Saturday, September 26, 2020

बालसुब्रह्मण्यम l SPBalasubrahmanyam

#SPBalasubrahmanyam #RIPBALA

साथिया... तूने क्या किया. 

वर्ष होतं सन २०००. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथे उपस्थित एका गायकाकडे हात करत सांगितलं. " माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहे." क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला.
“तुम्ही किती गाणी गायली” ? असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "३५ हजार".
क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?"
त्यावर ते म्हणाले “३५ वर्षात..”
क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. 
ते गायक होते.. श्रीपती पंडिताराध्युला बालासुब्रमण्यम. 
अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालासुब्रमण्यम. 
करीयच्या ३५ वर्षांत ३५ हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण ३ गाणी रेकॉर्ड केली असं म्हणूया. फेब्रुवारी १९८१ मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या २१ गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि १२ तासांत २१ गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बाला सर सांगायचे. एक काळ तर असा होता की बाला सरांचं दररोज १५ ते २० गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग १६ गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालासुब्रमण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं. 
एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांची होती. त्यामुळे बालासुब्रमण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई (मद्रास) मध्ये नोकरी पत्करली. एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतूक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडे करीअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. 

वर्ष १९६४ मध्ये नशिबानं बालासुब्रमण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई (मद्रास)मध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती.कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वर राव, घंटसाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार जजेस म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बाला सरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे पर्फॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?" 
बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीय" 
ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी. कोदान्तापानी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे." बालासुब्रमण्यम यांनी कोदान्तापानी यांना विनयपूर्वक नकार दिला. "मला माफ करा, माझे वडील खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनीअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे." असं सांगून बालासुब्रमण्यम निघून गेले. त्यांनी कोदान्तापानी यांना घरचा पत्ताही दिला नाही.
कोदान्तापानीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालासुब्रमण्य यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालासुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बाला सरांच्या बाबतीत तेच घडलं होतं.
वर्ष १९६६. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामन्ना'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काय आलीच नाही. शेवटी कंटाळून बाला सरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे" असं म्हणत असेल. तर त्यावर कोण विश्वास ठेवणार?. चौकीदारानं बालासुब्रमण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदान्तापानी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं.
त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रमण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालासुब्रमण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथे एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथे बालासुब्रमण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस. पी. बालासुब्रमण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला. 
बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहानी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालासुब्रमण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या ५०० रुपयांत लग्न पार पडलं. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थीरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली. 

वर्ष १९६९, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम. जी. रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता (दोघेही नंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.) यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेन्न'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा. वय वर्ष २३ असलेल्या कडकडीत आवजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. " पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे." अशी विनंती एम. जी. रामचंद्रन यांनी अवघ्या २३ वर्षाच्या एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे केली. करीयरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला. 
"बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शूटिंग महिनाभर पुढे ढकलतो. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो!"
प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल्ड बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालासुब्रमण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं. 
७० च्या दशकात एम.जी. रामचंद्रन, जेमिनी गणेसन, शिवाजी गनेसन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालासुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईस्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये ७०च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. ७० चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालासुब्रमण्यम यांनी गाजवून सोडलं. १९७९ साली  'संकराभारनम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 

पण आपल्या सर्वांना एस. पी. बालासुब्रमण्यम यांची ओळख झाली ती  'एक दुजे के लिए' या सिनेमामुळे. मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर ८०च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. 

वर्ष होतं १९८१. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालाचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमानचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'.  सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस पी सुब्रमण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले. 
"तेेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना....
तुने नही जाना मैने नही जाना..."
किंवा 
"हम बने तुम बने इक दुजे के लिएं" या गाण्यात 
i dont know What u say! 
असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं. 
दिग्दर्शक बालाचंदर, अभिनेता कमल हासन, रती अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल हे मात्र बालासुब्रमण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातील गाण्यांनी नवे कीर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बिच मे' या गाण्यासाठी एस. पी. बालासुब्रमण्य यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालासुब्रमण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया' 
'मैने प्यार किया' हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालासुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बाला सरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला. 
"दिल दिवाना बिन सजना के माने ना.....
यह पगला है, समझाने से समझें ना....."
‌या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचे जादूई स्वर होते. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं " साथिया..... ये तुने क्या किया.." हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं. 
हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं.
साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. 1985 साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो.... नाचों रे सब झुंम के गाओ रे.. आओ रे...."  हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोर दा यांनी आवाज दिला, तर कमल हासन यांचा आवाज एस.पी. बालासुब्रमण्यम बनले. सागर सिनेमामधलंच..
सच मेरे यार है, बस वही प्यार है,
जिसके बदले में कोई तो प्यार दे,
बाकी बेकार है, यार मेरे.
हो यार मेरे..
हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. 
1991 साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रहमान यांचं संगीत आणि बाला सरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. " रोजा जानेमन......" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस. पी. बालासुब्रमण्यम गात होते. पण १९९५-९६ नंतर विशेषतः २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बाला सर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. अलिकडेच आलेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एकस्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गायलं होतं.

आपण एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बाला सर कमल हासनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हासनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालासुब्रमण्य सरांच्या आवाजातच डब्ड केले जातात. कमल हासनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कार्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनिकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बाला सरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधिजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच आहे. 
गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी. बालासुब्रमण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल ७५ चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं! 
आजच्या घडीला एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावावर १६ विविध भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ६ राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल २५ वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर २०१६ साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. २००१ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २०११ साली पद्म भूषण पुरस्कारानं एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा गौरव करण्यात आला होता. 

एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रिय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रिय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालासुब्रमण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत. 
गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रिय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याऊलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलट सूलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथे स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रिय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो" असं त्यांना वाटायचं. 
एस. पी. बालासुब्रमण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालासुब्रमण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टिकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रितले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय." हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं. 
एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनियरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी  व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. 

🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाला सर 🙏🙏
©अमोल किन्होळकर

#spbalasubramanian #spbala #spb 
miss u sir

Saturday, September 19, 2020

मेरा कुछ सामान। हेमंत देशपांडे

#Cinemagully

मेरा कुछ सामान... 

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है 
सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं
और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है
वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो 
 
     माझं काही सामान, काही चीजवस्तू तुझ्याजवळच अजून पडून आहेत.  तुझ्यासोबत घालविलेले ते श्रावणातले ओले दिवस तुझ्याजवळच मी एखादा ठेवा जपून ठेवावा तसे ठेवले आहेत.  आणि मी तुला लिहिलेल्या पत्रात गुंडाळलेली एक रात्रदेखील तुझ्याकडेच अद्याप पडून आहे.  आता एक कर, ती रात्र तू विझवून टाक.  मागच्या कुठल्याच गोष्टी आता शिल्लक नकोत.  मात्र सगळं काही विझविण्याआधी तुझ्याकडे शिल्लक असलेल्या माझ्या चीजवस्तू मला परत पाठव.
 
पतझड़ है कुछ ... है ना ?
पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट
कानों में एक बार पहन के लौट आई थी
पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है
वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो 

     थोडीशी पानगळती आहे.  त्यावरून आठवलं, अशाच एका पानगळतीच्या काळात गळणाऱ्या पानांचा आवाज मी माझ्या कानात घातला होता नि तोही अशा रीतीने की, आपण अंगावर जणू एखादे सुंदर वस्त्रच घालत आहोत.  ज्या फांदीवरून ही पानगळ झाली होती ती फांदी अजून माझा मनात थरथर कापतेय.  ती कंप पावणारी आपल्या प्रेमाची फांदी तुझ्या मनातून कापून टाक नि माझ्या चीजवस्तू माझ्याकडे परत पाठव.  
 
एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी
गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
 
     कुठल्यातरी एका पावसाळ्यात एका दिवस आपण दोघेही एकाच छत्रीत अर्धओल्या अवस्थेत खूप भटकलो होतो.  त्या आठवणींनी आतादेखील ओलं असलेलं माझं मन बहुधा तुझ्या अंथरुणाशेजारी पडलेलं असेल.  तेही माझ्याकडे पाठव.

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल 
गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ
झूठ-मूठ के वादे सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो 
 
     तुझ्यासोबत घालविलेल्या क्षण नि क्षणाचा तपशील मला अद्याप आठवतोय.  तुझ्यासोबत अगदी मोजून सांगायचे तर एकशे सोळा चांदराती मी किती आनंदात घालविल्या.  तुझ्या खांद्यावर असलेला एका तीळ, माझ्या हाताच्या ओल्या मेंदीचा सुगंध, त्यातच आपण एकमेकांशी केलेल्या खोट्या तक्रारी नि आपण घेतलेल्या आणाभाका या सर्वांचा पुनर्रआठव एकदा तू मला करून दे नि सोबत माझ्या सर्व चीजवस्तू माझ्याकडे पाठव.

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी
मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी

     आणखी एक कर.  हे सामान, ह्या चीजवस्तू तू मला पाठवशील तेव्हा ह्या वस्तूंना जमिनीत गाडून टाकताना मलादेखील गाडून घेण्याची परवानगी दे.  त्या वस्तूंसोबत मीही कायमची झोप घेईन म्हणते.
     
 
चित्रपट : इज़ाज़त (1988)
गायक : आशा भोसले 
संगीतकार : राहुल देव बर्मन 
गीतकार : गुलजार 
 

   ✍️हेमंत देशपांडे
         
------------------------------------------------------------------

Wednesday, September 16, 2020

चमचमीत कोल्हापुरी (सुभाष देसाई)- सुभाष देसाई

चमचमीत कोल्हापुरी (सुभाष देसाई)
- सुभाष देसाई

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून ते प्रसिद्ध क्रिकेटियरपर्यंत कोल्हापूर भेटीच्या आकर्षणाच्या तीने गोष्टी असतात. करवीरची अंबाबाई, कोल्हापुरी चपला आणि कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा नि कोल्हापुरी मटण याशिवाय कोल्हापुरी झणझणीत, चमचमीत मिसळ. गेली साठ-सत्तर वर्षे ही ख्याती वाढत गेली. 1964 च्या दरम्यान गंगावेस या कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात धारोष्ण दुधाचे कट्टे होते. ग्राहकांसमोर दूध पिळून भल्या मोठ्या पितळी पेल्यातून दूध मिळायचे नि वर्षानुवर्षे दररोज दूध पिणारे ग्राहकही होते. त्याच्यासमोरच वास्कर पैलवानांची हनुमान खानावळ वरच्या मजल्यावर होती. गंगावेसहून पश्‍चिम भागाकडे गारगोटी, राधानगरी भागाकडे जाणाऱ्या एसटीच्या नि खासगी हाऊटोन गाड्या सुटत, त्यामुळे येणा-जाणाऱ्या प्रवाशांमुळे हनुमान खानावळीस गर्दी होती. वास्कर पैलवानाप्रमाणे गंगावेस तालमीचे बाहेरगावचे पैलवानही तेथे गर्दी करीत. पैलवान गडी दिलदार, मनाने मोकळा; पण धंदा कसा चालवायचा हे कळायचे नाही. खानावळ काढल्यावर बोर्ड लावला होता "पोटभर जेवण मिळेल.' पहिल्या काही महिन्यांतच वास्कर पैलवानाला कळले, की भरपेट व्यायाम करून जेवायला येणाऱ्या पैलवानांना मटणाची थाळी देणे फायद्यापेक्षा तोट्याचे काम आहे.
आजची परिस्थिती वेगळी आहे. कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना या शहरातील दक्षिण भागात गारगोटी रोडवर मटणाच्या खानावळी पावलोपावली आहेत. हॉटेल नि खानावळी यात परंपरेचा फरक आहे. या खानावळीतल्या जेवणाची चव औरच असते. वारंवार येणाऱ्या ग्राहकांमुळे मालकाशी अरे-तुरेचे, जवळचे नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे मटणरश्‍श्‍यात तेलाचा तवंग, कट कमी पाहिजे की जादा याची फर्माईश मालक ऐकतो. अर्थात आर्थिकरीत्या या मटणाच्या खानावळी अल्पसंतुष्ट बनल्या आहेत. या धंद्यात थोडेफार पैसे मिळतात, पण घरच्या कुटुंबीयांच्या जेवणाचाही प्रश्‍न मिटतो. त्यामुळे मार्केटिंग, शाखा काढाव्यात याचे गणित कोणी मांडत नाही. खानावळ, धाबे, हॉटेल हे प्रकार थोडा वेळ विसरा, पण शहरातली असंख्य रस्सामंडळे तुम्ही नाही सांगितलीत तर विपरीत; पण प्रेमळ शिवी हासडल्याशिवाय कोणी राहणार नाही. रस्सा मंडळाची खासियत अमावस्या, पौर्णिमेला बघायची ती पंचगंगेच्या काठावर. चपाती, भाकरी, भात प्रत्येकाने आपापल्या घरातून आणायचा. मटण-रस्सा साऱ्यांनी पंचगंगा घाटावर नाहीतर कात्यायनीच्या डोंगरावर करायचा. करवीर हे संस्थान, त्यामुळे शिकारीचा छंद जोपासलेला होता. त्यामुळे रानडुकरे, ससे, हरण, भेकर, पक्ष्यांचे, बकऱ्याचे मटण चवीने खाणारी माणसे येथेच भेटतील. चार-पाच माणसे असली तर मटण आणून दिल्यावर सारे जेवण तयार करून देणारा कुटीर उद्योगही कोल्हापुरात चालतो.
बरं मंडळी! तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. शाकाहारी का मांसाहारी? प्रथम मांसाहारीकडे वळू. सर्वात जुने नाव पद्मा गेस्ट हाऊस. चार-पाच सिनेमा टॉकीजच्या मधोमध. मटण, पांढरा-तांबडा रस्सा चवदार मिळेल. मटण लोणचे हा प्रकार भारतात कोठेही मिळायचा नाही, पण तो संस्थानकाळापासून या ठिकाणी मिळेल. आता उचगाव फाटा, किलबिल कळंबा, हिमाणी राधानगरी रोड येथे स्वस्त नि मस्त मांसाहारी जेवण मिळेल. गवत मंडईत जाल तर छोट्याच जागेत गर्दी दिसली तर समजा तिथे अण्णाची बिर्याणी मिळते. बिंदू चौकापासून याल तर बडा मस्जिदजवळ खिमा सामोसा न चुकता खा. नाष्ट्याला जर काय खायचे म्हणाल तर सकाळच्या पहिल्या नमाजानंतर स्टेशन रोडच्या मलबार कॉर्नरला जा. तेथेच फक्त खिमा पोठा, खिमा पाव मिळणार. जुन्या पुणे-बंगळूर रोडवर ओपल हॉटेललाही तुम्हाला पांढरा-तांबडा रस्सा मिळेल, हां! जाता जाता सांगतो. वडा-कोंबडा, चिकन फ्राय, बीन-रोटीसाठी रंकाळा गाठा.
कोणी ना कोणी आपला सुवर्णमहोत्सव साजरा करतो, पण शाहुपुरीतील रेल्वे स्टेशनमागचे वामन गेस्ट हाऊस हे वर्ष साजरे करीत आहे. वामन धोंडू बागलकर, विजय बागलकर नि आता तिसरी पिढी अजित उत्कृष्ट मालवणी जेवण ग्राहकांना देतात. 1927 ला वामन भोजनालय फणसवाडी गिरगाव, 1951 ला खोतांची चाळ बंदर रोज मालवण, भरड मालवण नि 1963 पासून कोल्हापुरात हे खास कोकणी जेवणाकरिता प्रसिद्ध गेस्ट हाऊस. बांगडा ताट, सुरमई ताट, बोंबील फ्राय हवी तर येथेच जायला हवे. राजारामपुरीतील श्रीनिवास आसबे यांचे हॉटेल सायबा हेही उत्कृष्ट मत्स्य भोजनाचे हॉटेल. शिवाय देवगड फ्रेश, मालवणी इत्यादी हॉटेलही आहेतच.
आता वळू या शाकाहारी जेवणाकडे. झोरबा, राजपुरुष, गोकूळ, वेळवण येथे जायला हवे. मिलन हॉटेलच्या भज्यांची चव न्यारी. जुन्या कॉलेजकुमारांना विचारा. कोल्हापुरी मोठ्या वड्याची गंमतही काही औरच. हे वडे बाहेर दुर्मिळच.
संध्याकाळी 5 ते 8 मालवणी भजी, कमी पीठ, करपलेला कांदा टाकून केलेल्या खेकडा भजीसाठी व्हीनस कॉर्नर व शाहुपुरीत जा. याहीपेक्षा खाताना डोळ्यांतून पाणी काढणारी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कधी खाल्लीत का? शहरात टोपमार्गे बावड्यात याल तर बावड्याची मिसळ न चुकता खा! तेथे बघाल तर मोठेमोठे सिनेअभिनेते येथे येऊन गेल्याचे फोटो दिसतील. उद्यमनगर भागात असाल तर दुपारी 12 पर्यंत फडतरेची मिसळ चाखा. थोडे वर आलात तर बाळाप्पाची फाळके गेस्ट हाऊस समोरची मिसळ लई भारी! खासबागची मिसळ, बिंदू चौकातली दत्तची मिसळ ही वर्षानुवर्षे प्रसिद्ध. हॉटेल श्रावण, त्रिवेणी, शाईबा, झोरबा यांसारख्या अनेक हॉटेलांतून शाकाहारी सात्त्विक भोजनाचा आस्वाद घेता येतो.
फास्टफूडचा जमाना आलाय. पुण्यात नाही पण कोल्हापुरात नॅशनल हायवेवर सरनोबतवाडीजवळ मॅकडोनाल्ड आणि कॉफी कॅफे तरुणाईला भुरळ पाडतो. शिवाजी विद्यापीठ, सायबरमधली पोर-पोरी तास चुकवून शोधायची तर तिथं जा. राजारामपुरीच्या 9 व्या गल्लीत मिस्टर इडलीत जा. इडलीचे 35 प्रकार पाहून दक्षिण भारतात आहोत असे वाटेल. कोल्हापुरात डोमिनोज पिझ्झाही मिळेल. गोली वडापाव, सॉस, बर्गर राजारामपुरीत भेटतो.
आणि या साऱ्यात शेवटी आइस्क्रीम राजारामपुरीत खाऊन थेट गंगावेस गाठा नि श्रीकृष्ण मठीजवळच्या हॉटेलमध्ये गझल ऐकत आकडी दुधाचा मस्त चहाचा घोट घेत स्वर्गसुख अनुभवा. घरी जाता जाता हिंदुस्थान बेकरी, भारत बेकरी नाहीतर खेमराज बेकरीतील खारी, टोस्ट वा केक घरच्यांना घेऊन जायला विसरू नका.
दावणगिरी दोसा
गांधी मैदानाजवळ शिवाजी अर्ध पुतळ्याजवळ (निवृत्ती चौक) रहदारी वाढली आहे असे दिसले की, नक्की समजावे की दावणगिरी दोसा खाण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी केली आहे. अर्थात हे सारे सायंकाळी दिसणारे दृष्य. हा दोसा केवळ लोण्यामध्ये रोटी, पराठ्यासारखा बनवितात. खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची चवदार भाजी यात असते. कोल्हापुरात जैन दोसा जनता बझार, राजारामपुरी, येथे मिळतो. त्या चटणीत कांदा- लसूण नसतो. याशिवाय चायनीज डोसा जवळच आहे. पेपर डोश्‍यावर ढबूमिरची, कांदा- लसूण, सॉस, सोया सॉस, व्हिनीगर असल्याने तुम्ही पुन्हा- पुन्हा तिकडे वळाल. कर्नाटकातल्या दावणगिरी गावानंतर गुंटूर गाव प्रसिद्ध बनले ते गुंटूर इडलीमुळे. ती राजारामपुरीत मिळते.

