Friday, October 26, 2018

हृदयनाथ मंगेशकर । सलील कुलकर्णी

पंडितजी 🙏🙏

जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा .

हृदयी नटावला ब्रह्माकारे!!

तासन् तास हातात पेन घेऊन कोऱ्या कागदांकडे पाहत बसलोय. गेले काही दिवस हे असंच होतंय. माझी आई, मुलं यांच्याविषयी लिहायचं म्हटलं तर मला जसं थिजून जायला होतं, तसंच.. कुठून सुरुवात करू? शीर्षक काय? ‘मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते..’ हे असावं? ‘वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का..’ हे असावं? स्वरशब्दांचं विद्यापीठ? ‘मैत्र जीवाचे’ का नुसतंच ‘ते’?

कागद आणि पेन एवढय़ाशा अवकाशात मावणारे ‘ते’ नाहीत. आणि माझ्यासाठी ‘ते’ जे आहेत ते सांगणंसुद्धा शब्दांच्या शक्तीच्या पलीकडलं आहे. माझ्या लहानपणी बाबांनी पैसे जमवून एक रेकॉर्ड- प्लेयर घेतला होता आणि काही निवडक रेकॉर्ड्स.. त्यातल्याच एका ‘कोळीगीते’ असं लिहिलेल्या रेकॉर्डवर मी त्यांचा फोटो पाहिला. समुद्र पहिल्यांदा भेटला तो त्या गाण्यांमधून. अगदी पाच वर्षांचा होतो मी; पण ‘राजा सारंगा’ ऐकताना छातीत काहीतरी झालं. अनेक र्वष ते गाणं लतादीदींचं म्हणून ऐकताना रेकॉर्डच्या कव्हरवरचे ते हुशार डोळ्यांचे चष्मेवाले गृहस्थ कोण, हे समजलं नव्हतं. मग एक दिवस दूरदर्शनवर अचानक ‘ते’ दिसले.. गाताना. थोडंच गुणगुणले; पण बऱ्याच वर्षांनी पुन्हा छातीत काहीतरी झालं. ते होतं- ‘त्या फुलांच्या गंधकोषी..’ आणि मग शाळेमध्ये स्पर्धेत भाग घेताना माझ्या डोक्यात हीच गाणी- ‘ती गेली तेव्हा रिमझिम..’ ‘तू तेव्हा तशी..’ मग सातवी-आठवीत असताना घराजवळ ‘ते’ कार्यक्रम सादर करणार म्हणून धावत गेलो आणि ‘ते’ दिसले. ‘भावसरगम’ची पहिली वारी शाळेत असताना केलेला मी भावसंगीतातला वारकरी! त्यानंतर अगदी आजपर्यंत त्या वारीत चालताना तीच नशा, तोच आनंद.. आणि सांगता न येणारं ते छातीत जाणवणारं सुख..

पंडित हृदयनाथ मंगेशकर नावाच्या शब्दस्वरांच्या विद्यापीठात लांबून का होईना, पण आपल्यावर त्या चंद्राचे चार किरण पडताहेत याचाच आनंद खूप मोठा होता.. आणि आजही आहे.

डोळसपणे संगीत आणि काव्य या विषयाकडे पाहू लागल्यानंतर हा आदर, भारावलेपण अजूनच वाढायला लागलं. किती पद्धतीनं आपलं जीवन व्यापलंय या माणसानं, हे जाणवू लागलं. गणपती उत्सवांत ‘गजानना श्रीगणराया’, ‘गणराज रंगी नाचतो’ यांचीच गाणी.. शिवजयंतीच्या कार्यक्रमांत ‘हे हिंदुशक्ती संभूतदीप्तीसम तेजा’.. ‘आनंदवनभुवनी’.. यांचीच. नृत्यांच्या कार्यक्रमातही ‘ओम नमोजी आद्या’ यांचंच.. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलताना ‘सागरा प्राण तळमळला’ यांचंच.. आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या शेवटी गायली जाणारी पसायदानाची चालसुद्धा पंडितजींचीच..

मास्टर दीनानाथांसारख्या स्वरसूर्याची ही पाचही किरणं अखंड भारतवर्षांला व्यापून राहिली आहेत गेली सात दशकं. पंडित हृदयनाथ

मंगेशकर यांची सृजनशीलता ही त्या स्वरसूर्याच्या खुणा दाखवत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणारी आहे. मराठी भावसंगीतात खऱ्या अर्थानं नवा प्रवाह आला तो हृदयनाथजींच्या रूपानं. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी भा. रा. तांबे यांची ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’सारखी अभिजात कविता निवडून ती ज्या पद्धतीनं स्वरबद्ध केली आहे तिथेच या संगीतकाराच्या कारकीर्दीची ‘वाट दूर’ जाणार हे जाणवलं असणार. मुळात उत्तमोत्तम काव्यं निवडून ती संगीतबद्ध करून रसिकांपर्यंत पोचवणारी मराठी भावसंगीताची परंपरा पंडितजींमुळे केवळ अधिक उजळली नाही, तर काव्य आणि संगीत या दोन्हीच्या कक्षा रुंदावल्या असं मला फार मनापासून वाटतं.

चालींमधली आक्रमकता, चमत्कृती आणि सहज गुणगुणता आली नाही तरी पुन: पुन्हा ऐकावीशी वाटावी अशी तेज:पुंज रचना.. या सगळ्याच्या मुळाशी असलेली साहित्याची उत्तम जाण आणि त्याच्यापुढे जाऊन भाषेवर असलेलं प्रेम यातून या साऱ्या अद्वितीय रचना घडल्या असाव्यात.

‘भावसरगम’चं सादरीकरण हा माझ्यासाठी कायमच अतिशय आकर्षक भाग होता. स्टेजवर बसल्यानंतरची पंडितजींची एकाग्रता, गाण्यांमागून गाणी सादर करून लोकांना खिळवून टाकण्याची खुबी, कवितेविषयी बोलताना रसिकांना समृद्ध करण्याची धडपड.. आणि या सगळ्याइतकीच हवीहवीशी वाटणारी एक कलंदर वृत्ती. ‘भावसरगम’चे शंभरच्या वर प्रयोग बघूनसुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाण्याची मला हिंमत झाली नाही. एकदा मेडिकल कॉलेजमधल्या मित्राच्या आग्रहाखातर भेटायला गेलो अणि समोर उभा राहून नुसताच बघत बसलो. तोंडून शब्दच फुटला नाही. शेवटी तेच म्हणाले, ‘सही हवीये का?’ मी म्हटलं.. ‘मी तुमचा..’ एक मोठ्ठा पॉज.. ‘ते’ म्हणाले, ‘फॅन आहात का?’ मी मान डोलवली. पूर्णपणे मॅड झालो होतो मी. मनात वाटलं, ‘असं’ व्हायचंय मला.. जास्त वाद्यबिद्यं नाहीत.. आपणच कवितेविषयी, गाण्याविषयी बोलायचं.. आणि गायचं..!!

अगदी परवा परवा मी ‘मैत्र जिवांचे’ सादर करताना पंडितजी म्हणाले, ‘हे डॉक्टर माझे मित्र आहेत. मी डॉक्टरांचा ‘फॅन’ आहे.’ मला भरत नाटय़मंदिरचा ‘तो’ प्रसंग आठवला. मी म्हटलं, ‘ते प्रेमानं मला ‘मित्र’ म्हणाले, माझ्या रचनांचं कौतुक केलं, तरी आपल्याला ठाऊक असतंच, की कोण ‘विठ्ठल’ आणि कोण ‘वारकरी’!’ पंडितजी हसले.. प्रसन्न!

रसिकता आणि रसग्रहण याची कार्यशाळा असावी अशा गप्पा. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, तांबे, कुसुमाग्रज, आरती प्रभू, शांताबाई शेळके, सुरेश भट, शंकर वैद्य आणि ग्रेस यांच्या शब्दांच्या पलीकडचेही जाणवेलेले पंडितजी शून्यात बघत या साऱ्यांविषयी बोलायला लागले की जाणवतं, की मुळात केवळ संगीतकार म्हणून नव्हे, तर रसिक म्हणून, मित्र म्हणून त्यांना ही सगळी मंडळी सतत आजूबाजूला जाणवतात.

‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ गाताना त्यांना भटसाहेब दिसत असतात आणि ‘जीवलगा’ गाताना शांताबाईंची आठवण पंडितजींच्या डोळ्यांत दिसते. आरती प्रभूंविषयी बोलताना ते दोन ओळींमध्ये जो विश्राम घेतात त्यात त्यांना आरती प्रभूंचे डोळे दिसत असावेत. आणि ग्रेसविषयी बोलताना ते मधेच उसासा टाकतात. तो उसासा खूप काही सांगून जातो.

शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाजीप्रभू देशपांडे यांच्या कथा सांगताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख झाला की एक वेगळंच मार्दव त्यांच्या स्वरांत जाणवतं. मंगेशकर कुटुंबीयांविषयी बोलतानाचे पंडितजी लोभस वाटतात. आणि त्यांचा सगळ्यात हळवा कप्पा म्हणजे ‘दीदी’! पंडितजींना दीदींविषयी आणि दीदींना पंडितजींविषयी बोलताना ऐकणं हे एखादी कविता ऐकण्यासारखं सुंदर असतं.

