Friday, September 27, 2019

लता ।द्वारकानाथ संझिगिरी

लताचं गाणंच नसतं तर?
द्वारकानाथ संझगिरी

लता मंगेशकर नसती तर...
खरंच.मी असा विचार,यापूर्वी कधी केला नव्हता.कशाला उगाच अभद्र विचार करायचे?
पण खरंच,महात्मा गांधी नसते तर...
डॉन ब्रॅडमन नसते तर...
शिवाजी महाराज नसते तर...
मधुबाला नसती तर...वगैरे विचार करून आपण काय गमावलं असतं,हे पहाता येईल.

महात्मा गांधी नसते,तर स्वराज्य मिळालं नसतं,असं नाही.पण अहिंसा आणि सत्याग्रह ही धारदार शस्त्र बनू शकतात,हे जाणवलं नसतं.
डॉन ब्रॅडमन नसते,तर फलंदाजाची कसोटी सरासरी शंभराच्या उंबरठ्यापर्यंत पोहचते हे कधी आपल्याला कळलंच नसतं.
शिवाजी महाराज नसते,तर आदर्श राजाची व्याख्या कशी करता आली असती?
आणि मधुबाला नसती,तर विश्वामित्रांना स्वर्गाच्या राज्यापासून दूर ठेवणारी स्त्री किती सुंदर असू शकते,याची कल्पना आपण करू शकलो नसतो.
आणि लता नसती तर...(हा एकेरी उच्चार केवळ प्रेमापोटी आहे.आईला कुणी‘अहो’म्हणतं का?)हेमंतकुमारने याचं उत्तर खूप चांगलं दिलंय.तो एकदा म्हणाला,‘देवाचे आभार की,ज्या काळात लता मंगेशकर होती,त्या काळात त्याने मला जन्माला घातले.नाहीतर एखाद्या शुष्क शतकात मी जन्मलो असतो,तर केवढ्या मोठ्या आनंदाला मी मुकलो असतो!’

हिंदी सिनेसृष्टीत लता येण्यापूर्वी संगीत होतं आणि आजही लताने निवृत्ती स्वीकारल्यावरही सिनेसंगीत आहे.त्यावेळी लोकप्रिय गायक होते.आणि आजही आहेत.पण मधला काळ लताने व्यापला नसता तर...?तर आपण विंध्य आणि सातपुड्याला हिमालय मानलं असतं.सिनेमाच्या गाण्यातलं एव्हरेस्ट काय असतं,ते कधी कळलंच नसतं.असं काय होतं,लतामध्ये की,१९५० ते २००० पर्यंत तिने अधिराज्य गाजवलं.

सुरुवातीचा काळ नूरजहां,शमशाद वगैरे गायिका गाजवत होत्या.नूरजहाँ तर लतासाठी‘आयडॉल’होती.पण आता वाटतं,की ते आवाज त्यावेळच्या कोवळ्या अभिनेत्रीसाठी खरंच योग्य होते का?नौशाद म्हणतो,त्याप्रमाणे‘बैठकीच्या गायिकीसारखी ती गाणी होती.लता आली आणि आवाजातला कोवळेपणा एेकताना एक परकर-पोलक्यातली मुलगी गातेय,असं वाटायचं.शमशादचं किंवा जोहराबाईचं गाण बाहेर एेकायला कितीही चांगलं वाटलं तरी ते त्या कोवळ्या नायिकेच्या कोवळ्या गळ्याला ते भारदस्त वाटायचं.दुसरी गोष्ट,लताच्या आवाजात एवढा गोडवा होता की,मधाला जर बोलता आलं असतं,तर त्याने लताला विचारलं असतं,‘लता,थोडा गोडवा उसना देणार का?’

चौदा वर्षाची लता,वसंत देसाईंकडे काळी दोन मधे गायिली,तेव्हा त्यांनी विस्फारलेले डोळे महिनाभर तसेच राहिले असं म्हणतात.कारण त्यावेळी इतर गायिका काळी चार काळी पाचमधे गात.परंतु लताचा नाजूक आवाजही आकाशाला गवसणी घालायचा.किंबहुना ब्रह्मदेवाने तिचं स्वरयंत्र असं बनवलं होतं,की देवांना स्वर्गात बसून तिचं गाणं आरामात एेकायला येईल.आवाज असं वळण घ्यायचा की,हा गळा नाही हे साक्षात वाद्य आहे असं वाटावं.त्यामुळेच कठीणातल्या कठीण चाली तिच्या गळ्याने इतक्या लिलया पेलल्या की त्याला शिवधनुष्याची उपमाही तोकडी वाटावी.म्हणून तर नौशाद म्हणाला,लता आहे म्हणून‘मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे’सारखं गाणं मी तयार करू शकलो...

