राधा ना बोले ना बोले ना बोले रे....
चांद तनहा है आसमा तनहा
दिल मिल गया कहां कहां तनहा
बुझ गयी आस छुप गया तारा
थरथराता रहा धुवा तनहां
जिंदगी क्या इसी को कहते है
जिस्म तनहा है और जहाँ तनहा.....
"आझाद "या हलक्या फुलक्या चित्रपटातील सुंदर नृत्य करणारी "शोभा"....पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील हि व्यथा.......एकाकीपणाचे दु:ख शब्दाशब्दातून जणू अश्रुंसारखे ठिबकताना दिसते....काय काय बहाल नाही केले नियतीने तिला....दौलत...शोहरत....नैसर्गिक अभिनयाची बेशुमार नजाकत.... शालीन सौंदर्य... दिव्य प्रतिभा...आणि याबरोबर "दर्द का दरिया".....तिच्या रुपेरी पडद्यावरील जिवंत अभिनयाचे रहस्य हेच होते का.??....ती होती "नाझ "जेव्हा ती उत्कटपणे शायरी लिही... ती होती "मुन्ना उर्फ मेहजबीन."...तिच्या मातापित्यांसाठी..."अली बक्ष "आणि" प्रभावती" उर्फ इकबाल बानू "यांच्यासाठी...मुलगा हवा असताना झालेले हे अपत्य....घरात कमालीचे दारिद्र्य...जन्मत: हिची रवानगी यतीमखान्यात करण्यात आली....पण हिने कळवळून फोडलेल्या टाहो मुळे पित्याचे हृदय द्रवले ...तो माघारी फिरला ...पाहतो तर काय ... बाळाच्या अंगावर जणू मुंग्यांचे आच्छादन होते....कित्ती यातना झाल्या असतील त्या लहानग्या जीवाला....काय होते त्या मुलीचे भवितव्य....ते काळच ठरवणार होता....पण मुंग्यांचे भय मात्र मीनाच्या मनी कायमचे बसले......ती तारुण्याच्या ऐन बहरात आली ..पिताजींनी मदरशात न घालता "रुपेरी पडदा" हे तिचे कार्यक्षेत्र निवडले ...घरची अतोनात गरिबी ....त्याला जणू "ठिगळ "लावण्यासाठीच हिचा जन्म झाला होता....आणि म्हणूनच ती ४थ्या वर्षांपासून रुपेरी पडदा गाजवू लागली...विजय भट्ट यांच्या "लेदरफेस" या पहिल्या चित्रपटाने मुन्नाला २५ रुपयांची कमाई करून दिली...बासी रोटी,हरी मिर्च, प्याज ,नमक हेच तिचे जेवण ....थोडक्यात काय "बासी रोटी खांके अश्रफियां उगलनेवाली मशीन थी मुन्ना...."बालपण असेच हलाखीत सरले...देवाने सुंदर स्वर बहाल केला होता ..त्याला अप्रतिम अभिनयाची जोड होती....१४व्या वर्षी "बच्चो का खेल" हा चित्रपट केला आणि यानंतर मात्र "मेहजबीन" "मीना" झाली..."पिया घर आजा "मधील सर्व गाणी मीनाजींनी गायली होती....आणि हीच मीना कुणाला तरी "अनारकली" व्हावी असे वाटू लागले....होय....तिच्या "चंदन" ची ती "मंजू "होती...."चंदन "म्हणजेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक "कमाल अमरोही"...ज्यांच्या कुशल दिग्दर्शनाने "महल" चित्रपटात कमाल केली होती.....कित्ती नाती जपली एकाच व्यक्तीने.... मुन्ना,मेहेजबीन,मीना,मंजू आणि नाझ...ज्या नावाने ती शब्दात "दर्द सागर "उभा करत असे....आणि तरीही एकाकीपण तिच्या भाळी लिहिले होते....तऱ्हे तर्हेचे दगड जमविणे हा तिचा छंद होता....ते बेजुबान पत्थर तिची सुख दु:खात साथ देत....तिचे एकटेपण दूर करत.... कित्ती भूमिका साकारल्या मीनाजींनी....त्या रुपेरी पडद्द्याचा उर सुद्धा भरून आला असेल....रसिक हो ,आज मीनाजींचा स्मृतिदिन.....त्यांना लक्ष लक्ष प्रणाम........!!!!!