भाषा हा मुळातच पंडितजींचा जिव्हाळ्याचा विषय. उत्तम मराठी, उत्तम हिंदी आणि उत्कृष्ट उर्दू कळणारे एकमेव संगीतकार म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर. ‘मैत्र जीवांचे’च्या निमित्तानं अक्षरश: लहान मुलाचं बोट धरून त्याला एखादं कलादालन किंवा किल्ले, गड दाखवावेत तसं त्यांनी संत ज्ञानेश्वर.. मीराबाई.. गालीब उलगडले. जितक्या सहजतेनं पंडितजींचे गुरू उस्ताद अमीरखांसाहेबांची बंदिश उलगडली जाते, तितक्याच सहजपणे गालीबचा शेर समजावून सांगितला जातो तो हृदयनाथ मंगेशकर नावाच्या कार्यशाळेत.

माझ्यासाठी पंडितजी गुरू तर आहेतच; पण देव तुम्हाला मार्ग दाखवायला पाठवतो तो देवदूतही आहेत. रोज बोलणं होतं असं नाही. भेट तर क्वचितच होते. पण दोन वाक्यांमध्ये खूप काही सांगून जाणारी व्यक्ती तुम्हाला स्वरशब्दांच्या अवकाशाचं खरंखुरं दर्शन घडवते. आणि अशा व्यक्तीचे शाबासकीचे दोन शब्दसुद्धा पुरस्कारापेक्षा मोठे असतात. त्यांची ‘डॉक्टर’ ही हाकच मला पाठीवरच्या हातासारखी वाटते. जगणं, संकट, दु:ख, नाती, रसिक , यश या सगळ्याविषयीचे संदर्भ आणि व्याख्या बदलणारा त्यांचा सहवास हा माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याच्या आयुष्यात परमेश्वरानं योजलेला सुवर्णयोग वाटतो.

अत्यंत उथळ अफवांना स्पष्टीकरण देताना मला बघून त्यांनी ‘डॉक्टर, तुम्ही छान गाणी करा.. उगीच या खडकांवर पाणी टाकून झाड उगवणार नाही. तुम्ही त्रास करून घेऊ नका..’ एवढय़ा दोन वाक्यांत माझ्या मनातला संदेह दूर केला. याला म्हणतात मार्गदर्शन! तासन् तास बोलायची गरजच वाटत नाही अशावेळी.

देवाच्या कृपेनं आमच्या घरी डोळ्याला दिसणाऱ्या बऱ्याच पुरस्काराच्या बाहुल्या आहेत. पण मी जपतो त्या बाहुल्या म्हणजे रसिकांची दाद आणि कार्यक्रमांत मी ‘संधिप्रकाशात’ किंवा ‘हुरहुर असते’ किंवा त्यांचं ‘तू तेव्हा तशी’, ‘भय इथले’ गाताना ‘‘क्या बात है डॉक्टर!’’ हे त्यांचे शब्द.

अगदी लहानपणी फोटोत बघितलेले ते हुशार, तेजस्वी डोळे माझ्याकडे कौतुकानं बघतात तेव्हा ‘याजसाठी केला होता अट्टहास’ असं वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर मी तिथेच असतो अजुनी मनानं.. भारावलेला.. कॉलेजमधला.. त्यांच्याकडे खुळावून बघणारा. माझ्या फर्माईशी आज तरी गातील का, अशी हुरहुर असलेला. आणि ‘ते’ तितकेच सहज, तितकेच उत्कट, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आणि मैफील हमखास जिंकणारी त्यांची अदा.. डोळे मिटून मन लावून ज्ञानेश्वरांच्या ओळी समजावून सांगताहेत-

बापरखुमादेवीवरू सहज नीटु झाला

हृदयी नटावला ब्रह्माकारे।

ज्ञानेश्वरांच्या हृदयात ‘पांडुरंग’.. पंडितजींच्या मनात ‘ज्ञानेश्वर माऊली’ आणि माझ्या हृदयात ‘ते’.. पं. हृदयनाथ मंगेशकर..!!

सलील कुलकर्णी.
( पुस्तक - शहाण्या माणसांची फॅक्टरी )

Thursday, October 25, 2018

पाकिजा । विवेक पुणतांबेकर

*पाकिझा ची कहाणी:*                                                

भारतीय सिनेविश्वात काही माईलस्टोन सिनेमे तयार झाले. काही खूपच रखडले.रखडलेले बहुतेक सिनेमे अपयशी ठरले याला अपवाद एकच तो म्हणजे पाकिझा. या पाकिझा च्या निर्मितीची ही कहाणी....

सय्यद हैदर उर्फ कमाल अमरोही यांचा मुंबईच्या सिनेविश्वात पटकथाकार म्हणून प्रवेश झाला तो सोहराब मोदींच्या १९३८ च्या जेलर सिनेमाने. १९४९ च्या महल पासून ते दिग्दर्शक बनले. १९५३ साली दायरा सिनेमाची निर्मिती/दिग्दर्शन/पटकथा लिहीतानाच मीनाकुमारी बरोबर विवाहबध्द झाले. कलकत्ता येथे गोहरजान नावाची गणिका होती. ती नेहमीच पैश्याच्या राशीत उभी राहून नाच करायची. व्हॉईसरॉय नंतर बग्गी वापराणारी गोहरजानच होती. व्हॉईसरॉय ने पाहिले आणि तिला दंड केला. तिने दंड भरला आणि परत बग्गी वापरायला सुरुवात केली. दुप्पट दंड झाला तो भरला. हा प्रकार आठ दिवस चालला. शेवटी व्हॉईसरॉय ने कंटाळून तिचा दंड माफ केला. गोहरजान आणि इतर गणिकांच्या ऐकलेल्या कथेवर पाकिझा ची पटकथा कमाल अमरोहींनी लिहीली.
मीनाकुमारी ला प्रमुख भुमिकेसाठी निवडले. आधी नायकाची भुमिका अमरोही स्वतः करणार होते.पण त्यांनी विचार बदलला आणि अशोककुमार ना निवडले. यात मीनाकुमारी ची आई आणि मुलगी अशी दुहेरी भुमिका होती. दुसर्‍या नायकाच्या रोल साठी धर्मेंद्र ला निवडले. संगीतकार म्हणून गुलाम महंमद ना घेतले. आधी रॉयल्टी वरुन वाद झाला पण नंतर अमरोही रॉयल्टी द्यायला तयार झाले. बाकी भुमिकांसाठी सप्रू,मेहताब ना घेऊन दादर मुंबईतील रंगमहाल स्टुडियोत १ ऑगष्ट १९५७ ला मीनाकुमारी च्या वाढदिवसाच्या दिवशी पाकिझा चा मुहूर्त झाला. त्यावेळी हजर असलेल्या चार्ली नावाच्या ज्योतिषाने भविष्य सांगितले की हा सिनेमा पुर्ण व्हायला अनेक अडचणी येतील. सिनेमाशी संबंधीत काही जण सोडून जातील. काही जण मरून जातील. काही काळ शुटिंग बंद पडेल. इतके होऊनही जर हा सिनेमा पुर्ण झाला तर मात्र सिनेमाच्या इतिहासात अमर होईल एव्हढे यश मिळेल.

कमाल अमरोही परफेक्शनीस्ट होते त्यामुळे मनाप्रमाणे सेट सकट सगळे जुळून येईपर्यंत शूटींग करत नसत. मुहर्ताला अरूण अहुजा (गोविंदाचे वडील), बालन आणि अमरोही यांच्यावर कव्वाली शूट केली. लांबी वाढली म्हणून कापावी लागली. मग इन्ही लोगोने गाणे ब्लँक अँड व्हाईट मधे शूट झाले. त्याच वेळी मुगले आझम रिलीज झाला. प्रिमीयर शो पाहून आल्यावर मीनाकुमारी ने आग्रह धरला की सिनेमा रंगीत करायचा. त्यामुळे आधीचे शूटींग रद्द केले आणि कोडँक्रोम रंगीत फिल्म मागवून शूटींग परत सुरू झाले. कागज के फूल पाहिल्यावर कमाल अमरोही नीं निर्णय घेतला की सिनेमास्कोप फॉरमँट वापरायचे. यासाठी ट्वेंथीएथ सेंच्युरी फॉक्स ला रॉयल्टी दिली. त्यावेळी भारतातील अनेक थिएटर्स मध्ये सिनेमास्कोप दाखवायची सोय अजीबात नव्हती या साठी बॉश अँड लँब कंपनीला ३०० लेंन्सेसची ऑर्डर पण दिली. १९५९ साली शुटिंग गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडियोत सुरु झाले. कमाल अमरोही नां रंगसंगती चे उत्तम ज्ञान होते. कलावंतांसाठी लागणारा कपडा ते स्वतः बाजारात जाऊन खरेदी करत. सेटवर एकही खिळा बाहेर आलेला त्यांना अजीबात खपत नसे. सेट उभा राहिल्यावर भिंतीना मखमली कापड ताणून लावत. मग त्या भिंती रंगवत. यामुळे सेट खरा वाटायचा. फिल्मीस्थान मधे लावलेला मीनाबाजाराचा सेट पहायला गीतकार असद भुपाली आले आणि सेट पाहून थक्क झाले. क्षणभर त्यांना वाटले आपण खरोखरीच मीनाबाजारात आलो.