तुम्ही‘ऐ दिलरूबा’हे‘रुस्तम सोहराब’मधलं सज्जाद या मनस्वी संगीतकाराने दिलेलं गाणं ऐकलंय?हे गाणं ऐकल्यावर सी.रामचंद्रसारखा महान संगीतकार म्हणाला होता,‘मी कितीही प्रयत्न केला,तरी इतकं चांगलं गाणं कधीच देऊ शकणार नाही.’हे गाणं गुणगुणून पहा,कठीण चाल म्हणजे काय याचा प्रत्यय येईल.माझ्या‘स्टेज शो’मध्ये हे गाणं मी काहीवेळा घेतलंय.पण,एरवी हसतमुखाने गाणं म्हणणाऱ्या गायिकांच्या चेहऱ्यावर त्या गाण्यामुळे पडणारे कष्ट स्पष्टपणे जाणवतात.म्हणूनच,लतादीदी नसत्या तर अशी चाल सज्जादने तयार करूनही त्याचा काही फायदा नव्हता.

शमशाद बेगम लताच्या सुरुवातीच्या काळात एका गाण्यासाठी १५०० रुपये घेत होत्या.१९४८-४९चा तो काळ होता हं!त्यावेळी लतादीदींना पन्नास रुपये मिळत.दोन वर्षात लतादीदी टॉपवर गेल्या.एकदा कारदार स्टु़डिओत(निर्माता-दिग्दर्शक-लेखक-नट अशी ख्याती असलेल्या अब्दुर रशीद कारदार याच्या मालकीच्या)नौशाद फोन करायला बाहेर आले.त्यांना बाहेर एक कृश मुलगी गाणं गुणगुणताना दिसली.नौशानने तिला विचारलं,‘नाव काय?’तिने उत्तर दिलं.‘लता मंगेशकर’त्यांनी तिला‘चांदणी रात’या सिनेमात संधी दिली.पण लतादीदींसाठी महत्वाचा ब्रेक होता.त्यांच्या‘अंदाज’सिनेमात मिळालेली संधी!

तोपर्यंत शमशाद बेगम त्यांच्या संगीताची पट्टराणी होती.‘अंदाज’च्या वेळी त्यांनी मेहबूबकडे लतासाठी हट्ट धरला.मेहबूबना लता नको होती.पण नौशादच्या हट्टापुढे त्यांनी मान तुकवली.त्यानंतर नौशादने शमशादकडे मागे वळून फारवेळा पाहिले नाही.

ज्यांनी ज्यांनी त्या काळात हा आवाज ऐकला,त्यांना त्यांना लक्षात आलं की हा आवाज म्हणजे द्रौपदीची थाळी आहे.सी.रामचंद्र तर लताच्या गळ्याच्या प्रेमात एवढे पडले की,शक्य असतं तर त्यांनी हिरोंनाही लताचा आवाज दिला असता.पण परमेश्वराने हा त्यांचा प्लॅन हाणून पाडला.एकेकाळी सी.रामचंद्र,संगीत देण्यासाठी दिलीपकुमारएवढे पैसे घेत.एका भांडणानंतर लता मंगेशकर त्यांच्या आयुष्यातून निघून गेली.आणि ते कोसळले.या आवाजाने अनेकांना तोंडघशी पाडलंय.शशधर मुखर्जी हे एकेकाळी हिंदी सिनेमातलं मोठं प्रस्थ,गुलाम हैदर नावाचा संगीतकार जेव्हा दीदींना घेऊन त्यांच्याकडे गेला.तेव्हा त्यांनी हैदरला सांगितलं,‘हिचा आवाज पातळ आहे.तो चालणार नाही.’गुलाम हैदर म्हणाले,‘तुम्ही चूक करताय.एक काळ असा येईल की निर्माते तिच्या घरासमोर रांग लावतील.’तिला घेऊन ते मालाड स्टेशनवर गेले.त्याने ५५५ सिगारेटच्या डब्याचा ठेक्यासाठी उपयोग करून लताला चाल ऐकवली.आणि"मजबूर'मधल्या गाण्याची तयारी करून घेतली.‘दिल मेरा तोडा’हे गाणं त्यावेळी खूप गाजलं.पुढे अनारकलीच्या वेळी शशधर मुखर्जींना सी.रामचंद्रनी सरळ सांगितलं.‘मी सर्व गाणी लताला देणार,मान्य असेल तरच संगीत देईन.’शशधर मुखर्जीने‘हो’म्हटले.

लता नसती तर...तर ओ.पी.नय्यर या संगीतकाराच्या मोठेपणाला सोनेरी किनार कशी लाभली असती?पन्नास आणि साठच दशक या माणसाने लता मंगेशकरचा आवाज न वापरता गाजवला.हे सोपं नव्हतं.हे म्हणजे,विराट कोहलीला न खेळवता,मालिका मागून मालिका जिंकणं होतं.सचिन देव बर्मननेही लताबरोबर झालेल्या गैरसमजुतीमुळे १९५७ ते १९६२ या काळात लताचा आवाज वापरला नाही.लताची गाणी आशाला दिली.‘बंदिनी’च्यावेळी त्यांचं भांडण मिटलं.‘गोरा मोरा अंग लै ले’हे गाणं त्यांनी लताला दिलं.पुढे त्यांनी फक्त १६ गाणी आशाला दिली आणि तब्बल ६० गाणी लताला!वर हे यात सांगितलं.‘मी टेनिसपटू आहे.लता माझी पहिली सर्व्हिस आहे.ती चालत असताना दुसरी सर्व्ह कशाला करू?’