वडापाव
कोल्हापुरात मंगळवार पेठेत कोळेकर तिकटी येथील शिंगोशी मार्केटमध्ये "आपली आवड' बोर्ड वाचून थांबा, तेथे वडापाव मस्त आणि स्वस्त. मोठा वडा केवळ 12 रुपयात गरमागरम. पावसाळा, हिवाळा नव्हे तर उन्हाळ्यातही आवडेल तो. सोबत तळलेली हिरवी मिरची तुमची चव वाढवेल. शाहू बॅंकेजवळच्या स्टॉलवर घरी जाता-जाता वडा-पाव पार्सल घेऊन जाणारे अनेक टू व्हिलर, फोर व्हीलरवाले थांबतात व ट्राफिकची एकच ओरड होते. राजाराम कॉलेज सागर माळावर "शामवडा' 1980 पासून प्रसिद्ध आहे. याशिवाय खाराळा बंगला, सत्यवादी ऑफिससमोर, दीपक वडा सेंटरला भेट द्यायला विसरू नका. भवानी मंडपातले "आप्पे' शेतकरी बझारसमोर हेही आता कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचे वैशिट्य बनले आहे.

प्रसन्न बुद्धीची किमया

प्रसन्न बुद्धीची किमया 
  
       भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी तीन मुख्य तत्वे सांगितली आहेत. 
1.       जगताना झुंज देणे अपरिहार्य आहे. म्हणून हताश न होता झुंज देण्यास सतत सज्ज राहावे. संकल्प चांगले असून भागात नाही. ते प्रत्यक्ष उतरविण्यासाठी झुंजावेच लागते. 
2.       लोकसंग्रह करीत राहण्यामागे जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. किंबहुना लोकसंग्रह हे बुद्धिमान माणसाचे कर्तव्य आहे. 
3.       वरील दोन तत्वे साध्य होण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यावश्यक आहे आणि बुद्धीच्या स्थिरतेसाठी मनाची प्रसन्नता अनिवार्य आहे. 
       प्रसन्न बुद्धीने झुंज दे, असे परस्परविरोधी वाक्य करणे ही श्रीकृष्णाची खासियत. यातील झुंज द्यावी, लोकसंग्रह करावा हे मनाला पटते.पण पण त्यासाठी आधी बुद्धी प्रसन्न करा, असे सांगितले. हे पटत नाही. झुंज व लोकसंग्रह साधला की त्यातून यश मिळते. आणि यश मिळाले की मन प्रसन्न होते. प्रसन्नता शेवटी आहे असे आपण मानतो, तर प्रसन्नता प्रथम असे श्रीकृष्ण सांगतात. यातील खरे काय?
       श्रीकृष्णाचे म्हणणे खरे आहे असे हार्वर्ड विश्वविद्यालयातील संशोधन सांगते. अर्थात श्रीकृष्णाची तत्वे तपासण्यासाठी हे संशोधन झालेले नाही. ते झाले आहे आर्थिक मंदीसारख्या जगासमोरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी. परंतु, त्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे गीतेतील वर उल्लेख केलेल्या तीन तत्वांशी तंतोतंत जुळतात. 
       शॉन अॅकोर या तरुण संशोधकाने हा विषय हाती घेतला व त्याला साधी, सोपी पण अद्भूत सामर्थ्यशाली अशी तत्वे सापडली. अमेरिका हा प्रयोगनिष्ट देश आहे. तत्वे मांडून तेथे चालत नाही. ती प्रयोगाने सिद्ध करावी लागतात. त्यासाठी डेटा जमा करावा लागतो. शॉनने तसे केले. केवळ अमेरिकेतील नव्हे तर ४२ देशातील निरीक्षणे घेतली. हजारो लोकांची परीक्षा केली. २२५ शोधनिबंधांचा अभ्यास केला. शॉनला पुन्हा पुन्हा एकाच गोष्ट दिसून आली. समस्येवर मात करण्यासाठी मनाची प्रसन्नता ही पूर्वअट आहे. 
       समस्येसमोर आपण चिंताग्रस्त होतो. काळजीत पडतो. मनावर ताण येतो. या प्रतिक्रिया मनाची गुंतागुंत आणखी वाढवतात. याउलट मन प्रसन्न असले की समस्या सोडविण्याचा मार्ग लवकर दिसतो. स्थिर व प्रसन्न मनाला समस्येचे आकलन चटकन होते. 
       विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर चिंता, काळजी वाढली की भयाला प्रतिसाद देणारे मेंदूतील क्षेत्र उद्दीपित होते. हे केंद्र उद्दीपित झाले की मेंदूतील सर्व उर्जा या केंद्राकडे वळते. शरीराची सुरक्षा जपणारे हे केंद्र समस्या सोडविण्यासाठी निरुपयोगी असते. समस्या सोडविण्यासाठी मेंदूतील ‘प्रिफ्रन्टल कोर्टेक्स’ हा भाग उद्दीपित होणे अत्यावश्यक असते.चिंता वाढली की हा भाग उद्दीपित होत नाही व माणूस गोंधळात पडतो. मात्र मन स्थिर व प्रसन्न असेल तर हाच भाग जास्त उद्दीपित होतो. डोपामाइन व सेरोटोनिन हे स्त्राव मेंदूत वाहू लागतात आणि समस्येतून मार्ग निघतो. मेंदूत हे स्त्राव वाहात असले की उत्पादनक्षमता, सर्जनशीलता व समाधान यामध्ये लक्षणीय वाढ कशी याची विस्तृत आकडेवारी शॉनच्या शोधनिबंधात मिळते. 
       मात्र बहुतेकांच्या मेंदूत हे स्त्राव चटकन वाहात नाहीत. बहुसंख्य माणसे काळजीत पडतात. निराश होण्याचे कारण नाही. यावर सहज सोपा उपाय शॉनने दाखवून दिला आहे. न्युरोप्लास्टिसिटी या क्षेत्रातील संशोधन असे दाखवून देते की नवीन गोष्ट शिकणे हे मेंदूला कोणत्याही वयात शक्य आहे. मेंदूतील केंद्रे एकमेकांशी व शरीराच्या पंचेन्द्रियांशी जोडलेली असतात. परस्परांशी असलेल्या मेंदूतील या जोडण्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य असते. त्यासाठी एक लहानसा मानसिक व शारीरिक व्यायाम शॉनने सुचविला आहे. 
       रोज पाच गोष्टी करा, असे शॉन सांगतो. 
1.       कृतज्ञता वाटण्याजोग्या तीन घटना लिहून काढा. 
2.       मित्र वा सहकाऱ्यांना उत्साह वाटेल अशी एखादी कृती सकाळीच करा. 
3.       अधूनमधून फक्त दोन मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. 
4.       दिवसातील एका महत्वपूर्ण घटनेवर डायरी लिहून चिंतन करा. 
5.       दहा मिनिटे व्यायाम करा. 
       मेंदूची कार्यपद्धती लक्षात घेऊन शॉनने हे उपाय सुचविले आहेत. आसपासच्या परिस्थितीची मेंदू सतत चाळणी करीत असतो. मात्र तो एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे नकारात्मक गोष्टीकडे मेंदूचे लक्ष आधी जाते. सावध राहण्यासाठी ते आवश्यक असते. मात्र यामुळे फक्त नकारात्मक गोष्टीच पाहण्याची सवय मेंदूला लागते. नकारात्मक गोष्टीच मनावर ठसतात, सकारात्मक नजरेतून निसटतात. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. ‘टेट्रीस इफेक्ट’ असे शॉन याला म्हणतो. याचे तपशीलवार विवेचन त्याने केले आहे. मात्र नकारात्मक भावनांप्रमाणे मेंदूला ‘पॉझिटिव्ह टेट्रीस इफेक्ट’ही तयार करता येतात. ती सवय लावण्यासाठी वरील व्यायाम प्रकार उपयोगी पडतात. 
       व्यक्तिमत्व विकासाच्या लोकप्रिय पुस्तकामधील विवेचानासारखे हे वाटेल. पण शॉन पुराव्यानिशी बोलतो. बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकांना वरील प्रकार सलग २१ दिवस करण्यास त्याने सांगितले. कार्यक्षमता, अचूकता व समाधान या प्रत्येक आघाडीवर प्रयोग करणाऱ्यांमध्ये तीन आठवडयात मोठा फरक दिसून आला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांनंतरही या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम अनुभवास येत होता. मेंदूला सकारात्मक काम करण्याची सवय लावता येते व अशी सवय लावली तर पुढील बरेच महिने तो उत्साहात काम करतो. अर्थात सकारात्मक भावना निर्माण होतील असे वातावरणही कंपनीत असावे लागते. गुगल, व्हर्जिन, अशा कंपन्यात असे वातावरण मुद्दाम निर्माण करतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवितात. 
       गीतेमध्ये श्रीकृष्ण पंचेन्द्रीयांना वळण लावून बुद्धी स्थिर करण्यास सांगतात. शॉनच्या व्यायाम प्रकारात तेच अभिप्रेत आहे. या पाच प्रकारांपैकी दुसऱ्याशी संपर्क ठेवण्याचा सवयीचा मनाच्या प्रसन्नतेशी सर्वात घनिष्ट संबंध असतो. असे शॉनला आढळले. कुटुंबाचे, मित्राचे, समाजाचे सहकार्य आणि शरीरस्वास्थ्य याचा थेट संबंध आहे. समाजात रममाण झालेला माणूस जास्त जगतो. याउलट एकटेपणाचा शरीरावर होणारा परिणाम हा उच्च रक्तदाबाइतका घटक असतो. याबाबत खूप संशोधन अन्य समज शास्त्रज्ञांनीही केले आहे. मात्र आपलेपणाचे सुख सर्वांनाच मिळते असे नाही. बहुतेक लोक याबाबत कमनशिबी असतात. यावर उपाय म्हणजे स्वत:हून लोकांच्या संपर्कात जाणे वा त्यांना मदत करणे. शॉनच्या पाहणीनुसार स्वत:हून घेतलेल्या अशा पुढाकारामुळे मेंदूची कार्यक्षमता खूप वाढते. पुढाकार घेणारे लोक व उदासीन राहणारे लोक यांच्या कार्यक्षमतेतील फरक शॉनने प्रयोगातून दाखवून दिला आहे. लोकांशी स्वत:ला जोडून घेण्याचे फायदे अनेक आहेत. लोकसंग्रहाचा आग्रह गीतेत का धरला आहे हे यावरून लक्षात येते. 
          लोकसंग्रह व प्रसन्नता साधली म्हणून सर्वकाही सोपे होत नाही. आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडतच असतात. फसवणूक, गैरसमज, द्वेष,शत्रुत्व, हेवा, असूया, अशा अनेक भावनांशी माणसाला सामना करावा लागतो. यातून ताण येतो. ताण सहन झाला नाही की माणूस स्वत:ला शक्तीहीन मानू लागतो आणि मग वेगाने एकटा पडत जातो. ताणाच्या वाईट परिणामांवर आता भरपूर संशोधन झाले आहे. पण त्यामुळे आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी. असा शॉनचा सल्ला आहे. विपरीत परीस्थीतीशी झुंज द्या. असं तो सांगतो व हा सल्लाही पुन्हा प्रयोगातून सिद्ध करून दाखवतो. आर्थिक मांडीत बँका गटांगळ्या खात होत्या व सर्वत्र नैराश्येचे वातावरण होते. तेंव्हा ‘यूबीएस’मध्ये शॉनने प्रयोग केला. ताणाचे वाईट परिणाम दाखविणारी चित्रफीत एका गटाला वारंवार दाखविली तर ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास मेंदू व शरीराला नवी शक्ती कशी मिळते हे सांगणारी चित्रफीत दुसऱ्या गटाला दाखविली. काही दिवसांनंतर दोन्ही गटांची तपासणी केली असता ताणाकडे आव्हानं म्हणून पाहणाऱ्यांची मानसिक व शारीरिक उर्जा वाढलेली आढळली. आरोग्याच्या कुरबुरी तर जवळपास नाहीशा झाल्या. कामातील आनंद व आत्मविश्वास वाढला. फायझर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शॉनने दुसरा प्रयोग केला. आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या पाच घटना आयुष्यात निवडण्यास सांगितले. तेंव्हा या पाचही वेळा हे अधिकारी खूप ताण सहन करीत होते असे दिसले. ताणामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व सुदृढ झाले. ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर माणसाची उत्पादनक्षमता कमालीची वाढते असे शॉन ठामपणे सांगतो. ताण म्हणजे सामर्थ्य वाढविण्याची संधी असे समीकरण आहे. 
       आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही. मात्र बुद्धीची प्रसन्नता व लोकसंग्रह ही दोन आयुधे हाती असली तर संघर्ष असूनही जगण्याचा आनंद लुटता येतो. मात्र त्यासाठी मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय मुद्धाम लावून घ्यावी लागते. सध्या आजूबाजूला सतत त्रासदायक गोष्टी कानावर येत असताना अशी सवय लावून घेणे अत्यंत कठीण असले तरी सकारात्मक विचार करणे हाच उपाय त्यावर आहे. गीतेमध्ये मांडलेल्या तत्वांचा वैज्ञानिक आधार शॉनच्या प्रयोगातून मिळतो. शॉनला भगवद्गीता माहित नाही तरीही तो श्रीकृष्णाप्रमाणेच सल्ला देतो. 
       शॉन म्हणतो, ‘आनंदाचा मुखवटा चढवा असे मी अजिबात सांगत नाही. समस्या नाहीच अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्यासही मी सांगत नाही. प्रत्येक घटना ही सुवर्णसंधी माना असला खुळा उपदेशही मी करीत नाही. वेगळ्या सवयी लावून मेंदूमध्ये बदल घडवून आणता येतो व अशा बदलाचे फायदे प्रत्यक्ष दिसतात इतकेच मी सांगू इच्छितो. आपण बदलू शकत नाही अशी समजूत आपल्या मनात समाजाने रुजविली आहे. ती खोटी आहे असे माझे प्रयोग सांगतात. विपरीत परिस्थितीतही चांगल्या गोष्टी शोधीन प्रसन्नतेला अग्रक्रम द्या. तशी सवय मेंदूला लावा आणि त्याच्या उत्तम परिणामांचा अनुभव घ्या.’ 
       नवीन वर्षाची सुरुवात शॉनच्या प्रयोगाने करण्यास हरकत नसावी. त्यानिमित्ताने भगवद्गीताही नव्या नजरेने तपासता येईल.

