इरफान दुःख दाखवण्यासाठी गुडघे टेकतो आणि अचानक चितेवरील काकांच्या मृतदेहाचे डोळे उघडतात. आम्ही तालीम करत होतो. पियुष चितेवर आडवा झाला होता, इरफान त्याच्या बाजूला बसला होता आणि मी त्याच्या मागे उभा होतो. तालीम सुरू झालीय याची मला काही कल्पनाच नाही. मी तसाच उभा होतो.इरफान जोरात मागे कोसळला. मी त्याला आधार द्यायला धावलो. मला वाटलं त्याचा तोल जातोय.तर - इसमत चुगतई सदाअत हसन मंटोच्या डोळ्यांचं वर्णन करते तसं - ते 'मोरपंखी' डोळे माझ्याकडे वळून मला म्हणाले,"नसिरभाई मी अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय.तुम्ही का मला मदत करताय?" एखादा अभिनेता अभिनय करतोय आणि मला ते खरं वाटलंय हे याआधी कधी झालेलं नाही. ज्या तन्मयतेने तो भावनिक उद्रेक, क्रोध आणि उत्कटता असलेल्या प्रसंगांना भिडायचा तेव्हा तेव्हा तो नेहमीच विस्मयचकित करायचा.

मी त्याला रंगमंचावर कधीच पाहिले नाही. त्याविषयी बोलण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्याने कधी इच्छा दाखवली नाही. तो थेटरला यायचा. माझे रंगमंचावरील काम पाहायचा. पण त्यात त्याने कधी सहभाग घेतला नाही. कदाचित रॉबर्ट डी निरो किंवा डॅनियल डे लुईस प्रमाणे इरफान त्याच्या भूमिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भावनिक गुंतवणूक करायचा असं मला जाणवतंय. रोज रात्री त्या प्रमाणात स्वतःच्या मनाची गुंतवणूक करून घेणे शक्य नसते. म्हणून त्याने नाटक सोडले असावे असे माझे गृहीतक आहे. याच कारणासाठी मार्लन ब्रँडो आणि डॅनियल लुईस सारख्या अभिनेत्यांनी नाटक सोडले. यश मिळालं म्हणून नव्हे तर रंगमंच त्यांच्याकडून जी मागणी करत होता ती पूर्ण करणे त्यांना अशक्यप्राय होते म्हणून.  

'यु होता तो क्या होता' (2006) या मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची मला लाज वाटते. इरफानचा त्या सिनेमातील भाग अनेक कारणांसाठी अतिशय निर्दयीपणे कापायला लागला. इतका की शेवटी त्याचं सिनेमात काही उरलंच नाही. त्याने एकदाही तक्रार केली नाही किंवा मी त्याच्यावर अन्याय केलाय अशी जाणीव होऊ दिली नाही. तो त्याविषयी केवळ आपुलकीने बोलला. भूमिका कोणती किंवा किती पैसे मिळणार असा एकही प्रश्न न विचारता त्याने केवळ माझ्या एका बोलण्यावर होकार कळवला होता. मला पश्चाताप होतोय की मला त्याची भरपाई करायची संधी मिळाली नाही.आता त्या मोठ्या अभ्यासखोलीत भेटायची संधी आम्हाला कधी मिळालीच तर मी ती भरपाई करू शकेल.

इरफानची कथा सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत प्रेरणादायी आहे. त्याने आपल्याला दिलेल्या क्षणांसाठी मी केवळ फैज अहमद फैजची एक ओळ सांगू शकतो. 

"उन असीरों के नाम
जिन के सीनों में फ़र्दा के शबताब गौहर
जेलख़ानों की शोरीदा रातों की सर-सर में
जल-जल के अंजुम-नुमाँ हो गये हैं | 
(त्या बंदिवानांच्या नावे - ज्यांच्या उरात उद्याचे चमकणारे मोती आहेत - परंतु कारागृहाच्या  उद्विग्न रात्रींच्या तुफानी वावटळीत जळून जळून जणू ते तारे होऊन गेले आहेत ; भाषांतर:नचिकेत देवस्थळी) 

इरफान मागे ठेऊन गेलेला वारसा म्हणजे या ताऱ्यांचे नक्षत्र आहे. नटांनी आदर्श आणि प्रेरणा घ्यावी असे हे नक्षत्र आहे.इरफान खरोखर अभिनेत्यांचा अभिनेता आहे.

लेखक : नसिरुद्दीन शाह
इंग्रजी संपादन : अलका साहनी 
मराठी भाषांतर : कृतार्थ शेवगावकर

Thursday, April 30, 2020

इरफान खान

[29/04, 5:14 pm] Charudatta: भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

'पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला'....
इरफानचे वडील असं म्हणण्यामागे काय होतं कारण
>>>>> NEWS18 LOKMAT
📘📙📗📕📘📗📗📕

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इरफान खानचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. अचानक तब्येत खालावल्यानं इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती चिंताजनक होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. आज मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा रिलीज झाला होता. हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या इरफान खानला भारतात कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. इरफानचा जन्म 1967 मध्ये जयपुरमधील एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. त्याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे. त्याचे वडील टायरचा व्यवसाय करायचे. इरफानचा जन्म पठाण कुटुंबात झालेला असूनही तो लहानपणापासून शाकाहारी होता. यामुळेच इरफानचे वडील त्याला नेहमी पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्मला आला असे मस्करीत म्हणायचे.

इरफान खानचं स्ट्रगल फार मोठं होतं. जेव्हा इरफानला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला त्याच काळात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्याला घरुन पैसे मिळणं पूर्ण बंद झालं. एनएसडीकडून मिळणाऱ्या फेलोशिपमधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. इरफानने त्याची वर्ग मेत्रिण सुतपा सिकंदरशी 23 फेब्रुवारी 1995 मध्ये लग्न केलं. इरफानच्या कठीण काळात सुतपाने नेहमीच त्याला साथ दिली.

सुतपासाठी इरफान धर्म बदलायलाही तयार होता. मात्र सुतपाच्या घरातल्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं. यामुळे इरफानला धर्म बदलायची गरज पडली नाही. इरफानने एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘रोग’ सिनेमात इरफानची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ‘हासिल’ सिनेमासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर इरफानने ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पीकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’सारखे अफलातून सिनेमे केले.

‘पान सिंग तोमर’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 2011 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्याचा सन्मान केला. गेल्यावर्षीपासून तो न्यूरो एंडोक्राइन या आजाराने त्रस्त आहे. 2 वर्षांपूर्वी त्यानं अमेरिकेत या आजारावर उपचार घेतले होते. आजारपणामुळे तो बॉलिवूडपासून दूर होता. मात्र प्रकृती सुधारल्यावर त्यानं 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. याआधी रिलीज झालेल्या त्याच्या ‘हिंदी मीडियम’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आजारपणातचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रमोशनलाही उपस्थित राहू न शकलेल्या इरफानचा हा शेवटचा सिनेमा ठरला.
📕📗📙📘📕📗📙📘
[29/04, 8:40 pm] Charudatta: *शेअरिंगचं सौजन्य : हर्षवर्धन*

*वो चमेली कें फुल...*

इरफान खान आज गेला.. गेल्या कित्येक दिवसांपासून तो जाणार अश्या बातम्या कानावर आदळत होत्या. साधारण 15 वर्षांपुर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजुला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा  खणखणीत आवाज कानावर येत होता. इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते.

मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. इरफान त्यावेळी बोलताना मला म्हणाला, त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवुन ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलासोबत माझं एक नातं तयार झालं होतं असं त्याने सांगितलं.

इरफानचं वेगळेपण हे तेव्हाच दिसुन आलं होतं. काही माणसं ही खरोखर वेगळी असतात स्टारडमपेक्षा या माणसांकडे मन असतं हे त्यावेळी इरफानशी बोलताना पदोपदी जाणवलं. त्यानंतर इरफान वरचेवर भेटला.. कैसे हो प्रभाजी.. असं म्हणत नंतर पुढचं वाक्य म्हणायचं आपको याद हैं ना चमेली के फुल.. मी म्हणायचे यस सर...

इरफान खानने त्या मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली होती. की आमच्या धर्मात आमच्यावर फुलांची चादर चढवली जाते. मी जेव्हा या जगातून जाईन तेव्हा हा चमेलीचा सुगंध माझ्यासोबत असावा असं मला वाटतं. माझ्या अंगावर मी गेल्यानंतर चादर चढवली जाईल तर ती चमेलीची असावी असं मला वाटतं.

आज इरफानचं जाणं फार धक्का लावून नाही गेलं. कारण शेवटचं त्याच्याशी बोलणं झालं साधारण दीड वर्षांपूर्वी तेव्हाच तो म्हणाला,  “प्रभाजी चमेली की चादर चढाने का वक्त नजदीक आ रहा हैं..”

आज या टाळेबंदीच्या काळात मिळाली असेल का त्याला ती चमेली.. म्हणुन जीव कासावीस झालाय... तो गेलाय त्याचं फार वाईट वाटत नाहीए... तो सुटलाय.. पण चमेलीचं काय...

मिळाली असेल का त्याला ती चमेली... तो चमेलीचा सुगंध... ???

*प्रभा कुडके*
Prabha Kudke
[30/04, 8:27 am] Charudatta: मकबूल 'फिदा' खान....
© मिलिंद सहस्रबुद्धे

हॉलीवूड मधील डेंजील वॉशिंग्टन हे नाव असं आहे की, "एखादा इंग्लिश मूवी बघू, अरे डेंजील वॉशिंग्टन आहे का? चल भारी असेल मग". जरा तसंच हिंदी पिक्चरच्या वेळेस "इरफान आहे का? तर मग बघूच, चांगला असेल नक्की" असं वाटावं असा Born Actor.  ज्याच्या फक्त नावामुळे पिक्चर बघावा, त्या पिक्चर मधे आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं वाटावं असा हा मकबूल.... अर्थातच इरफान खान.  

वास्तववादी पिक्चर बघायची ज्यांना आवड आणि नशा आहे ना, त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने काही हिरे नेहमीच राखून ठेवलेले आहेत. अर्धसत्य मधला घामाघूम होवून धावत पळणारा इन्स्पेक्टर ओमपुरी असेल, "मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे" म्हणणारा मनोज वाजपेयी असेल, सरकार मधला के के मेनन असेल, नाहीतर मग "भाई.. सोडा बाॉटल की किंमत तब तक जबतक की वो बंद...जैसे ही बुच खुला...फुस्स..झाग बह जाता है...रह जाता है क्या...पानी" वाला आन मधला पठाणवाडीतला पठाण, इरफान खान असेल. हया सर्वांचा एक वेगळाच 'वरचा क्लास' आहे. म्हणजे 'दहावी फ' असून सुद्धा हे सगळेजण 'बोर्डात' आलेले आहेत.

हो बरोबर ओळखलंत..आज इरफान खान.
उत्तर प्रदेश मधील पठाणी कुटुंबात जन्मलेला एक साधा युपी का लौंढा. मला तो सापडला तो हासिल नावाच्या जिम्मी शेरगील नामक हिरोच्या पिक्चर मध्ये. विद्यार्थी राजकारणावर बेतलेला चित्रपट. त्यात इरफाननी व्हिलनची भूमिका केली होती. टिपिकल उत्तर प्रदेश मधला रणविजय सिंग नावाचा नेता.  यूपीच्या बॅकग्राऊंडवर असलेलं हे पिक्चर. त्यामुळे इरफान साठी जणू  होम ग्राउंडच होतं. त्यानी त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्या भूमिकेचं सोनं केलं. त्याला त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. साधारण 2003-2004 साल असेल.