थोडेफार शूटींग झाले .तेव्हढ्यात मीनाकुमारी धर्मेंद्र यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. संतप्त अमरोहींनी धर्मेंद्रला काढून टाकले. धर्मेंद्र वर शूट झालेला एक शॉट सिनेमात आहे. सेहरा बांधून घोड्यावर बसलेला राजकुमार नाही तो धर्मेंद्र आहे. धर्मेंद्र मीनाकुमारी प्रेमप्रकरण संपले आणि पाकिझा चे शूटींग परत सुरू झाले. अनेकांनी लहरी राजकुमार ला घेऊ नका असा सल्ला अमरोहींना दिला होता. पण अमरोही खमके होते. राजकुमार चे नखरे अजिबात चालवून घेतले नाहीत. एका सीन मधे राजकुमार हिरवा कोट आपल्या घरून घेऊन आला. दुसरे दिवशी लाल कोट घालून आला. माझ्याकडे हिरवा कोटच नाही असा बहाणा करायला लागला. अमरोहींनी नोकराला पाठवून राजकुमारच्या घरून हिरवा कोट मागवला. चलो दिलदार चलो गाणे गोवा येथे शूट करायचे होते. राजकुमारला हे लोकेशन पसंत नव्हते. तो आलाच नाही. अमरोहींनी डमी वापरून गाणे शूट केले. राजकुमार पहिल्यांदा साहिबजानला (मीनाकुमारी ला) घेऊन येतो. बाजारात ठेकेदार तिला ओळखतो आणि मागे लागतो. राजकुमार आणि ठेकेदाराची मारामारी होते असा सिन महाबळेश्वरच्या बाजारात शूट व्हायचा होता. राजकुमार ठेकेदाराकडून मार खायला तयार नव्हता.  अमरोहींनी त्याचे न ऐकता १५ रिटेक्स घेतले आणि राजकुमारला चांगलाच धडा शिकवला. या नंतर राजकुमारने परत कधीच त्रास दिला नाही. तसाच त्रास मेहताब नी दिला. एका सीन मधली हिरवी ओढणी त्यांना पसंत नव्हती. मुद्दाम रिटेक्स करत बसल्या. अमरोही पण हट्टाला पेटले. रॉ स्टॉक संपेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत शूटींग सुरु ठेवले. शेवटी मेहताब नी टेक दिला. दुसरे दिवशी त्यांना काढून नादिरा ला घेतले. तिचेही नखरे वाढायला लागल्यावर तिला काढून वीणा ला घेतले. तब्येत ठिक नसताना पण सगळी गाणी गुलाम महंमदनी रंगमहाल स्टुडियोत रेकॉर्ड केली. अर्धा सिनेमा तयार झाला पण पिंजरे के पंछी च्या सेटवर सुरू झालेल्या गुलझार बरोबरच्या प्रेमसंबंधनामुळे मीनाकुमारी घर सोडून गेली आणि पाकिझा बंद पडला.

६० च्या दशकात मीनाकुमारी चे करियर उतरायला लागले. अतिरिक्त मद्यपानामुळे झालेल्या खुणा शरीरावर दिसायला लागल्या. निर्माते तिला टाळायला लागले. अमरोहींबरोबर तिने संबंध  जुळवून घेतले. नर्गिस, सुनील दत्त, अचला सचदेव यांच्या मध्यस्थी मुळे मीनाकुमारी परत पाकिझा चे शूटींग करायला तयार झाली. जवळजवळ एक दशकाचे अंतर पडले होते. दरम्यानच्या  काळात गुलाम महमंद, कँमेरामन जोसेफ विर्शिंग यांचे निधन झाले होते. आता नवीन संगीतकार आणि कँमेरामन यांचा शोध सुरु झाला. शंकर जयकिशन सकट अनेक आघाडीचे संगीतकार  संगीत द्यायला उत्सुक होते. पण आधीची गाणी बाद करा ही त्यांची अट अमरोहींना पसंत नव्हती. शेवटी नौशादना बोलावले. त्यांचे संगीत पसंतीला आले. सहा आणखी गाणी रेकॉर्ड केली. पण लांबी वाढल्याने सिनेमात घेता आली नाहीत. पार्श्वसंगीत आणि टायटल म्युझिक नौशादनी तयार केले. के.के.महाजन या नामवंत कँमेरामन ना बोलावले. त्यांनी एक शूटींग शेड्युल केले. रशेस पाहिल्यावर सेट तिरका दिसत होता.अमरोहींनी स्टुडियोत जाऊन मुद्दाम चेक केले सेट बरोबर होता. कँमेरा तिरका लागला होता. यानंतर कँमेरामन व्ही.के.मुर्ती ना बोलावले. चलो दिलदार चलो , मौसम है आशुकाना ही दोन गाणी आणि हत्ती हल्ला करतात हा प्रसंग हे सगळे व्ही. के. मुर्ती नी शूट केले.पण फार काळ ते अमरोहींबरोबर रमले नाहीत. राजश्री पिक्चर्स चे कँमेरामन अरविंद लाड यांच्याबरोबर अमरोहींचे सूर जुळले आणि उरलेले शूटींग त्यांनी पुर्ण केले.

रात्रीच्या वेळी चुकुन राजकुमार बायकांच्या डब्यात शिरतो. तिथे त्याला मीनाकुमारीचे पाय दिसतात हा प्रसंग विरार च्या रेल्वे यार्डात शूट व्हायचा होता पहाटे चार वाजता. ऐनवेळी लक्षात आले गाडीच्या इंजिनाचे तोंड उलट्या दिशेला लागले होते. ते रिव्हर्स करायची विरार यार्डात सोय नव्हती. परत दुसरे दिवशी शूटिंग करावे लागले. साहेबजान निघून गेल्यावर रागात राजकुमार रागाने जंगल जाळतो असा सीन शूट करायचा होता. या साठी सुरत जवळ वाडी येथे एक जंगल अमरोहींनी विकत घेतले. शहा या फायनान्सर ने पाकिझा ला पैसा पुरवला होता. शूटींग च्या वेळी शॉट सुरु व्हायच्या आधी एका स्पॉटबॉय च्या चुकीने आग लागून जंगल जळून गेले. शहांनां ही गोष्ट समजली. परत पैसे द्यायची तयारी दाखवली. पण कमाल अमरोहींनी तंबू जाळतो असा सीन शूट केला. शहांना लोकांनी वेड्यात काढले. शहा म्हणाले जंगल जळले यात अमरोहींची चूक नव्हती. मी पैसे अमरोहींकडे पाहून दिले आहेत. इतर निर्माते पैसे हातात पडले की बंगला घेतात गाडी घेतात. पण हा माणूस तसा नाही. सिनेमासाठी दिलेला पैसा सिनेमातच वापरतो. अतिशय साधा आहे. मला पैसे दिल्याचा अजिबात पश्याताप होत नाही.अमरोही स्वतः लोकेशन पहायला जात. चलते चलते गाण्यात शेवटी पुलावर थांबलेल्या गाडीची शिट्टी वाजते हा सीन घेण्यासाठी वापी जवळच्या भिलाड येथे दमणगंगेच्या पुलावर एक खोटा सिग्नल उभा केला.पहिल्या दिवशी गाडी थांबलीच नाही. परत दुसरे दिवशी सीन शूट केला.

लहानपणी मोठ्या भावाने मारल्यामुळे अमरोही घरातून पळून गेले. जाताना अम्मीला सांगून गेले इतके चांदीचे रुपये मिळवून आणीन की तुझा दुपट्टा भरून फाटेल. सिनेविश्वात यशस्वी झाल्यावर चांदीच्या रूपयांनी त्यांनी अम्मीचा दुपट्टा भरला आणि तो फाटला. त्यातलीच नाणी ठाडे रहियो गाण्यात शेवटी वापरली आहेत. परत शूटींग सुरु झाले पण मीनाकुमारी ची तब्येत बिधडत चालली. डान्सेस साठी पद्मा खन्ना ला वापरली आणि क्लोज-अप मीनाकुमारी चा वापरला. हुबेहुब तिच्या सारखी दिसणारी बिल्किस मोसम है आशुकाना गाण्यात वापरली. (याच बिल्किस बरोबर मीनाकुमारी गेल्यावर अमरोहींनी लग्न केले. पण काही दिवसातच त्यांना कफल्लक करुन ती निघून गेली) डबिंग साठी साधना खोटे या मिमिक्री आर्टीस्ट चा आवाज वापरला. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे गाण्याचा सेट एव्हढा भव्य होता की लाईटस् विझवायला वीस मिनिटे लागत.

शेवटी झुंबराच्या फुटक्या तुकड्यांवर मीनाकुमारी नाचते आणि तिचे पाय रक्तबंबाळ होतात हा परिणाम साधण्यासाठी सफेद चादरीखाली लाल स्पंजाचे तुकडे वापरून हे गाणे शूट केले गेले. सिनेमा पुर्ण झाल्यावर आधीची सुरवात बदलून फक्त जळती मेणबत्ती पार्श्वभूमीवर दाखवून नाचणारी मीनाकुमारी दाखवून अप्रतिम परिणाम अमरोहींनी साघला. एडिटिंग मधे कापलेल्या सहा गाण्यांची खास रेकॉर्ड एच.एम.व्ही. ने काढली होती त्यात शोभा गुर्टू यांनी गायलेली गझल होती. अमेरिकेत रिलीज केलेल्या लॉंग प्लेईंग रेकॉर्ड चे कव्हर डिझाईन मोहन वाघ यांचे होते.
मुंबईच्या मराठा मंदिर सिनेमात पाकिझा चा भव्य प्रिमीयर झाला. नटवलेल्या बग्गीतून दिमाखात सिनेमाची रिळे आणली गेली. प्रिमीयर शो ला अमरोहींबरोबर आलेली मीनाकुमारी पहाताना प्रेक्षक हळहळले. यानंतर काही दिवसातच मीनाकुमारी ने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर हा सिनेमा भारतभर तूफान यशस्वी झाला. सिनेमाच्या शेवटी साहेबजान ची डोली निघते हा प्रसंग पाहिल्यावर देशभरातील अनेक गणिकांची पत्रे अमरोहींना आली. एकीने लिहिले होते आमचे लग्न हे एक स्वप्न असते ते तुम्ही साकार केलत याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. पाकिझा निर्माण केल्याचे सार्थक झाले असे अमरोहींनी आपल्या आठवणीत सांगितले होते.