Sunday, September 13, 2020

श्रीमंत पेशवाई - Shrimant Peshwai

श्रीमंत पेशवाई - Shrimant Peshwai
एकेकाळी सत्ता आणि राजवैभव उपभोगलेल्या राजेरजवाडे आणि संस्थानिकांचे आजचे वंशज कसे आयुष्य जगताहेत ? त्यांना गतवैभवाचे ओझे पेलताना त्रास होतो का? आज सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगताना त्यांच्या काय भावना आहेत ?

पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत 'रघुनाथ' नावाचा बंगला आहे. हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज या बंगल्यात राहतात. श्रीमंत पेशवा घराण्याचे वंशज पुण्यात राहतात ही माहिती फारच थोडय़ा पुणेकरांना असेल. पेशव्यांच्या वंशजांना 'रघुनाथ'मध्ये भेटायला जायचंय या कल्पनेनंच मनावर दडपण आलं होतं. पेशव्यांचं नाव निघालं की शनिवारवाडा डोळ्यासमोर येतो.. शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात असलेला पराक्रमी बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा आठवतो.. पुण्याची पर्वती.. पेशव्यांचा तळ्यातला गणपती.. पेशवेकाळात शनिवारवाडय़ापासून पर्वतीपर्यंत एक भुयारी रस्ता होता, ही पुण्यात सांगितली जाणारी कथा.. अशा एकेक गोष्टी आठवत राहतात..
'रघुनाथ' बंगल्याच्या प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात कोरलेली पाटी दिसली. पाटीवर कोरलेली 'डॉ. वि. वि. पेशवा' ही अक्षरं वाचली आणि पुण्यात राहणाऱ्या पेशव्यांच्या वंशजांपर्यंत आपण पोहोचलो आहोत याची जाणीव त्या पाटीने करून दिली. प्रभात रस्त्याच्या परिसरात प्रशस्त आणि सौंदर्य जपणारे अनेक बंगले आहेत, तसाच पेशव्यांचाही हा बंगला. खूप काही ऐतिहासिक वगैरे वस्तूंनी त्याची सजावट केलेली असेल अशी आपली कल्पना असते, किंवा पेशवा घराण्याचे वंशज इथे राहतात याचं दर्शन लांबूनच होईल असंही मनात येऊन गेलेलं असतं; पण तशी काही परिस्थिती इथे नाही. म्हणजे भव्य, उंच प्रवेशद्वार, कमानी, दारात जुन्या तोफा वगैरे असं इथे काही आढळत नाही. हे पेशव्यांचं निवासस्थान आहे याची कल्पना बाहेरून येत नाही. जुन्या थाटाच्या काही ऐतिहासिक वस्तू या कुटुंबानं हौसेनं जमा केल्या आहेत. त्या घराची.. दिवाणखान्याची शोभा वाढवतात. इतिहासाची साक्ष देतात. पण अशा वस्तूंनी 'रघुनाथ' बंगला भरलेला आहे असं मात्र बिलकूलच नाही. या भागात असलेल्या इतर बंगल्यांप्रमाणेच हादेखील एक बंगला.

डॉ. विनायकराव पेशवा, त्यांची पत्नी जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सून आरती आणि रिया व सना या नाती असं पेशवा कुटुंब इथे राहतं. ही पेशवा घराण्याची दहावी पिढी. ७४ वर्षांचे विनायकराव भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. आणि याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठात ३३ वर्षे नोकरी केली. पुष्करचं वय ३८ आहे. आणि आर्किटेक्ट म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुष्करला दोन बहिणी. एक- आदिती अत्रे आणि दुसरी- सुपर्णा देव.

पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात आहेत. दुसरं पुण्यातलं कुटुंब म्हणजे डॉ. विनायकराव पेशवा यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव पेशवा. रत्नपारखी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यानिमित्ताने भारतभर त्यांनी प्रवास केला आहे. त्यांची पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सून सुचेता आणि नात पूजा हे कुटुंबदेखील प्रभात रस्त्यावरच राहतं. महेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कृष्णरावांना एक मुलगी- मोहिनी करकरे. आदिती आणि मोहिनी यांचं सासर पुण्यात, तर सुपर्णाचं सासर दिल्लीत आहे.

ही सगळी मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांचे वंशज. पुण्यात असलेल्या या पेशवा घराण्याकडे वंशपरंपरागत वा पिढीजात मालमत्ता, जमीनजुमला असं काहीही आलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा पेशव्यांवर असलेला विलक्षण राग. त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन पेशव्यांच्या वंशजांकडे काही राहणार नाही याची आवर्जून काळजी घेतली. सन १८०० च्या आसपास अमृतराव वाराणसीत गेले. पुढील काही पिढय़ा तिकडेच राहिल्या. पण गेल्या दोन-तीन पिढय़ांच्य आधीची पेशवे मंडळी तिकडून पुण्यात आली. पेशव्यांचा वारसा सांगता येईल असं या पेशव्यांकडे काय आलं? तर दोन गोष्टी आल्या.. एक म्हणजे आडनाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरं. अर्थात ही मंदिरं पुण्यात वा महाराष्ट्रात नाहीत. वाराणशीतील गणेश घाटावर असलेलं गणपतीचं मंदिर तसंच वाराणशीतल्या राजा घाटावरचं अन्नछत्र या पेशव्यांना परंपरागत मिळालेल्या दोन गोष्टी. त्यातलं अन्नछत्र आता अस्तित्वात नाही. पण त्या घाटावर अन्नपूर्णेचं व शंकराचं अशी काही जुनी मंदिरं आहेत. गणेश घाटावरच्या गणपती मंदिराची मात्र पूर्ण व्यवस्था आजही पुण्यातील पेशवा घराण्याकडे आहे. त्यासाठी पुण्यातील दोन्ही पेशवा कुटुंबीयांनी मिळून ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याच्या माध्यमातून मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. अतिशय चांगल्या स्थितीत मंदिर राखलेलं आहे. तेथे नियुक्त केलेले व्यवस्थापक, कर्मचारी वगैरे या मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. हे मंदिर हा पेशवे घराण्याकडे चालत आलेला सध्याचा एकमेव वारसा. दरवर्षी या मंदिरात पेशव्यांतर्फे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या घरातील गणपती सात दिवसांचा. तसाच तिकडच्या प्रथेप्रमाणे हा उत्सवही सात दिवसांचा असतो. तिथल्या परंपरेनुसार गणेशचतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस या गणेशोत्सवास सुरुवात होते. या उत्सवाचं स्वरूप मुख्यत: उत्तर भारतीय प्रथा-परंपरांप्रमाणे सांस्कृतिक असतं. त्यात संगीताच्या मैफिली, वादनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. एक दिवस भोजनाचा मोठा बेत असतो. एक दिवस गणरायांच्या सजावटीचा असतो. तिकडच्या मराठी मंडळींचं, मंदिरात वर्षभर भक्तिभावानं येणाऱ्या गणेशभक्तांचं यानिमित्तानं जणू संमेलनच भरतं. परंपरागत आलेली एक वेगळी प्रथा या घराण्यात नवरात्रात पाळली जाते. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी तांदळाच्या उकडीचा मुखवटा करून त्याची पूजा करण्याची प्रथा पेशवा घराण्यात वर्षांनुवर्षे चालत आली आहे. यानिमित्ताने अनेकजण दर्शनासाठी येतात. घटस्थापनेच्या दिवशी गहू पेरायचे आणि देवीसमोर लावलेल्या छोटय़ाशा शेतात जे गहू उगवतात ते दसऱ्याला सोनं म्हणून द्यायचे, अशीही एक प्रथा पेशवा घराण्यात आहे. दसऱ्याचं हे सोनं अशा वेगळ्या पद्धतीनं लुटलं जातं. बाकी सगळे सण-उत्सव नेहमीच्याच पद्धतीनं साजरे केले जातात. त्यात घराण्याचं म्हणून काही वेगळेपण नाही.

पेशवे म्हणून जगताना या मंडळींना काय अनुभव येत असतील याची उत्सूकता खूपजणांना असते. अनुभव दोन्ही प्रकारचे असतात. डॉ. विनायकराव, महेंद्र, पुष्कर यांच्या गाठीशी असे खूप अनुभव आहेत. एक मोठा वर्ग असा आहे की- मुख्यत: नवी पिढी.. या पिढीला पेशवे हे प्रकरणच माहिती नाही. त्यामुळे इतर अनेक आडनावं तसंच पेशवा हे एक आडनाव अशी त्यांची धारणा असते. पण त्याबरोबरच ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहीत आहे, ज्यांना थोरल्या बाजीरावांचे असाधारण कर्तृत्व माहिती आहे, त्यांच्याकडून मात्र खूपच वेगळा अनुभव येतो. अशी मंडळी पेशवा कुटुंबीयांविषयी आजही खूप आदर व्यक्त करतात. मनापासून आस्था दाखवतात. हे आडनाव ऐकलं तरी लोकांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. पेशवा घराण्यातील वंशज म्हणून आजच्या पिढीकडेही कौतुकानं बघितलं जातं. डॉ. विनायकरावांची वेगवेगळ्या निमित्तानं खूप भ्रमंती झालेली आहे. विद्यार्थ्यांना भूगोलाच्या अभ्यासासाठी ते विविध ठिकाणे दाखवण्यासाठी घेऊन जात, तर कधी पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबीयांबरोबर प्रवास घडे. अशा भ्रमंतीत पेशव्यांविषयी असलेल्या औत्सुक्याचा अनुभव त्यांना जागोजागी आलेला आहे. असेच इतरही खूप अनुभव या मंडळींना येत असतात. काही वेळा त्यातून मजेदार प्रसंगही घडतात. इतिहासाच्या धडय़ात पेशव्यांचा उल्लेख वाचल्यानंतर जवळच्याच एका मुलाने घरी खूप हट्ट धरला की, मला आपल्या घराजवळ जे पेशवे राहतात त्यांना भेटायचंय. त्यांना बघायचंय. त्याची समजूत कशी काढणार? अखेर त्याला घेऊन त्याची आई पेशव्यांकडे आली. मुलाच्या कल्पनेतले पेशवे म्हणजे त्याने इतिहासाच्या पुस्तकातील चित्रात पाहिलेले पेशवे. तेच चित्र त्याच्या मनात पक्कं होतं. मात्र, घराचा दरवाजा उघडताच जे कोणी पेशवे त्याने पाहिले, ते अगदी 'नॉर्मल पेशवे' निघाले. तरीही आपण पेशव्यांना बघितलं हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.
महेंद्र पेशवा यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. नव्यानं कोणाशी ओळख झाली की हमखास लोक गमतीनं म्हणतात, 'अरे, तुम्ही तर पेशवे! तुम्हाला काय गरज आहे उद्योग-व्यवसायाची? ज्यांनी इतिहास वाचला आहे, ज्यांनी पेशवे वाचले आहेत, अशा मंडळींना मात्र पेशव्यांच्या वंशजांबद्दल खूप उत्सुकता असते, हा अनुभव त्यांना नेहमीच येतो. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात पेशव्यांबद्दल खूप आस्था आणि आदर असल्याचा अनुभवही पेशवा वंशजांना येतो.

महेंद्र यांचे वडील कृष्णराव पेशवा. केंद्र सरकारमधील नोकरीनिमित्तानं त्यांचं वास्तव्य बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात होतं. शिक्षणासाठी त्यांनी महेंद्र यांना पुण्यात ठेवलं. महेंद्र यांचा अनुभव असा की, पुण्यात जेवढी पेशव्यांविषयी माहिती लोकांना आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जाण वा माहिती आणि आदर उत्तर प्रदेशात आहे. पेशव्यांना असलेलं जनमानसातील आदराचं स्थान तिकडे जाणवतं. पानिपतच्या रणसंग्रामाचा स्मृती समारंभ असो किंवा पेशव्यांविषयीचा एखादा कार्यक्रम असो; पेशवा घराण्यातील मंडळींना त्या ठिकाणी बहुमान दिला जातो, त्यांचा सन्मान केला जातो, असा महेंद्र यांचा अनुभव आहे- जो ते कधीच विसरू शकत नाहीत.

पेशवा आडनावामुळे येणारं अपेक्षांचं काहीसं ओझं असलं तरी एका गोष्टीबद्दल मात्र पेशव्यांच्या वंशजांसमोर तसा कोणताही प्रश्न वर्तमानकाळात उभा राहत नाही. इतर अनेक संस्थाने, राजेराजवाडे यांच्या पुढील पिढय़ांसमोर पूर्वजांकडून आलेली आणि गावोगावी पसरलेली विविध प्रकारची स्थावर मालमत्ता, जमीनजुमला जपण्याचे, त्यांची देखभाल करण्याचे प्रश्न वर्तमानकाळात निर्माण झाले आहेत. हे ओझं पेशवा घराण्यातील नव्या पिढय़ांवर बिलकूल नाही. कर्तृत्वानं मिळवायचं, ते राखायचं आणि ते वाढवायचं, हीच या घराण्यावर असलेली जबाबदारी. अशा घराण्यांमधील वंशजांवर दुसरी महत्त्वाची जबाबदारी असते, ती आपल्या दिग्गज पूर्वजांचं नाव कायम राखण्याची! कारण लोकांच्या मनात या घराण्यांबद्दल विशिष्ट प्रतिमा असते. त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. या दोन्ही कुटुंबातील पेशव्यांच्या वंशजांनी ही जबाबदारी चोख बजावल्याचं दिसतं.