कायम पारोसा दिसणारा चेहरा, बटबटीत बाहेर आलेले डोळे, अगदीच अर्धवट वाढलेली दाढी आणि बोलताना एकीकडे सतत लवंग किंवा काहीतरी खातोय असं वाटावं असा लूक.
 तो कितीही मोठा सेलिब्रिटी झाला ना तरी या लुक मधून बाहेर येऊ शकला नाही, अगदी ऑस्कर समारंभातपण. पण हाच त्याचा लुक भल्याभल्यांना वेडं करून गेलाय हे मात्र नक्की.

अभिनय ही तर जबरदस्त ताकदीची बाजू होतीच पण सगळ्यात उजवी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे डायलॉग डिलिव्हरी. त्याचा प्रत्येक डायलॉग, डिलिव्हरीसाठी कायम लक्षात राहील.  भूमिका फक्त चित्रपटापुरती नाही, तर ती वास्तववादी आहे आणि खरंच कोणीतरी असा माणूस आहे, असं वागतोय असं वाटावं इतकी तो ती भूमिका आणि त्याचा अभिनय हुबेहूब करायचा. कित्येक वेळा आपण एखाद्या रस्त्यावर किंवा नाक्यावर  टिपिकल पान खात चाललेला माणूस पाहिला ना की उगाच आठवतं च्यायला साला इरफान, त्या अमुक पिक्चरमध्ये तमुक रोल हुबेहूब करून गेलाय. हेच तर त्याच्या यशाचं गमक होतं असं वाटतं.

अर्थातच एनएसडी मधील शिक्षण. हे शिक्षण काही औरच असतं. इथं तुम्हाला शबनम आणि चप्पल घालून जमिनीवरच सत्य अनुभवायला शिकवतात. एकदा का जमिनीला कान लावून शिकलात ना! की मग उंच उड्या मारायला आरामात जमतं. भीती वाटत नाही. जमिनीवर परत खाली येताना पडायची भीती नसते, कारण आधी कित्येक वेळा तिच्यावर पडून आणि आपटून झालेलं असतं.

हासिल पिक्चर नंतर, हया हिऱ्याला स्पर्श झाला तो गुलजार नामक वडाच्या सावलीत वाढणाऱ्या विशाल भारद्वाज ह्या जौहरी दिग्दर्शकाचा. मकबूल...बास मग अजून काय हवं होतं. आप, मै और बॅगपायपर सारखी बैठक जमून आली. आणि ती आल्यावर मैफल तो रंग लानी ही ती. सिर्फ रंग नहीं लायी तर पुरे दुनिया में छा गई.

इरफान खान हे नाव इंटरनॅशनल लेव्हलवर झळकू लागलं.  कसं असतं बघा, सर्वसाधारणपणे राहुल आणि सिमरन मागे असणारे सगळे चाहते, अचानक त्यांना इरफान आवडायला लागला. तोपर्यंत हा माणूस त्यांना कुठेच दिसला नाही. बिचारा 1988 च्या सलाम बॉंबे पासून ते मग मकबूल 2004 ला रिलीज होई पर्यंत विविध छोट्या-मोठ्या भूमिका यशस्वीपणे करत होता.  पण आपल्याकडे सामाजिक दृष्टीकोनाच्या काचा नेहमी अधूनमधून गाडीच्या वायपर फिरवतात तसा हलवून साफ कराव्या लागतात. मगच आपल्याला दिसतात ओम पुरी, नासिरउद्दीन शाह, गिरिष कर्नाड, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान ...असे बरेच जण.

मकबूल पासून मात्र इरफानने मागे पाहीलेच नाही. आपल्या पब्लिक नी पण त्याला डोक्यावर घेतलं.  मग नॅशनल, इंटरनॅशनल विविध चित्रपटांमध्ये तो झळकू लागला.  शाहरुख बरोबर बिल्लू बार्बर, अमितजींबरोबर पिकू, अक्षय कुमार बरोबर आन असे बरेच कमर्शिअल सिनेमे तर केलेच. त्याच वेळेस लंचबॉक्स, पानसिंग तोमर, मदारी यांसारखे वास्तववादी पिक्चर करून तो कायम याद राहिला.

हॉलिवूड मध्ये Slumdog Millionaire, Jurrasic World आणि त्याचा अतिशय गाजलेला Life of Pie. हया चित्रपटांमुळे तर तो अमेरिकेच्या चंदेरी दुनियेत नावाजला गेला. एक मात्र कायम दिसून आलेलं आहे की, ऑस्करच्या वारीत तुम्ही चंदेरी दुनियेत झळाळणारे स्टार असायलाच पाहिजे असं नाही आणि तिथं गुलछबू चेहऱ्यांची गरज नाही. तुम्ही जर हाडाचे नट असाल तर हॉलीवुड कायमच तुम्हाला त्याच्या साम्राज्यात सहभागी करून घेतो. ओम पुरी पासून ते इरफान खान पर्यंत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

पानसिंग तोमर हा माणूस पुढील कित्येक वर्षांनी इरफाननीच आपला आत्मचरित्र चित्रपट करावा म्हणूनच जन्माला आला होता की काय असं वाटावं, इतका जिवंतपणा त्या पिक्चर मध्ये इरफानने आणलेला आहे. "बिघड मैं बागी होते है साहीब, डकैत मिलते है पार्लमेंट मे!" हा त्याचा डायलॉग इतका जबरदस्त होता की देशाच्या राजकारणाचं कसं चंबळचे खोरे होत चाललंय याची जाणीव हा डायलॉग वेळोवेळी करून देत गेला.

असा हा आपला पानसिंग, कॅन्सरची रेस जिंकण्यासाठी त्याच तळमळीने धावला कधी जिंकला तर कधी हरला. पण  न डगमगता लढतच राहिला. मागच्या आठवड्यापासून शेवटची रेस होती त्याची आणि ती लालफित क्रॉस करण्यासाठी, जिंकण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द खरंच संस्मरणीय राहील. आयुष्याच्या शर्यतीत जरी ती लालफीत तो क्रॉस करू शकला नसला तरी लोकांच्या ह्रुदयात त्याच्या नावाचा लाल रंगाचा हार्ट शेप तो कायम ठेवून गेला.

शेवटी त्याच्याच एका D- Day  नावाच्या पिक्चरमधील डायलॉग आठवतो....
"सिर्फ इन्सान गलत नही होते. वक्त भी कभी गलत हो सकता है"

इरफान तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०

ऋषी कपूर

[30/04, 10:25 am] Charudatta: *आज सकाळी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले.*
*ऋषी कपूर यांचा अल्प परिचय.*
जन्म. ४ सप्टेंबर १९५२
असा अभिनेता होणे नाही.
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. 
आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य.... दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला. आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते , रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे की ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल. १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ चि वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसऱ्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नसत. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती. प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा. २०१९ मध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. या फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. *ऋषीकपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.*
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
*ऋषीकपूर यांची गाणी.*
https://www.youtube.com/watch?v=buak7IIvWxY
https://www.youtube.com/watch?v=1ldwcYP4PjQ
https://www.youtube.com/watch?v=VLmVJmi3CtA
[30/04, 11:33 am] Charudatta: मेरी उमरके नौजवनो...

चाळीस चाळीस वर्षांचा बोजड हिरो आणि डोळ्यांची पिटपिट करणारी षोडशा नायिका बघण्याची सवय झालेल्या भारतीय प्रेक्षकांना एकदम 16 वर्षांची डिंपल आणि समोर 18 वर्षांचा नायक प्रथम दिसला तो ऋषिकपूरच्या रूपाने. ऋषीकपूर सिनेमात येईपर्यंत 18व्या वर्षी सिनेमा बघणे देखील संस्कारात बसत नव्हते. तोच डिंपल आणि ऋषीने सिनेमा एकदम तरुण करून टाकला. मेरा नाम जोकर पडला आणि त्याच्या वडिलांना म्हणजे राजकापूरला मोठा आर्थिक फटका तर बसलाच पण स्वतःचा सिनेमा या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागला. नर्गिस, नूतन, वैजयंतीमाला, पद्मिनी, हेमामालिनी अशा अपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान नायिकांबरोबर लोक आपल्याला मान्य करणार नाहीत याची जाणीव राजला झाली. त्याने हार मानली आणि नायक म्हणून स्वतःला बाजूला करून ऋषीला पुढे आणले आणि देशातली तरुणाई एकदम बदलून गेली. प्रेमाचा अंकुर सोळाव्या वर्षीच फुलू लागला या जोडीमुळे. नर्गिस प्रथम ज्या रुपात दिसली ते तिचे रूप आणि त्या पौगंडावस्थेतील आपला झालेला गोंधळ मोठ्या खुबीने डिंपल व ऋषींच्या रूपाने त्याने दाखवला आणि तरुणांना जाणवले की आपले देखील असेच होते. बॉबी लोकांनी डोक्यावर घेतला. अतिशय तरल वाटणाऱ्या मेरा नाम जोकरचे अपयश बॉबीने अक्षरशः धुवून काढले. लोकांना फ्लॅशबॅकचा कंटाळा आला होता. तरुणाई वर्तमानात जगू बघत होती. बॉबी आला तो वादळ घेऊन. मला घरातून तंबी मिळाली होती. बॉबी बघायचा नाही. बघायचा नाही म्हणल्यावर जास्तच बघावा वाटू लागला. एकेक मित्र बघून सांगत अरे येड्या डिंपल काय दिसते दस्सा. सगळे पाहून आलेले ऋषिकपूर होऊन वावरायला लागले होते. शेवटी एकदाचा बॉबी बघितला. एकदाचे गालावरून मोरपीस फिरले. सगळं नवीनच घडत होते.  संस्कार बदलून टाकले बॉबीने. इतिहास घडवला ऋषी आणि डिम्पलने.
मग ऋषी खेळखेलमे बघितला, बारुद बघितला, अमर अकबर अँथनीत देखील भाव खाऊन गेला. राजेश खन्नाला डब्यात घालणारा हा हिरो अनेक दिवस गळ्यातला ताईत बनून राहिला. कपूर घराण्याचा आनुवंशिक जाडेपणा जेव्हा आला तेव्हा मात्र वेळेत एक्झिट घेतली. वयाला आणि जाडीला शोभतील काही चरित्र भूमिका केल्या. 
ऋषीचे जाणे म्हणजे आमच्या पिढीतल्या एका मित्राच्या जाणे. जीवाला चटका लावून गेले. तरुणावस्थेतून सगळे जातात पण सगळे तारुण्य जगतात असे नाही. ऋषीने आमच्या पिढीला तारुण्य जगणे शिकवले. 
'मेरी उमरके नौजवनो...' असे म्हणून नाचायला शिकवले त्या ऋषीला माझी ही छोटीशी श्रद्धांजली.

श्रीकांत कुलकर्णी
9850035037
30.04.2020
[30/04, 12:12 pm] Charudatta: *अजून एक तारा निखळला.....*

आज ३० एप्रिल २०२०
कालंच इरफान खान गेल्याचं दु:ख अजून २४ तासही जुनं झालेलं नसतानाच ऋषि कपूर गेल्याची बातमी कळली आणि मन हेलावून गेलं..... ४ सप्टेंबर १९५२ ला जन्मलेला ऋषि आज वयाच्या ६८ व्या वर्षी गेला.....
*मेरा नाम जोकर*  मधे छोट्या राजूची भूमिका साकारणारा गोबर्‍या गालांचा निळसर डोळ्यांचा ऋषि गेला ..... १९७० साली त्याकाळचा सर्वांत मोठा — २ मध्यंतरं असलेला सिनेमा *मेरा नाम जोकर* पडला , अतोनात आर्थिक नुकसान झालेलं , पण उत्कृष्ट बालकलाकाराचं पारितोषिक मिळवलेला ऋषि , आणखीन ३ वर्षांनी परत *बाॅबी* मधे राज नाथ ऊर्फ दुर्गा खोटेंच्या मिसेस ब्रिगॅन्झासाठीचा राजूबाबा साकारणारा ऋषि , कोवळ्या वयातल्या डिंपलपेक्षाही जास्त चिकणा वाटला होता मला ! त्याने कुणाचीही काॅपी केली नाही ! स्वत:ची अभिनयाची एक स्टाईल , नाचण्याची स्टाईल डेव्हलप करंत आणि अखेरपर्यंत हाॅस्पिटलमधेही स्टाफ नर्सेस व डाॅक्टर्सशीही सतत करमणूकपर संवाद साधणारा ऋषि गेला..... त्याने किती सिनेमात काम केलंय यापेक्षा किती प्रकारचे रोल्स किती समरसून केलं याला जास्त महत्व आहे!