लता मंगेशकर नसती तर...काही कचकड्याच्या बाहुल्यांच्या घरची चूल कशी पेटली असती?कारण लता गाते,तेव्हा ती गाण्यातून अभिनय करते.त्या शब्दामधल्या भावना तिच्या गळ्यातून व्यक्त होतात.संगीताचे हे वाहक त्या भावना आपल्या हृदयापर्यंत पोचवणारे,तिच्या स्वर्गीय आवाजाचे भोई असतात.नर्गीस एकदा म्हणाली,‘राजा की आयेगी बारात’वर मला अभिनय करावा लागला नाही.आपोआप डोळे पाणावले.तुम्ही प्रिया राजवंश नावाची नटी पाहिलीय?मायकेल एन्जलोचा पुतळा तिच्यापेक्षा किती तरीपटीने जास्त प्रभावीपणे भावना व्यक्त करतो.तरी सुद्धा तिच्या मुखातली गाणी सुसह्य होतात,कारण तो स्वर भावना व्यक्त करतो.‘जरा सी आहट पे’हे प्रियावर चित्रित झालेलं गाणं ऐका.म्हणजे,मी काय म्हणतो,ते कळेल.मदन मोहन त्या गाण्याचा संगीतकार!लता नसती तर मदन मोहनने काय केलं असतं?त्याची दुसरी आवड होती क्रिकेट!तो बहुधा क्रिकेट खेळत राहिला असता.त्याने जे संगीत दिलं,ते सिनेमातल्या व्यक्तिरेखेसाठी किंवा प्रसंगापेक्षा लतासाठी दिलं असं बऱ्याचदा वाटतं.तुम्ही‘देख कबिरा रोया’ची गाणी एेका.गाण्याचे शब्द,गाण्याच्या भावना,त्या प्रसंगासाठी आहेत असं वाटतच नाही.पण तिची गाणी रेडियोवर एेकताना ग्रेट वाटतात.

हं,लता नसती तर...कदाचित,सुमन कल्याणपूर,मुबारक बेगम,सुधा मल्होत्रा,वाणी जयराम यांचं मार्केट वधारलं असतं.मंगेशकर भगिनींवर आरोप नेहमी ठेवला जातो,की त्यांनी मोनोपॉलीचं राजकारण केलं.आपण धरून चालू की ते खरंय.पण याचाच अर्थ असा की‘लता’ला तिच्या शंभर मैलाच्या आसपासही स्पर्धक नव्हता.लताने डोळे वटारले,की भले भले घाबरायचे.हिंदी सिनेमाची संस्कृती पुरुषप्रधान आहे.आजही आहे.पण त्या काळात जास्त होती.क्वचित एखादी नटी दादागिरी करायची.पार्श्वगायन सोडलं,तर इतर सर्व क्षेत्र पुरुषांनी व्यापलेली होती.अशा या पुरुषप्रधान संस्कृतीत फक्त एकच पाहिज,े तेव्हा‘दादागिरी’करू शकायची आणि भले भले पुरुष तिच्या पुढे लोळण घ्यायचे.‘मधुमती’तलं‘आजा रे परदेसी’गाणे बिमल रॉय वगळायला निघाले होते.बिमल रॉय केवढा मोठा निर्माता-दिग्दर्शक!त्याच्या आशीर्वादासाठी सर्व धडपडत-लताने त्याला स्पष्ट
बजावले.‘तू जर हे गाणं वगळलंस.तर मी तुझ्याकडे पुन्हा गाणार नाही.’बिमल रॉयची हिंमत झाली नाही,गाणं वगळायची.

आणखीन एक किस्सा सांगतो.‘राज कपूर’म्हणजे सिनेमातला‘मुघल’.रॉयल्टीवरच्या भांडणानंतर लता मंगेशकरने त्याच्या सिनेमात गाणं सोडलं.‘सत्यम शिवम् सुंदरम्’च्या वेळी राज कपूरला लताच हवी होती.‘लक्ष्मी-प्यारे’हे लतादीदीच्या खास मर्जीतले.त्यांनी लताला विनंती केली.लताने अट घातली.‘मी गाईन,पण रेकॉर्डिंगला राज कपूर नको.’तरीही रेकॉर्डिंगप्पा वेळी राज कपूर आला.लक्ष्मी-प्यारेला तो सांगू लागला.इथे आलाप टाकायला सांग,तिथे आलाप वाढवं वगैरे वगैरे!लताने‘लक्ष्मी-प्यारे’ना सांगितले.‘त्याला गप्प बसायला सांग.नाहीतर अख्ख गाणं मी आलापाने भरेन.’तरीही राज कपूरची वटवट सुरू होती,म्हटल्यावर तिने पायात चप्पल घातली आणि ती निघून गेली.ती थेट परदेशी दौऱ्यावर गेली.लक्ष्मी-प्यारेने राज कपूरला सांगितले,‘आशाच्या आवाजात आपण गाणं गावून घेऊ.’राज कपूर तयार झाला नाही.शेवटी,रेकॉर्डिंगच्यावेळी स्टुडियोत न येण्याची अट त्याला पाळावीच लागली.हे लताशिवाय कुणालाही शक्य नव्हते.