खुद्द पेशव्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल काय वाटतं? महेंद्र आणि पुष्कर यांचा अनुभव असा की, शनिवारवाडा असो वा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अन्य कोणतंही ठिकाणं असोत- अशा ठिकाणी गेलं की नकळत ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या पूर्वजांचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. या अभिमानातूनच या मंडळींनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. बाजीराव पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम, पेशवा घराण्यातील इतरही पराक्रमी वीरांचे कार्यक्रम आयोजित करून स्मरण, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणाऱ्या सहलींचं आयोजन आदी अनेक उपक्रम करून ही मंडळी पेशव्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताहेत. व्याख्यानांचंही आयोजन केलं जातं. याच भावनेतून दहा वर्षांपूर्वी 'मराठी राज्य स्मृती प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात होत असतं. मुत्सद्दी, युद्धनीतीनिपुण आणि अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्यावर टपाल तिकीट निघावं यासाठी बाजीराव पेशवेप्रेमींनी आणि पेशवा यांच्या नव्या पिढीनं अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आलं आणि प्रत्यक्ष तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम ज्या दिवशी झाला, तो दिवस पेशव्यांच्या नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरला.

पण असं असलं तरी या मंडळींनी पेशवा आडनावाचं अवडंबर माजवलेलं नाही, हेही जाणवत राहतं. किंबहुना, साधी राहणी हीच त्यांची खासीयत. कोणताही बडेजाव न करता आयुष्य जगायचं, नेटकं राहायचं, ही या घराण्याची रीत. रोजचं जगणं आणि इतिहासातलं जगणं यात महद्अंतर असतं. हे ज्या मंडळींच्या लक्षात येत नाही अशांची बहुश: परवड होते. 'आम्ही असे होतो,' 'आमचे पूर्वज असे होते,' अशा कथा वर्तमानात कधीतरी सांगणं ठीक असतं; पण त्याची सांगड वर्तमानाशी घातली जात नसेल तर मात्र गडबड होते. मग जुना थाटमाट, जुन्या प्रतिष्ठा वर्तमानात जपताना अकारण ताण येतो. आपल्या पूर्वजांना जो मान मिळाला तो आपल्यालाही मिळावा अशी अपेक्षा निर्माण होते. अनेक राजकीय घराण्यांमध्ये, वलयांकित व्यक्तींच्या घराण्यांत हे प्रकर्षांनं दिसतं. पेशव्यांच्या वंशजांनी मात्र ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली आहे. पुढच्या पिढय़ांवरही तसेच संस्कार केले जात आहेत. त्यामुळे आडनाव हे पुढच्या पिढय़ांसाठी ओझं झालेलं नाही. उलट, वर्तमान जगताना दोन्ही पेशवा कुटुंबीयांचं जीवन आनंददायी झालं आहे. खरं तर ही गोष्ट तशी खूप अवघड. माणसांना मानमरातब, पद, बडेजाव सोडवत नाही. हे सारं मिळवण्यासाठी अशी माणसं वर्तमानातही धडपडत राहतात. 'रघुनाथ'मधून बाहेर पडताना मात्र मनात आलं- अरे, हे तर सहज भेटणारे पेशवे.. इतिहासाचं ओझं न वागवता जगणारे!

शबरी। वृषाली प्रभावळकर

सीतेच्या अपहरणानंतर रामलक्ष्मण दंडकारण्यात सीतेच्या शोधासाठी दक्षिण दिशेने पुढे निघतात. कालांतराने सरळ रस्ता सोडून प्रभू रामचंद्र रस्त्यातील एका वळणाच्या दिशेने चालायला लागतात तेव्हा लक्ष्मणाला या रस्ताबदलाचे कारण काही कळत नाही पण प्रभू वर्षानुवर्षे आपली प्रतिक्षा करणा-या एका भाग्यसंपन्न जीवासाठी  पंपा सरोवराजवळील मतंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने चालू लागतात. कोणासाठी? तर  आयुष्यभर आपली प्रतिक्षा करणा-या भगवती शबरीला दर्शन देण्यासाठी. कोण आहे ही शबरी? आपण लहानपणापासून शबरीबद्दल ऐकले आहे. काही पौराणिक कथांमधून तिचे सुंदर चरित्र उपलब्ध आहे. दंडकारण्यातील भिल्ल वस्तीप्रमुखाची कन्या असलेली ही शबरी मतंग मुनींच्या आश्रमात कशी त्याची कहाणी गोड तितकीच ह्रदयस्पर्शी आहे.
 
ही शबरी आठ – दहा वर्षाची अल्लड बालिका आहे. त्या काळी लग्न लवकर होत हे आपण जाणतो. तसे शबरी आठ – दहा वर्षाची असतानाच तिचे लग्र ठरले. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. त्या तयारीचा एक भाग म्हणून तिच्या वडिलांनी काही बोकडांची पिल्लं आणून ठेवली. शबरी त्या बछड्यांबरोबर खेळत राहायची. लग्न म्हणजे काय हे देखील तिला कळत नव्हते. त्या पिलांशी खेळताना शबरीला जेवायचीसुध्दा शुध्द राहात नसे. आई सारखी जेवणासाठी हाक मारायची आणि ती सारखी पिलांमागे धावायची. एक दिवस आई खेकसली – ‘खेळून घे, खेळून घे, किती दिवस खेळशील? सगळे मरून जातील मग कोणाशी खेळशील? ‘ शबरीने आईला विचारले – ‘पण ही पिले का मरतील?’ तेव्हा आईने तिला सांगितले – ‘अग मग ती पिले आणलीत कशासाठी? ती पिले जर कापली नाहीत तर तुझ्या लग्नात सगळ्यांना मेजवानी कशाची देणार?’  त्यावर शबरीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की, आपल्या लग्नामध्ये ही पिले कापून त्याचे पदार्थ करणार. तिला खूप वाईट वाटले. ती आईला म्हणाली – ‘आई, नको गं यांना मारू. ही किती छान आहेत आणि हे सारे माझे मित्र आहेत.’  पहिल्यांदा आईने दुर्लक्ष केले पण शबरी पुन्हापुन्हा आईच्या मागे लागली की तू मला सांग मी या पिलांना मारणार नाही. शेवटी वैतागून आई म्हणाली, ‘जे काही सांगायचे ते तुझ्या वडिलांना सांग’  पण शबरीत हे धाडस नव्हते. एके दिवशी तिच्या आईनेच आपल्या पतीजवळ हा विषय काढला. तेव्हा शबरीचे वडील म्हणाले – ‘आली मोठी शहाणी मला शिकविणारी. इतके दिवस मोठमोठ्या लोकांच्या घरी जाऊन मेजवान्या खाल्ल्या. आता सगळ्या लोकांना मला खायला बोलवायला नको का? ’  आपल्या बापाने असे दरडावल्यावर बिचारी शबरी काय बोलणार.  तिच्या एक गोष्ट लक्षात आली की या लहान लहान बोकडांचं मरण काही टळत नाही. हे कापले जाणार. ह्या पिलांना कापायचे त्यांना खाऊन टाकायचे ही कल्पनाच तिला असह्य झाली. लग्नाचा दिवस जवळ येत चालला तसे तिने निश्चय केला की ही पिले मरता कामा नयेत. पण हे जमायचे कसे तर आपण एक गोष्ट करू शकतो. या पिलांची हत्या आपल्या लग्नाच्या निमित्ताने होणार तर मी जर लग्नच नाही केले तर ..ही हत्या टळेल. पण माझे वडील हात धरून मला बोहल्यावर उभे करतील. या घरात राहायचे तर लग्न करावेच लागेल. घरातून पळून जाण्याचा विचार शबरी करू लागली. मध्यरात्रीची वेळ. सारेजण शांत झोपलेले. छोटी शबरी घरातून बाहेर पडली. रात्रभर ती धावत होती. तशी थोडी भिती तिच्या मनात होती. पण ती भिल्लाची मुलगी. रानावनांची तिला सवय होती. तिला हेही ठाऊक होते की सकाळी घरी कळले की शोधाशोध सुरू होणार. म्हणून उजाडताच ती झाडावर चढून लपून बसली. शोध करणारी माणसे झाडाखालून आली आणि गेली. शबरीने एक नियमच केला की दिवसभर एखाद्या झाडावर लपून बसावं, झाडावरची फळं खावी आणि रात्री खाली उतरून पुढे पुढे जात राहावं. कुणीकडे जायचे तिला माहीत नव्हते. ते बोकड मारले जाऊ नयेत  म्हणून  आपण लग्न करायचे नाही या एका आकांक्षेने ती घरापासून दूर चालली होती. परंतु सद्भावना अंतःकरणात घेऊन जो अंधकारातही चालत राहतो त्याला योग्य ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था परमेश्वराला करावी लागते. शबरीच्या बाबतीत हेच घडले.
 
एके दिवशी शबरी रात्रभर चालून पहाटेच्या वेळी एका झाडावर चढून बसली. उजाडल्यानंतर तिला समोर एक आश्रम दिसू लागला. तेथील तपस्वी, ऋषीमुनी, त्यांची ती बालकं, त्यांचे सात्विक चेहरे पाहून तिला खूप बरे वाटले. तिला ते लोक आवडले. तिने विचार केला की या लोकांची काहीतरी सेवा करावी. त्यानुसार शबरी पहाटे रोज लवकर उठायची. खराटा घेऊन संपूर्ण आश्रम झाडून स्वच्छ करायचा आणि मग पुन्हा झाडावर जाऊन बसायचे असा तिचा दिनक्रम सुरू झाला. रोज आपला आश्रम इतक्या लवकर स्वच्छ होतो आहे हे पाहून मतंग ऋषीना वाटले की आपले चेले सुधारले. आश्रमाच्या वातावरणातील हा फरक शिष्यांच्याही लक्षात आला. मतंग ऋषीना कळले की शिष्यांपैकी कोणीही हा आश्रम झाडत नाही.  मग ही सगळी सेवा कोण करते? एके रात्री मतंग ऋषी जागत बसले. पहाटे शबरी नित्याप्रमाणे आली. हातात खराटा घेऊन ती आश्रम झाडू लागली. मतंग ऋषीनी आपल्या कुटीराचे दार उघडले. शबरी चपापली. मतंग ऋषीनी विचारले, ‘तू कोण आहेस?’ तिच्या अंगाला कापरं भरलं. शबरी जवळ आली आणि त्यांच्या चरणावर कोसळली.  मतंग ऋषीनी पुन्हा  विचारले, ‘तू कोण आहेस?’ इथे का आलीस?’ शबरीने त्याना आपली सर्व कथा ऐकविली. मतंग ऋषीना ती ऐकताना आश्चर्य आणि कुतुहूलही वाटत होते. त्यांच्या लक्षात आले की अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा जीव कोणत्यातरी कर्माने या घरात जन्माला आला आहे. मतंग  ऋषी तिला म्हणाले, ‘बाळ, तू या आश्रमातच का राहात नाहीस? कोप-यात एक खोपटं बांधून घे आणि तिथेच राहा.’ शबरीला हेच हवे होते. ती भिल्लकन्या असल्याने स्वतःकरीता एक खोपटं तिने भराभर बांधले आणि तेथे ती आनंदाने राहू लागली.
 
आता शबरीचे जीवन सेवामय झाले. आश्रमाच्या स्वच्छते बरोबर तिने चांगले उद्यानही फुलवले. जे जे करता येईल ते ते काम ती करू लागली. थोड्या दिवसानंतर मतंग ऋषीना भगवंताचा संकेत प्राप्त झाला की समाधीची वेळ आली आहे. हिमालयाच्या अमुक स्थळी आपण जावे. ऋषींनी सर्वाना सांगीतले की दोन दिवसानी मी निघणार आहे. ज्याला कुणाला मला भेटायचे, काही विचारायचे त्यानी परवा संध्याकाळपर्यंत मला भेटावे. हे लोकांना कळताच त्यांच्यावर श्रध्दा असलेले अनेक लोक दर्शनासाठी येऊ लागले, साधनेद्वारा उध्दार कसा होईल या बद्दल नाना प्रश्न विचारू लागले. मतंग मुनी शांतपणे त्यांना मार्गदर्शन करीत असायचे. शबरी हे सर्व कुतुहलाने ऐकत राहायची. दोन दिवस भरकन निघून गेले. आता मतंग मुनी निघणार, आपले गुरूदेव आपल्याला सोडून जाणार. शबरीच्या नेत्रातू अश्रुधारा वाहू लागल्या. इतके प्रेम मुनीनी त्या छोट्याश्या भिल्लकन्येला दिले होते. तिने आपल्या सद्गुरूना विचारले, ‘गुरूदेव, इतके लोक आपणाकडे येत होते. साधन काय करावे?,माझा उध्दार कसा होईल? असे विचारत होते. गुरूदेव, उध्दार होतो म्हणजे काय होते? त्यासाठी साधन कसे करायचे असते? मी काय करू ते मला सांगा.’
 
शबरीच्या मस्तकावर हात ठेवून मतंगमुनी म्हणाले, ‘शबरी बेटी, त्याची काळजी तू नको करूस. अग तुझा उध्दार आपोआप होईल.’ शबरी विचारते ‘आपोआप कसा होईल?’  गुरूदेव म्हणाले, ‘अगं, तुझा उध्दार करण्याकरिता भगवान श्रीराम स्वतः या ठिकाणी येतील.’ छोटी शबरी हे ऐकून आनंदाने उड्या मारू लागली. गुरूदेवांनी सर्वांचा निरोप घेतला. ते निघून गेल्यावर आश्रमसुध्दा रिकामा झाला. शबरी मात्र तेथेच रडत बसली. रात्रीची वेळ झाली. आता निजायचे. शबरीच्या मनात विचार आला. मी काय वेडी आहे. श्रीराम कधी येतील हे मी गुरूदेवांना विचारलेच नाही. आता जर मी रात्री निजून गेले आणि रात्री श्रीराम आले तर ते काही मला उठवणार नाहीत आणि ते जर रात्रीच निघून गेले तर आले होते हे देखील मला कळणार नाही. या कल्पनेने शबरीला झोपच येईना. ती रात्रभर बसूनच राहिली. तिला वाटले, राम दिवसा आले तर बरे होईल. आपल्याला काही तयारी करता येईल. आता त्या आश्रमात कोणीही नव्हते. शबरीने हातात खराटा घेतला. तिने एक मार्ग स्वच्छ केला. तिला असे वाटले की, राम या बाजूने येतील असा विचार करून मी पूर्वेकडचा रस्ता स्वच्छ केला, पण राम पश्चिमेकडून आले तर मी एवढात रस्ता स्वच्छ करून काय उपयोग. त्यांच्या पायाला इकडच्या रस्त्याचे खडे आणि काटे बोचणारच.म्हणून शबरीने आश्रमाकडे येणारा दुसरा तिसरा असे करत सगळे रस्ते स्वच्छ केले.आता तिला स्नान करायचे होते. भिल्लाची अल्लड पोर ती. पूर्वी ती झ-यावर कितीतरी वेळ खेळत बसायची. पण आता तिला खेळताही येईना. झ-यावर स्नानासाठी गेली तरी तिचे लक्ष आपल्या झोपडीकडे होते. कुठे मी स्नानात अडकले आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्र येऊन गेले तर! आज ती स्नान करून पटकन आली. आता रामांना आल्यावर काय काय लागेल याचा ती विचार करू लागली. एका शिळेवर त्यांना बसण्यासाठी तिने आसन तयार केले. रामाना पाय धुवायला पाण्याचा घडा भरून ठेवला. इकडून तिकडून फळे गोळा केली. रंगीबेरंगी सुवासिक फुले आणून त्यांचे हार, गजरे ती गुंफत बसली. सर्व तयारीनिशी रामांची ती वाट पाहात बसली. अशी सर्व तयारी करून वाट पाहायची हा तिचा नित्यनेम झाला. झोप अशी तिला राहिलीच नाही. श्रीराम येणार हा एकच ध्यास. ती सतत रामांच्या विचारात गढलेली असायची. रामांचा रंग रूप कसे असेल याबद्दलच्या कल्पना करीत तिची तंद्री लागे. त्या तंद्रीत तिला कधी त्या त्या रूपाचे दर्शनसुध्दा होऊ लागले. शबरीला ध्यान म्हणजे काय ते ठाऊक नव्हते. पण तिला ध्यास लागलेला होता. ज्याला ध्यास लागतो त्याला ध्यान करण्याची आवश्यकता उरत नाही. रात्रंदिवस ध्यास लागलेल्या शबरीचं बाल्य गेलं, यौवन गेलं, प्रौढत्व आलं पण शबरीच्या या ध्यासमय दैनंदिन जीवनात कधीच खंड पडला नाही. रोज रस्ते स्वच्छ करणे, आसन टाकणे, पाणी भरणे, हार गुंफणे, फळं तोडणे. तिच्या मनाला विश्वास होता की राम येणार. ती तेथील लतावेलींना सांगत राहायची, ‘ अगं आज आले नाही म्हणून काय झाले? केव्हा न केव्हा ते नक्की येतील.’ भक्तीशास्त्राचा एक नियम आहे. जो रोज रोज दार ठोठावतो त्याच्याकरिता दार नक्की उघडलं जातं. तुम्ही रोज भगवंताचे दार ठोठावत राहा. रोज रोज दर्शन मागत राहा. एक दिवस नक्की मिळेल असं संत सांगतात. शबरी वृध्द झाली. शरीर जराजर्जर झाली. पण शबरीच्या अंतःकरणातला विश्वास कमी झाला नाही. भगवंताच्या स्वागताची तयारी करून शबरी रोज प्रतीक्षा करीत जीवन व्यतीत करीत होती.
 