शब्दांकन:  विवेक पुणतांबेकर.
सौजन्य : चंद्रशेखर गद्रे

साहिर लुधियानवी।।।।।उदय सप्रे

मंडळी *सप्रे* म नमस्कार ! आज २५ आॅक्टोबर २०१८ ! आजपासून बरोबर ३८ वर्षांपूर्वी म्हणजेच २५ आॅक्टोबर १९८० रोजी ,  हिंदी सिनेसृष्टीला प्रचंड मो योगदान देणारा कलाकार हे जग सोडून गेला ! म्हणजेच आज त्याचा *स्मृतीदिन* आणि म्हणून आजचा हा विशेष *सप्रे* म लेख त्यालाच समर्पित आहे !
लेख सुरु करण्यापूर्वी एक
*वैधानिक इशारा* : ह्या भागात या कलाकाराची गाजलेली काही गाणी अख्खी दिली आहेत.एका थोर कलाकारावरचा लेख असल्याने हा भाग खूप मोठा आहे.त्यामुळे हाताशी भरपुर वेळ असेल तेंव्हाच वाचायला घ्यावा !

*सर उठाओ तो कोई बात बने*

मंडळी, *सप्रे* म नमस्कार ! आज मी तुम्हाला अशा एका कलाकारा बद्धल माहिती सांगणार आहे की ज्याच्या नावापासूनंच नशिबाने त्याची थट्टा मांडली , पण जो पुढे जाऊन एक असा अद्वितीय कलाकार बनला की ज्याच्या नावाशिवाय हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ उभा रहाण्याची कल्पनाच करवत नाहि! चला तर मग या हकीकतीकडे.....

पंजाबमधील लुधियानात एक जहागीरदार रहात असे — फज़ल मोहम्मद. याने आयुष्य भर फक्त अय्याशीच केली. याने एकूण १२ जणींशी लग्न केली आणि यापैकी बेगम सरदार नामक ११ व्या बायको पासून त्याला एकुलता एक मुलगा झाला. बाकीच्या बायकांपासून एकहि संतान नव्हती! शेजारी एक सुप्रसिद्ध राजकारणी गृहस्थ रहात असे — ज्याच्याशी त्याने उगीचंच उभा दावा मांडला होता. पण त्या गृहस्थाचं वर्चस्वंच इतकं होतं की याचा नाइलाज होता! आणि त्याच्यावर सूड उगवण्याची संधी याला मिळाली ती बेगम सरदार ८ मार्च १९२१ ला प्रसूत होऊन मुलगा झाल्यावर! याच्या शैतान डोक्यातून एक शक्कल आली व मुलाला त्याने शेजाऱ्याचंच नांव ठेवलं व मुलगा ४ वर्षांचा होईतो हा मुलाला मोठमोठ्याने नांव घेऊन शिव्या देई! शेजारी वैतागून जाब विचारी, की हा लगेच म्हणे *मी आपणांस नाहि, माझ्या मुलाला — अब्दुल हयीला शिव्या देत आहे!*

स्त्रीला भोगदासी समजणऱ्या फज़लने आणखी मुलांसाठी बेगम सरदारचा छळ मांडला. तो जेंव्हा असह्य झाला तेंव्हा बेगम सरदारने घटस्फोटा साठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायाधीशांनी जेंव्हा ४ वर्षांच्या अब्दुल हयीला विचारलं की *तू कुणाबरोबर राहू इच्छितोस?* तेंव्हा अब्दुल हयीने शांतपणे आईकडे बोट दाखवलं व तो आईसोबत मामाकडे राहू लागला. लहानपणापासून स्त्री जातीवर झालेला अन्याय पाहिलेल्या अब्दुलच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झाली.

आजूबाजूला शीख व हिंदू रहात असल्याने शाळेतले तमाम मित्रमंडळी शीख व हिंदूच होते. लहानपणापासून कवी मनाच्या अब्दुलला दसऱ्याला मेळ्यातील नाटकं व शेरोशायरीत खूप रस वाटे. त्याकाळचे सुप्रसिद्ध शायर रहमत यांची सगळी शायरी त्याला मुखोद्गत होती! शाळेतील शिक्षक फैय्याज़ हिरयानवी यांनी अब्दुलला प्रोत्साहन दिलं व तो मोठेपणी शायरी करू लागला. उर्दू व साहित्याची ओळख करून देणारे फैय्याज़ हे अब्दुलचे आद्य गुरू होत ! एकदम फोटोजेनीक मेमरी असलेला अब्दुल, एकदा वाचलेलं सहज लक्षात ठेवी.१९३७ साली मॅट्रिकच्या परिक्षेची तयारी करता करता इकबाल यांनी लिहिलेली एक नज़्ज़्म जी १९ व्या शतका तील शायर दाग देहलवी यांच्या प्रशंसनार्थ लिहिली होती, ती त्याला विशेष आवडली — जी अशी होती :

*चल बसा दाग, अहा! मय्यत उसकी जेब-ए-दोष है*

*आखिरी शायर जहानाबाद का खामोश है*

*इस चमन में होंगे पैदा बुलबुल-ए-शीरीज भी*

*सैकडों साहिर भी होगें, सहीने इजाज भी*

*हुबहु खींचेगा लेकिन इश्क की तस्वीर कौन*

यातला *साहिर* ( म्हणजे जादुगार ) हा शब्द त्याला इतका आवडला की त्याने आपलं नांव अब्दुल हयीच्या एवजी *साहिर* ठेवलं व पुढे आपल्या जन्मगावाचं नांव लावलं *लुधियानवी*! मंडळी हाच तो अब्दुल हयी ऊर्फ *साहिर लुधियानवी* ज्याने पुढे अगणित उत्कृष्ट गीते लिहिली आणि *हिंदी चित्रपट सृष्टीतला संगीत-कारांपेक्षा १ ₹ जास्त मानधन घेणारा एकमेव गीतकार ठरला!*

साहिरच्या शायरीमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत होता. १९४३ ला साहिर लाहोरला आला व त्याने तिथे आपला *तल्ख़ियाँ* ( म्हणजे कटुता ) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आणि साहिरला वारेमाप प्रसिद्धी मिळाली! पण शायरीने पोट भरत नाहि ना महाराजा? याच दरम्यान त्याला *अदब—ए—लतीफ* या मासिकाच्या संपादकाची महिना ४० ₹ ची नोकरी मिळाली.१९४५ ला *आजादी की राह पर* सिनेमात गाणी लिहिण्याचं काम मिळालं. साहिर त्याचा मित्र हमीद अख्तर बरोबर मुंबईला आला. मुंबईत साहिरचा परिचय मजरूह सुलतानपुरी, कैफी आज़मी , मजाज लखनवी या थोर शायर मंडळींशी झाला. मजाजशी खूप गहरी दोस्ती झाली. वर्सोव्याला एका आऊट हाऊसमधे दोघे राहू लागले आणि याच दरम्यान पंजाबमधील हिंसाचाराची बातमी आली. अर्धा जीव आईमधे अडकलेला साहिर लुधियानाला परतला. फाळणी झाली, देश स्वतंत्र झाला.साहिर आईबरोबर पाकिस्तानला गेला. पण तिथेहि क्रौर्य पाहताच साहिरची लेखणी *सवेरा* नामक नियतकालिकेतून अंगार बरसू लागली : 

*ये जलते हुए घर किसके हैं , ये कटे हुए तन किसके हैं*

*तकरीम के अंधे तुफा में , लुटते हुए गुलाब किसके हैं*

*ऐ सहबर मुल्क ओ कौम बता, ये किसका लहु है और कौन मरा , ये किसका लहू है कौन मरा , जरा हमको भी बता , हमभी सुनें!*

पाकिस्तान सरकारला हे कसं सहन व्हावं ? त्यांनी साहिरला जेरबंद करण्याचा फतवा काढला. याची कुणकुण लागताच साहिर आईसह परत हिंदुस्थानात पळून आला! ( एवढं एकंच काम पाकिस्तानने चांगलं केलं ज्यामुळे साहिर सारखे शायर भारताला मिळाले! )

वर सांगितल्याप्रमाणे १९४३ ची अखेर व १९४४ ची सुरुवात — या दरम्यान साहिरचा *तल्ख़ियाँ*  ( म्हणजे *कटुता* ) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला व तो अत्यंत यशस्वी ठरला!

पण *उच्च दर्जाचा कवी* हा शिक्काच साहिरच्या सिने-सृष्टीतील गीतकार म्हणून प्रवेशाला मारक ठरला! साहिर स्टुडिओत गेला की, सिनेसृष्टीतील तमाम निर्माते — दिग्दर्शक त्याच्या लौकिकाने दिपून जाऊन त्याचं स्वागत करायचे. पण गीतलेखनाच्या मुद्द्यापाशी येताच *साहित्यिक अंगाचा थोर कवी चांगला गीतकार ठरू शकेलच असं नाही आणि गाणी ठीक नसतील तर सिनेमा कोसळू शकतो!* असं सांगून त्याला परतवून लावायचे!