लता नसती तर १९५०-१९६५च्या संगीताला सुवर्णयुग म्हटलंच असतं असं  नाही. सैगल,रफी,तलत,आशा,शमशाद,नूरजहाँ,किशोरकुमार वगैरे गायक महानच होते.पण लता परीस होती.तिने ज्या गाण्याला स्पर्श केला,ते सोनेरी झालं.माझा क्रिकेटपटू मित्र वासू परांजपेचं ब्रॅडमन आणि लता दोघांवर प्रेम.मी त्याला म्हटले.‘लता क्रीकेट खेळत असती,तर ब्रॅडमन झाली असती.’तो म्हणाला‘एक अंगुळे वर!ब्रॅडमनची सरासरी ९९.९४ आहे लताची १०० असती.ती सुरात कधीच चुकत नाही.’लता नसती तर...आपला जन्म झाला नसता तरी चाललं असतं,असं म्हणणाऱ्या अनेकात एक वासू परांजपे नक्की असेल...

द्वारकानाथ संझगिरी
dsanzgiri@hotmail.com

Monday, September 16, 2019

Chandoba

🌹
लहानपणी.. *चांदोबा* अंक वाचायला सर्वांनाच आवडत असे..
या लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला *चांदोबा मासिकाचे* स्कॅन केलेले १९६० ते २००५ पर्यंतचे अंक मिळतील आणि ते डाऊनलोडही करता येतील.

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-EksNuzurbfZj72Dbso4rIsTqHvufIvy?usp=drive_open