यावरून मला मनात एक विचार आला. आपण कधी देवाची शबरीसारखी वाट पाहिली का? आपल्या जवळच्या माणसांची वा मित्र, नातेवाईक, कामानिमित्त वा इतर कोणत्याही कारणासाठी कोणा कोणाची किती वेळ किती दिवस वाट पाहातो. ते येणार म्हणून काय काय तयारी करतो. पण आपल्या लाडक्या देवाची वाट पाहातो का?  कधीतरी शबरीसारखे आसनावरती बसून स्वागताची तयारी करून प्रभूची वाट बघून पाहा. रोज रोज वाट पाहा असे मी स्वतःच्या मनालाच बजावले.  
 
शबरीचे गुरूदेव पक्के होते. श्रीराम कधी येणार, कुणीकडून येणार हे त्यानी तिला मुद्दामच सांगीतले नसावे. समजा गुरूदेवानी शबरीला श्रीराम दहा वर्षानी येणार असे सांगीतले असते तर तिने नऊ वर्षे कदाचित् तुम्हा आम्हा सारख्या झोपा काढल्या असत्या. परंतु सद्गुरूनी तिला अनिश्चित स्थितीत ठेवले. तीव्र इच्छा आणि वेळ ठरलेली नाही अशा वेळी प्रत्येक क्षणी त्याचे स्मरण राहाते कारण कधीही आणि कुठूनही कोणत्याही रूपात प्रभू येऊ शकतात.
 
शबरीचे संपूर्ण जीवन म्हणजे केवळ प्रतीक्षा. ती एकटी बसून राही. येणारे जाणारे वाटसरू तिला वेडी भिल्लीण समजत. त्यांना असे वाटे की, ज्या रामाला कधी कोणी पाहिले नाही तो हिच्याकडे कुठून येणार? पण शबरीला रामाबद्दल अशी शंका कधीच आली नाही कारण तिचा आपल्या सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. विश्वासो गुरूवाक्येषु स्वस्मिन् दीनत्वभावना। शरणागतीची जी सूत्र आहेत, त्यात एक अत्यंत महत्वाचे सूत्र सद्गुरूंच्या वचनावर विश्वास. आपल्या जीवनात सगळी गडबड हा विश्वास नसल्यामुळे होते. संशयात्मा विनश्यति असे भगवंतानी गीतेत अर्जुनाला सांगितले आहे. भगवंताच्या नामस्मरणाचे महत्व सर्वाना माहित असते. पण रोज निदान एक माळ जप करताना तितक्या भक्तीभावाने, नाममहात्म्याच्या स्मरणाने, प्रेमाने उचंबळून जाऊन आपल्याकडून एक माळ तरी जप होतो का? प्रामाणिकपणे विचार करायला हवा.  
 
भगवंताचे नाम एकदा मुखात आल्यावर सारा भवसागर आटतो असं संत म्हणतात. भगवंताचे नाम एकदा जिभेवर येण्याकरता हजारो जन्मांचे पुण्य असावे लागते. आपण भाग्यवान आहोत की, एवढे महत्वाचे भगवन्नाम आपल्या जीभेवरती नृत्य करते. कधीतरी आपल्याला आपल्या या भाग्याची जाणीव झाली कां? आपण जप करीत नाही असे नाही, पूजा करीत नाही असेही नाही. पण प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या क्षणी तरी वैतागून संशयामुळे वा निराशेमुळे आपल्या सगळ्या साधनेवर पाणी पडते म्हणून  संशयात्मा विनश्यति असे भगवंत अर्जुनाला सांगतात.
 
मीरा फार शिकलेली नव्हती, पंडीत विद्वान नव्हती. पण एका साधूने श्रीकृष्णाची छोटीशी प्रतिमा तिला दिली आणि तिला ते म्हणाले, ‘मीरा हे तुझे ठाकूर.’ मीरेने विचारले,’ यांचे नाव काय?’ त्या साधूने सांगितले,’यांचे नाव गिरिधर.’ तितकेच शब्द मीराबाईनी धरून ठेवले. पण त्या क्षणापासून मीरेला एक क्षणभरही असे नाही वाटले की, ही केवळ पाषाणाची प्रतिमा आहे. लग्नाचे वेळी सुध्दा मीराबाई गिरिधराला सोबत घेऊन लग्न करते. या एका आत्यंतिक विश्वासाने मीरेच्या जीवनात क्रांती घडवली. लोकांना कित्येक जन्म साधना करून जे प्राप्त करून घेता येत नाही ते मीरेला एका जन्मात प्राप्त झाले. याचे कारण तिचा सरल निःसंशय भक्तीभाव.    
दक्षिणेश्वरची कालीमाता. व्यावहारिक भाषेत सांगायचे तर रामकृष्ण परमहंस त्या मंदिरातील पगारी पुजारी होते. मोठ्या भावाने फक्त सांगितले,’गदाधरा, ही आपली आई बरं.’ गदाधराने मातेच्या भूमिकेतून त्या प्रतिमेकडे पाहिले आणि गदाधराला असे कधीच वाटले नाही की ही केवळ पाषाणप्रतिमा आहे. त्यांना ती प्रतिमा चिन्मयीच दिसायची. आई आई असे म्हणत ते तिच्याशी बोलत बसत. काही दिवस आपण असे भगवंताशी बोलत बसलो म्हणजे भगवंतसुध्दा आपल्याशी बोलू लागतो. 
 
प्रतिमा केवळ बोलतच नाहीत, तर हसतात आणि रडतात देखील. संतांची जीवनं पाहिल्यावर हे लक्षात येते. त्यांच्या भक्तीभावाने त्या प्रतिमेतही प्राण निर्माण व्हायचा. गोंदवलेकर महाराजांच्या चरीत्रामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. महाराज ब-याच दिवसांसाठी गोंदवले सोडून कदाचित कायमचेच यात्रेला जाणार होते. कुणीतरी वाटेवर येऊन महाराजाना सांगितले,’महाराज, रामरायाच्या नेत्रातून अखंड अश्रूपात चालू आहे.’ महाराज धावत मंदिरात गेले. पाहिले तर रामराया रडत होते. महाराजानी रामरायाचे डोळे पुसले आणि ते रामरायाला म्हणाले, ‘रामराया, तू रडू नकोस, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी तुझ्याजवळच सेवेला राहीन.’ ते ऐकून रामरायाच्या नेत्रातील अश्रुपात थांबला. आपला जसा भाव असेल तसा प्रतिसाद भगवंताकडून प्राप्त होतो. प्रत्येकाची आपल्या साधनेवर आत्यंतिक श्रध्दा हवी. पतंजली म्हणतात – सत्कारासेवितो दृढभूमिः। संशयाने साधनेचे खंडण होते. कोणतीही साधना केली अगदी थोडी केली तरी चालेल ती मनापासून करा आणि लक्षात ठेवा की हा सगळा प्रांत अनुभवाचा आहे  असे संत सांगतात.  
 
शबरीच्या मनात संदेह नव्हता. गुरूदेवानी सांगितले म्हणजे रामचंद्र येणारच. तिचे शरीर खंगत चालले होते. तपस्येने ती कृश झाली होती पण तिचा भाव काही बदलला वा किंचितही कमी झाला नाही उलट त्यातील उत्कटता वाढतच राहिली. आयुष्यभर डोळ्यात प्राण आणून शबरी रामाची वाट पाहात राहिली. ज्या दिवशी प्रभू रामचंद्र आले तो दिवस शबरीच्या जीवनातला अखेरचा भाग्याचा दिवस होता.
रोजच्याप्रमाणे शबरीने रामांच्या स्वागताची तयारी करून ठेवली आणि नित्यनेमानुसार ती रामांची वाट पाहात बसली. तिने पाहिले की समोरून दोन आकृती येत आहेत. अशा प्रकारची भगवंताची आकृती तिने ध्यानामध्ये किती तरी वेळा अनुभवली होती. ते राम आहेत हे तिला सांगावे लागले नाही. अत्यंत सुंदर श्यामल शरीर, मस्तकांवर जटासंभार, उत्फुल्ल कमलाप्रमाणे असलेले नेत्र, गळ्यामध्ये सुंदर पुष्पमाला, शबरीच्या अंतःकरणात जसे प्रभूंचे स्वरूप साकारले होते तशाच रूपात तिला त्यांचे दर्शन झाले.
 
देव कसा आहे हा प्रश्नच विचारूच नये. आपल्याला देव कसा हवा त्या रुपात तो दर्शन देतो. आपण केवळ त्याला समर्पित व्हावे. त्याच्या रूपावरती प्राणापलिकडे प्रेम करावे. लोकांना चिकित्सा करावीशी वाटते. पण समर्पण करावेसे वाटत नाही. त्यांचे म्हणणे असते की भगवंत कसा आहे ते आम्हाला आधी पटवून द्यावे. श्रीमत् भागवतामध्ये एक अद्भूत श्लोक आहे –
 
त्वं भावयोगपरिभावितह्रत्सरोजे
आस्से श्रुतेक्षितगुणो ननु नाथ पुंसाम्।
यद् यद् धिया तमुरूगाय विभावयन्ति
तद् तद् वपुः प्रणयसे सदनुग्रहाय।।
 
भगवंताची भावना कोणत्याही रूपात करा. कुठलेही रूप आणि नाम चालेल. ज्या रूपावर आपली श्रध्दा आहे ते भगवंताचे सर्वश्रेष्ठ रूप. भगवंताचे रूप असे नाही तसे नाही हे म्हणण्याचा अधिकार यःकश्चित माणसाला कदापि नाही. शिवमहिम्न स्तोत्रात पुष्पदन्त म्हणतात –
रूचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिल नाना पथजुषाम् 
नृणामेको गम्यः त्वमसि पयसामर्णव इव। 
भगवंताच्या कोणत्याही रूपावर प्रेम करावे. प्रेम महत्वाचे आहे. नाथांकडे एकदा एक व्यापारी आला. तो म्हणाला – ‘ तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाचे ध्यान करायला बसतो, पण मला देव आठवतच नाही. माझे सगळ्यात जास्त प्रेम माझ्या म्हशीवरती आहे. तीच मला आठवते.’ नाथ म्हणाले, ‘ती म्हैस सुध्दा ब्रह्म आहे. तू तिचेच ध्यान कर. पण तिचे ब्रह्मभावनेचे ध्यान कर.’ ब्रह्मसूत्रात ‘ब्रह्मदृष्टिः उत्कर्षात।‘ असे एक सूत्र आहे. भगवंताचे ध्यान मानवी जीव म्हणून करणे चूक आहे. पण कोणत्याही वस्तूचे ध्यान ब्रह्मरूपात करणे श्रेष्ठ आहे. ध्रुवाच्या मनोमय कोषात, अंतःकरणात भगवंताच्या ज्या दिव्य रूपाचे प्रकटीकरण झाले होते तेच रूप धारण करून भगवान् बाहेर उभे होते. हे साधनेचे विज्ञान आहे. म्हणून प्रभू रामचंद्र येताच शबरीने त्याना ओळखले. प्रभूनाही सांगावे लागले नाही की ही शबरी आहे. जीव कितीही दूर असले तरी अंतःकरणातून ते जोडले गेले असतील तर पहिल्या भेटीतच ओळख पटते. पहिल्या भेटीतच रामकृष्ण विवेकानंदाना म्हणाले, ‘अरे किती दिवस मी तुझी वाट पाहात होतो. तु कुठे गेला होतास.’
 
‘तुम्ही आलात तुम्ही आलात’, असे म्हणत शबरी प्रभूंकडे धावते. त्यांचे दिव्य रूप पाहिल्यावर आयुष्यभर प्रभूंशी कितीतरी वेळ बोलत राहणारी शबरी प्रभूंचे साक्षात दर्शन झाल्यावर मात्र काहीही बोलू शकत नाही. प्रभूंच्या चरणावर शबरी कोसळली आणि प्रभूचरणांना आलिंगन दिले. तिच्या नेत्रातून अश्रूंचा अभिषेक सुरू झाला. लक्ष्मण तिला सांगू पाहात होते,’जरा दुरून.’ लक्ष्मणाने प्रभूंच्याकडे पाहिले. प्रभू भावविभोर होऊन त्या भिल्लिणीकडे पाहात होते. शबरी पुनःपुन्हा भगवंताच्या मुखाकडे पाहते आणि भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवते. तिचे शब्द विसर्जित झाले होते.
 
आपली अवस्था भगवत् प्रेमाने कधी अशी होते का? ज्याला देव कुठे आहे असा प्रश्न पडतो त्याला तो कुठेच दिसत नाही. आजकाल एक धार्मिक आध्यात्मिक खोडसाळपणा वाढला आहे. हातचे साधन सोडायचे आणि काहीतरी गूढ दिसले की त्याच्याकडे धावायचे. कुठलेही साधन प्रामाणिकपणे केले तरी सिध्दी प्राप्त होते. पुढे काय करावे हे सांगणारा कोणाच्यातरी रूपात गुरू भेटतो आणि आयुष्यात कोणीच भेटले नाहीतरी अंतःकरणातला राम आपल्याला पुढचा कर्ममार्ग दाखवितो. भगवान् पतञ्जलींचे एक सूत्र आहे. सः एष पूर्वेषामपि गुरूः कालेनानवच्छेदात्।
 
म्हणून प्रामाणिकपणे मनापासून आजच साधन सुरू केले पाहिजे. आपण देवपूजा करतो, पण देवांमध्ये आपल्याला चांदी दिसते, लाकूड दिसते, दगड दिसतो पण देव दिसत नाही. आपल्या घरातील बालकृष्णाला आपल्या ह्रदयाशी घेऊन प्रगाढ आलिंगन द्यावेसे आपल्याला कधी वाटते का? कधी त्या देवाला डोक्यावर घेऊन नाचावेसे वाटते का? किर्तन प्रवचनात देहभान विसरून मोठ्यांदा टाळ्या वाजवायचीही आपल्याला लोक काय म्हणतील म्हणून लाज वाटते. आपल्या घरातील देवाकडे एकदा प्रेमाने बघा आयुष्यात काय सकारात्मक बदल घडतो ते असे सर्व संत सांगतात.
 