१९४६ च्या सुरुवतीला साहिरने मुंबईला येऊन *आज़ादी की राहपर* सिनेमासाठी गाणी लिहिली पण १९४८ ला रिलीझ झालेल्या या सिनेमातील गाणी व सिनेमा — दोन्ही विशेष गाजले नाहीत!

आता साहिर मुंबईला परत येऊनही वर्षभर होत आलेलं. अजून काही गीतलेखनाचं जमत नव्हतं. एकदा तर विजेची व पाण्याची  बिलं चुकती करण्यासाठी साहिरला आईच्या सोन्याच्या बांगड्या विकाव्या लागल्या ! अशाच बिकट परिस्थितीत असताना साहिरने कृष्ण चंद्र यांच्या ( न समजणेबल / न वाचनेबल ) हस्ताक्षरातील संहितेच्या पुनर्लेखनाचं काम स्वीकारलं — दोन वेळच्या खाण्याच्या प्रश्नाच्या दीडशे रुपये मोबदल्यासाठी ! काळ कठीण होता, पण जसा हट्टी राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही , तसाच साहिरनेही तो सोडला नाही! तो त्याही परिस्थितीत हसतमुख राहून प्रयत्न करत होता! त्याला मनोमन खात्री होती ( त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर , अशी खात्री की, )
*यार , ये बंबई शहर है, जो बाहरसे आनेवालोंसे कम से कम दो साल तक जद—ओ—जेहाद माँगता है और इसके बाद बडे प्यार से गले लगा लेता है!*
प्रतिक्षेचा वनवास संपला असावा..... साहिरचा मित्र मोहन सायगल ने साहिरला सांगितलं की संगीतकार एस. डी. बर्मन गीतकाराच्या शोधात आहेत आणि ते नवीन उमेदवारांची कदर करतात!
साहिर पोचला एस. डी. बर्मन यांच्या खार येथील *एव्हरग्रीन हॉटेल* मधील खोलीत जिथे एस. डी. रहात असे.
खोलीबाहेरील *Please Do Not Disturb* पाटी वाचूनही —
*आवाज करू नये!*
असा अर्थ लावत महाशय अवतरले ना एस. डीं. च्या पुढ्यात ! परिचय देऊन येण्याचं कारण सांगितलं. एस. डी. ने शांतपणे सगळं ऐकून घेतलं व साहिरला सिनेमातील गाण्याचा एक प्रसंग समजावून सांगितला व त्यासाठी रचलेली धून पण ऐकवली. साहीरने ती धून परत वाजवण्याची केलेली विनंती मान्य करून एस. डी. ने ती परत ऐकवली. बर्मनची हार्मोनिअम साहिरच्या लेखणीतून प्रकट झाली *ठंडी हवाएँ , लहराके आए , रुत है जवाँ , तुम हो यहाँ , कैसे बुलाएँ?*
बर्मन दां नी ते बोल ऐकले मात्र आणि ते हर्षभरीत होऊन साहिरला कारदार स्टुडिओत घेऊन गेले व ए. आर. कारदार समोर ते गीत सादर केलं गेलं.....  नलिनी जयवंतने पडद्या वर साकारलेलं हे गाणं लताने गाऊन अमर केलं आणि हिंदी सिनेसृष्टीला १९५१ ला *नौजवान* सिनेमासाठी *नौजवान* शब्दांचा जादुगार—साहिर सापडला !

*नौजवान* ने साहिरसाठी पायघड्या घातल्या..... पाठोपाठ *सजा , जाल , बाजी , सी. आय्. डी.* अशी अनेक शिखरं साहिरने पादाक्रांत केली.

मंडळी , साहिरची लेखणी म्हणजे जणू दुधारी तलवारंच! एकेक शब्द घायाळ करणारा.... आता मी तुम्हाला जरा सैर करून आणतो साहिरच्या शब्द नगरीत.....

अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्तच्या *बाजी* या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले,
*तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...*
या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. हे गाणं खरं तर साहिरची एक गझल होती व एस. डी. ने त्याला क्लब साँग बनवताच साहिरने फणा काढला होता! पण गाण्याचं सिनेमातील उत्कृष्ट चित्रीकरण व नंतर गीता दत्तच्या आवाजाने व एस. डी. च्या चालीने ते गाणं गाजलं आणि साहिरचा आवाज एस. डी. नं कृतीने बंद केला! अभिनेते देव आनंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.

पश्चिम बंगालमधील 'बाऊल' परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्‍या,
*आन मिलो आन मिलो शाम सवेरे...*
हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं.

प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचा.
*ठंडी हवाएँ लहराके आयें...*
नंतर देव आनंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या
*चुप है धरती*
*चुप है चाँद सितारे...*
या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.आणि हेमंतकुमारने तर या गाण्याचं सोनं केलं सोनं!

गुरुदत्तचा *प्यासा* हा चित्रपट साहिर - एस. डी. बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळस होता! साहिरचं *तल्ख़ियाँ* वाचून प्रभावित झालेल्या गुरुदत्तला *प्यासा* ची *एका कवीच्या जीवनाची शोकांतिका* हि *One Liner Story* सुचली व या सिनेमात त्याने याच काव्यसंग्रहातल्या अनेक कविता वापरल्या!  एका *प्यासा* चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची. मात्र, *प्यासा* चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एस. डी. बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण *प्यासा* तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरश: *महान* च पण त्यातहि
*ये दुनिया*
*अगर मिल भी जाये*
*तो क्या है...*
या गीताला तोड नाही ! १९५७ ला *प्यासा* मिनर्व्हा ला प्रदर्शित झाला. पडद्यावर गुरूदत्त जेंव्हा
*यहाँ पीर भी आ चुके है , जवान भी आया*
गाऊ लागे तेंव्हा थिएटरमधे तमाम प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवंत !
( जसे मराठीतले वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या *गीत रामायण* साठी लोक आजहि टाळ्या देतात ! ) मंडळी, नाटकाप्रमाणे एखाद्या कलाकाराऐवजी गीत रचनेसाठी सिनेमा थिएटरमधे टाळ्या घेणारा फक्त *साहिर* च असू शकतो !

सचिन देव ऊर्फ एस. डी. बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने *नया दौर*, *तुमसा नही देखा* असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या *माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...*
या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकलं!

संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. मात्र, *कभी कभी* चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले
*मै पल दो पल का शायर...*
हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले.

हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये *हम दोनो* ची ही गीते येतात.
*अल्लाह तेरो नाम...* , *प्रभू तेरो नाम*
*कभी खुद पे कभी हालात पे...*
*तसंच,*
*मै जिंदगी का*
*साथ निभाता चला गया...*
अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र,
*अभी ना जाओ छोड कर...*
यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.
यातील गाणी रेकाॅर्ड व्हायच्या काळात लता व एस.डी.चा अबोला सुरू होता.जयदेव हा एस.डी.चा सहाय्यक असल्याने साहजीकच हा अबोला त्यालाही लागू असावा अशा समजूतीने त्याने  *अल्लाह तेरो नाम...* , *प्रभू तेरो नाम* या दोन गाण्यांसाठी एम.एस.सुब्बलक्ष्मी यांची निवड केली.ही बातमी लतापर्यंत गेली आणि एक दिवस जयदेवला निरोप आला : *एम.एस.सुब्बलक्ष्मी या मोठ्या कलाकार लांब मद्रासमधे आहेत , पण लता नावाची एक छोटी गायिका इथे जवळंच मुंबईमधे उपलब्ध आहे!* पुढे या गाण्यांनी काय इतिहास घडवला हे वेगळं सांगायला नकोच ! ही महती जशी जयदेवची होती तितकीच ती साहिरच्या शब्दांचीही होतीच ना महाराजा? *प्रभू तेरो नाम* मधे एका विवाहितेची आपल्या सैन्यातील पतीची वाट पहाणार्‍या सौभाग्यवतीची आर्त साद साहिरने शुद्ध हिंदीत साकारली आणि पुढे उर्दूमिश्रित हिंदीमधे  *अल्लाह तेरो नाम* हे भजन त्याच सौभाग्यवतीच्या तोंडी मंदिरामधे देताना मात्र सर्वधर्मसमभाव दाखवणारी चित्रं पडद्यावर येतात , अल्लाहपासून गाण्याची सुरुवात होते आणि अख्ख्या गाण्यामधे सैन्यातील सैनिकांच्या व्यथा मांडणारे शब्द येतात *माँगोंका सिंदूर ना छूटे , माँ बहनोंकी आस ना टूटे , देह बिना , दाता , देहबिना भटके ना प्राण!* ह्रृदयात कालवाकालव करणारी शब्दरचना ! आणि दोन्हि गाण्यांत पडद्यावर ललिता पवार व नंदा यांसारख्या सशक्त अभिनेत्री ! *प्रभू तेरो नाम* च्या वेळची केस मोकळे सोडलेली देवाला आर्त विनवणी करणारी सालस , सुरेख नंदा आणि *अल्लाह तेरो नाम* च्या वेळी डोईवर पदर घेतलेली तमाम सौभाग्यवतींची प्रतिनिधी — निष्पाप व करूण पण पातिव्रत्य व निर्धार चेहेर्‍यावर दिसणारी स्त्री वर्गाची प्रतिनिधी नंदा ! आपल्या लहानपणी अपार काबाडकष्ट करून आपल्याला वाढवलेल्या आईबद्धलचं आणि म्हणूनंच समस्त स्त्रीजातीबाबतचं प्रेम व आदर साहिरच्या शब्दांतून आयुष्यभर असं ओसंडून व भरभरून वाहात राहिलं !