😊

सरोज खान । दासू भगत

*शेअरिंगचं सौजन्य : भावना सामंत—दादर*

*एक..दो..तीन…चार..पाँच..: सरोज खान ……………*
फाळणीच्या वेळी कराची मधील एक पंजाबी सिंधी कुटूंब भारतात आलं. किशनचंद्र साधू व नोनी साधू सिंह नागपाल हे त्यांचे नाव. इथे येण्यापूर्वी किशनचंद श्रीमंत होते. फळणीने त्यांच्या हातात दोन चटाया देऊन भारतात पाठवले. फाळणीने कुणाचा कसा व किती फायदा झाला हे फक्त विचारवंतच सांगू शकतात. मात्र दोन्हीकडचे विस्थापित रस्त्यावर आले हे एक कटू सत्य आहे. मुंबईत आल्यावर ते आपल्या पत्नीसोबत माहिमच्या एका चाळीत राहू लागले. त्याचं पूर्वीचं मोठे विश्व आकसून एका रूम पर्यंत येऊन पोहचलं. पहिली मुलगी झाली. निर्मला तिचं नाव. ही मुलगी जेव्हा तीन-साडेतीन वर्षांची झाली तेव्हा तिच्या आईला तिचे वागणे विक्षिप्त वाटू लागले. आईने तिला उचलले आणि थेट डॉक्टरकडे घेऊन गेली.
“काय झालं पोरीला ?”
“माहित नाही डॉक्टर साहेब, विक्षिप्त वागते.”
“म्हणजे नेमकी कशी वागते?”
“भिंतींवरील स्वत:ची सावली बघून शरीराच्या हालचाली करते”
डॉक्टरांच्या लक्षात आले. पोरीला नाचायची आवड दिसते. लहानपणी अनेक मुलं स्वत:च्या सावलीकडे बघून विविध हातवारे करत असतात. निर्मला शांतपणे दोघांचा संवाद ऐकत होती. तिच्याकडे बघत डॉक्टर म्हणाले-
“आहो तिला नृत्य करायला आवडतं. यात काय चुकीचं आहे.”
“पण आमच्या सात पिढ्यात असे कोणीच नव्हते. गाणे, नृत्य, चित्र काढणे, संगीत असे आमच्याकडे कोणीच नाही” निर्मलाच्या आईला असे वाटत होते की आपल्या मुलीवर कुणी तरी छूमंतर केले किंवा तिच्या मेंदूत काही तरी बिघाड आहे. डॉक्टरांच्या लक्षात सर्व काही आले. ते म्हणाले- “तुमच्या मुलीला काहीही झाले नाही. उलट चित्रपट क्षेत्रात तिला बाल कलाकार म्हणून काम मिळेल. शिवाय तुमची अर्थिक स्थिती पण बेताची आहे, थोडे फार पैसेही मिळतील.” पण चित्रपट क्षेत्राची ना तिला माहिती होती ना तिच्या पतीला. डॉक्टराची या क्षेत्रात ओळख होती. त्यांनी काही जणाकडेया मुलीची शिफारस केली.
निर्मलाचे नृत्य वेड वया बरोबर समातंर वाढत होते. तिला एका चित्रपटात श्यामा या अभिनेत्रीच्या लहानपणाची भूमिका मिळाली. हे तिचे पडद्यावरील पहिले पदार्पण. नंतर १९५३ मध्ये तिला “आगोश” या चित्रपटात एक भूमिका मिळाली. या चित्रपटात ती आणि बेबी नाज या दोघीवर एक गाणे चित्रीत झाले. “बासुरिया काहे बजाए…” या गाण्यात बेबी नाज कृष्ण झाली आणि निर्मला राधा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आर.डी. माथूर. तिचे नृत्याचे कसब आजही या चित्रपटाची क्लीप बघताना जाणवते. पडद्यावर तिचे नाव निर्मला नाही तर बेबी सरोज असे होते.
ही बेबी खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली ती १९८९ मध्ये. अर्थात १९७५ पासूनच ती एक प्रोफेशनल कोरीयोग्राफर म्हणून प्रस्थापित झाली होती पण ती पडद्या मागे. चित्रपटसृष्टीला ती माहित झाली होती पण प्रेक्षकाना माहिती झाली ती १९८९ मध्ये. त्यावेळी आताच्या इतकी प्रसार माध्यमे नव्हती. १९८९ मधील एन.चंद्राच्या “तेजाब”च्या एक दो तीन, चार पाँच…या गाण्याने सगळीकडे धूम केली होती. सरोजला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याने मिळवून दिला. म्हणजे १९८९ मध्ये पहिल्यांदाच फिल्म फेअरतर्फे नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्कार जाहीर केला. बेबी सरोजला ‘सरोज खान’ बनण्यासाठी ३८ वर्षे संघर्ष करावा लागला. तिच्या संघर्षाला तोड नाही…………….
चार बहिणी व एक भाऊ अशा कुटूंबाला दारीद्र्याने आपल्या विळख्यात घेतले होते भर म्हणून की काय वडीलानां कॅन्सरने आपल्या जवळ ओढून घेतले. शेवटी सर्व पसारा मागे ठेवून वडील अनंताच्या प्रवासाला निघून गेले तेव्हा सरोज १० वर्षांची होती. ती कुटूंबात सर्वात मोठी म्हणजे कुटूंबाचे पालन पोषण करण्याची नैतिक जबाबदारी आई नतंर तिचीच होती. तिच्यातले नैसर्गिक बालपण तिथेच खुरटले. हा काळ अत्यंत वाईट होता. तिची आई पातेल्यात पाणी ठेवून वर झाकणी ठेवे व म्हणे – “पोरानों जेवण तयार होई पर्यंत जरा झोपा. मी उठवेल तुम्हाला जेवायला.” त्यांच्या शेजारी एक मलबारी भजीवाला राहत असे. दिवसभर भजी विकून उरलेले भजे तो तिच्या आईकडे देई.. आई खूप संकोच करायची. मग विचार करायची स्वत: एकवेळ उपाशी राहणे ठिक, पण पोरानां कसे उपाशी ठेवणार? त्या भज्यात ब्रेडचे तुकडे मिसळून शिजवून ते पोरानां खाऊ घालत असे.  हे सर्व सरोज बघत असे. वयाची १० वर्षे म्हणजे ना धड बालपण ना तरूणपण. लहान मुलानां ती मोठी वाटू लागली तर मोठ्याना ती लहान.