रुपेरी पडद्द्यावर ज्या ज्या भूमिकात त्यांनी आपल्या जिवंत अभिनयाने रंग भरले ,त्या अजरामर झाल्या...आजही त्यांची "साहिब बीबी और गुलाम" मधील "छोटी बहू" विसरता येत नाही..."औरत जात के लिये इतना अपमान....?इतनी बडी लज्जा...." असे संतापून विचारणारी ,आणि "गहने तुडवाओ और नये बनवावो" हे जमीनदारीचे तत्वज्ञान न पटणारी,पती प्रेमासाठी आसुसलेली आणि त्यासाठी मदिरा सुद्धा प्राशन करणारी "छोटी बहू"हिंदी चित्रपट इतिहासात त्यांनी अमर केली आहे...ते बंगाली सौंदर्य त्या भूमिकेत खुलले....होय रवींद्रनाथ टागोरांच्या खानदानाचा वारसा लाभलेली मीना त्या भूमिकेसाठीच जणू जन्मली होती.....गुलाम मोहोम्मद यांच्या जादुभऱ्या संगीताची कमाल असलेला आणि कमालजींच्या दिग्दर्शनाचा अत्युच्च आविष्कार असलेला आणि मीनाजींच्या समर्थ अभिनयाने रंगलेली साहेबजान पाहण्याचे भाग्य रसिकांना लाभलेला... "पाकिजा" ......आजही तितकाच लोकप्रिय आहे.....हे चंदन मंजुचे स्वप्न होते.....त्यांच्या गुलाबी प्रेमाचे ते प्रतीक होते....महत प्रयासाने ते पूर्ण झाले....!!!!आणि पुन्हा एकदा रुपेरी पडदा पाकिजाच्या सप्तरंगी रंगानी मोहरला....बहरला.....!!!!
मीनाजी स्वयंभू अदाकारा होत्या.....महाबळेश्वर येथे झालेल्या मोटार अपघातात त्यांना दोन बोटे गमवावी लागली...पण बावनकशी अभिनयात यामुळे कधीच कमी जाणवली नाही....त्यांचा स्वर किंचित अनुनासिक होता...भावनावेगात तो ताणल्यामुळे किन्नरा होई...पण प्रत्येक शब्दात काळजाला भिडण्याची ताकद होती..."शाका मेरा भगवान है...."असे व्याकुळ होऊन म्हणत आणि रक्तबंबाळ होईपर्यंत बेभानपणे हात आपटणारी नायिका आताच्या तरुण पिढीने पाहणे दुरापास्तच....एकेकाळी असलेल्या प्रियकराला आपल्या नवऱ्याचा इलाज करतेवेळी भावार्त पणे "बदला तो नहीं लोगे डॉक्टर....??"असे निर्भीडपणे विचारणारी पतिव्रता रंगवावी ती मीनाजींनीच ...एकूणच रुपेरी पडद्यावर "भारतीय पतिव्रता स्त्री "ची इमेज त्यांनी जिवंत केली.....ग्लिसरीन चा एकही थेंब न वापरता केलेला तो अभिनय होता...एकदा ऐकल्यावर संवाद जणू मनावर कोरला जाई... अशी स्मरणशक्ती होती....कित्येक वेळा भावपूर्ण प्रसंगाचे शूटिंग झाल्यावर त्या कोलमडून जात...त्या भूमिकेतून त्यांना वास्तवात येणे कठीण होई.....त्यांचा अभिनय कसदार होता...त्यात विलक्षण संयम होता...शालीनता होती आणि म्हणूनच त्यांची साहेबजान सुद्धा उथळ वाटली नाही...वेश्या असूनही तिच्यात शालीनता होती...भडकपणा नव्हता...
मीनाजींनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला पौराणिक चित्रपटातही भूमिका केल्या...लक्ष्मी नारायण मध्ये "देवी लक्ष्मीची" तसेच हनुमान ,पाताल विजय,गणेश महिमा,वीर घटोत्कच,अल्लादिन और वंडर लॅम्प अशा अनेक भूमिका...."तमाशा "मध्ये त्यांनी अशोक कुमार यांच्याबरोबर काम केले आणि त्याच सेट वर त्यांची कमाल अमरोही यांच्याशी भेट झाली....पुढे शिया आणि सुन्नी दोन्ही रिवाजानुसार निकाह झाला......नव्या नवलाईचे दिवस झरझर गेले....मीनाजी यशाचे एकेक दालन पार करत होत्या, पण वैयक्तिक जीवनात मात्र एकेक पायरी खाली येत होत्या....शादी अनेक अटींवर बंदिस्त झाली आणि अखेर हे रेशमी बंधन तुटले...जीवन एकाकी झाले....दौलत ,शोहरत सारे मिळूनही हि तारका एकटेपणाचे दु:ख आणि मानसिक घाव पचवू शकली नाही....तिचे ते दु:ख मदिरेच्या प्याल्यात बुडाले पण सल तशीच राहिली...हि अभिनय सम्राज्ञी आयुष्यभर खऱ्या प्रेमापासून वंचित राहिली लहानपणी मातापित्यांचे प्रेम मिळाले नाही आणि तारुण्यात प्रियकराने साथ सोडली....शेवटी "लेखणी" हेच त्यांचे आयुध बनले दर्द उमटविण्याचे....आणि अनेक दर्दभऱ्या नज्म,गझल जन्मल्या....मीनाजींच्या स्वरात खय्याम साहेबांनी "आय राईट ,आय रिसाईट"ची निर्मिती करून रसिकांना एक अनोखी दर्द दास्तान खुली करून दिली आहे.... त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच....!!!!
ज्योती कलश छलके" गाणे ऐकताच सोज्वळ मीनाजी डोळ्यासमोर येतात..."आझाद "हा दक्षिणेकडील चित्रपट "दिलीप मीना" यांच्या अभिनयाने आणि सी रामचंद्र यांच्या सुमधुर गीतांनी खुप गाजला ...परिणिता मधील त्यांची "ललिता" पाहणे हा सुखद अनुभव ,नव्हे नव्याने अभिनय क्षेत्रात येणार्यांसाठी तो वस्तुपाठ ठरावा... यहुदी मधील त्यांची "हन्ना" अशीच प्रेमात पाडणारी... बैजू बावरा मधील "गौरीने "त्यांना यशाचे नवे दालन उघडून दिले ...."मोहे भूल गये सावरीया" म्हणणारी गौरी विसरणे केवळ अशक्य...भट्ट साहेबांनी त्यांची या भूमिकेसाठी केलेली निवड त्यांनी सार्थ ठरविली....!!!"दो बिघा जमीन" या चित्रपटाने पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविला होता...१९५४मध्ये कान्स येथे हा चित्रपट खूप गाजला....दिल अपना प्रीत पराई,दिल एक मंदिर,बहू बेगम,चित्रलेखा,कोहिनूर हि आणखी काही अभिनयाची देखणी दालने जी मीनाजींनी काबीज केली....!!!!चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकेत दुष्मन,मेरे अपने ,अभिलाषा या चित्रपटातही त्यांनी रसिकांची मने जिंकली....
"समर्थ ,बोलका अभिनय" हा त्यांचा स्थायी भाव होता..."भूमिका जगणे" हे त्यांच्या रक्तात होते.... त्या हाडाच्या कलाकार होत्या...शालीनता ,निसर्गदत्त सौंदर्य हे त्यांना मिळालेले वरदानच....पण ही अजीब दास्तान अश्रूंनी भिजलेली होती... ग्लिसरीन घालून पाझरणारे बेगडी अश्रू नव्हते ते...प्लास्टिकच्या फुलांनी सजविलेल्या सेटवर आणि काचेचा चंद्र दाखविणाऱ्या बेगडी दुनियेत या खऱ्या अभिनयाच्या "कोहिनूर" ची कुचंबणा झाली....अनेकांनी फसवणूक केली...पैशावर प्रेम करणाऱ्या या जगात खऱ्या प्रेमाचे मोल समजण्याची ताकद नव्हती..."आईपण" हि निसर्गाने स्त्री ला दिलेली सर्वोच्च देणगी.....पण हे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले.....त्यामुळे त्यांच्या पदरी घोर निराशा आली.....निराशेच्या खोल खोल गर्तेत त्या लोटल्या गेल्या...........आजही मीनाजी आपल्यात आहेत ....त्यांच्या काव्यातून...त्यांच्या अभिनयातून......आजही कधी कधी त्यांचा स्वर कानी येतो.......
टुकडे टुकडे दिन बिता
धज्जी धज्जी रात मिले
जिसका जितना आँचल था
उतनीही सौगात मिले......
उतनीही सौगात मिले........
मानसी पटवर्धन
No comments:
Post a Comment