भगवतीचरण वर्मा यांच्या *चित्रलेखा* कादंबरीवर याच नावाचा सिनेमा आला व गीतकार म्हणून साहिरची निवड झाली व तमाम सिनेसृष्टी धास्तावली की उर्दूचा माहिर शायर साहिर शुद्ध हिंदी कथानकाला साजेसं लिहू शकेल ? आणि साहिरने
*ए री जाने न दूँगी*
आणि
*सखी री मेरा मन उलझे तन डोले*
यासारखी शुद्ध शास्त्रीय संगीताकडे झुकणारी गाणी लिहिली व रोशनने ती लताकडून कलावती व मल्हार रागात गाऊन घेतली व तमाम महारथींची तोंडंच बंद झाली !
'यमन' रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका उंचीवर नेलेले - *मन रे तू काहे ना धीर धरे...*
या गाण्यात तर साहिरने उत्तुंग षटकारच ठोकला महाराजा !
*उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे*
*जनम मरनका मेल है सपना , ये सपना बिसरा दे*
*कोई न संग मरे!*

असंच एक उत्कृष्ट समयोचित गाणं साहिरने दिलं : पडद्यावर अशोककुमार संन्यासी वेषात व मीनाकुमारी त्याला उपहासात्मक शब्दांत म्हणते ,
*संसारसे भागे फिरते हो ,*
*भगवानको तुम क्या पाओगे?*
*इस लोकको भी अपना न सके,*
*उस लोकमें भी पछताओगे*

काय शब्द पेरलेत साहिरने! संन्याशाच्या मुखवट्या आडच्या मानवी स्वभावाचं इतकं सडेतोड वर्णन तेही दोन ओळींमधे करणारा साहिर किती द्रष्टा कवी होता !

आर. डी. बर्मन यांच्या साठीही साहिर यांनी गीतलेखन केले.
*आ गले लग जा* मधील त्यांच्या
*तेरा मुझसे है पहले का नाता कोई...*
या गीतातील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. मात्र, *जोशिला* मधील
*किसका रस्ता देखें*
*ऐ दिल ऐ सौदाई...*
हे तात्त्विक शब्द वेड लावून जातात. यातलं हे एक कडवं जीवनाचं तत्वच सांगून जातं :
*कोईभी साया नहीं राहों में , कोईभी आएगा न बाहों में*
*तेरे लिये मेरे लिये कोई नहीं रोनेवाला*
*झूठाभी नाता नहीं चाहों में , तूही क्यूँ डूबा रहे आहों में?*
*कोई किसी संग मरे ऐसा नहीं होनेवाला*
*कोई नहीं जो यूँहीं जहाँमें बाँटे पीर पराई*

हे इतकं कडवट व दाहक सत्य मांडणारा साहिर *फिर सुबह होगी* मधे आशावाद इतक्या सशक्त शब्दांमधे व्यक्त करतो , जो खय्यामने मुकेश व लताकडून मांडला :

*वो सुबह कभी तो आयेगी* , वो सुबह कभी तो आयेगी
इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगी, जब धरती नग़मे गाएगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर के जीते हैं
जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

माना के अभी तेरे मेरे इन अरमानों की, कीमत कुछ नहीं
मिट्टी का भी है कुछ मोल मगर, इनसानों की कीमत कुछ भी नहीं इनसानों की इज़्ज़त जब झूठे सिक्कों में ना तोली जायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

दौलत के लिये अब औरत की, इस्मत को ना बेचा जायेगा
चाहत को ना कुचला जायेगा, गैरत को ना बेचा जायेगा
अपनी काली करतूतों पर, जब ये दुनिया शरमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

बीतेंगे कभी तो दिन आखिर, ये भूख और बेकारी के
टूटेंगे कभी तो बुत आखिर, दौलत की इजारेदारी की
अब एक अनोखी दुनिया की, बुनियाद उठाई जायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

मजबूर बुढ़ापा जब सूनी, राहों में धूल न फेंकेगा
मासूम लड़कपन जब गंदी, गलियों में भीख ना माँगेगा
हक माँगने वालों को, जिस दिन सूली न दिखाई जायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

या आशावादमधेही त्याने साम्यवादाचा पुरस्कार दाखवला , स्वत:चं हरवलेलं असुरक्षित बालपण कुठेतरी शब्दबद्ध केलं !

याच साहिरने प्रेम व्यक्त करताना निसर्गातील छोटी छोटी उदाहरणं दिली.उदाहरणार्थ *हमराज* मधील रवीने संगीतबद्ध केलेलं व महेंद्र कपूरने अजरामर केलेलं हे गाणं — याचे शब्द बघा :

*हे..., नीले गगन के तले, धरती का प्यार पले*
ऐसे ही जग में, आती हैं सुबहें
ऐसे ही शाम ढले ...

शबनम के मोती, फूलों पे बिखरे
दोनों की आस फले ...

बलखाती बेलें, मस्ती में खेलें
पेड़ों से मिलके गले ...

नदिया का पानी, दरिया से मिलके
सागर किस ओर चले ...

काय विशेष होतं या शब्दांमधे? पण निसर्गातील प्रवाही संगीत पोचवण्याचं सामर्थ्य फक्त अशा प्रकारे साहीरच दाखवू शकला ना महाराजा?

आता हे दुसरं गाणं बघा :

असहाय्य पांगळ्या तरूणीला जीवनातील आशावाद दाखवताना *सुंदर मी होणार* या ममराडी नाटकावर आधारीत व वसंत जोगळेकर दिग्दर्शित *आज और कल* या सिनेमात  एका तरुणाच्या तोंडी साहिरने काय शब्द पेरलेत , जे रवीने संगीतबद्ध केलेत व रफीने गायलेत ..... बघा याचे शब्द :

*ये वादियाँ ये फ़िज़ाएं बुला रही हैं तुम्हें* - 2
खामोशियों की सदाएं बुला रही हैं तुम्हे
ये वादियाँ ये फ़िज़ाएँ बुला रही हैं तुम्हे

तुम्हारी ज़ुल्फों से खुशबू की भीख लेने को
झुकी झुकी सी घटाएं बुला रही हैं तुम्हे
खामोशियों की सदाएँ ...

हँसीन चम्पाई पैरों को जबसे देखा है
नदी की मस्त अदाएं बुला रही हैं तुम्हे
खामोशियों की सदाएँ ...

मेरा कहा ना सुनो दिल की बात तो सुनलो
हर एक दिल की दुआएँ बुला रही हैं तुम्हे
खामोशियों की सदाएं बुला रही हैं तुम्हे
ये वादियाँ ये फ़िज़ाएँ बुला रही हैं तुम्हे ...

आणखीन एक गाणं बघा : *आदमी और इन्सान* मधलं : रवीने संगीत दिलेलं व महेंद्र कपूर व आशा भोसलेने अजरामर केलेलं : संपूर्णपणे Landscape चित्र डोळ्यांसमोर उभं रहातं व त्याची सांगड मानवी भावनांशी घातली जाते अलगद , सहजपणे.....

*ओ नीले पर्बतों की धारा*
*आयी ढूँढने किनारा बड़ी दूर से*
*सब को सहारा चाहिये*
*कोई हमारा चाहिये*

फूल में जैसे फूल की खुशबू
दिल में है यूँ तेरा बसेरा
धरती से अम्बर तक फैला
चाहत की बाहों का घेरा
ओ नीले पर्बतों की धारा ...

सूरज पीछे घूमे धरती
साँझ के पीछे घूमे सवेरा
जिस नाते ने इन को बाँधा
वो नाता है तेरा मेरा
ओ नीले पर्बतों की धारा ...

दूरवरून किनार्‍याच्या शोधात वहात येणार्‍या पाण्याचा धबधबा डोळ्यांसमोर उभा रहातो ! पडद्यावर मागे धबधबा , पुढे धर्मेंद्रसोबत अल्लड , शोख़ , नटखट , बालीश सायरा !
निसर्गाचं इतकं उत्कृष्ट चित्रण करणारा साहिर त्याच सिनेमामधे आयुष्याच्या अनिश्चिततेविषयी आयुष्य म्हणजे निव्वळ एक योगायोग असल्याचं सांगतो : आशा भोसले व महेंद्र कपूरच्या आवाजात

*ज़िन्दगी इत्तफ़ाक़ है* -2
कल भी इत्तफ़ाक़ थी आज भी इत्तफ़ाक़ है
ज़िन्दगी इत्तफ़ाक़ है ...

जाम पकड़ बढ़ा के हाथ
माँग दुआ घटे न रात
जान-ए-वफ़ा तेरी क़सम
कहते हैं दिल की बात हम
ग़र कोई मेल हो सके
आँखों का खेल हो सके
अपने को ख़ुशनसीब जान
वक़्त को मेहरबान मान
मिलते हैं दिल कभी-कभी
वरना हैं अजनबी सभी
मेरे हमदम मेरे मेहरबाँ
हर ख़ुशी इत्तफ़ाक़ है -2
कल भी इत्तफ़ाक़ थी ...