सरोजला पहिला चित्रपट मिळाला तो तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा म्हणजे मधूबालाचा. १९५८ चा तो चित्रपट होता “हावडा ब्रीज”. शक्ती सामंताच्या या चित्रपटात अशोक कुमार मधूबाला मूख्य भूमिकेत होते. यात ओ.पी.नय्यरचे बहारदार संगीत होते. यातील “आईए मेहरबाँ..बैठीए जाने जाँ……”या गाण्यात सरोज खान हॅट घातलेल्या मुलाच्या वेषभूषेत नाचताना स्पष्ट दिसते. शीला विज ही ग्रूप डान्सर सरोज खानची लहानपाणा पासनूची मैत्रीण. (शीला म्हणजे श्री ४२० या चित्रपटातील “रमैया वस्तावया” या गाण्यातील मूख्य डान्सर) त्यांच्या म्हणण्यानुसार सरोज लहानपा पासून मॉड रहात असे. तिला वेणी घातलेली मी कधी बघितलेच नाही. स्कर्ट, जीन पँट तिला खूप आवडत असे. पण तिच्या नसानसात नृत्य भिनलेले होते. नृत्य मास्टरचे अत्यंत सुक्ष्म निरिक्षण ती करीत असे आणि बिनचूक त्या सर्व हालचाली स्वत: करून दाखवित असे.
एकदा शशी कपूरच्या चित्रपटासाठी त्या शुटींग करत होत्या. शुटींग संपले पण पैसे आठ दिवसानी मिळणार होते. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण. घरात पैसे नाहीत. त्या शशी कपूर जवळ गेल्या आणि अडचण सांगितली. शशी कपूर यांनी जवळ असलेले २०० रू. काढून त्यांच्या हाती ठेवले व म्हणाले- “माझ्याकडे इतकेच आहेत.” सरोज खानचे डोळे आजही हा प्रसंग सांगताना पाणावतात. त्यावेळी हे पैसे त्यांच्या कुटूंबासाठी किती अनमोल होते हे सांगताना त्या म्हणतात- “मी आजही ते पैसे परत केले नाहीत, हे ऋण मी आयुष्यभर असेच वाहून नेईल.”
वाराणशी किंवा बनारस घराणे हे संगीत नृत्य क्षेत्रातील सर्वात मोठे व महत्वाचे घराणे. मूळचे जयपूर येथे जन्मलेले बी. सोहनलाल हे या घराण्याचे कथक नर्तक. बी.हिरालाल, बी.चिनीलाल आणि बी.राधेशाम हे त्यांचे धाकटे तीनही भाऊ कथक शैलीचे नर्तक होते. बी. हीरालाल आपल्या सर्व कुटूंबाला घेऊन दक्षिणेत स्थलातंरीत झाले. नंतर तेथेच त्यांनी कांथा या तरूणी बरोबर लग्न केले आणि चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) स्थायिक झाले. त्यानां ४ मुलेही झाली.
बी. सोहनलाल हे त्याकाळचे आघाडीचे चित्रपट नृत्य दिग्दर्शक होते. १९५८ ते १९७८ या काळातील जवळपास सर्व महत्वाच्या चित्रपटात हे नाव तुम्हाला हमखास दिसेल. मधूमती, कल्पना, दिल अपना और प्रित पराई, चौदहवी का चाँद, साहब बिबी और गुलाम, पारसमणी, मेरे मेहबूब, गाईड, आरजू, मेरा साया,ज्वेल थीप या चित्रपटातील अविस्मरण्य नृत्य दिग्दर्शन त्यांचेच आहे. एकदा मुंबईत बी. सोहनलाल आले असताना त्यांचे ग्रूप मधील सरोजकडे लक्ष गेले. त्यांनी बहूदा तिच्यातील क्षमता जोखली असावी. सरोजला त्यांनी आपले सहाय्यक केले. यावेळी सरोज अवघी १२-१३ वर्षांची होती. सोहनलाल जेव्हा नृत्याच्या स्टेप्स शिकवत असत त्यावेळी सरोज अत्यंत बारकाईने त्या बघत असे. तिची निपूणता बघून त्यांनी तिला आपली सहाय्यक केले. आणि लवकरच तिने एका नामवंत अभिनेत्रीला स्टेप्स पण शिकवल्या.
१९६२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “डॉ. विद्या” या चित्रपटात वैजयंतीमाला मूख्य भूमिकेत होती. स्वत: वैजयंतीमाला भरतनाट्यम शिकलेली अभिनेत्री. यातील एका क्लासिकल नृत्याच्या वेळी सोहनलाल वैजयंतीमालास म्हणाले की माझी सहाय्यक तुम्हाला नृत्याच्या स्टेप्स सांगेल. गाणे होते “पवन दिवानी न मानी उडाये घुंगटा” सरोज पेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या वैजंयतीमालाला आश्चर्य वाटले की एवढीशी मुलगी काय करून दाखविणार. पण सरोजने चेहऱ्या वरील सर्व हावभाव, डोळ्यांच्या हातांच्या हालचाली अगदी सुक्ष्म बारकावे इतके अप्रतिम करून दाखविले की वैजयंतीमाला पण अवाक झाली. या गाण्यासाठी वैजयंती मालाला २२ रिटेकस् द्यावे लागले. तिने सरोजची तोंड भरून स्तुती केली आणि वर रक्कम बक्षिसही दिले. आजही जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा लक्षात येईल की गाण्यातील प्रत्येक शब्दांवर वेगळी मुव्हमेंट आहे आणि ती रिपीट झालेली नाही. १९६२ ते १९७२ या १० वर्षांत सरोज खान सोहनलाल यांची सहाय्यक होती.