पण मला थोडसं वेगळंच सांगायचंय.....
आपलं जीवन नाट्य—सिने सृष्टीतील कलाकारांनी इतकं व्यापलेलं असतं , की त्यांपैकी कुणीही गेलं तरी आपल्याला आपल्याच कुटुंबातील कुणीतरी गेल्यासारखं वाटतं. आणि मग *गुड्डी* सिनेमाद्वारे दिला गेलेला संदेश आठवतो.....

आज कोरोना नामक संकटाने ग्रासलंय म्हणून आपल्याला जे जास्त जाणवतंय — सैनिक , पोलीस , डाॅक्टर्स , नर्सेस , वाॅर्ड बाॅईज , साफसफाई कामगार , अत्यावश्यक सेवा पुरवणारे बँकर्स , टेलिफोन वाले , इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स..... अनेक जण आपलं जीवन धोक्यात घालून आपल्या संरक्षणासाठी झटतायत.यामधेच काहींनी आपले प्राण गमावले ! यासारखे कितीतरी लोक बारा महिने तेरा काळ आपल्यासाठी झटत असतात.प्रसंगी कितीतरी जणांनी आपले प्राण गमावलेत व आजही गमावत आहेत.पण हे सगळे खरे हिरो ( यामधे स्व.ऋषि कपूर किंवा पै.इरफान खान यांच्याशी तुलना करून त्यांचा अवमान करण्याचा तिळमात्रही उद्देश नाहिये ! ) ..... पण हे सगळे खरे हिरो गेल्यावरती त्यांना कुठल्याही न्यूज चॅनलवर इतका वेळ स्थान मिळतं ? नसेल तर किमानपक्षी आपण सगळे तरी त्यांचं किती काळ स्मरण करतो ? आणि मग बा.भ.बोरकरांच्या ओळी हमखास ओठी येतातंच *परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती , तेथे कर माझे जुळती!*

आज राजेश खन्नासारखाच एक चाॅकलेट हिरो म्हणून बरेच रोल्स केलेला पण नंतर वयोपरत्वे बरेच विविध रोल्स तितक्याच समर्थपणे केलेला ऋषि गेला..... चिंटू , ईश्वर तुझ्या आत्म्यास सद्गति देवो !

पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या जीवनात कुठलीही करमणूक न करणारे परंतू ते आपले जीवनंच सुसह्य व्हावे म्हणून आपली जान निछावर करणार्‍या खर्‍या हिरोंनाही आठवूया आणि बघा , डोळ्यांच्या पापण्यांमधून दोन थेंब आपसूकंच गालवरती ओघळतील तुमच्या , अगदी माझ्यासारखेच !
© उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे
[30/04, 4:09 pm] Charudatta: ऋषी कपूरच्या कारकिर्दीतील कोरोना!!

सगळं ठीक ठाक चालू होतं आणि मधेच हा कोरोना आला. असा कोणीतरी मधेच आला आणि सगळा खेळ बिघडवून गेला तर किती यातना भोगाव्या लागतात ना. पण ऋषी कपूर हा असा अभिनेता आहे ज्याच्या कारकिर्दीत नेहमीच कोरोना सारखे इतर अभिनेते टपकत राहिले. तरीही ऋषीने कधीही हार मानली नाही. दुसऱ्या अभीनेत्याने भाव खाल्ल्यामुळे काही सिनेमे त्याच्या करिअरला लॉक डाऊन ठरले तरी तो पुन्हा उठला. असे अनेक लॉक डाऊन आले आणि गेले आणि तरीही ऋषी पुन्हा पुन्हा त्यावर मात करत राहिला. अखेरीस कोरोनाच्या कठीण काळातच ऋषीच्या निधनाची बातमी आली. अनेक चाहते हळहळले. ऋषी गेला तरी त्याची गाणी, वाद्य वाजवण्याचा अभिनय रसिकांच्या मनात अमर राहील.

ऋषी पहिल्यांदा "मेरा नाम जोकर" मध्ये दिसला. त्याला सुपरस्टार बनवले ते "बॉबी" ने.. सन होतं १९७३. पदार्पणात जोरदार सुरुवात झाली. त्याच्या पित्याने म्हणजे राज कपूरने कर्जातून मुक्त होण्यासाठी हा टीनएजरच्या प्रेमाचा फॉर्मुला आणला, जो चांगला यशस्वी झाला. ऋषीचा सुपरस्टारचा प्रवास सोपा झाला. पण एका लंबूटांग अभिनेत्याच्या रूपात माशी शिंकली. त्याबद्दल ऋषी काय म्हणतो.? ऋषीचे नुकतेच एक आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे, ज्याचे नाव आहे-'' खुल्लम खुलला ऋषी कपूर". त्यात तो म्हणतो की लंबूटांग अमिताभच्या सिनेमात असायचं तरी काय - सिर्फ टांगे टांगे दिखती थी !!

काहीही असो, पण ऋषीला अमिताभने रोखून धरले. हा अमिताभ ऋषीच्या पाचवीलाच पूजाला होता. 'अमर अकबर ऍंथोनी' चे उदाहरण घ्या. अमिताभ, ऋषी आणि विनोद खन्नाला समान फुटेज होतं. '' परदा है परदा " हे गाणं ऋषींच्या वाट्याला आलं होतं. स्टेजवर गाणं रंगात येतं. पण प्रेक्षकात बसलेला अमिताभ मधेच उठून गातो " तो अकबर तेरा नाम नाही है". बस एकच ओळ अमिताभ म्हणतो. पण ऋषीचं दुर्भाग्य बघा, टाळ्या आणि शिट्या इथे वाजतात.

तरी ऋषी हरला नाही. जितेंद्र, धर्मेंद्रसुद्धा अमिताभ सोबत सिनेमा करायला राजी नसताना, ऋषी अमिताभ सोबत कितीतरी चित्रपट करत गेला. 'कभी कभी' मध्ये अमिताभ वयस्कर दाखवला आणि ऋषी कपूर नव्या पिढीचा तरुण. इथे अमिताभच्या ग्रहांनी ऋषीच्या ग्रहांवर मात केली. आजही 'कभी कभी' अमिताभचा चित्रपट ओळखला जातो. ऋषीच्या बाबतीत एक बाब नेहमी चांगली घडत गेली. त्याला चांगली गाणी मिळाली. तो कोणतही वाद्य असं वाजवायचा की असं वाटे तो खरंच स्वतः वाजवतोय. म्हणून त्याच्या वाट्याला अशी गाणी आली की त्यात कधी त्याच्या हाती डफली आली तर कधी गिटार!!

पण सह-अभिनेता भाव खाऊन जाईल हा योग काही त्याच्या कुंडलीतून जाता जात नव्हता. 'सागर' ची कथा पूर्णपणे ऋषीच्या बाजूची होती. त्याच्या वाट्याला '' सागर जैसी आँखोवाली'', " सागर किनारे, दिल ये पुकारे', '' जाने दो ना'' अशी गाणी होती. प्रेमाच्या त्रिकोणात नायिका त्यालाच मिळणार होती. सोबत होता दक्षिणेचा म्हणून ओळखला जाणारा कमल हसन. म्हणजे ऋषी सुरक्षित होता. तरीही कमल हसन लोकांना आवडला. प्रेमभंग झालेल्या प्रेक्षकांनी कमल हसनसाठी सिनेमा पुन्हा पाहिला. तेल गेले, तूप गेले आणि हाती आले धुपाटणे ह्या म्हणीप्रमाणे ऋषीच्या हाती फक्त गाण्यातील गिटार उरली आणि सगळा 'सागर' कमल आणि डिंपल घेऊन गेले.

ऋषीला असे कोरोना कायम छळत राहिले. 'खेल खेल में ' सारखा सिनेमा ऋषीसाठी बनला होता. पण तिथेही वेगळी भूमिका करणारा राकेश रोशन आडवा आला. 'साहिबान' तरी त्याच्या नावावर व्हायला हरकत नव्हती. तिथे संजय दत्त आडवा आला. 'शेषनाग' बरा चालला. पण जितेंद्रने बाजी मारली.

'' दामिनी'' मध्ये त्याची भूमिका केंद्रस्थानी होती. सगळी गाणी त्याला मिळाली होती. सनी देओल फक्त एक वकील होता. त्याला ना नायिका होती आणि ना गाणी. तो फक्त कोर्टात दिसणार होता. पण सनीच्या ''तारीख पे तारीख'' सारख्या संवादावर प्रेक्षक फिदा झाले. इंटरवल नंतर आलेला सानी देओलचा ढाई किलो का हात भारी पडला. " ढाई किलो का हात आदमी पे पडता है, तो आदमी उठता नही उठ जाता है." असं म्हणणाऱ्या सनीने ऋषिलाच सिनेमातून उठवलं.

यश चोप्रा ह्यांना तर कधीच कुणाचं प्रेम नीट पाहवत नसे. कायम एक प्रेम जमत नाही तर दुसरा येऊन टपके. ऋषीला त्यांचा हा फॉर्मुला माहित होता. तरीही त्याने " चांदनी" ला होकार दिला. इथे ऋषीच्या हिमतीचं कौतुक करायलाच हवं. ऋषीला " दामिनी" मध्ये नमवणाऱ्या सनी देओलने यश चोप्रांच्या ' डर ' मध्ये वाईट अनुभव घेतला. व्हिलन बनलेल्या शाहरुखने डर ' स्वतःकडे ओढून घेतला, त्यानंतर सनी चोप्रांपासून नव्हे तर दुसऱ्या स्टार पासून दूर राहिला. पण ऋषी समोर कोणीही असला तरीही सिनेमा स्वीकारत राहिला. ' चांदनी' मध्ये विनोद खन्ना असूनही त्याने मुख्य नायकाची भूमिका केली. " चांदनी, ओ मेरी चांदनी" सारखी चोप्रांचा टच असलेली गाणी होती खरी पण विनोद खन्ना दुसरा नायक असून तो लोकांच्या लक्षात राहिला आणि दोघांना मागे टाकून श्रीदेवीने ' चांदनी' चं यश खेचून नेलं.

पुढे '' दिवाना'' आला. ऋषीला नव्या अभिनेत्याकडून मात खावी लागणार नव्हती. इथेही ऋषी हाती वाद्य घेऊन तारा छेडत राहिला, पण सूर दुसर्यालाच गवसत राहिले. शाहरुख हा काही मोठा स्टार नव्हता. त्याला चांगली गाणीही मिळाली नव्हती. ऋषी गिटार घेऊन " सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं''' गाताना दिसतो, " 'तेरी पायलीया" गाताना डफली वाजवतो तिथपर्यंत सगळं सुरळीत चालू राहतं. पण नवखा शाहरुख बापाशी भांडतो, " लाथ मारता हू तुम्हारी दौलत को" असं म्हणतो आणि पुढे प्रेक्षक त्याला पाहताना, ऋषीला विसरतात. जसे इतरजण ऋषीला मागे टाकून गेले तसे शाहरुखही ऋषीला मागे सोडून सुपरस्टार पदाकडे निघून गेला.