हुस्न है और शबाब है
ज़िन्दगी क़ामयाब है
बज़्म यूँ ही खिली रहे
अपनी नज़र मिली रहे
रंग यूँ ही जमा रहे
वक़्त यूँ ही थमा रहे
साज़ की लय पे झूम ले
ज़ुल्फ़ के ख़म को चूम ले
मेरे किए से कुछ नहीं
तेरे किए से कुछ नहीं
मेरे हमदम मेरे मेहरबाँ
ये सभी इत्तफ़ाक़ है -2 कल भी इत्तफ़ाक़ थी ...

आणि याच सिनेमात सैनिकांचं मनोगत मांडणारी एक लाजवाब कव्वाली साहिरने दिली आहे : *दिल करता , ओ यारा दिलदारा मेरा दिल करता* जी बलबीर, जोगिंदर व महेंद्र कपूरने गायली आहे ! मंडळी उत्कृष्ट शब्दांकन , चित्रण व मनाला स्पर्शून जाणारी *ही कव्वाली बघायला विसरू नका !* काय नाचलेत जवान पण या गाण्याला , अहाहा !लाजवाब साहिर , लाजवाब गायक , संगीतकार व अभिनेतेही !

*दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता*
ऐसा कुछ कर पायें
यादों में बस जायें
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता
हो सदियों जहान में हो, चर्चा हमारा
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता

जलती मशालें लेके मिलनेकी रातों में मिलनेकी रातोंमें
आगे आगे हम चलें यारों कि बरातों में यारों कि बरातों में
हँसे कोई भोली भाली अपनी भी बातों में अपनी भी बातों में
किसी की कलाई आए अपने भी हाथों में अपने भी हाथों में
हो सदियों जहान में हो, चर्चा हमारा
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता

नित नैइ धूमें मचें, नित नये मेले हों नित नये मेले हों
परियों में घिरे रहें, कभी न अकेले हों  कभी न अकेले हों
ग़म की घटायें हों कि, ख़ुशियों के रेले हों ख़ुशियों के रेले हों
दोनों से निभानेवाले हम अलबेले हों हम अलबेले हों
हो सदियों जहान में हो, चर्चा हमारा
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता

हम सा जियाला कोई मिले न हज़ारों में मिले न हज़ारों में
मरे चाहे जीये रहें अगलि कतारों में  अगलि कतारों में
झलके हमारा लहू कल की बहारों में  कल की बहारों में
अश्कों का तोहफ़ा हो कि बँट जाये यारों में बँट जाये यारों में
हो सदियों जहान में हो, चर्चा हमारा
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता
ऐसा कुछ कर पायें यादों में बस जायें
दिल करता, ओ यारा दिलदारा मेरा दिल करता

यातील दुसरं कडवं सिनेमाच्या लांबीच्या मर्यादेमुळे नंतर कापण्यात आलं !

याच सिनेमात साहिर जीवनाचं एक तत्वज्ञान सांगून जातो आशा भोसलेच्या आवाजात :

*ज़िन्दगी के रंग कई रे साथी रे ज़िन्दगी के रंग कई रे* -2

ज़िन्दगी दिलों को कभी जोड़ती भी है
ज़िन्दगी दिलों को कभी तोड़ती भी है -2
ज़िन्दगी के रंग ...

ज़िन्दगी की राह में ख़ुशी के फूल भी
ज़िन्दगी की राह में ग़मों की धूल भी -2
ज़िन्दगी के रंग ...

ज़िन्दगी कभी यक़ीं कभी ग़ुमान है
हर क़दम पे तेरा-मेरा इम्तहान है
ज़िन्दगी के रंग ...

चित्रपट *देवदास* :
*मैं वो फूल हूँ की गया हर कोई मसल के* ,
*मेरी उम्र बह गई है मेरे आसुओंमें ढलके*

चित्रपट
*फिर सुबह होगी* :

*रहने को घर नहिं है ,*
*सारा जहाँ हमारा* ,
*तालीम अधूरी मिलती*
*मिलती नहिं मजूरी* , *फुटपाथ बंबईके*
*हैं कारवाँ हमारा* ,
*चीन—ओ—अरब हमारा ! हिंदौस्ताँ हमारा!*
: एक पूर्णपणे उपहासात्मक काव्य !

चित्रपट *साधना* :
*औरतने जनम् दिया मर्दोंको ,*
*मर्दोंनेंसे बाजार दिया* ,
*जब जी चाहा मसला कुचला ,*
*जब जी चाहा दुत्कार दिया*
ही रचना म्हणजे त्याने आपल्या बापासारख्या बेदरकार व स्त्री ला भोगदासी समजणाऱ्या तमाम पुरूष जातीवरती ओढलेले ताशेरे, किंबहुना कोरडेच नाहीत काय ?

चित्रपट *त्रिशूल* :
*तू मेरे साथ रहगा मुन्ने , ताकी तू जान सके , तुझको परवान चढानेके लिए कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी*
ही रचना म्हणजे त्याने आपल्या आईने आपल्याला कुठल्या मनस्थितीत वाढवलं असेल याचं केलेलं कथनंच नव्हे काय ?

चित्रपट *इन्साफ का तराझू* : संगीतकार रवींद्र जैन , त्यांची अट असायची की गीतकार पण मीच असणार! पण बी. आर. चोप्रांनी हा त्यांचा हट्ट न पुरवता साहिरला कथा ऐकवली. ती स्त्रीजातीवरील अन्यायाला वाचा फोडणारी कथा ऐकून साहिर इतका भारावला की *माझ्या मनाप्रमाणे जर एखादं गाणं निर्माण झालं तरंच मी ते तुम्हाला देईन पण माझ्या  मनाप्रमाणे मला ते लिहिणं नाहिच जमलं  तर एक ओळहि मी देऊ शकणार नाहि!* असं सांगून साहिर निघून गेला. पण दुसऱ्याच दिवशी साहिरचे बोल बी. आर. चं काळीज चिरत गेले : *लोग औरतको फक्त जिस्म समझ लेतें हैं , रूह भी होती है उसमें ये कहाँ सोचते हैं?* कुठेतरी साहिरने आपल्या ऐय्याश बापावर कोरडे ओढलेच....

चित्रपट *प्यासा* : गुरुदत्त व कॅमेरामन व्हि.के.मूर्ती पार वेश्यावस्तीत ५—६ दिवस फिरून आलेले. दिलीप कुमारने नायकाच्या रोलला नाही म्हणत म्हणत गुरुदत्त लाच *इतनी डिटेल्ड स्टडीके बाद मुझसेभी ज्यादा तूही ये किर्दार अच्छि तरह निभाएगा ! व्हाय डोण्ट यू डू इट?* म्हणंत बोहल्यावर उभा केला. मुहुर्ताच्या शॉटला साहिरने एन्ट्री घेत गुरुदत्तला ओळी ऐकवल्या :
*ये पुरपेच गलियाँ*
*ये बदनाम बाज़ार ,*
*ये गुमनाम राही*
*ये सिक्कोंकी झनकार ,*
*ये इस्मत के सौदे*
*ये सौदोंपे तकरार ,*
*जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?*

*ये फूलोंके गज़रे ,*
*ये पीकों के छींटे ,*
*ये बेबाक नजरें*
*ये गुस्ताख़ फिकरे ,*
*ये ढलके बदन और*
*ये बीमार चेहरे,*
*जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?*
ज्या सिच्युएशनसाठी , शॉटस् व शूटिंग योजना ठरवण्यासाठी ५-६ दिवस रेडलाईट एरियात गुरुदत्त व मूर्ती वणवण भटकले होते व झिजत होते, त्याचं मर्म कुठेहि न जाता साहिरने आठ ओळीत उभं केलं होतं! मला सांगा, साहिर का नाहि हो म्हणणार की *प्यासा* साहिरमुळे चालला ? साहिर बेफिकिरीत जगला! करिअरच्या अगदी सुरुवातीला लता मंगेशकर शी भांडला! परिणामी हाती असलेल्या ११ पैकी ९ चित्रपट हातातून गेले! पण त्याने कुणाची तमा—फिकीर बाळगली नाहि!त्याच बेफिकिरीचं गाणंहि बनवलं....