हे सर्व करीत असताना सरोजने सहा महिन्याचा एक नर्सिंगचा कोर्सही पूर्ण केला. आणि केईएम हॉस्पिटल मध्ये कामही केले. नंतर जेव्हा टायपरायटिंग आणि शॉर्ट हँडचा कोर्स पूर्ण केला तेव्हा वरळीच्या ग्लॅक्सो कंपनीत नोकरी मिळाली. याच वेळी ती मेकअपचे कामही शिकली. १९६३ मध्ये प्रदीपकुमार बिना रॉय यांचा “ताज महल” चित्रपट गाजला तो त्यातील रोशन यांच्या संगीतामुळे.या चित्रपटात रफी-आशा यांची एक कव्वाली आहे “चाँदी का बदन सोने की नजर…..” यात मुख्य नर्तिका मिनू मुमताज आहे (मेहमूदची बहिण) आणि तिच्या उजविकडे पाठीमागे सरोज खान आहे. या चित्रपटाचे मेकअपमन होते जेष्ठ्य रंगभूषाकार पंढरी जुकर. या गाण्याच्या वेळी ते तेथे हजर होते. सरोज खानचे चेहऱ्यावरील आणि डोळ्यांच्या हालचाली खूपच मोहक होत्या. ते दिग्दर्शक सादिक साहेबानां म्हणाले की या मुलीला समोर घ्या यावर सादिक साब म्हणाले की तिला समोर घेतले तर मिनू मुमताज जी मुख्य डान्सर आहे तिच्या समोर फिकी पडू शकेल. म्हणजे सरोज त्या वयात कुणालही भारी पडू शकत होती.
१९६२ पासून मास्टर सोहनलाल यांच्या प्रत्येक चित्रपटात सरोज सहाय्यक होती आणि स्वत:ही अनेक गोष्टी बारकाईने शिकतही होती. ती त्यांची पट्टशिष्या झाली. सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता. १४ व्या वर्षी सरोजने आपल्या पहिल्या मुलाला हमीदला जन्म दिला. आज हा मुलगा देखिल प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजू खान या नावाने ओळखला जातो. पण जेव्हा सोहनलाल यांनी आपले नाव या मुलाला देण्यास मनाई केली तेव्हा सरोजला मोठा धक्का बसला. तिला तेव्हा समजले की ते चार मुलाचे पिता आहेत.सरोज एखाद्या सवाष्णी सारखी श्रृगांर करीत असे मात्र हा घाव तिच्या जिव्हारी लागला. तिने सर्वाचाच त्याग केला. १९६५ मध्ये ते दोघे पती पत्नी म्हणून विभक्त झाले. मात्र सहाय्यक म्हणून सरोज ७२ पर्यंत त्यांच्या सोबतच होती. मला वाटतं कलेसाठी ही फार मोठी किंमत सरोज यांनी चुकवली.
१९६३ “दिल ही तो है” या चित्रपटाचे शुटींग सुरू होते अणि या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक देखिल सोहनलालच होते. या चित्रपटातील एक कव्वाली “निगाहे मिलाने को जी चाहता है…..”चे जेव्हा चित्रीकरण सुरू झाले तेव्हा अडचण अशी आली की सोहनलाल परदेात गेलेले नृत्य कंपोज कोण करणार ? निर्माते सरोज खानला म्हणाले की सोहनलाल नाहीत तुम्ही त्यांच्या सहाय्यक आहात तेव्हा तुम्हीच कंपोज करा. पण नृत्य कसे कंपोज करायचे ते सरोजला माहित नव्हते. सरोज म्हणाली मी स्वत: नृत्य करून दाखवेन या गाण्यावर हवे तर…. आणि त्यांनी सर्व हावभाव कव्वाली सोबत करून दाखविले आणि ते गाणे पिक्चराईज झाले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वतंत्रपणे हे नृत्य कंपोज करून दाखविले….
अभिनेत्री साधना ही सरोजची पूर्वी पासूनच फॅन होती. १९७५ मध्ये साधनाने आपल्या पती आर.के. नैय्यर “सोबत गीता मेरा नाम” या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात पहिल्यांदा सरोज खान स्वतंत्र नृत्य दिग्दर्शक बनली. ग्रपू डान्सर म्हणून सुरूवात केल्या नंतर स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळवायला सरोज खानला १७ वर्षे लागली. मात्र ही १७ वर्षे प्रचंड कष्ट आणि समस्येने भरलेली होती. “गीता मेरा नाम” मधील त्यांचे काम सुभाष घई यानां खूप आवडले आणि त्यांनी “विधाता” या चित्रपटात संधी दिली.