ऋषीच्या कारकिर्दीत "कर्ज", " लैला मजनू", " सरगम", "बोल राधा बोल" असे काही चित्रपट आले ज्यामुळे ऋषी सुपरस्टार पदावर विराजमान झाला. " हीना", " प्रेमग्रंथ" हे घरचे सिनेमा बनवताना त्याने दुसरा नायक मध्ये येणार नाही ह्याची काळजी घेतली. पण दुसरा नायक भाव खातो म्हणून फक्त सोलो सिनेमा करेन अशी ऋषीने अट घातली नाही, हे त्याचे वैशिष्टय आहे. अजूनही तो इतर अनेक सुपरस्टार सोबत भूमिका करतो. अमिताभ सोबत " १०२ नॉट आऊट " करताना तो कचरला नाही. इतकंच नाही तर आगामी " पहिले आप जनाब" मध्ये तो पुन्हा अमिताभ सोबत आहेच.

ऋषी नावाप्रमाणे ऋषी आहे. आपल्याबाबत काहीही घडो, आपल्या बाजूने घडो किंवा आपल्या विरोधात... तो आपलं काम करत राहिला. हम किसीसे कम नहीं हे त्याने सिद्ध करून दाखवलं.

आता तो जरी ह्या जगात नसला तरी त्याच्या कामातून अमर राहील.

ओम शांती ओम !!

- निरेन आपटे.

ऑनलाईन पुस्तक: अमृताशी पैजा

https://www.facebook.com/nirenaptethoughts/

Tuesday, April 21, 2020

जीना प्रिया प्रभुदेसाई

#आवडलेल्या_कविता 

लहानपणी गिरगावला दर शनिवारी आजीकडे जाण्याचं एक मुख्य कारण होते म्हणजे जुन्या बिल्डींग्स आणि त्याच्या पाठच्या बाजूला असलेला नागमोडी जिना. लोखंडाचा जिना असला तरी पावसात, वाऱ्यात भिजून त्याला गंज चढायचा आणि लाल दिसायचा. जिन्याच्या पायऱ्यांमध्ये फट असायची आणि जोरात चढून गेलो किंवा उतरलो तर नकळत त्या फटीत पाय अडकून आपण खाली पडू असा पोटात भस्स गोळा यायचा. 
तशी भीती वाटण्यासाठी आम्ही पैज लावायचो आणि कमीतकमी वेळात जिन्यावरून चढ उतार करायचो . 
जेमतेम एक व्यक्ती एका पायरीवर बसेल एवढीच रुंदी होती त्याची.
मी आणि माझ्याहुन थोडीच मोठी  चुलत बहीण एका पाठोपाठच्या पायऱ्यांवर बसायचो आणि ऐ , तुला एक गंमत सांगते म्हणून जे जे काही समोर घडायचे त्याचा वृत्तांत एकमेकींच्या कानात द्यायचो. लहान बहिणी ते ऐकायला मध्ये धडपडायच्या. मग मध्ये येणाऱ्या त्यांच्या कानाला पकडून, त्यांना बाजूला करून परत खुसपूस करायचो.
काय घडतंय हा अंदाज असायचा आणि तो बरोबर आला  की  थ्रिल्लिंग वाटायचे ..कारण हे सगळे  आम्हाला करायची हिंमत नव्हती. आजीचे लक्ष असायचे आणि आमचा मुक्काम संध्याकाळपर्यंतच असायचा. 
 पण तो  जिना आम्हाला नकळत मोठे करायचा.  
.आम्ही तशा लहान होतो आणि चाळीतल्या मुली सॉलिड हुशार होत्या. घरच्या हुशार लोकांना  शेंडी लावायच्या, तिथे आमचे काय! 
या अशा जिन्यावर किती प्रेमप्रकरणे जमली, किती तुटली देव जाणे .
संध्याकाळी उन्हे कलायला लागली की बाबांबरोबर परत दादरला जायची लगबग सुरु असतानाच, हळूच जिन्याकडे लक्ष जायचे. अंधारात दोन आकृत्या दिसायच्या. एकमेकांकडे झुकलेल्या आणि त्यांना सावरणारा , लपवणारा तो सर्पाकृती जिना डोळे मिचकावून आम्हाला बाय करायचा. 

जिना
-------

कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे…

 वसंत बापट  यांच्या “ जिना” या कवितेने एवढ्या आठवणी जाग्या  केल्या. 
पाठच्या  बाजूने नागमोडी जिना  बनवणाऱ्याच्या  डोक्यात रोमिओ ज्युलिएट नाटक असावे का हा प्रश्न मला नेहेमी पडतो. कारण इथे उभे राहणाऱ्या तमाम जोड्यांची तीच पोझ असायची. 
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

पाय  चुकण्यावर श्लेष आहेच. अनेक जोडप्यांची घाईघाईत लग्ने केलेली ऐकली आहेत, आणि जन्मलेल्या मुलाला सातोळा म्हणून जाहीर केलेले  सुद्धा माहित आहे. 

Priya Prabhudesai

Sunday, February 23, 2020

पिशी मावशी आणि भुतावळ । विंदा करंदीकर

 उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे....
.........
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई
स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्टर
दोन पोरे लठ्ठत मठ्ठे
पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,
डोक्यावरती हॅट बीट,
तुम्ही फसाल! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय?
नागोबाचा लंबा टाय!
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आले आले थातूमातू ;
हे खाते रोज सातू
जर सातू नसले घरात 
तर बसते नखे खात.
रोज रात्री मांजरावरुन 
हे येते जग फिरुन,
हे भूत आहे मुत्रे,
तरी त्याला भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आले आले अरेतुरे;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.
जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण कारे म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरून
भुते घेतात स्वैपाक करून
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.
किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला पिंपळावरून
एक मुंजा संध्या करून.
त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्तातसारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.
तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करू,
पोथीवाचन झाले सुरू;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले!

- विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के । विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी...
........
जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भुते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढिले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
तुम्ही पेरा तुम्ही कापा
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामध्ये 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
जिकडे टक्के तिकडे टोळी
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त । रोहित कुलकर्णी

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त !*

           *{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी. }*

#Cinemagully
**********************************
*'वक्त'* ... ! या 1965 साली आलेल्या आणि रवी यांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटाच्या नावाला अत्यंत साजेसं असं हे गीत ... आशाताईंच्या 'आशादायक' स्वरातील या गीताचे गीतकार... शायर साहिर लुधियानवी !

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू"* ...
**********************************
      *'वक्त'*.... काळ हा एकाचवेळी अनादि, अनंतही असतो आणि त्याचवेळी तो क्षणभंगूरही असतो !
      'वक्त' ... वेळ ही कधी अगदी सरता सरत नाही आणि कधी तीच वेळ वाळूसारखी ओंजळीतून निसटून जाते तेव्हा हातात उरता उरत नाही !
      वक्त के 'सितम' आणि 'करम' दोन्ही भोगलेल्या साहिरसारख्या शायरने हे सगळं तत्त्वज्ञान इतक्या सहज आणि सोप्या शब्दात सांगितलंय की ते अक्षरशः  'Timeless Classic' होऊन मनामनात रूजलं आहे !
**********************************
*आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू जो भी है, बस यही एक पल है*

      एखाद्या जीवाच्या जिवलगाने सहज खांद्यावर हात ठेवून सांगावं; इतक्या सहजतेने साहिर हे कालातीत सत्य सांगून गेले आहेत ! यातील 'जाने ना तू' हे शब्द खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. कारण या हातातून निसटलेल्या काळावर...क्षणावर जसं आपलं काहीच नियंत्रण नाही, हक्क नाही... तसंच येणाऱ्या वेळेवरही कुठलीच मालकी नाही, विजय मिळवलेला नाही.
      'आपला' म्हणता येईल असा एकच क्षण असतो; तो म्हणजे चालू वर्तमान काळातील चालू क्षण ! आधीच्या क्षणाचा मृत्यू...आणि पुढील क्षणाचा जन्म... यामध्ये खऱ्या अर्थाने 'जिवंत' असलेला एकमेव क्षण...आत्ता श्वास घेत असलेला क्षण ! आपल्याला जे काही करायचंय, जगायचंय, उरायचंय... ते फक्त आणि फक्त याच एका क्षणात... याच एका क्षणासाठी ! "जो भी है, बस यही इक पल है !"
**********************************
*अन्जाने सायों का, राहों में डेरा है*
*अनदेखी बाहों ने, हम सबको घेरा है*

      या सावल्या... काळाच्या असीम मार्गावर आयुष्याच्या वाटेत येणाऱ्या या सावल्या... सुखदुःखांच्या, भावभावनांच्या, जय-पराजयांच्या...तसंच एक सावली जन्माची आणि एक सावली मृत्यूचीही !
      यातील एखादी सावली अथक प्रवासातील शीतल विसावा होऊनही येते, सुखावून... ताजंतवानं करून जाते. आणि एखादी दु:खाची छाया; सगळं जगणंच गोठवून, वठवून जाईल की काय असंही वाटतं.
      पण यातील काहीच आपोआप किंवा उगाच होत नाही. त्या 'नियंत्याला' जरी कुणीच प्रत्यक्ष पाहिलेलं नाही... तरी 'नियती' मात्र तिचं अस्तित्व पदोपदी जाणवून देते. त्याच नियतीच्या हातातले आणि काळाच्या पटावरील आपण सगळेच मोहरे ! ती खेळवेल तसं आणि तोपर्यंतच खेळायचं... "अन्जानी बाहों ने हम सबको घेरा है"
**********************************
*ये पल उजाला है, बाक़ी अंधेरा है*
*ये पल गँवाना ना, ये पल ही तेरा है*

      'छाया-प्रकाशाच्या' या खेळात; त्या स्वच्छ, शुभ्र प्रकाशाने उजळलेले असे किती क्षण येतील, कधी येतील आणि कुठवर टिकून राहतील... हे आपल्या हातात तर नाहीच. मग असा तेजाळलेला क्षण जर आत्ता असेल तर तुही स्वतःला त्या क्षणाच्या हवाली कर, उजळून जाऊ देत या क्षणात आयुष्य !
      पुढच्या प्रवासात जरी कधी अंधार दाटून आला तर निदान हा प्रकाशित क्षण निसटून गेल्याचं दु:ख तरी होणार नाही. उलट त्या आठवणींचे लुकलुकते काजवे; अंधाराचीही शोभा वाढवतील ! म्हणूनच हा क्षण तरी झाकोळू देऊ नकोस... *"ये पल ही तेरा है !"*
**********************************
*जीनेवाले सोच ले,*
*यही वक़्त है कर ले, पूरी आरज़ू*

      'जीनेवाले' ... हा खरोखरच वरवर पाहता साधा वाटला तरी फार महत्त्वाचा शब्द आहे. ज्याला खऱ्या अर्थाने जगायचं आहे, जिवंतपणाची सारी नैसर्गिक लक्षणं मिरवत पुढे जायचं आहे आणि जगण्याची केवळ सक्ती न होता; सोहळा साजरा करायचा आहे; त्यालाच उद्देशून साहिरजींनी ही साद घातली आहे...'जीनेवाले' ... आत्ताच विचारपूर्वक ती समरसून जगण्याची इच्छा पूर्ण करून घे !
*"यही वक्त है कर ले, पूरी आरजू"*
**********************************
*इस पल के जलवों ने, महफ़िल संवारी है*
*इस पल की गर्मी ने, धड़कन उभारी है*
*इस पल के होने से, दुनिया हमारी है*
*ये पल जो देखो तो, सदियों पे भारी है*