शबरी भावाकुल झाली. तिने भगवंतांचे दोन्ही हात धरले. मुकाट्याने भगवंत चाललेत. शबरी म्हणाली, ‘जरा थांबा, आधी तुमचे पाय धुते.’ लक्ष्मण बोलणार होते, ‘नको, दादा कधी पाय धुऊन घेत नाहीत.’ पण लक्ष्मणाने पाहिले की, भगवंत काहीच बोलत नाहीत. शबरीने रामचंद्रांचे चरण मनसोक्त धुतले. श्रीरामांनीही आढेवेढे घेतले नाहीत. श्रीराम कशालाही नाही म्हणत नाहीत. जणू काय त्यांना आपल्या प्रेमळ भक्ताला भेटल्यानंतर स्वतःच्या नियमांचा विसर पडला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ‘वेडा झाला वेडा झाला, देव वेडा झाला।‘ जो देवाकरीता वेडा होतो देव त्याच्याकरीता वेडा होतो. केवटाला प्रभूंचे चरणप्रक्षालन करायचे होते तेव्हा प्रभूनी हो नाही, हो नाही म्हणत किती वेळ घालवला. पण तेच प्रभू शबरीकडून पाय धुवून घेताना काही बोलत नाहीत. वाल्मीकि रामायणात वर्णन आहे की,शबरीने प्रभूना दोन्ही हात धरून आसनांवरती बसवले. तिने आपल्या सद्गुरूंना देवाची पूजा करताना पाहिले होते. अगदी तशा प्रकारे तिने रामांची पूजा केली आणि प्रभूनीही ती पूर्ण पूजा करून घेतली. पूजेच्या अंतर्गत देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो.
 
भगवती शबरीने अतिशय सुंदर गोड गोड फळे देवाला अर्पण केली. शबरीने बोरे दिली असे वर्णन वाल्मीकि रामायणात नाही. पण बोरे म्हणणे चूक देखील नाही. ती आपली म्हणण्याची पध्दत आहे. एखाद्या माणसाचे घर मोठा बंगला असतो. पण तो बोलावताना म्हणतो- आमच्या गरिबाच्या झोपडीला तुमचे पाय लागू द्या. प्रत्यक्षात झोपडी नसते पण झोपडी म्हणायचे असते. जेवायला श्रीखंडपुरीचा बेत असला तरी गरीबाची चटणी-भाकरी खा, असे म्हणायचे असते. आलेल्या पाहुण्याला कुणीही चटणी-भाकरी खायला घालत नाही. पण हे विनयाचे शब्द आहेत. उत्तम फळे शबरीने आणली. एकेक फळ भगवंतापुढे करताना ती म्हणते, ‘हे जास्त गोड आहे. हे घ्या.’ लक्ष्मणाला सांगायचे होते की प्रभूंचा नियम आहे की कुणीही आणलेले खायचे नाही. गुहाने आणलेली फळे रामानी घेतली नव्हती. पण शबरीच्या आश्रमात प्रभूना जणू सर्व नियमांचे विस्मरण झाले आहे. शिवाय असे नाही की नाइलाजास्तव भगवंत फळं खातात. ते अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत आवडीने शबरीने दिलेली फळं खातात. शबरीला ते म्हणतात, ‘शबरी, किती गोड फळं आहेत ही. कित्येक दिवसात इतकी गोड फळे खायला मिळाली नाहीत.’ केवळ औपचारिकता म्हणून प्रभू फळं गोड आहेत असं म्हणतात, असेही नाही. गोस्वामीनी एक प्रसंग वर्णन केला आहे. अयोध्येत राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू अनेक मंत्र्यांच्या घरी मेजवानीकरीता जातात. ऐश्वर्यसंपन्न अयोध्येतील शाही मेजवानीत विविध पदार्थांचा आस्वाद घेताना प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, ‘शबरीची बोरे यापेक्षा किती गोड होती.’
 
शबरीच्या बोरांमध्ये असे काय होते? बोरांचा गोडवा कशाचा होता? शबरी अत्यंत उत्सुकतेने, भक्तीभावाने भारून जाऊन एकेक फळ प्रभूंच्या हाती देत होती. शबरीच्या नेत्रातून वाहणारा, शब्दाशब्दातून ओसंडणारा प्रेमभाव याची ती गोडी होती. गोस्वामी म्हणतात, रामहि केवल प्रेम पियारा। जानि लेउ जो जाननिहारा। हात जोडून शबरी प्रभू रामचंद्रांच्या समोर उभी आहे. ।।श्रीरामचंद्रार्पणमस्तु।। 
 
अखेरच्या श्वासापर्यंत रामनाममय होण्याचे शबरीचे सामर्थ्य आणि बुध्दी मला आणि सर्वाना प्राप्त व्हावी केवळ यासाठीच माझ्या अल्पमतीनुसार शबरीचरित्र साध्यासरळ संक्षिप्तस्वरूपात शब्दबध्द करण्याचा हा विनम्र प्रयत्न.।।अवघ्या आशा श्रीरामार्पण।।श्रीरामसमर्थ।।जय जय रघुवीर समर्थ।।-
 Vrushali Prabhavalkar

नारायण .....कोविड व्हर्जन

नारायण .....कोविड व्हर्जन
“नारायण, सॅनिटायझरचे कॅन कुठे आहेत ?”
“नारायण , भटजींसाठी ट्रॅडिशनल लुकचं पीपीई किट येईल ना वेळेवर?”
“नारायण,डिजीटल थर्मामीटर फुटला “
“नारायण,गुगलमीट ची लिंक कोण शेअर करणार ?”
“नारुभावजी, हा कुंदन लावलेला मास्क ठेवून द्या तुमच्याजवळ , नंतर बिदाईच्या वेळेस मागून घेईन “
“नाऱ्या लेका , वर आयुषकाढा नाही आला अजून , व्याही पेटलाय”
पन्नास ठिकाणांहून येणारे पन्नास हुकूम नारायण शिताफीने परतवत असतो.ह्या कोविडच्या काळात नारायणवर निराळीच जबाबदारी पडली आहे .मोजक्या 50 जणांची यादी करणे , मुलीकडचे २५ नि मुलाकडचे २५ ... “अय्या , मग भटजी विसरलेच की” कुणीतरी मायरा किंवा आलिया असल्या चालू फॅशनच्या नावाची मुलगी प्री वेडिंग व्हिडीओ काॅन्फरन्समध्ये चिवचिवते  आणि स्वत:चे कौतुक करून घेते .
प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी ... सकाळी लवकर जाऊन हाॅल आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घेणे, काॅर्पोरेशनचा फ्युमिगेशन ट्रक येऊन फवारणी करुन गेला की नाही याची खात्री करुन घेणे .. वऱ्हाडी मंडळी जमायला लागली की त्यांचे डिजीटल थर्मामीटर ने टेंपरेचर घेणे , त्यांच्या हाताला अत्तर नाही तर सॅनिटायझर लावणे ,सोशल डिस्टन्सिंगच्या सर्कलमध्येच 
त्यांना बसवणे ही सारी कसरत फक्त नारायणच करु शकतो . भटजी आले की हात पाय धुवून त्यांना पीपीई किट चढवायला मदत करणे , करवल्यांच्या हट्टाखातर ऐनवेळेस मॅचिंग ग्लोव्हसाठी धावाधाव .....
बायकांच्या ओट्या भरायला आयुषकाढ्याची छोटी पाकिटं आणि मास्कचं जरीकाठी कापड तयार ठेवणे , 
एक ना दोन ! जवळच्या नातेवाईकांना गुगलमीटची लिंक पाठवणे आणि इतर सर्वांसाठी फेसबुक लाईव्ह आॅप्शन देणे हे त्याचंच काम ! मध्येच नवरामुलगा अडून बसला , पार्क अॅव्हेन्यू सारख्या वासाचंच सॅनिटायझर हवं म्हणून तेव्हा तुळशीच्या वासानेच कोरोना पळतो म्हणून तसं सॅनिटायझर आणलंय असं ठणकावून सांगत डझनाचं बाँक्स नारायणानं त्याच्या पुढ्यात आदळलं .तितक्यात झूमवरून जाॅईन झालेली थोरली आज्जी म्हणाली , “नारायणा , राबतोयस बाबा सारखा , कोपभर आयुषकाढा तर घे “ . नारायणाला थांबायला सवड नव्हती पण गुगलमीट साठी लॅपटाॅपचा स्क्रीन अॅडजस्ट करताकरता पाच मिनीटांत त्याने काढा पिऊन घेतला . 
“नवऱ्यामुलाकडली माणसं समंजस आहेत हो सगळी “ आजी झूमवरूनच बोलल्या .”डोंबलाची समंजस , मी म्हटलं , तुमची माणसं सोशल डिस्टन्सिंगचे सर्कल सोडून जवळजवळ येतायत , त्यांना लांब बसवा , तर मुलाचा काका म्हणतो कसा , मी काय पोलिस म्हणून आलोय का इथं ?आणि तो कोरोनाबिरोना आमच्या वाट्याला नाही जात , आम्ही प्राणायाम करतो रोज”नारायण चॅटबाॅक्समध्ये मेसेज टाकतो .आजींना एकूण मुलाकडच्यांना कोविडअवेअरनेस नाही हे कळते . यांवर मुलीकडच्या झूम मीटिंगमध्ये एकमत !!
एवढं करून लग्न या घटनेत नारायणाला कणभरही इंटरेस्ट नव्हता .पटापट फूड स्टाॅल्स लांब लांब लावून घेणं ,सर्विसबाॅईजनी ग्लोव्हज , फेसशील्ड , कॅप सगळं घातल्याची खात्री करुन घेणं हे त्याचंच काम ! जेवणातही आलं पुदिना मिरी तुळशीचा इम्युनिटीबूस्टर काढा ॲपिटायझर म्हणून ठेवायची आयडिया त्याचीच!
जेवणाचा मेन्यू देखील प्राेटिनयुक्त , सात्विक , घरगुती असतो .तिकडे लग्नविधी सुरू असताना नवरानवरी हळूच मास्क सरकवत नाहीत ना इकडेही त्याची नजर असतेच .
बिदाईच्या वेळेस नवरामुलगा ग्लोव्हज काढून शेकहॅंड करायला लागतो तेव्हा , “ हां हां वसंतराव , नो शेकहॅंड ! लांबूनच हात जोडून नमस्कार करा ! सुमे , मजेत रहा , stay home , Stay safe !! ‘’ असं म्हणताम्हणता त्याचा गळा भरून येतो . सगळे जातात.
मांडवात आता फक्त उरलेले मास्क , सॅनिटायझरचे रिकामे कॅन आणि क्लिनिंग करणारा मुलगा एवढेच असतात . सगळं आवरून भराभर फोटो फेसबुकवर अपलोड करून नारायण ही निघतो , चेहऱ्यावरचा फेस्टीव्ह मास्क काढून साधा घालून !!!

✍️✍️©️पल्लवी फाटक

बेळगावचा कुंदा

मारवाडी मिठाईवाल्याची रेसिपी गंडली त्यातून बेळगावचा कुंदा जन्मला...
जगात जी काही सुंदर शहरे असतील तर त्यात बेळगावचा समावेश नक्की होईल. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचं आटोपशीर गाव. शांत आल्हाददायक वातावरण, लाल मातीचे रस्ते, गर्द झाडी. कानडी झाक असलेल्या मराठीत बोलणारी गोड माणसं.

बेळगावच्या मातीत असलेला गोडवा इथल्या एका रेसिपीमध्ये उतरलाय.
बेळगावचा कुंदा

बेळगावची ओळख म्हणजे इथला गोड कुंदा. पुलं देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बेळगावला जाऊन कुंदा न घेता आलं तर फाऊल मानलं जावं इतकं कुंद्याचं बेळगावशी नाते जोडलेलं आहे.

पण या कुंद्याची जन्मकथा सुद्धा खूप गंमतीशीर आहे.

 
गोष्ट आहे सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची. ब्रिटिशांच राज्य सुरू होतं. जहां न जाये गाडी वहा पे जाये मारवाडी अस म्हणतात. मारवाडी समाज दुष्काळी राजस्थानमधून व्यवसायाच्या निमित्ताने राज्याबाहेर पडला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला, अगदी दुधात साखर मिसळावी असा विरघळून गेला.

अशाच मारवाडी समाजातील काही कुटूंब बेळगाव जवळच्या शहापूर येथे वसले होते. यातील गंगाराम नावाच्या व्यक्तीच गजानन मिठाईचं दुकान होतं. या दुकानात जक्कु महाराज नावाचा एक आचारी होता. गंगाराम यांनी त्याला राजस्थान वरून आपल्या मदतीसाठी बोलवून घेतलं होतं.

जक्कु मारवाडी मिठाई बनवण्याच्या कामात तरबेज होता.

 
त्याच्या हाताला चव होती. पण जक्कु थोडासा आळशी होता. पण डोकं प्रचंड हुशार होतं.

एकदा तो कशासाठी लागेल म्हणून दूध तापवत होता. तो जमाना स्टोव्हचा होता. जक्कू महाराज स्टोव्ह वर दूध ठेवून दुकानातल्या कामासाठी बाहेर गेले, परतल्यावर पाहतात तर काय दूध आटून घट्ट बनलं होतं.

स्टोव्हचं बटन बंद करायलाच तो विसरला होता.

जक्कू घाबरला. स्वतःच्या निष्काळजीपणाला त्याने खंडीभर शिव्या घातल्या. गंगाराम शेटजीला कळल्यावर दंगा होणार हे ओळखून या आटलेल्या दुधाचं काही तरी विल्हेवाट लावायचं त्यांनी ठरवलं.

आधीच सांगितल्याप्रमाणे जक्कु महाराज हुशार होते.

त्यांनी गंडलेल्या दुधाची टेस्ट पाहिली. ते दूध गोड लागत होतं. याच दुधात त्याने खवा मिक्स केला. आणखी काही तास ते मिश्रण ढवळलं.

एवढी सगळी उसाभर केल्यावर तयार झाली एक गोड खास चवीची मिठाई. जक्कुने दूध आटवलं म्हणून त्याला रागवायला आलेल्या गंगाराम शेटजी यांनी जेव्हा त्याने बनवलेली मिठाई चाखली तेव्हा त्यांना ती प्रचंड आवडली.

जक्कूवर ते प्रचंड खुश झाले.

 
ही नवी मिठाई त्यांनी आपल्या दुकानात विकायला ठेवायचं ठरवलं. पण त्यापूर्वी मिठाईला नाव दिलं पाहिजे.

जक्कू मारवाड्याने आपल्या लाडक्या लेकीचं या मिठाईला दिलं.

हाच तो जगप्रसिद्ध कुंदा.

 
साजूक पौष्टिक कुंदा अगदी थोड्याच दिवसात फेमस झाला. मारवाडी पुरोहित मिठाई दुकानात तो हमखास मिळू लागला. त्यात अनेक प्रयोग करून त्याची चव वाढवली.

काजू बदाम घातलेला खमंग कुंदा बेळगाव बाहेरच्या लोकांना देखील भयानक आवडला. कित्येकांनी तो बनवण्याचा प्रयत्न देखील केला पण सुपीक बेळगावच्या गाईम्हैशींच्या दुधाला चव आहे की काय माहीत. तिथे बनणारा कुंदा बाहेर कुठेही तसा बनत नाही.

 
गेली अनेक वर्षे शहापूरमधलं ते गजानन मिठाईचं दुकान आजही तितकंच फेमस आहे.
जवळपास २०० दुकानात कुंदा मिळतो. एका दुकानात रोज शेकडो लिटर दुधापासून ६०० किलो कुंदा बनतो. म्हणजे थोडं गणित घातलं तर कित्येक टन कुंदा बेळगाव मध्ये तयार होतो आणि खपतो.