चित्रपट : *हम दोनो* :
*जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ,*
*जो खो गया मैं उसको भुलाता चला गया !* ;
*मैं ज़िंदगीका साथ निभाता चला गया ,*
*हर फिक्रको धुएँमें उडाता चला गया!*

आणि मंडळी , साहिरने जेवढ्या कव्वाल्या सिनेसृष्टीला दिल्या तेवढ्या अन्य कुणीही दिल्या नसाव्यात ! उदा. ३ मुलांचा बाप झालेल्या लाला चं — बलराज सहानीचं आपल्या लाजोवरचं— आशा सचदेववरचं प्रेम व्यक्त करताना गायलेली *वक्त* मधली *ऐ मेरी जोहरा जभीं* , *दिल ही तो है* मधील आशाच्या आवाजात गायलेली *निगाहें मिलाने को जी चाहता है*  , तसंच *परदा उठ्ठे सलाम हो जाए* ,  झालंच तर *चाँदीका बदन सोनेकी नजर* ही *ताजमहल* मधली कव्वाली आणि सगळ्यात कहर म्हणजे *बरसात की रात* मधली सोळा कडव्यांची दोन भागातील कव्वाली *ना तो कारवाँ की तलाश है* जी रोशनने रफी—मन्ना डे—आशा भोसले—सुधा मल्होत्रा —शिवदयाल बातिश व कोरस यांच्या आवाजात अजरामर केली ! याच सिनेमात द्वि—रूपातील ( पुरूष व स्त्री असं वेगवेगळं गायलेलं ) गाणं *ज़िंदगीभर नहिं भूलेगी* — फक्त दोन्हि वेळी शब्दांत थोडेसे बदल केलेले !
*वक्त* मधे *ऐ मेरी जोहरा जभीं* अशी बेधुंद कव्वाली देणारा साहिर *कौन आया के निगाहोंमें चमक जाग उठी* , *चेहेरेपे खुशी छा जाती है* , *दिन है बहारके तेरे मेरे इकरारके* , *हम जब सिमटके आपकी बाहोंमें आ गए* अशी प्रणयधुंद गाणीही लिहून गेलाय तर दुसरीकडे *आयुष्याचा काहीच भरवसा नाहीये — जगायचा क्षण हा आत्ताचाच!* हे तत्वज्ञान सांगून जातो *आगे भी जाने न तू* या गाण्यात ! या गाण्याचे शब्द बघा :

*आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू*
*जो भी है, बस यही एक पल है*

अन्जाने सायों का राहों में डेरा है
अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है
ये पल उजाला है बाक़ी अंधेरा है
ये पल गँवाना न ये पल ही तेरा है
जीनेवाले सोच ले
यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू
आगे भी ...

इस पल की जलवों ने महफ़िल संवारी है
इस पल की गर्मी ने धड़कन उभारी है
इस पल के होने से दुनिया हमारी है
ये पल जो देखो तो सदियों पे वारि है
जीनेवाले सोच ले
यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू
आगे भी ...

इस पल के साए में अपना ठिकाना है
इस पल की आगे की हर शय फ़साना है
कल किसने देखा है कल किसने जाना है
इस पल से पाएगा जो तुझको पाना है
जीनेवाले सोच ले
यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू आगे भी ...

*वक्त* सिनेमाचं संपूर्ण सार या ३ कडव्यांमधे मांडलंय पठ्ठ्यानं !

*बरसातकी रात* मधे साहिरने हे संपूर्णपणे सिद्ध केलं की तो फक्त साम्यवादाचा पुरस्कर्ता , कडवट सत्य चितारणारा विद्रोही कवी व गीतकार नव्हता तर प्रेमाचे नाजूक धागे , प्रणयाचे नशीले क्षण टिपणारा स्वैर विचारांचा प्रेमी , आशिक मिज़ाज़ शायर पण होता !
यातली ही गाणी याची साक्ष देतात : *गरजत बरसत सावन आयो रे* हे सुमन कल्याणपूरच्या सुमधूर आवाजातील शास्त्रीय संगीताच्या अंगानं जाणारं शुद्ध हिंदीतील गाणं , *मैंने शायद तुम्हें पहले भी कभी देखा है* हे रफीचं मधामधे घोळवून मुरलेल्या मुरांब्यासारखं मधूर प्रेमगीत , *मुझे मिल गया बहाना तेरी दीदका* हे लताने गायलेलं सलज्ज कुमारिकेच्या प्रेमाची कबुली देणारं गीत , *निगाहें नाज़के मारोंका हाल क्या होगा* ही आशा भोसले—सुधा मल्होत्राची प्रेमावस्था वर्णन करणारी कव्वाली , आणि जितकी उत्कृष्ट कव्वाली *ना तो कारवाँकी तलाश है* तितकंच उत्कृष्ट धुंदावणारं गीत *ज़िंदगीभर नहीं भूलेगी* हे विशेषत: रफीच्या आवाजातील गाणं आणि पडद्यावर व्हीनस आॅफ द स्क्रीन : *एकमेवाद्वितीय मधुबाला!* ( मधला काही काळ न टाळता येणारा मेणचट भारत भूषण — ही या गाण्याला दृष्ट लागू नये म्हणून लावलेली *तीट* होती म्हणा!) गाण्याचे लाजवाब शब्द , तितकाच स्वर्गीय मधाळ रफीचा आवाज , पडदद्यावर अप्सरा आणि रोशनचं संगीत ! जियो साहिर जियो ! या गाण्याचे शब्द द्यायचा मोह टाळवत नाहि.....

*ज़िंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात*
*एक अंजान हसीना से मुलाकात की रात*
*ज़िंदगी भर नहीं भूलेगी ...*

हाय वो रेशमी ज़ुल्फ़ों से बरसता पानी
फूल से गालों पे रुकने को तरसता पानी
दिल में तूफ़ान उठाते हुए
दिल में तूफ़ान उठाते हुए हालात की रात
ज़िंदगी भर नहीं भूलेगी ...

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका
और फिर शर्म से बलखाके सिमटना उसका
कभी देखी न सुनी ऐसी हो
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात कि रात
ज़िंदगी भर नहीं भूलेगी ...

सुर्ख आंचल को दबाकर जो निचोड़ा उसने
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोड़ा उसने
आग पानी में लगाते हुए
आग पानी में लगाते हुए जज़बात कि रात
ज़िंदगी भर नहीं भूलेगी ...

मेरे नग़्मों में जो बसती है वो तस्वीर थी वो
नौजवानी के हसीं ख़्वाब की ताबीर थी वो
आस्मनों से उतर आई
आस्मनों से उतर आई थीजो रात की रात
ज़िंदगी भर नहीं भूलेगी ...

*प्रत्येक वाक्यागणिक तो श्रृंगारिक प्रसंग डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा ठाकतो ! सलाम तुला साहिर , सलाम !*

मंडळी सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे ! म्हणून इथेच थांबतो....१९७६ ला साहिरने त्याचा श्वास गमावला...बेगम सरदार — त्याची अम्मी जग सोडून गेली. आधी अमृता प्रीतम , मग सुधा मल्होत्रा... कित्येक निष्फळ प्रेम प्रकरणानंतर ( तसं तर लुधियानातील गव्हर्नमेंट कॉलेजमधील वर्ग मैत्रिण महिन्दर चौधरी — जिच्यावर साहिरचं प्रेम होतं, पण याची गरिबी व धर्म आड आला व ती अल्पावधीत क्षयरोगाने मरण पावल्यावर साहिरने तिच्या आठवणीत  *मरघट की सरजमीन* नावाची कविता लिहिली ; त्यानंतर साहिरला इशर कौर आवडू लागली. तिचा विरह असह्य होऊन साहिरने कॉलेजात जाऊन तिची भेट घ्यायचं ठरवलं. पण *नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न* या म्हणीनुसार त्यादिवशी कॉलेजला सुट्टी होती. मग हे कवी महाशय लेडीज हॉस्टेलवर पोचले. या दोघांच्या भेटीचं संकेतस्थळ बहुतेकांना माहित होतं. त्यामुळे तिथे प्रिन्सिपॉल हॉर्वे जाऊन पोचले व परीणामत: इशरला कॉलेजातून काढून टाकण्यात आलं व साहिरनेही कॉलेजला रामराम ठोकला! इशर कौर पुढे मुंबईला पण आली व साहिर पण मुंबईला आला. पण १९४७—४८ या सुरुवतीच्या २ वर्षात तिला शोधण्याची त्याने तसदीही घेतली नाही आणि या ताठ्यात राहिला की *मी सुप्रसिद्ध होताच ती स्वत:च माझा शोध घेत येईल!* — पण अर्थातंच दैवाला दोन्ही मंजूर नव्हतं!),

साहिरची जीवनासक्ती आटत गेली... २५ आॅक्टोबर १९८० रोजी  ह्रृदयविकाराच्या धक्क्याने हा आभाळाएवढा गुणी शायर इहलोक सोडून गेला... त्याच्याच शब्दांत सांगायचं तर :

*उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे , जनम मरनका मेल है सपना ये सपना बिसरा दे , कोई ना संग मरे! हाय् मन रे तू काहे ना धीर धरे!*

मंडळी ,
*दुनिया ने तजुर्बातो —हवादिस की शक्ल में*
*जो कुछ मुझे दिया है , वो लौटा रहा हूँ मैं!*
*अनुभव आणि अपघाताने जगाने जे मला दि तेच मी आता ( तुम्हांला ) परत करत आहे !* — असं म्हणणारा साहिर आपल्याच रुतब्यात जगला ! त्याचा स्वत:च्या या शब्दांवर प्रचंड विश्वास होता व हेच आपल्या जीवनाचं सूत्र बनवत साहिर जगला :
*पोंछकर अश्क अपनी आँखोंसे , मुस्कुराओ तो कोई बात बने*
*सर झुकानेसे कुछ नहिं होता, सर उठाओ तो कोई बात बने!*
पहिल्या २ ओळी जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन शिकवणाऱ्या तर दुसऱ्या दोन ओळी बेदरकार व ताठ बाणा शिकवणाऱ्या !

बा साहिर, तुझ्या प्रतिभेला सलाम करत तुला श्रद्धांजली वाहताना एवढंच म्हणावसं वाटतं :

*यूँ तो शायर औरभी होंगे , तुझसा न कोई साहिर होगा*
*पलमें आशिक़ी — पलमें रुतबा , ऐसा न कोई माहिर होगा!*

कळावे,
आपला विनम्र ,
© *उदय गंगाधर सप्रे* म—ठाणे
सेल फोन : +९१९००४४१७२०५ ( संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )
ई—मेल : sudayan2003@yahoo.com