१९८३ मध्ये प्रदर्शीत झालेल्या त्यांच्या हिरो या चित्रपटाने मात्र खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीला त्यांच्या क्षमतेची ओळख पटली. आणि नंतर त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट त्यानां यशो शिखराकडे घेऊन गेला. नगीना(१९८६) “मधील मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा……” मिस्टर इंडिया (१९८७) मधील…हवा हवाई……, तेजाब (१९८८)…..चांदणी(१९८९)….बेटा(१९९२)…..डर, बाजीगर खलनायक(१९९३)….मोहरा (१९९४)….याराना, दिलवाले दुल्हनिया(१९९५)…. परदेस(१९९७)…. हम दिल दे चुके सनम…ताल(१९९९)…..लगान(२००१)… देवदास(२००२)…. देवदास(२००२)…. स्वदेस, वीर जारा(२००४)…. फना(२००६)…. गुरू(२००७)…. गुरू, तारे जमी पर, जब वूई मेट(२००७)…. खट्टा मिठा(२०१०)…. राऊडी राठोड, अग्नीपथ(२०१२)…. गुलाब गँग(२०१४)…. अशा एकाहून एक सरस चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले.
२००७ मध्ये डॉ. शारदा रामनाथन या दिग्दर्शीकेचा “श्रीगांरम्” हा चित्रपट आला.  पूर्णत: भारतीय नृत्यकलेचा अविष्कार असणारा या चित्रपटासाठी सरोज खान यांना बोलवण्यात आले होते. यात पूर्ण शास्त्रीय पद्धतीचे भारतीय नृत्ये त्यांनी कंपोज केली. यातील एका नृत्यात “पदम” या प्रकारात गाण्यातील फक्त एका ओळीत सरोज खान यांनी १६ विविध प्रकारच्या भावमुद्रा करून दाखविल्या……. डॉ. शारदा रामनाथन म्हणतात मी त्यांचे वर्णन “स्पिचलेस” असे करेन. त्यांनी स्वत: या भावमुद्रा मोजल्या आहेत.
झगमगत्या चंदेरी दुनियेतले जब वुई मेट, देवदास आणि श्रीगांरम् या तिन चित्रपटांसाठी ३ राष्ट्रीय पुरस्कार तर तेजाब, चालबाज, सैलाब,बेटा, खल नायक, हम दिल दे चुके सनम, देवदास आणि गुरू असे सात फिल्म फेअर पुरस्कार त्यानां मिळाले पण वैयक्तिक वेदनांनी त्यांची पाठ सोडली नाही.
सरोज खान यानां कॅमेरा मुव्हमेंटचे देखिल उत्तम ज्ञान आहे. जो सेट लावलेला आहे जे कलाकार त्यात भाग घेत आहेत त्या सर्वांचे त्या बारकाईने निरीक्षण करतात. जेव्हा ‘देवदास’चा प्रमियर झाला तेव्हा सरोजखान दवाखन्यात बेडवर होत्या. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी जेव्हा भेटायला गेले तेव्हा आगोदर त्यांनी विचारलेत्- ‘सिटी बजी या नही हॉल मे….लोगोंने सिक्के उछाले या नही’……अर्धवट कॉन्शस असलेली ही बाई फक्त आणि फक्त नृत्यच जगणारी आहे.”
सोहनलाल पासून झालेली दोन मुले राजू खान आणि हिना खान तर नंतर सरदार रोशन खान पासूनची मुलगी सुकैन्या खान अशी तिन मुले. मात्र २०१२ मध्ये हिना खान मृत्यू पावली. आपल्याकडे सर्व काही असताना आपल्या मुलीला वाचवू शकलो नाही याची त्यानां आजही खंत आहे. दुसऱ्या लग्नाच्या खूप पूर्वीच त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. दुसरी मुलगी दुबईला डान्स क्लास चालवते. चित्रपटा नंतर टीव्ही वरील नृत्याच्या अनेक रियालटी शो मध्ये त्या जज होत्या. सध्या त्या चित्रपटा पासून काहीशा लांब गेल्या आहेत. मुंबईत त्यांची नृत्य शाळा आहे जिथे अनेक तरूण तरूणी नृत्याचे धडे गिरावल्या त्यांच्याकडे येतात. स्वत:पेक्षी ही अधिक आपल्या गुरूवर आणि नृत्यावर प्रेम करणाऱ्या सरोज स्वभावाने कडक आहेत. अर्थात हा कडकपणा नृत्य गुरू म्हणून. त्यांच्या स्वत:चे अनेक वर्षां पासूनचे असे १८ शिष्य आहेत ज्यावर त्या मुलां सारखे प्रेम करतात. सेटवर येण्या पूर्वी जर कोणी रंगभूमिला नमस्कार केला नाही तर प्रचंड रागावतात. सन २०१२ मध्ये फिल्मस् डिव्हीजनने तयांच्यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी तयार केली ती बघण्या सारखी आहे. १९५८ मध्ये सुरू झालेला नृत्याचा प्रवास आजही थांबलेला नाही. शरीर स्थूल झाले असले तरी सेटवर जाताच आजही शरीर चपळ होते, डोळे, चेहऱ्यावरील भावमुद्रा, पदन्यास त्याच गतीने होऊ लागतात जितके ६० वर्षापूर्वी होते. ….त्यांच्या भाषेत सांगायचे तर- “ मेरे गुरू हर वक्त मेरे सामने होते है. जब भी मै काम करने लगती हूँ तो वह मेरे अदंर प्रवेश करते है औरा मेरा काम पुरी शिद्दतसे पूरा हो जाता है. आज मै जो भी हूँ वह मेरे गुरू की वजहसे……”
- *दासू भगत.*