      'क्षणभंगूर' म्हणून कायमच हिणवल्या गेलेल्या त्या क्षणाचं...'पल' चं ते क्षणिक असणंही किती लाक्षणिक आहे; हे साहिरजींनी अतिशय सुचकतेने मूर्तीमंत समोर उभं केलं आहे !
      क्षणभंगूरतेलाही...क्षणसुसंगत कसं करता येईल; हा दृष्टीकोन तेव्हाच समजेल जेव्हा सगळ्या आयुष्याची एक स्वानंदी  'मैफल'  करण्याची इच्छा असेल. इथे साहिरजींनी अगदीच नजाकतीने हा  'महफ़िल' शब्द वापरला आहे.... 'जलसा' नाही... 'महफ़िल' !
      जी मैफल  'सोबती काही जीवाचे'  बरोबर असतानाच रंगते, समेवर दाद देते-घेते आणि त्या जीवाभावाच्या सोबतीनेच  'संपन्न'  होते !
      याच क्षणी ह्रदयातून रक्तात मिसळलेला श्वास फक्त आपला आहे. पुढच्या क्षणी तो सुद्धा निरोप घेऊन निश्वास झालेला असेल. जिथे तुझाच श्वासही पुढच्या क्षणी परका होऊन पाठ फिरवणार आहे; तिथे बाकी जग तर परकंच आहे... त्या दुनियेकडून कसली अपेक्षा ! म्हणून तुझ्या या क्षणात जे काही आणि जे कुणी बरोबर आहेत... तेच खरं तुझं विश्व आहे.
      असा हा विश्वरूप दर्शन घडविणारा क्षण जेव्हा साहिर दाखवतात... तेव्हा तो  'सदियों पे भारी है' ... हे अगदी मनापासून पटतं ! मनात पुन्हा पुन्हा त्याच शब्दांचे प्रतिध्वनी उमटत राहतात... *"जीनेवाले सोच ले..." !*
**********************************
*इस पल के साए में, अपना ठिकाना है*
*इस पल के आगे की, हर शय फ़साना है*
*कल किसने देखा है, कल किसने जाना है*
*इस पल से पाएगा, जो तुझको पाना है*

      'उद्या', 'नंतर कधीतरी', 'पुढच्या वेळी',  'आयुष्यात अजून प्रगती केल्यानंतर'..... असे अनेक पुढच्या मृगजळांचे वायदे आपण स्वतःला आणि इतरांनाही नेहमीच करत राहतो.
      जणू काही काळावर विजय मिळवला आहे... अशीच आपली समजूत असते.  पण  'जहा पे सवेरा हो, बसेरा वही है' ... हे विसरतो आपण सगळेच.
      जे या क्षणात नाही, ते पुढच्या क्षणात...काळात असेल असं मानणं ही एकप्रकारे स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक आहे. धुक्यातील धुसर आकृती किंवा ढगातील पोकळ चित्रांचे आकार खरे मानण्यासारखंच आहे हे.
      अर्थात याचा अर्थ माणसाने  'आशावादी'  असू नये; असा नकारात्मक नक्कीच नाही ! उलट  'आशा'  आणि  'अपेक्षा'  यातील फरक समजून घेतला तर संपूर्ण तत्व नीट उमलून येईल.
      जर आपल्याला कधीतरी सावलीची  'आशा'  असेल; तर त्या वृक्षाचं बीज अगदी आजच , आत्ता... चालू क्षणात लावलं पाहिजे... ही त्या 'क्षणाची' अपेक्षा असते आपल्याकडून !
      चालू क्षणाची अपेक्षा आपण पूर्ण केली; तरच तो आपल्या आशा पल्लवित करत राहिल... !

*"जो भी है, बस यही इक पल है !"*

*{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी }*
**********************************

मी एक 'चहा'ता l डॉ. शंतनू अभ्यंकर

मी एक 'चहा'ता 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रिसूत्री होती, 
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा 
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                               
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं. 
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. आम्हां चहाबाजांच्या घड्याळात चार वाजत नाहीत, चहाच वाजतात. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घरचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा असं यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच! 
  …आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. अशा  आनंदाच्या उकळ्या फुटल्यावर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यंत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्यासरशी गिळणारी मंडळी पाहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर काटा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे. 
टी टाईम ही पंचेंद्रीयांनी अनुभवायची वेळ आहे.  चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो. मग तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी!  चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून, गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वयात तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चहाते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल. 
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे. 
सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होतं. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं न पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. ‘असा तीर्थासारखा वारंवार घेतलेला चहा उन्हाळ्यात शीतकारक असतो’, असे चरकमुनी (जर चहा पीत असते तर) म्हणाले असते. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच. सवाष्ण बायका जसं कुंकवाला नाही म्हणत नाहीत तसं हे कधी चहाला नाही म्हणत नाहीत.   
 शिवाय चहात्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. शंभर पासून शून्यापर्यंत वेगवेगळ्या तापमानचा चहा आहे. त्यामुळे   ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फयुक्त, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, ‘वामांगी कॉफीबाई दिसे दिव्य शोभा’, असा  रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय असा  बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे, मैत्रिणीबरोबरचा पहिलावाहिला,  नवथर, मितभाषी,  चहा आहे आणि मित्रांच्या मैफिलीतला चहाटळ चहा आहे. शिवाय या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे. घोटभर चहा बरोबर इराण्याकडे पोटभर गप्पा फ्री मिळतात.      
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात, तरंगत, तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. चहा पकवण्यात जे सुख आहे ते चहा खपवण्यात नाही, हे त्याला  उमजलेलं असतं.   इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा, चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराने छू मंतर करावे  तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते मंतरलेलं पाणी सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा तामसतीर्थाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काही ना काही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यायलाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. पोटातले कावळे देखील उपाशी ओरडून ओरडून  गप्प झालेले असावेत.  मग कधीतरी, उतरत्या कातरवेळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. मांडी ठोकावी. आपोआप पाय चेपले गेल्यानेच ते दुखत होते याची जाणीव व्हावी.  आता  चार बिस्किटे घेऊन  एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. कषायपेयपात्रपतित बिस्किटाचा तुकडाही मखमाली चिमटीने तोंडात टाकावा.   डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल. 
चहा हे फार महत्वाचं पेय आहे. त्याचा आदर करा. चहा आणि पोहे न घेता लोकांची लग्नं  कशी ठरली असती? चहा नसता तर किरिस्तावांच्या घरी चहा आणि भिस्कुटे खाण्याबद्दल लोकमान्यांना माफी मागावी लागली नसती. चहा नसता तर   फिल्मवाल्यांना  सगळी चहाच्या मळ्यातली गाणी उसाच्या मळ्यात चित्रित करावी लागली असती. चहा नसता तर  सरकारी सेवकांनी चहापाण्यासाठी चिरीमिरी कशी बरं मागितली असती? चहा नसता तर लांबून नुसतं बोट वर करताच कँटीनवाल्यानं आपल्याला काय आणून दिलं असतं बरं?  जाऊ दे. नकोच ते.  बिनचहाच्या जगाची कल्पनाही करवत नाही. 
कुणीतरी म्हंटलंच आहे   
                                               
आहे चहा तंवर प्या चहा,   
नाही चहा तर नुसतंच अहा,                                                 
हा हा हा; हा हा हा!!!
(शेवटचं हा हा हा हे हास्य माझे आहे. ही फालतू कविता वाचण्याबद्दल मी तुम्हाला हसतोय.)

Tuesday, February 18, 2020

जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल। चारुदत्त

[07/02, 4:41 am] Charudatta: मित्रांनो,  "जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल' हे  गाणे सर्वांनाच आवडते, 'गुलामी' चित्रपटातील गुलज़ार यांनी लिहिलेले हे गीत अशीच याची ओळख, पण मुळात हे गाणे ७०० वर्षापूर्वीचे आहे, १४ व्या शतकात अमीर खुसरो यांनी हे लिहिले आहे, इतकी वर्ष या गाण्याने अनेक पिढ्यांना भूरळ पाडली आहे, विशेष म्हणजे सांगितले तर आश्चर्य वाटेल पण हे गीत म्हणजे हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या संम्मीलनाचे आगळे वेगळे प्रतीक आहे, कारण हे गीत दोन भाषेत आहे, फ़ारसी आणि ब्रज या त्या दोन भाषा, मूळ गीतातील पहिले कडवे फ़ारसी भाषेत आहे तर दुसरे अस्सल भारतीय अशा ब्रज भाषेत, ७०० वर्षांपूर्वी काही कलावंत दोन भिन्न संस्कृतीला भाषेच्या सहाय्याने एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करीत होते, त्याअर्थी या गीताचे मोल अधिक आहे, अनेक ख्यातनाम गायकांनी हे गीत गायले आहे, नव्हे त्यांना तो मोह आवरला नाही इतके ते अप्रतीम आहे ! सोबत सम्पूर्ण मूळ गीत देत आहे, नक्की वाचा ! 

                  

"जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल, 

 दुराय नैना बनाय बतियाँ। 

किताबे हिज्राँ, न दारम ऐ जाँ, 

न लेहु काहे लगाय छतियाँ।। 

शबाने हिज्राँ दराज चूँ जुल्फ बरोजे वसलत चूँ उम्र कोताह। 

सखी पिया को जो मैं न देखूँ तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ। 

यकायक अज़दिल दू चश्मे जादू बसद फरेबम बवुर्द तस्कीं। 

किसे पड़ी है जो जा सुनावे पियारे पी को हमारी बतियाँ 

चूँ शम्आ सोजाँ, चूँ जर्रा हैराँ, हमेशा गिरियाँ ब इश्के आँ माह। 

न नींद नैंना, न अंग चैना, न आप आये न भेजे पतियाँ।। 

बहक्के रोजे विसाले दिलबर के दाद मारा फरेब खुसरो। 

सपीत मन के दराये राखूँ जो जाय पाऊँ पिया की खतियाँ।   

        - अमीर खुसरो 
[07/02, 4:41 am] Charudatta: लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवून, निरनिराळ्या कहाण्या रचून
माझ्या ह्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करण्याचा तुझा प्रयत्न मला कळतो आहे!

( खरे तर ही माझी अवस्था तुझ्या विरहामुळेच झाली आहे!)

प्रिये , माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होत आहे,
अशा स्थितीत तू मला हृदयाशी का कवताळत नाही आहेस?

तुझे लांब कुरळे केस म्हणजे जणू विरहाच्या प्रदिर्घ रात्री
आपल्या मिलनाचा वेळ जवळ जवळ काहीच नाही!

सखी प्रिया ची साथ नसेल तर ह्या  अंधाऱ्या रात्री कशा बरे कटतील?
तुझ्या शेकडो विभ्रमांनी माझी आधीच दुर्दशा झाली आहे!

कोणाला माझी  इतकी काळजी पडली आहे,
जो माझी अवस्था प्रियेला जाऊन सांगेल!

एखाद्या मिणमिणत्या पणती प्रमाणे,
मी प्रेमाच्या वण्यव्यात भटकतो आहे!

बैचेन मन , थकलेली काया,
ती येत नाही,तिचा निरोपही येत नाही!!

ती मला एकदा तरी भेटावि ह्या आशेनं मी व्याकुळ आहे,
ती तुला खूप काळ नुसती झुलवत आहे खुसरो!!

हे शापित जीवन मी असाच जगत राहीन,
कारण कधीतरी मिलनाची वेळ येईल अशी आशा आहे !!!

अनुवाद- चारुदत्त

Tuesday, February 11, 2020

बाबा आमटे। विकास आमटे

*बाबा आमटें* ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा...