बेळगावच्या स्टेशनवर शिरणाऱ्या रेल्वेच्या डब्ब्यात पहिल्यांदा कुंदयाचा घमघमाट पसरतो. प्रत्येक प्रवासी कुंदयाचा एखादं पाकीट घेतल्याशिवाय बेळगावच्या बाहेर पाऊल टाकत नाही.

आता तर कुंदा सातासमुद्रापार पोहचलाय. बेळगावला त्याने कुंदानगरी अशी ओळख बनवून दिलीय. गरमागरम कुंदा त्याची जिभेवर रेंगाळणारी चव बेळगावच्या खाद्यसंस्कृतीचं तिथल्या हौशी लोकांच्या रसिकतेचं प्रतीक बनली आहे हे नक्की.

आशा भोसलेंवर सुलोचनाबाईनी लिहिलेला लेख

*आशा भोसलेंवर सुलोचनाबाईनी लिहिलेला लेख*

माई मंगेशकरांनी माझ्यावर त्यांच्या मुलींप्रमाणेच माया करणे चालू केल्याने लतादीदींसोबत असलेली मैत्री संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या मैत्रीमध्ये रूपांतरित झाली. मला गुबगुबीत मुली विशेष आवडत असल्याने मंगेशकर भावंडांमधील आशाबाईंनी माझे विशेष लक्ष वेधून घेतले होते. आशाबाईंना मी एकतर घरकामाला जुंपून घेतलेलं पाहिले आहे किंवा अंगणामध्ये बेभान होऊन खेळताना ! आशाबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही खेळ असो त्या लहानग्या हृदयनाथांना कडेवर घेऊन खेळायच्या. अगदी लंगडी सुद्धा. लहानग्या बाळासाहेबांना न पाडता लंगडी खेळण्याचे आशाबाईंचे कसब मला अचंबित करत असे.

जेव्हा मी माई मंगेशकरांसोबत गप्पा मारायची तेव्हा त्यांची गाडी अपरिहार्यपणे आशाबाईंवर घसरायची. कारण असायचे खेळाच्या नादात रियाझ व गाण्याकडे आशाबाईंचे होणारे दुर्लक्ष व स्वतःच्या वेणी फेणी/ आंघोळीकडे होणारे दुर्लक्ष किंवा उशीर. अशावेळी आशाबाईंना खेळातून ओढून काढून घरात आणण्याचे अवघड काम माझ्यावर येत असे. हे काम दमछाक करणारे होते. पण एकदा आशाबाई हातात सापडल्या की मात्र आज्ञाधारक मुलीप्रमाणे त्या माझ्याकडून आंघोळ/वेणी फणी सगळे करून घ्यायच्या.

प्रफुल्ल चित्र (मास्टर विनायक यांची ) संस्था कोल्हापुरातून मुंबई मध्ये स्थानांतरित झाली. मंगेशकर कुटुंब पण त्यामुळे  मुंबईला शिफ्ट झाले. मी मात्र कोल्हापुरातच राहिले. व जयप्रभा स्टुडियोमध्ये सामील झाले. पण कालांतराने भालजींचा जयप्रभा स्टुडियो गांधीहत्येमुळे जाळला गेला व भालजींच्या परवानगीने मी कोल्हापूरवरून पुण्याला शिफ्ट झाले. तिथेच १९५१ साली माझा संबंध परत एकदा आशाबाईंसोबत आला. निमित्त होते “बाळा जो जो रे' हा चित्रपट व या चित्रपटामधील माझ्यावर चित्रित झालेले 'बाळा जो जो रे' हे अंगाई गीत; जे आशाबाईंनी गायले होते. बहुदा त्याच साली भालजींच्या 'शिवा रामोशी' या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठी शांता शेळके व ती गाणी गाण्यासाठी आशा ताई कोल्हापूरला आल्या होत्या. जयप्रभा स्टुडियोमध्ये प्रथमच मी आशा भोसले या १८ वर्षांच्या धीर गंभीर गृहिणीला पाहत होते. माझ्या आठवणीतील १० वर्षांच्या अवखळ, मस्तीखोर आशा मंगेशकरच्या अगदी उलट हे व्यक्तिमत्त्व होते. आशा बाई त्यावेळी कधी कधी नऊवारी साडी देखील नेसत असत. माई मंगेशकर यांच्या सारख्या इंदौरी साड्या व मानेवर केसांचा अंबाडा घालणाऱ्या आशा बाई म्हणजे दुसर्‍या माईच भासायच्या.
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत होता. त्यामुळे आता माझे देखील मुंबईमध्ये येणे जाणे चालू झाले. त्यावेळी ज्येष्ठ कलाकार ललिता पवार यांनी मी मुंबई मध्ये घर घ्यावे असा लकडा माझ्या मागे लावला होता. त्यांच्या मते हिंदी व  मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कायमचे बस्तान बसविण्यासाठी मुंबईमध्ये घर आवश्यक  होते. पण मला ते शक्‍य नव्हते. कारण त्याकाळी मराठी चित्रपटांमध्ये काम, करण्याचा मला मिळणारा मोबदला अत्यल्प होता व कर्ज काढून घर घेण्यास माझ्या आईचा सख्तविरोध होता; त्यामुळे दोन वर्षे माझा मुंबईमधील मुक्काम हा हॉटेलमध्ये असायचा (व शूटिंग
संपले की कोल्हापूरमध्ये ).
एकदा बोलताबोलता हा घराचा विषय आशा भोसले यांच्याकडे निघाला. त्यावेळी आशाबाई माहीम कोकण नगर इथे राहत असत. त्यांच्याकडे दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली होती. सोबत त्यांचा गायन क्षेत्रामध्ये देखील चांगला जम बसत होता. त्यामुळे आशाताई मोठ्या घरामध्ये जाऊ इच्छित होत्या. त्यांनी माझ्या घराची अडचण समजावून घेतली व माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला ज्या किंमतीमध्ये त्यांनी माहीमचे घर घेतले होते त्याच किंमतीमध्ये त्या मला घर द्यायला तयार होत्या; ५० टक्के रक्कम लगेच तर उरलेली ५० टक्के रक्‍कम माझ्या सोयीनुसार द्यायचे ठरले. त्याकाळी असलेली घराची ६००० ते ७००० रक्‍कम देखील माझ्यासाठी खूप मोठी होती. पण आशाबाई मुळेच मुंबईमधील माझ्या पहिल्या घराचे स्वप्न मात्र पूर्ण झाले. “नवल वर्तले ग' हे आशाबाईंच्या आवाजात.
भाऊबीज या चित्रपटामध्ये माझ्यावर ४-५ लावण्या चित्रित झाल्या होत्या त्या सर्व आशा भोसले यांनीच गायल्या होत्या. या लावण्यांवर आज देखील अनेक मुलींचे पाय थिरकतात यातच सर्व काही आले. आर के बॅनरच्या 'अब तक दिल्ली दूर नहीं' या चित्रपटाची मी नायिका होते; यातील 'ये चमन असपना हमारा है' या गाण्याला देखील आशा भोसले यांचाच आवाज होता. 'रामपूर का लक्ष्मण' या चित्रपटामध्ये माझ्यावर व रणधीर कपूर वर एक भजन चित्रित झाले आहे त्यात देखील आशा भोसले यांचा आवाज मला लाभला होता.
आशा ताई यांना गाणे व स्वयंपाक दोन्हीमध्ये सारखाच रस आहे; विशेषतः मासे त्यांना खूप आवडतात. एकदा सिटी लाईटच्या मासळी बाजारात माझ्या नातीची, इरावतीची व आशा भोसले यांची भेट झाली. तेव्हा कोणते मासे घ्यावेत, कसे पाहून घ्यावेत इत्यादी तपशील देताना त्यांनी तिथेच त्या माशांची रेसिपी देखील माझ्या नातीला सांगितली. इतक्यावर थांबतील त्या आशा ताई कसल्या; त्यांनी ती रेसिपी इरावतीकडून परत वदवून घेतली. षण्मुखानंद मधील लता मंगेशकर पुरस्कार असो की स्वतःच्या घरातील पंचाहत्तरीचा हद्य कार्यक्रम; मला पाहिले की माझी गळाभेट घेणे, माझ्या पाया पडणे; माझ्या व त्यांच्यातील जिव्हाळ्याबद्दल मीडियाला आवर्जून सांगणे हे सर्व सोपस्कार कधीच चुकले नाही. आशा भोसले म्हणजे एक अथांग व्यक्तिमत्त्व आहे;

आशा ताई यांची ७०-७२ वर्षांची गान तपश्‍चर्या ही खडतर व अद्‌भुत आहे. त्यामुळेच त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंदले गेले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्र गीतामध्ये एक पंक्ती आहे; 'आकांक्षांपुढती गगन जिथे ठेंगणे'; कोल्हटकरांची क्षमा मागून मला मात्र म्हणावेसे वाटते की 'आशापुढती गगन ठेंगणे'; माझ्या मनातील त्या  वर्षांच्या आशाबाईंना ८७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अनेक उत्तम आशीर्वाद व आभाळभर माया!

Wednesday, September 9, 2020

आशा भोसले। संजीव वेलणकर

*आज ८ सप्टेंबर*  
*आज चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका मा.आशा भोसले यांचा वाढदिवस.* 
जन्म. ८ सप्टेंबर १९३३  
आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८६
व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वााच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्या व आज वय वर्षे ८६ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वा साने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाशसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्या करवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते. लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.
१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.
 ५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्याव ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत आणि बाब 'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आपल्या समूहातर्फे मा.आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
आशा भोसले आज के फनकार
https://www.youtube.com/watch?v=O540x-z8SQI 
*मा.आशा भोसले यांची गाणी.*
https://www.youtube.com/watch?v=dBSER4zDvJ8 https://www.youtube.com/watch?v=7MjZYvAAakI 
https://www.youtube.com/watch?v=ooFjhE_DjJE
https://www.youtube.com/watch?v=48jGe4vcar8
*मा.आशा भोसले यांची मराठी गाणी.*
https://www.youtube.com/watch?v=sQwTJmRFJE4
https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI

स्वरादनी आशा। प्रपुरीका जोशी

स्वराज्ञी आशा....

(Prapurika Joshi)

आशा भोसले ह्यांची प्रतिभा   संगीतकारा नी बरोबर ओळखली होती..त्यांच्या आवाजाची चंचलता, धमाल,आणि सहज हास्य मधून काही गाणी खूप गाजली .., तर जेवढ्या त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत मध्ये  गायले तेवढ्याच अल्लड पणे त्याने केबरे,रॉक,डिस्को मध्ये ही गाणी गायली.. 

आशा भोसले चे  ,मधुबाला वर चित्रिकरण झालेले हावडा ब्रीज मधले गाणे म्हणजे  कोहिनूर हिरा  होते..'. आइये मेहेरबा ....".अवखळ मदमस्त मधुबाला  नाचताना समोर उभी राहिली आणि आशा भोसले च्या आवाजाची जादू चा अनोखा संगम आहाहा..मस्त च,
  
राहुलदेव बर्मन आणि आशा भोसले ,एक कल्पक हरहुन्नरी संगीतकार...."शब्दांचे सुरात रूपांतर करणारा अवलिया.'.,आणि आशा भोसले चा थिरकायला लावणारा  आवाज,.........
Romantic गाणी ह्या जोडी ने मस्त च दिली,अगदी तरंगायला लावणारी काही गाणी,जी फक्त आशा च्याच आवाजात ऐकावी अशी च..

"आ ओ हुजुर तुमको..". ह्या गाण्यामध्ये ज्या ओळी आहेत त्या फिल्म मध्ये बबिता वर चित्रीत झालेल्या, ..ज्यात नुसती मदकाता ची उधळण व्हावी अश्याच,आवाजात.. "हमराज..हमसफर बनो "...ह्यात अशा भोसले चा आवाज इतका सुंदर नशिला लागला आहे की हरवून जायला होते ऐकताना, ..

अजुन ही जुनी गाणी आपण म्हणतो ,पण ती कितीतरी जवळ ची वाटतात..
हेच एक अजुन आशा जी चे गाणे मुमताज ला थिरकाताना बघून आपल्यालाही डोलायला लावणारे" ये हे रेशमी झुल्फो का अंधेरा न घाबराईये...ह्या गाण्याचा मध्ये आशा जी इतक्या काही गोड हसल्या आहेत,की ती  हास्याची उधळण  हे गाणे म्हणताना हेवा वाटावा इतकी सुरेख आहे, नशा आणावी गाण्याची ती आशा च्या गाण्या ऐकण्याची एवढे काही  गाणी  सुंदर गायली आहे. ...
   
"उडे जब जब जुल्फे तेरी" ..फिल्म नयादोर मध्ये दिलीपकुमार वैजयंती माला वर चित्रीत हे गाणे आज ही लोभस ,..श्रवणीय च

."इशारो इशारो मे दील .."..काश्मीर की कली ..धुंद वातावरण,..शम्मिकापुर एका हाताने फेटा डोक्यावर गुंडाळत..हळूच झाड्याचा अवतीभवती,फिरताना.. लाजणारी ,गालावर खळी,आणि प्रेमात ओतप्रोत शर्मिला टागोर.. किती सुंदर गोड लाजवाब लाजते,,अगदी प्रत्येक नाजूक ऍक्शन वर फिदा व्हावे असे तरल भाव ,एवढेच सुंदर बोल"मोहॉबत  जो करते हे वो ...मोहोबत जताते नहीं... धडकने अपने दिल की कभी किसी को सूनाते नही...

 ओ. पी चे म्युझिक आणि आशाजी चा आवाज... ह्या काश्मीर की कली चे हे गाणे आज ही वेगळ्या विश्वात घेऊन जाते...

त्यांची किशोर कुमार बरोबर ची अल्लड गाणी कुठेतरी मजेदार वाटली,तर  हेलन नी पिसारा लावलेल्या ड्रेस मधून येताना,नाचताना बघून थिरकायला लावणारा गाणी ही तेवढीच मधाळ ..
"पिया तू अब तो.....
"दम मारो दम...
"चुरा लिया हे तुमने..."
कितीतरी अवखळ,गाणी किती सुंदर,R D आणि आशा ची  गाणी आज ही तेवढेच ओढ लावणारी...

ज्वेलथिफ फिल्म मधली       नटखट तनुजा  जरा डोळ्यासमोर आणावी,आणि..".रात अकेली हे.".. उफ काय आवाज  ,सगळी धावपळ मस्त गाण्यातून ही अनुभवावी अशी...

"परदे मे रेहेने दो..."आशा पारेख चे प्रत्येक पडद्या बरोबर खेळणे, भावले तेवढेच रहस्य उत्पन्न करणारे हे गाणे उत्सुकता वाढवणारे असे ..
 
फिल्म मध्ये भावना व्यक्त करण्यासाठी गाण्यांची, ओळ,रिदम,ठेका असणारी अगदी चपखल ही आशा भोसले च्या शैलीतली त्यांचीच ....त्यांचा आवाज  एवढया जादुमय सांगितला स्पर्श करणारा,तर कधी  डूलायला लावणारा..तर कधी डांबरट,अवखळ,चंचल भासणारा...पण मनात भरणारी ही गाणी,हा प्रेमळ आवाज,

काही सिनेमा पडद्या वर बघून,फक्त गाण्यासाठी परत बघावे,इतके ह्या अवाजामध्ये ओढ  असणारे....वक्त,चौदविका चांद, गुमराह, ह्या फिल्म जेवढ्या गाजल्या तेवढेच त्यातले अशा जी चे गाणेही भावले. 

काही सुर मनाला  स्पर्श करून जाणारे असतात,त्यात आशा जी चा आवाजाची स्वर् मयी गोडी असणारी गाणी अजरामर ..एक संगीत जगात मधले अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..किती गाणी,कितीतरी रेकॉर्डस, किती  अवॉर्ड मिळवलेले,गाण्याचा कोणताही प्रकार असो अगदी भावगीत  ते ऋतु हिरवा पर्यंत...
गुजराती ते बंगाली गाण्या पर्यंत..
केब्रे ते चंचल गीत असो...
अगदी गझल ही ,शास्त्रीय गीत..प्रत्येक सुरा ना नवे रूप रंग,आशा भोसले च्या आवाजातून ऐकायला मिळाले..

