Saturday, July 6, 2019

चौदहवी का चाँद हो या आफताब हो  पद्माकर पाठकजी

या प्रियकर-प्रेयसीच्या प्रीतिकथेत शकील बदायुनी यांचे काव्य तर विविध रंगांची, विविध भावनांची उधळण करते. एकेक शब्द, एकेक उपमा लाजवाब असतात. असेच शकील यांनी ‘चौदहवी का चाँद’करिता लिहिलेले लाजवाब गीत मोहम्मद रफी यांच्या गोड आवाजात आणि सं. रवी यांच्या संगीतात श्रवणाचा अद्भुत आनंद तर देतेच; पण पडद्यावर पाहतानाही शकीलच्या उपमा अलंकारानुसार सौंदर्य लाभलेली वहिदा रेहमान पाहून ती मनाच्या हिंदोळ्यांवर झुलत राहते. गुरुदत्त यांचा अभिनयही प्रभावी ठरला आहे. ‘तिच्या’ सौंदर्याने पागल झालेला प्रियकर तिला म्हणतो, 

चौदहवी का चाँद हो या आफताब हो 

जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

(हे प्रिये तू) चतुर्दशीचा चंद्रमा आहेस (की उदयाचली दिसणाऱ्या मोहक) सूर्यासारखी (दिसत) आहेस, (हे मला नेमके सांगता येत नाही; पण एवढे निश्चितच खरे, की) तू जी कोणी आहेस ती देवाशपथ सांगतो, की अप्रतिम लावण्यवती आहेस. तुझे सौंदर्य लाजवाब आहे. 

आपल्या या सुंदर प्रेयसीचे सौंदर्य वर्णन करताना ‘तो’ प्रियकर पुढे म्हणतो -

जुल्फे है जैसे कंधोंपर बादल झुके हुए 

आँखेट है जैसे मय के प्याले भरे हुए

मस्ती है जिस में प्यार की तुम वो शराब हो

(हे प्रिये तुझे) हे काळे केस म्हणजे (तुझ्या मुखचंद्राच्या बाजूला) खांद्यावर झुकलेले मेघच होत! (तुझे सुंदर चमकदार) नेत्र म्हणजे जणू काही मदिरेने भरलेले प्यालेच आहेत. ज्यात प्रेमाची मस्ती (कणाकणाने भरलेली आहे) असे तुझे सौंदर्य म्हणजे (एक प्रकारची नशा आणणारे) मद्यच आहे. 

उपमा अलंकाराने अशा प्रकारे हे काव्य नटवत शायर पुढे ‘तिला’ म्हणतो -

चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कमल

या जिंदगी के साजपे छेडी हुई गज़ल 

जानेबहार! तुम किसी शायर का ख्वाब हो

(हे प्रिये तुझा) चेहरा म्हणजे जणू काही सरोवरात उमललेले हसरे/ मोहक कमळ आहे. अथवा जीवनाच्या वाद्यांवर छेडलेली (भावपूर्ण) गज़ल आहे. जानेबहार प्रिये, तू कोणा महाकवीचे विलोभनीय स्वप्नच आहेस. 

असे आपल्या प्रेयसीचे वर्णन करताना हा प्रियकर या गीताच्या अखेरच्या कडव्यात म्हणतो -

होठों पें खेलती है तबस्सुम की बिजलियाँ 

सज्दे तुम्हारी राह में करती है कहकशाँ

दुनिया-ए-हुस्न इश्क का तुम ही शबाब हो

(हे प्रिये) मधुर हास्याच्या विद्युलल्ता तुझ्या अधरांवर/ओठांवर खेळतात. तुझ्या मार्गावर आकाशगंगा नतमस्तक होते. सौंदर्य व प्रणयाच्या दुनियेतील अप्रतिम लावण्य म्हणजे तूच आहेस! 

असे हे सौंदर्यवर्णन करणारे गीत लिहिताना शकील बदयुनींनी ‘तबस्सुम’ (मधुर हास्य), सज्दे (नतमस्तक होणे), कहकशाँ (आकाशगंगा), आफताब (सूर्य), मय के प्याले (मद्याचे चषक) असे भारदस्त उर्दू शब्द वापरून या काव्याचे सौंदर्य एकदम खानदानी बनवले आहे. ते संगीतात बांधताना संगीतकार रवींनी जी आकर्षक व हळुवार चाल बांधली आहे, तिचे सौंदर्य गीताच्या सुरुवातीच्या ‘हुं हुंऽऽहुं’ अशा गुणगुणण्यामुळे आणखीच प्रभावी बनते. मोहम्मद रफींचा स्वर त्याला साजेसा न्याय देतो. आणि पडद्यावरची वहीदा व गुरुदत्त म्हणजे तर अप्रतिम दर्शनीय!

अशी गीते असणारे एम. सादिक यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक भाग! अशा या उत्कृष्ट दिग्दर्शकाला त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी

मोबाइल : ८८८८८ ०१४४३

No comments:

Post a Comment