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

१९९९ सालचा जानेवारी महिना. त्या दिवशी तापमान असेल ५-६ डिग्री सेन्टीग्रेड. बाबांचा पोशाख मात्र नेहमीचाच. खादीची बनियन आणि चड्डी. कंबरेला पट्टा. *पंतप्रधान अटलजी* मला बाजूला घेत म्हणतात,

_‘‘विकास, तेरे बाप को ठंड नहीं लगती क्या?’’_

मी त्यांना म्हणालो, _‘‘नहीं अटलजी, ये पैलवान आदमी है!’’_

पुढे बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला. भारताने नुकतीच पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. अणुकार्यक्रमाचे जनक *डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम* या पुरस्कार सोहोळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यादरम्यान त्यांच्याकडे जात बाबांनी त्यांना सुनावलं,

*_‘‘Dr. Kalam, we don't need bombs, we need toilets! ‘National Highways’ have become national toilets! If you say we are a nation of Mahavir, Buddha, Guru Nanak and Gandhi, we don't need bombs!’’_*

डॉ. कलाम अचंब्याने पाहतच राहिले! (आजच्या परवलीच्या *‘स्वच्छ भारत अभियाना’*ची नीव बाबांनी कधीच रचली होती.)

_‘मेरा बाप पैलवान आदमी था..’_ असं मी कायम म्हणतो याचं कारण- जसे बाबांनी अनेक प्राणघातक हल्ले, अपघात, आजारपणं पचवली, तशी त्यांनी विधायक कार्य असो वा संघर्ष- ‘ठाम भूमिका’ ही घेतलीच. त्यांनी कधीही कचखाऊ धोरण अवलंबलं नाही. त्यामुळे बाबांचं शारीरिक अस्तित्व संपल्यानंतर माणसं रडली निश्चित; पण खचली मात्र नाहीत.

ब्लड कॅन्सरशी लढता लढता बाबांनी ९ फेब्रुवारी २००८ ला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या या अखेरच्या आजारपणात रात्रीचा दिवस करत उपचार करणारे डॉ. विजय पोळ आणि विलास मनोहर त्यावेळी बाबांसोबत होते. बाबांची मनोभावे सेवा करणारे देवानंद सलामे, कमल उमरोटकर होते. इंदू, रेणुका, मी आणि भारतीही आनंदवनातच होतो. प्रकाश-मंदा लोकबिरादरी प्रकल्पावर. आमची पोरं बाहेर होती.

रात्रीपर्यंत सर्वजण आले. तो पूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा बाबांना बघण्यासाठी लोकांची रीघ कायम होती. दोन किलोमीटरची माणसांची रांग. कुठलाही आवाज नाही. फक्त बाबांना बघून हात जोडण्याची आस असलेली, सर्वदुरून आलेली ही माणसं. हजारोंची गर्दी लोटली होती.

केळीच्या पानात गुंडाळून आणि वरनं मीठ टाकून आपलं दफन केलं जावं, ही बाबांची इच्छा होती. त्याला दोन वैज्ञानिक कारणं होती. बाबा म्हणत, *_‘‘एका मृतदेहाचं दहन करायला जेवढी लाकडं लागतात तेवढ्यात हजार माणसांचा तीन-चार दिवसांचा स्वयंपाक होऊ शकतो!’’* (हा विचार अहमदाबादच्या ‘सद्विचार परिवारा’ने रुजवला होता. म्हणून बाबा-इंदूने त्यांचे फॉर्म्स भरत दहनाऐवजी दफन जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं.)_

दुसरं म्हणजे _‘पशूपंछी भोजन करे, तन भंडारा होएँ’_ या संत कबिरांच्या दोह्याप्रमाणे, मर्त्य शरीरावर पशुपक्ष्यांचा, किड्यामुंग्यांचा अधिकार असतो. तेव्हा मृतदेह त्यांच्या हवाली केला जावा; जेणेकरून हे शरीर भंडाऱ्याप्रमाणे विरून जाईल! त्याप्रमाणे बाबांच्या देहाचं दफन केलं गेलं. ही तीच अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिलेची जागा- जिथे बाबांच्या जिवाला जीव देणारे त्यांचे शेकडो कुष्ठमुक्त सोबती वास करत होते.

९ फेब्रुवारी काय किंवा १० फेब्रुवारी- आनंदवनाला सुट्टी नव्हती. त्या दिवशीही काम सुरूच होतं. पॉवरलूम्स तशाच धडधडत होत्या. हातमाग खट्खट् आवाज करत चादरी-टॉवेल्स विणत होते. वेल्डिंग मशीन्स चरचर आवाज करत जोडणी करत होत्या. आनंदवन थांबलं नव्हतं.

२०१४ हे बाबा आमटेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष कसं ‘साजरं’ करणार, याबाबत नेहमीच कुणी ना कुणी विचारत. अशी विचारणा करणाऱ्यांना मी सांगत असे की, आनंदवनात साजरं होतं ते *‘कार्याचं गुणात्मक विस्तृतीकरण’!* समाजातील जास्तीत जास्त दुर्बल घटकांपर्यंत कार्याचा विस्तार हाच आमच्यासाठी सोहोळा. आनंदवनाच्या इतिहासात कधी कुणाची जयंती, पुण्यतिथी साजरी झाल्याचं मला स्मरत नाही. आणि भविष्यातही असं होणं नाही.

*बाबा आमटे* या व्यक्तीशी किती माणसं जोडली गेली होती याचा प्रत्यय आम्हाला ते गेल्यानंतर आला. बाबांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सुमारे तीन लक्ष तारांचा खच आनंदवनात पडला! अक्षरश: पोती भरभरून तारा येत होत्या.

असं काय होतं बाबांमध्ये ज्याने ही माणसं त्यांच्याकडे ओढली गेली आणि कायमची जोडली गेली? यात जशी राजकारण, प्रशासन, उद्योग, कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान-तंत्रज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांतली नावाजलेली मंडळी होती, तशीच देश काय आणि विदेश काय, समाजातल्या प्रत्येक स्तरातली लाखो सर्वसामान्य माणसंही होती. या अनुषंगाने मला काही छोटे-मोठे प्रसंग आठवतात ते सांगतो...

ते बहुधा १९५९ साल असावं. जबलपूरच्या ‘नवभारत’ दैनिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करणारी *चंद्र मोहन जैन* नावाची एक व्यक्ती आनंदवनात येते आणि काम बघून प्रभावित होत बाबांना म्हणते,

_‘‘बाबा, आपके हाथों को सेवा कि खुशबू आती है.’’_ परत जाऊन जैन ‘नवभारत’मध्ये बाबांबद्दल विस्तृत लेख लिहितात. या लेखावरून जैन यांचा दैनिकाच्या मालकाशी वाद होतो. मालक म्हणतात,

_‘‘तू माझं दिवाळं काढणार! राजकारण, हत्या, भानगडी यांच्या बातम्या सोडून असे विधायक कार्याविषयीचे लेख छापून आले तर माझं दैनिक लवकरच बंद पडेल.’’_

यावर जैन उत्तरतात, _‘‘जगात खून, आत्महत्या, अत्याचार यांव्यतिरिक्त चांगल्या गोष्टीही खूप घडत असतात. बाबा आमटेंनी आपलं आयुष्य कुष्ठकार्यासाठी वेचलं आहे. या माणसाचं काम सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. बाबा आमटेंविषयी छापल्यामुळे दैनिकाचं सक्र्युलेशन वाढणार नाही हे मला माहिती आहे. पण काळजी नसावी. मी बाहेर पडतो. तुम्ही तुमचं सक्र्युलेशन वाढवा,’’_ असं म्हणत तत्क्षणी ते आपला राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकतात.

*हीच चंद्रमोहन जैन नावाची व्यक्ती पुढे जाऊन सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारक बनते... ज्यांना आपण सर्व ‘रजनीश-आचार्य- भगवान- ओशो’ म्हणून ओळखतो.*

जेआरडी टाटांना बाबांविषयी प्रचंड स्नेहादर होता. मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान बाबा मुंबईला असताना जेआरडींनी त्यांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, _‘‘मी आनंदवनाला काय मदत करू शकतो?’’_

बाबा उत्तरले, _‘‘मी आपला ऋणी आहे. पण आनंदवनाला मदतीची गरज नाही. उलट, समाजाने नाकारलेल्या ज्या माणसांच्या कष्टांतून आनंदवन उभं राहिलं आहे, त्यांच्यात आज समाजातल्या मूलभूत समस्यांवर मात करण्याची जिगर आहे!’’_

२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

_‘‘क्या है?’’_ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!

चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, _‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है?’’_

मला झेपलंच नाही. मी म्हणालो, _‘‘जी हाँ, क्यूं नहीं?’’_

गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, _‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत!’’_

हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो.

एवढ्यात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, _‘‘आईये.’’_ *दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता!*

आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढयात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले!

मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, _‘‘ये आपने क्या किया?’’_

मला जवळ घेत ते म्हणाले, *_‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना!’’_*

मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक *विजयकुमार चोपडम* पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात,

*_‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे!’’_*

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि _‘का अडवली?,’_ असं विचारलं की म्हणत,

*_‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’_*

यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली.

इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत,

*_‘‘Great heroes of history are nothing to me. The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life...’’_*

याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा *‘साधा’* माणूस होता, सर्वासाठी _‘Accessible’_ आणि _‘Approachable’_ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता.

न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण *_‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे,’_* असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, *_‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढया सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं.’’_*

एकूणात काय, तर _‘देव’_ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं.

बाबा आमटे हा _‘घाईतला’_ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता.

_‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे,’’_ असं ते म्हणत.

बाबांना *‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढ्य इंजिन’* असं संबोधणाऱ्या *कवी कुसुमाग्रजांनी* बाबांवर *‘संत’* नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

_सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात..._
_भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या_
_विराट वृक्षावर_
_अपराजित कुऱ्हाड मारणारा तू -_

_वणव्याच्या समोर_
_घनघोर पाऊस होणारा_
_दु:खाच्या समोर_
_फक्त निर्भेळ माणूस होणारा_

_दुबळ्या दयेच्या चिखलातून_
_माणुसकीला बाहेर काढणारा तू -_

_अरे आम्ही आहोत असे करंटे_

_की आमच्या पेठेत लागतात पताका_
_फक्त मंत्री आले तर_

_सोनेरी अंबारीचे ऐरावत_
_जेव्हा रस्त्याने झुलू लागतात_

_तेव्हा आमचे हिशेबी हात_
_जुळून येतात छातीवर_

_आणि तुझ्यासारखे संत_

_ऐहिकाच्या प्रपंचातील_
_ईश्वरी अंशाचे रखवालदार_
_निघून जातात_
_गस्त घालीत अंधारात_

_उद्ध्वस्त मनांच्या मोहल्ल्यातून_
_आसवांच्या दलदलीतून_
_दु:खानं उसवलेल्या दुनियेवर_
_अमृताचं सिंचन करीत..._

_हे यात्रिका,_
_विस्कटलेल्या शरीरांचा_
_चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन_
_तू तुझ्या मार्गानं जा_

_मागे वळून पाहू नकोस_

_जो हिशेब कधी केला नव्हतास_
_तो यापुढेही करू नकोस_

_तुला साथसोबत आम्ही करणार नाही_

_आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश_
_तुझ्या रात्रीवर पडणार नाही_

_तुझ्या अलौकिक वेदनेसाठी_
_आम्ही रडणार नाही_

_आमच्या जयघोषांच्या जमावातही_
_तू राहणार आहेस एकटा_

_दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा_
_अगदी एकटा_

_पण असेच एकाकीपण_
_लाभले होते ख्रिस्ताला_

_ज्याच्या हाताचा ठसा_
_मला दिसतो आहे तुझ्या हातावर_

_असेच एकाकीपण_
_लाभले होते बुद्धाला_

_ज्याच्या प्रज्ञेचे किरण_
_मला दिसताहेत तुझ्या पथावर_

_हीच तुझी सोबत_
_आणि हेच तुझे संरक्षण..._

_‘जेथे जाशी तेथे.._
_तो तुझा सांगाती_
_चालवील हाती- धरोनिया..’_

🙏🙏🙏

~ *विकास आमटे*
vikasamte@gmail.com

forwarded as received

Friday, January 10, 2020

मॅटीनी

*मॅटीनी*                        

परवा एका फॅमिली गेट टूगेदरला 'मॅटिनी' शब्द ऐकला आणि पन्नास वर्षांपूर्वीच्या काळा (१९७०-७१) च्या सुमारास पोहचलो.                                    