आज ही एवढया वर्षांनी त्यांना त्या उत्साहपूर्ण  वातावरणात गाताना बघून अगदी आपण ही गायला लागतो..".एक मे ओर एक तू...
एक रम्य संध्याकाळ असावी आणि ह्या.  भावतरंग मध्ये गुंफून फक्त आशा जी ची सुर ऐकावे..रदया च्या तारा मस्त गाऊ लागतील बघा..आईये मेहेरबा.....

Prapurika..!!

आशा भोसले। जयंत विद्वान्स

आशा भोंसले… (रिपोस्ट कितव्यांद्या तरी)...
 
आज या चिरतरुण आजींना ८८ वं वर्ष लागलं. आवाज आणि उत्साह मात्र १८ चा आहे. या वयात 'आता उरलो सल्ल्यापुरता' ही अवस्था आलेली असते आणि ही बाई  या वयात सिनेमात काम करते, स्टेज शो करते, बिनधास्त मुलाखती देते, आत्मचरित्र लिहितीये, मुलीच्या अकाली निधनाचं दु:खं पचवतीये. आकड्यांच्या हिशोबातली वयं आपल्या सारख्या सामान्य माणसांना (चाळिशीत ग्रांड स्लाम जिंकलं परवा लिएंडर पेसनी), ही माणसं असामान्य. कुणाला चेह-यानी एखादवेळेस नाही वाटणार सुंदर पण ही बाई आवाजानी मात्रं चिरतरुण, सौंदर्यवतीच आहे. गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या त्या पाच भावंडांच्या प्रसिद्ध फोटोत आशाबाई सगळ्यात सरस दिसतात (आणि त्या एरवीही आहेत असं माझं मत आहे). वटवृक्षाच्या सावलीत बाकीची झाडं खुरटतात पण हे रोपटं मात्रं असं काही उंच झालं की हेवा करावा. स्वकर्तुत्वावर, स्वबळावर सहानुभूती न घेत, झगडत. त्यांच्या ऐकलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या मुलाखतीतून, त्यांच्यावर आलेल्या लेखातून जेकाही समजलंय त्यावरून वाटतं की हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. त्याचं आत्मचरित्र येऊ घातलंय, त्यांच्यासारखच फटकळ, स्पष्ट असणार याची खात्री आहे. किती जणांची पितळं उघडी पडतील काय माहित.
 
पहिल्यांदा घरोघरी ठोक्याच्या कळशा असायच्या. तांबटाच्या एक पट्टीचे आणि हातोडीचे घाव सोसून तयार केलेली नक्षी, जगात असे तांबट हातोड्या आणि पट्ट्या घेऊन तयारच असतात. आशाताईंनी असे अनेक घाव सोसले पण एकही पोचा पृष्ठभागावर दिसू दिला नाही. त्यांच्या गालावरच्या खळ्यात आणि गाण्यात मधेच हसतात ना तशा हसण्यात सगळं लपवून टाकलं त्यांनी. पण बाई धीराचीच. त्यांच्या नावातच आहे हो सगळं, उगाच आपलं नाव सोनुबाई… हा प्रकार नाही. सुरेल गळा एवढीच पुंजी खरं तर. चोहोबाजूनी झालेली कोंडी, सहनायिकांसाठीची मिळणारी गाणी, कुणीतरी आज नाही म्हणून मिळालेली गाणी आणि कुणीतरी आज आहे म्हणून नाकारली गेलेली गाणी. 
 
'मेरा नाम जोकर' ची सगळी गाणी त्यांची आहेत, तितर के दो आगे तितर, मोहे अंग लग जा बालमा आणि दाग न लग जाये. का? तर आर.के.चं थोरलीशी भांडण झालं होतं म्हणून. 'मोहे अंग लग जा बालमा' ला त्या जो उसासा टाकतात ना तो पद्मिनीला शारीरिक दाखवावा लागतो, त्या गळ्यातून दाखवतात. सुलोचना चव्हाण जशा अंगभर पदर घेऊन खाली मान घालून लावणीतला भाव चेह-यावर न आणता शृंगारिक लावण्या म्हणतात ना (आता त्यांचे कार्यक्रम होत नाहीत हे आपलं दुर्दैवं) तशा या आज्जीबाई गळ्यातून काय काढतील सांगता येत नाही. अनेक नवीन गायिका मादक, उडत्या चालीची गाणी गाताना तसेच अंगविक्षेप करावे लागतात या भ्रामक कल्पनेत तसं गात असतात. आशाताई रेशमी साडीत, एक चकचकीत ब्रेसलेट, कानात कुड्या अशा पेहरावात चढती जवानी…, ये मेरा दिल…, मेरा कुछ सामान…., नाच रे मोरा  आणि युवती मना दारूण रण म्हणतात. देवानी  गळ्यात कुठली चीप बसवून पाठवलंय, त्यालाच माहित.
 
त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं म्हणजे पुस्तकच होईल (ते काम नेरूरकरांनी आधीच केलं आहे). पण काही मात्रं त्यांचीच. कुठली घ्यावी आणि कुठली वगळावी? नाच रे मोरा,  भरजरी गं पितांबर, एका तळ्यात होती, मलमली तारुण्य माझे, चांदण्यात फिरताना, सोनियाच्या ताटी,  बुगडी माझी, ही वाट दूर जाते, ये रे घना, ऐन दुपारी यमुनातीरी, केंव्हा तरी पहाटे, चुरा लिया है, खाली हाथ शाम, मेरा कुछ सामान, बेचारा दिल क्या करे, कतरा कतरा, इस अंजुमनमें, ये मेरा दिल, मोनिका, पान खाओ सैय्या आणि अशी कितीतरी. आशाबाई म्हणजे गाण्याचा मॉल आहे. बालगीत, प्रेमगीत, भावगीत, छेडाछेडी, उत्तान क्याब्रे, विरह, नाट्यसंगीत  काय हवं ते मागा, सगळं अंडर वन रुफ आहे.      
 
पान खाओ सैय्याच्या ताना काय अफाट आहेत, बेचारा दिल क्या करेचं हमिंग, चांदण्यात फिरतानाचा तो तालाशी खेळणारा आवाज, ये मेरा दिलच्या कडव्यात तर मला हेलनची घाई पण दिसते, बुगडी माझीचा कोवळा नवतरुणीचा, शारद सुंदर चा चंदेरी आणि सांज ये गोकुळी, झिनी झिनी वाजे चा धीरगंभीर.  देणगीच ही, पडद्यावर जयश्री गडकर, वहिदा रेहमान, नितू सिंघ, झीनत अमान, सिमा, हेलन, बिंदू, रेखा, हेमा मालिनी पासून उर्मिला, तबू कुणीही असो ते गाणं त्या अभिनेत्रीचच वाटतं हे त्यांचं सगळ्यात मोठं  यश आहे. मद्दड चेह-याच्या अभिनेत्रींसाठी त्या काय मेहनत घेतात हे एकदा विचारायला हवं त्यांना कुणीतरी.

दुस-यांच्या, त्यातल्या त्यात सेलेब्रेटींच्या, आयुष्यात घडलेले किस्से, प्रसंग, अडचणींच्या  कहाण्या आपण मोठ्या चटकदार गोष्टी असल्यासारख्या वाचतो. पण तेंव्हा  त्यांची अवस्था तेच जाणोत (ती ही  माणसंच  आहेत हे पण का विसरतो खरं तर). त्यांच्या ऐकीव, क्वचित पसरवलेल्या, ख-या, खोटया,  सफल, असफल प्रेमकहाण्यांना  आपण लफडी या एकाच शब्दात तोलून आपण मोकळे होतो. आशाबाई जेंव्हा लिहितील तेंव्हा कळेल भोसले, दादा कोंडके, ओ.पी.आणि आर.डी.यांच्या बद्दलचं सत्यं किंवा त्यांची बाजू. दुर्दैवानी आज चौघंही हयात नाहीयेत.

विभक्तं झाल्यावर त्यांनी सोसलेले हाल, उपसलेले कष्ट त्यांच्याच तोंडून  ऐकायला  हवेत. बोरिवलीहून  त्या  लोकलनी  जायच्या.  तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, अख्खी मुंबई जाते पण अख्खी मुंबई एवढी गाणी नाही गात. सांसारिक अडचणी, कराव्या लागणा-या तडजोडी, मानहानी, डावललं जातंय ही बोच हे सगळं एका कप्प्यात बंद करून माईक  पुढे   उभं राहिल्यावर त्यातले जे भाव असतील  त्याच्याशीच फक्तं नातं जोडायचं हे खायचं काम नाहीये.
 
काही जोड्या जुळतात, काही प्रसिद्धी मिळवतात, काही कमनशिबी असतात. त्यांची ओ.पी.बरोबरची जोडी नशीबवान होती. 'माझ्याशिवाय नाही तुम्हांला यश शक्यं' असा प्रभाव असणा-या गायिकेला एकदाही न घेता हा माणूस शिखरावर गेला कारण त्याच्या सोबत तेवढाच दमदार (काकणभर सरसच माझ्या मते), कुठल्याही प्रकारच्या गाण्याची सवय असलेला, मुख्यं म्हणजे भाव ओतणारा (हल्ली स्वरांची बाराखडी असते, जर्रा इकडे तिकडे हलायचं नाही, भाव गेला तेल लावत) चिरतरुण आवाज होता. या जोडीनी धुमाकूळ घातला. बघा ना नमुना म्हणून ही गाणी : माँग के साथ तुम्हारा,  उडें जब जब जुल्फें तेरी, आईएं मेहेरबां, ये हैं रेशमी जुल्फों का, जाईए आप कहाँ जाएंगे, आओ हुजुर तुमको, इशारों इशारों में, दिवाना हुआ बादल,  बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी, चैन से हमको कभी, हुज़ुरेवाला.

अशीच एक त्यांची जोडी फडके साहेबांबरोबर जुळली. स्पष्टं शब्दोच्चार, सोप्प्या वाटणा-या अवघड चाली आणि कुठलाही आव न आणता म्हटलेली गाणी. सहज गुणगुणता येतील इतक्या सोप्प्या वाटतात की नाही? म्हणून बघा, सोप्प्या नाहीत हे मान्यं करा आणि परत त्यांना ऐका, ते जास्तं सोप्पं काम आहे.
        
आर.डी., गुलझार आणि आशाताई हे एक वेगळंच त्रिकूट आहे. मोठ्ठ्या दवाखान्यात कसे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात तसं होतं यांचं. एक लेखणीचा जादूगार, एक तालासुरांशी रममाण झालेली वल्ली आणि एक - झालं का तुमचं फायनल, द्या इकडे - इतक्या सहजतेने गाणारा गळा. काय गाणी आहेत एकेक तिघांची. मेरा कुछ सामान… चालीसाठी दिल्यावर आर.डी. म्हणाला होता हे काय गाणं आहे? उद्या टाइम्सची हेडलाईन द्याल चाल लाव म्हणून. गुलझार म्हणाले, खरा संगीतकार त्याला सुद्धा लावेल. मग जे काही आर.डी.नी तयार केलंय ते मात्रं चिरंतन आहे. ही तिन्ही माणसं काळाच्या पुढे होती, काळाशी जुळवून घेणारी होती, लवचिक होती, यांचा आवाका मुळातच मोठा. म्हणूनच तेरे बिना जिंदगीसे लिहिणारा गुलझार छैया छैया, कजरारे कजरारे, नीले नीले जिंदे शामियाने के तले लिहू शकतो, सुनो चंपा सुनो तारा देणारा आर.डी. चिंगारी कोई भडके, मेरे नैना सावन भादो आणि रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम पण देतो. आशाबाईंबद्दल काय बोलणार पाण्यासारखा गळा. तुम्ही टाकाल तो रंग दाखवणारा.  
 
संगीतकार नवीन असो किंवा प्रथितयश त्या १०० % गातात.  बघा न रवि बरोबर : तोरा मन दर्पण कहलाए, आगे भी जाने ना तू, दिन हैं बहार के, दिल की कहानी रंग लाई हैं, इन हवाओं में, जिंदगी इत्तेफ़ाक़ हैं, एस. डी. बर्मन बरोबर अच्छा जी मैं हारी, नज़र लागी राजा, सच हुए सपने तेरे, चाँद सा मुखड़ा क्यों शर्माए, जानू जानू रे काहे खनके हैं, काली घटा छाये, अरे यार मेरे तुम भी हो गज़ब, अब के बरस भेज भैया को बाबुल, रात अकेली हैं (हे आणि होठोपे ऐसी बात आर.डी.नीच  दिलंय म्हणे, ठेका बघितला तर मान्यं आहे), अन्नू मलिक कडे किताबे बहोतसी पढी होगी तुमने,  रहेमानकडे रंग रंग रंगिला रे, तनहा  तनहा, राधा कैसे न जले, मुझे रंग दे, ओ भंवरे, मदन मोहन कडे झुमका गिरा रे, संदीप चावटा कडे कंबख्त इश्क, सलिलदांकडे जानेमन  जानेमन आणि खय्याम चा आख्खा उमराव जान.       

त्यांची आर.डी.बरोबरची ही गाणी बघा : ओ हसीना जुल्फोंवाली, ओ मेरे सोना रे, आजा आजा मैं हूँ प्यार  तेरा, पिया तू अब तो आजा, दम मारो दम, मोनिका ओ माय डार्लिंग, चुरा लिया हैं तुमने,  आपके कमरे में कोई, लेकर हम दीवाना दिल, जाने जाँ धुंडता फिरा रहा, खाली हाथ शाम, कतरा कतरा, छोटीसी कहानी से, ओ मारिया, रोज़ रोज़ आँखों तले, पिया बावरी, जाना ओ मेरी जाना,  हैं अगर दुश्मन, ये लड़का हाए अल्लाह. किती देणार याद्या. 

अनेक पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर, आयफा, गिनीज बुक मधे नाव गेलं, जीवन गौरव मिळालं, फाळके पुरस्कार, पद्मविभूषण मिळालं. पण काहीतरी राहून गेलंच. मेरा नाम 
जोकरच्याअपयशाबद्दल बोलताना राज कपूर म्हणाला होता. माझं एका आईसारखं झालंय, थोड मागे पडलेलं, अशक्तं, अपयशी मूल तिच्या जास्तं जवळचं असतं, तसं माझं 
मेरा नाम जोकरच्या बाबतीत झालंय. तो माझ्या हृदयाजवळ आहे. आधीचं आणि नंतरचं उत्तुंग यश नाही त्याच्या हृदयाजवळ आलं. निसटलेलं, अपयश, हुकेलली संधी असंच शिल्लक रहात असेल का मनात? आशाताईंच्या मनाजवळ किती गर्दी असेल ना अशा गोष्टींची. ऐनवेळी नाकारलं गेलेलं ऐ मेरे वतन के लोगो, डावललं गेल्याची अनेक शल्यं, आर.डी.गेल्यानंतर झालेला मन:स्ताप आणि खूप काही. 

एक उत्कृष्ट सुगरण, एक गोड गळ्याची लोभस खळ्यांची गायिका, एक बिनधास्त बाई, एक मिश्किल नकलाकार, एक यशस्वी उद्योगपती, टीका आणि हारतुरे एकाच भावनेने स्विकारणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एकटी पडली (किंवा पाडली) म्हणून हार न मानता यशस्वी होणारी जिद्दी स्त्री 
आणि नंतर यश मिळालंय म्हणून कटूता न ठेवणारी. आपण फक्त एवढच लक्षात ठेवायचं.

आत्मचरित्र आलं की वाचायचं, जमलंच तर बिटवीन द लाईन्स.

जयंत विद्वांस

'सत्तर एमएमचे आप्त'मधून
00000000000000000000प