मल्टिप्लेक्स हे नावही कोणी ऐकले नव्हते. पण नवीन चित्रपट एका पेक्षा जास्त थिएटर्स मधे लागत होते. पुण्यात कोणताही नवीन चित्रपट लागायचा तेव्हा एक मुख्य थिएटर असायचे आणि तेव्हा नुकत्याच विकसित झालेल्या उपनगरांमधील थिएटरमध्येही तो लागायचा. मुख्य थिएटरमध्ये दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ असे तीन शो दाखवले जायचे. दुपारी बारा वाजताच्या शो ची वेळ - मॅटीनी शो साठी - मुद्दाम जुन्या सिनेमासाठी राखून ठेवली जायची. उपनगरांमधील थिएटरमध्ये मात्र दुपारी बारा वाजता मॅटीनी शो च्या वेळीही नवीनच सिनेमा दाखवीत असत.           
दुपारी बाराचा मॅटीनी शो हे जादूभरे शब्द होते. मॅटीनी शो ची मोहिनी जबरदस्त होती. त्या काळी ५ ते २५ वर्षे जुने असलेले चित्रपट म्हणजे साधारण १९४५ ते १९६५ या काळातील चित्रपट मॅटीनीला दाखवले जायचे. त्यामुळे या मॅटीनी शो ला अबाल वृद्धांची गर्दी असायची. तेव्हाची प्रौढ पिढी ५०/५५ वयाची अंदाज, बरसात, अनारकली,  बैजूबावरा, बाझी, नागिन वगैरे चित्रपटांना गर्दी करून आपल्या तेव्हाच्या आठवणी ताज्या करीत असे. साधारण ३०/४० वयोगटातील पिढी पेईंग गेस्ट. मधुमती. अनाडी. तुमसा नहीं देखा मधील गाण्यांवर ताल धरण्यासाठी, उजाला, शरारत मधील "मोरा नादान बालमा" "तेरा तीर ओ बे पीर" गाण्यांवरील कुमकुमच्या डान्स वर शिट्ट्या मारायला या चित्रपटांच्या वार्या करीत. नंतरची नवीन पिढी एक मुसाफिर एक हसीना, चायना टाऊन, जंगली, मेरे मेहेबूब, राजकुमार, हम दोनों या चित्रपटांवर फिदा होती. देव आनंद, शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार हे मॅटीनी आयडॉल होते. त्यांचे चित्रपट मॅटीनी शो ला गर्दी खेचत असत.                               

या मॅटीनीला आणखी एक प्रेक्षक वर्ग होता. तो म्हणजे वाड्यातील १४/१५ जणांचा निरनिराळ्या वयांच्या व्यक्तींचा पण एकत्र असलेला कंपू. वर्षातून पाच वेळा तरी हा कंपू एकत्र यायचा. एकदा नदीला पाणी आले की ते पहायला लकडी पुलावर (आताचा संभाजी पूल - तेव्हा पुण्यात नदीवर तीनच पूल होते लकडी पूल नवा पूल आणि संगम ब्रिज) हा कंपू जाणार. दुसरे म्हणजे वाड्यातील जो कोणी (अकरावी) मॅट्रिकला असेल त्याला बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी डबा घेऊन भेटायला हा कंपू जाणार. (तेव्हा एका दिवसात अकरा ते दोन आणि तीन ते सहा असे दोन पेपर असत. त्यामुळे या परीक्षार्थीला मधल्या वेळात डबा देत असत) तिसरे म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत दुपारी चार वाजता जाऊन भरपूर खेळणार आणि भेळ खाऊन रस पिऊन घरी येणार. चौथी वेळ म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत शनिवार /नारायण पेठेतून वाड्यातूनच डबे घेऊनच निघून अरण्येश्वर पद्मावती किंवा विठ्ठलवाडी पर्यंत पायी जाऊन दिवस भराची ट्रीप एन्जॉय करायचा. हाच कंपू वर्षातून एकदा मॅटीनीला जात असे. काका काकू मावशी दादा ताई मुले सर्व असल्याने जागृती. चलती का नाम गाडी. 'भाभी', 'छोटी बहन' यासारखे चित्रपट निवडले जात.                              

युवकांमध्ये मॅटीनीचे वेड जास्त होते. मधुबाला मीना कुमारी माला सिन्हा शकीला साधना यांच्या चित्रपटांना तर तोबा गर्दी होत असे. शिवाय मॅटीनीचे तिकीटाचे दरही कमी असत.
जुने सिनेमे पहायला भाग्य लागायचे. आज केव्हाही नेटवर हवा तो सिनेमा पाहता येतो. तेव्हा तसे नव्हते. "आहें ना भरी" ही हिंदी सिनेमातील पहिली कव्वाली ज्या मधे होती आणि नूर ए तरन्नुम नूरजहाँ नायिका होती (आंधियां गमकी यूं चली) तो "झीनत" नावाचा सिनेमा माझ्या आठवणीत फक्त एका रविवारी मॅटीनीला एका शो पुरता विजयानंद ला दाखवला होता. तोपर्यंत नूरजहाँचा एकही चित्रपट पाहिला नव्हता. अर्थातच ती संधी आम्ही सोडली नाही हे वेगळे सांगणे नलगे । पण सांगायची गोष्ट अशी की हे फक्त मॅटीनी मुळे  शक्य झाले.                                 

मॅटीनीला जायचे ठरवणे हा एक प्रोग्रामच असायचा. चार पाच जणांचे टोळके त्यावर चर्चा करीत. "परवा कुठला टाकायचा?"  कोणी तरी विषयाला तोंड फोडत असे. "असली नकली" ला जाऊ. कोणी तरी 'आपली आवड' सांगायचा. ('तेरा मेरा प्यार अमर' गाण्यातली साधना पुन्हा एकदा पाहण्याचा मोह त्याला झालेला असायचा. तेव्हा सिनेमा शिवाय गाणे पाहण्याची दुसरी काहीच सोय नव्हती). तिसरा म्हणायचा 'दिल देके देखो' ला चला यार शम्म्याला बरेच दिवसात पाहीले नाही. आता हा ठराव पास होणार तेवढ्यात एक जण म्हणायचा "हे सगळे नंतर बघता येतील." निशात "ला" बावरे नैन "लागला आहे तो बघू." बाकीचे सगळे प्रश्नार्थक चेहरे करतात. तो पुढे स्पष्टीकरण द्यायचा "अरे मुकेशचे तेरी दुनिया में, खयालों में किसी के, राजकुमारी चे सुन बैरी बलम गाणी आहेत त्यात. आणि राज कपूर हीरो आहे आणखी काय हवे?" मंडळींना त्याचे म्हणणे पटायला लागले असते पण थोडे साशंक असतातच. पण तो संशय  दूर करण्यासाठी "आणि पिक्चरमध्ये गीता बाली नऊवारी मध्ये आहे बरं का " असे तो शेवटचे अस्त्र काढतो. लगेच 'बावरे नैन' वर शिक्कामोर्तब होते आणि रविवारी अंमलबजावणी होते.        
दुसऱ्या ग्रुपला वेगळीच चिंता लागलेली असायची. फण्डस ची! पक्या म्हणायचा "विष्ण्या, (याचे खरे नाव सुधीर) च्यायला, खूप दिवसात लेका तू पिक्चरची सोय केली नाहीस. यावेळी काही तरी कर". (जुन्या नोटा चलनातून बाद होतात तसे च्यायला, लेका हे शब्द बाद होत आहेत.) तो देखील ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे स्वीकारून "बघतो. करतो काही तरी" असे आश्वासन द्यायचा. (ही वेळ प्रत्येकावर कधी तरी यायचीच). रविवारी सकाळी अकरा वाजता आळीच्या तोंडाशी पारावर ग्रुप त्याची वाट बघत बघायचा. खिशात हात घालून शिट्टी वाजवत येणारा विष्ण्या दिसला की काम फत्ते झाले हे कळायचे. "कुठून जुगाड लावलंस रे?" कोणाची तरी उत्सुकता बाहेर पडायचीच. "होती घरात तीन महिन्यांची रद्दी. आपलं काम झाले. ठरवा कुठे जायचं आहे ते." उत्तर मिळायचं "ठरवा काय? बंड्या गेलाय आधीच लायनीत नंबर लावायला " मग सर्व मंडळी आधीच ठरलेल्या "चौदहवीं का चांद" पहायला जायची.                                       

तेव्हाच्या तरूणीही मॅटीनीला जाण्यात मागे नव्हत्या. चार पाच मैत्रिणी प्रत्येकीच्या घरी जाऊन तिच्या आईला "काकू आम्ही सिनेमाला जातो ना. संध्या सुनंदा शैला सगळ्यांच्या आईनी परवानगी दिली आहे. तुम्ही पण रंजनाला पाठवा ना" असं सांगून सर्व आयांची परवानगी घेत. सिनेमाला जायचे ठरले, सिनेमा, थिएटर सर्व ठरले आता प्रश्न एकच. "एवढ्या गर्दीत तिकिटाच्या लायनीत तास भर उभे राहून तिकीट कोण काढणार? मग त्यातली रंजना - म्हणजे माझी ताई - मला म्हणायची, "आम्हाला तिकीटे काढून दे ना" मग मी - इयत्ता दहावी - पांढरा शर्ट खाकी हाफ पॅन्ट मधे खोचून ताईने दिलेले सहा रुपये संभाळत थिएटर मध्ये तिकीटांच्या लायनीत तास सव्वा तास आधीच जाऊन उभा रहायचो. त्यातून ग्लोब (श्रीनाथ) किंवा मंडईतले मिनर्ह्वा (आता वाहनतळ) थिएटर असले तर विचारूच नका. तिकीट खिडकी पर्यंत जाण्यासाठी संपूर्ण लायनीलाच लाकडी खुराड्यातून जावे लागे. पावणे बारा वाजता ताई आणि तिच्या मैत्रिणी आल्या आणि माझ्या कडून तिकीटे मिळाली की माझी रवानगी घरी व्हायची. "मैत्रिणींमधे तू कशाला?" म्हणून मला कन्नी दिली जायची.  तिच्या साठी मेरे सनम, तीसरी मंजिल ची तिकीटे काढलेली पक्की लक्षात आहेत. पण पुढे आणखी मोठे झाल्यावर याच ताईने मला मॅटीनीलाच नेऊन मिस मेरी, शबाब आणि नई दिल्ली हे सुंदर चित्रपट दाखवले हे ही तितकेच खरे!                           

'नव्या ओळखी' करण्यासाठी मॅटीनी तिकिटांची लाईन हे एक व्यासपीठ होते. एखाद्या मुलीला हेरून एखाद्या दिवशी थिएटर मध्ये तिला लायनीत उभे राहिलेले पाहून तेव्हाची सर्व कामे विसरून तो मॅटीनी शो पाहणारेही काही वीर होते. तसेच स्त्रियांच्या रांगेत उभे असलेल्या हव्या त्या मुलीला "मिस, एक्सक्यूज मी पण जेन्टस लाईन फारच मोठी आहे. तिकीट मिळेल असे वाटत नाही. प्लीज आमची दोन तिकीटे काढता का?" असं म्हणून तिच्या हातात पैसे देणारे वीरही होते. आणि त्यात जर पलीकडून प्रतिसाद मिळाला तर मग काय- बहार ही बहार!          

या नवीन झालेल्या ओळखी वाढवण्यासाठीही मॅटीनी फार उपयोगी पडत. 'कोहरा', 'आरती', 'बात एक रात की' वगैरे चित्रपट मॅटीनीला लागत, पण रविवार आणि सुटी सोडून इतर दिवशी त्यांना फारशी गर्दी नसे. त्यामुळे असे चित्रपट, झालेल्या ओळखी वाढवण्यासाठी सोईस्कर असत.                                          

मॅटीनी वरून एक गंमत आठवली. घरी पाहुणे आले होते. वडीलांना रात्रीच्या शो ची तिकीटे काढून आणायला सांगितले होते कारण थिएटर त्यांच्या अॉफीस जवळ होते. संध्याकाळी साडे पाच वाजता ते आले आणि मला तिकीटे दिली. तिकीटे पाहून मी चुकलो. "काका ही तर संध्याकाळी साडे सहाच्या शो ची तिकीटे आहेत. तेही गोंधळले, म्हणाले, "अरे पण मी तर सेकंड शो चीच तिकीटे मागितली होती." 
मग मी म्हणालो "काका दुपारी तीन चा शो पहिला, संध्याकाळी सहाचा शो दुसरा आणि रात्रीचा शो तिसरा असतो "ते म्हणाले" असं होय?  आमच्या वेळी संध्याकाळी पहिला आणि रात्रीचा शो दुसरा असायचा "मग सर्वांनी धावपळ करत संध्याकाळी साडे सहाचा शो गाठला आणि सुरूवाती पासून पूर्ण पाहीला. हेमा मालिनी चा "मीरा". पण उत्सुकता म्हणून मी काकांना विचारले" मग दुपारच्या शो ला तुमच्या वेळी काय म्हणायचे?"
त्यांचे उत्तर होते "अरे तो मॅटीनी शो असायचा".                                 

काळ कसा बदलत गेला. वडिलांच्या वेळी दुपारी मॅटीनी संध्याकाळी पहिला रात्री दुसरा शो होता. नंतरच्या काळात दुपारी बारा वाजता मॅटीनी तीन वाजता पहिला सहा वाजता दुसरा आणि नऊ वाजता तिसरा शो असे झाले. आज आता एका थिएटर मधे किती चित्रपट असतात आणि किती शो होतात त्याला गणतीच नाही. सकाळी साडे नऊ पासून रात्री साडे अकरा पर्यंत कोणत्याही वेळेला चित्रपट सुरू होतात आणि संपतात. आजच्या काळात ते सोईस्कर आहे. आजची पिढी त्यात रूळली आहे, खूष आहे. एन्जॉय करते.     
मॅटीनी या शब्दाचा खरा अर्थ काय असेल तो असो, पण आमच्या लेखी मॅटीनी म्हणजे दुपारी बारा वाजता पाहीलेला सिनेमा - कधी करमणूक प्रधान, कधी संगीत प्रधान, कधी कथा प्रधान तर कधी अभिनय प्रधान सिनेमा! तेव्हाची थिएटर्स, तेव्हाचे मित्र मैत्रिणी, तेव्हाचे दिवस आणि तेव्हाच्या असंख्य आठवणी!          

ही किमया आहे 'मॅटीनी' ची!          
*विलास करंबळेकर नवी मुंबई*

Wednesday, January 1, 2020

बाजे मुरलिया बाजे। प्रफुल कुलकर्णी

#Cinema_Gully

बाजे रे मुरलिया बाजे

काही कलाकृती अशा असतात की, त्यांना दैवी स्पर्श लाभलेला असतो. त्यांची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. आपल्याकडे चित्रपट, नाट्य, संगीत या क्षेत्रांत अशा अनेक कलाकृती झालेल्या आहेत. 'राम श्याम गुणगान' ही अशीच एक अद्वितीय कलाकृती. जिथे साक्षात दोन भारतरत्नं (स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर) एकत्र येतात, तिथे कोणताही भारतीय संगीतप्रेमी केवळ हात जोडून नतमस्तक होऊ शकतो. त्यात जर तो मराठी असेल, तर त्याला अजूनच आनंद होईल, कारण या दोन दिग्गजांना एकत्र आणणारा मणिकांचन योग साधलाय तो आपल्या श्रीनिवास खळे यांना. तसे तर त्यांनी या दोहोंसोबत स्वतंत्रपणे अभंगरचनांचे अल्बम्स ही केलेत, पण या अल्बमची गोष्टच निराळी. १९८५ मध्ये हा अल्बम रिलीज झाला होता. 

एकवचनी, एकपत्नी, मर्यादा पुरुषोत्तम इ. नावांनी विख्यात असलेला दशरथ-कौसल्यापुत्र राम आणि कृष्ण...त्याची ख्याती काय वेगळी सांगावी! बाल, किशोर, तरुण, प्रौढ या चारही रुपांमध्ये वंदनीय असलेला हा एकमेवच. फक्त हाच एक देवत्वाच्या पलीकडे जाऊन प्रियकराच्या रूपातही जनमानसात रुजला अन त्याचं ते रूपही आज सर्वत्र पुजलं जातं. सर्वोच्च प्रेमाचा मापदंड म्हणून राधेवरच्या त्याच्या प्रेमाला पाहिलं जातं. या दोन हरीरुपांची एकत्रितपणे स्तुती करणारा कदाचित हा एकमेव अल्बम असेल. या अल्बमची सगळी गाणी सुंदरच आहेत, पण त्यातलं एक गाणं जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे बाजे मुरलिया बाजे.

राधा-कृष्णाच्या प्रेमावर विविध प्रकारची गद्य-पद्य रचना विविध भाषांमध्ये आजवर झालेली आहे. अनेक कवींनी वेगवेगळ्या प्रकारे या दोघांच्या प्रेमाचं चित्रण केलं आहे. असंच हे एक गीत. कृष्णाच्या बासरीनं वेड लावलं नाही अशी एकही गोष्ट गोकुळात, वृंदावनात नव्हती. अगदी पशुपक्षी, वृक्षवेली, पानाफुलांनाही त्या सुरांची मोहिनी होती मग माणसं तर सोडाच. या गाण्यातही त्याच सुरांनी मोहित झालेली राधा बाकी सर्व विसरून श्यामरंगी रंगली आहे. 

पं. नरेंद्र शर्मा यांची शब्दरचना असलेल्या या गीताची सुरुवात भीमसेनजींच्या आवाजातील दोह्याने होते.

विमुख शिखर से धारा धाये
राधा हरि सम्मुख लाये
बाँसुरिया हरि साँवरिया की 
राधा गोरी सुनवा ले

आणि मग गाणं सुरु होतं. भजनी ठेक्यासह येणारी बासरीची सुरावट अपेक्षित वातावरणनिर्मिती करू लागते अन लतादीदींच्या अमृतमय गळ्यातून शब्दसुधेचे तुषार पाझरू लागतात. काय सुंदर वर्णन आहे पहा! 

बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे
बाजे मुरलिया बाजे

हरे-हरे बाँस की बनी मुरलिया
मरम मरम को छुए अंगुरिया
चंचल चतुर अंगुरिया जिसपर
कनक मुंदरिया साजे

इथे मुंदरिया म्हणजे मुद्रिका (अंगठी). वेळूपासून बनलेल्या बासरीवर हरीच्या कोमल ओठांचा स्पर्श व्हायचा अवकाश, की जे काही त्यानंतर घडतं, ते केवळ अद्वितीयच. बासरीच्या छिद्रांवर हरीची बोटं इतक्या सहजपणे फिरत आहेत की, त्यातून एक एक मधुर सुरावटी निघत आहेत. 

पीली मुंदरी अंगुरी शाम
मुंदरी पर राधा का नाम
आकर देखे सुने मधुर स्वर
राधा गोरी लाजे

इथं कृष्णाच्या हातातल्या त्या अंगठीचं वर्णन आहे. त्याच्या बासरीच्या सुरांनी मुग्ध झालेली राधा त्या ठिकाणी येते. भावविभोर होऊन त्या सावळ्याला पाहत असतानाच अचानक तिचं लक्ष त्याच्या बोटातल्या त्या सोन्याच्या अंगठीकडे जातं, ज्यावर तिचंच नाव कोरलेलं असतं. ते पाहून ती लाजून चूर होते. 

भूल गई राधा भरी गगरिया
भूल गये गोधन को साँवरिया

माधवाच्या वेणूनादात राधा इतकी तल्लीन झालेली असते की, आपण येथे कशासाठी आलो होतो, याचेही स्मरण तिला राहत नाही. तिने पाणी नेण्यासाठी आणलेली घागर भरली, आणि तशीच ठेवली. इकडे या नंदकिशोरालाही विसरच पडलाय की आपण आपल्या सवंगड्यांबरोबर गाईवासरं चरायला घेऊन आलो होतो. तो आपला मुरलीतच रममाण. त्या दोघांची ही प्रेमलीला अशी रंगली आहे, की त्याची समाप्ती कधी होऊच नये असंच तिथल्या प्रत्येकाला वाटत आहे. 

हे गाणं पटदीप रागात बांधलेलं आहे. याच रागातली अजून काही गाणी म्हणजे लतादीदींचंच 'शर्मीली' मधलं 'मेघा छाये आधी रात' किंवा मग मराठीमधलं 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या'. 'मर्मबंधातली ठेव ही' हे मराठी नाट्यगीतही याच पटदीपमधलं.(ही गुगल गुरुजींची कृपा, हे मी नमूद करतो.) असो, आपली गाडी उगाच भरकटू नये. 

श्रीनिवास खळे यांच्यासारख्या प्रयोगशील संगीतकाराची चाल अन साक्षात स्वरभास्कर व स्वरसम्राज्ञी यांचा आवाज लाभलेल्या गीताचा परिणाम काय असेल, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तसा तो आहेदेखील. शब्दागणिक आपोआप चित्र डोळ्यासमोर साकारत जातं, ही गायनाची किमया. खरंतर हे गाणं म्हणे फक्त दीदींच्याच आवाजात होतं, पण अचानक खळे यांना वाटू लागलं की, आपण याचं ड्युएट करावं म्हणून मग ते पंडितजींच्या आवाजातही रेकॉर्ड करण्यात आलं. म्हणूनच हे गाणं ऐकताना आपल्या कानाला थोडा फरक जाणवतो, तो यामुळे. मला मूळ गाणं तर आवडतंच, पण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनीही एका कार्यक्रमात हे गाणं सादर केलं होतं, तेही माझं तितकंच प्रिय आहे. या दोन्ही लिंक मी खाली शेअर करतोय. 

जाता जाता अजून एक, शंकर महादेवन यांचं अजून एक नातं आहे या अल्बमसोबत. ज्यांनी हा संपूर्ण अल्बम ऐकलाय, त्यांना ते कळेल. यात जेवढे वीणेचे पीसेस ऐकू येतात (विशेषतः राम भजन कर मन मध्ये), ते सगळे शंकर महादेवन यांनी वाजवले आहेत, आणि तेसुद्धा वयाच्या १७-१८ व्या वर्षी. आहे की नाही कमाल! तुम्हांला माझं हे लिखाण कसं वाटलं, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगालच. अजून एक नम्र विनंती, जर काही चुका, कमी आढळल्यास ती शांतपणे वाद न घालता निदर्शनास आणून द्यावी. 

पुन्हा भेटू, एखाद्या नव्या गाण्यासह... तोपर्यंत सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!😊

Original song link -
https://youtu.be/GP6dt_qW5qE

Shankar Mahadevan version link - 
https://youtu.be/-TglJafPXYw