Wednesday, October 9, 2019

रेखा 2

रेखा ओ रेखा...

कथेतल्या पात्रामुळे मिळणा-या सहानुभूतीमुळे वाटलं असेल पण राखी मजुमदारने 'बसेरा'मधे शेवटच्या क्लायमॅक्सच्या एन्डला त्या सिनेमातल्या भानुरेखा गणेशनला खाऊन टाकलंय. अर्थात समोर पूनम धिल्लन असल्यामुळे राखीला स्पर्धा नव्हतीच. गुळगुळीत देखण्या चेह-याकडे सहसा अभिनय नसतो (भेटा अथवा लिहा - बबिता, कमल सदाना, विवेक मुशरान, झेबा बख्तियार आणि अनेक). अर्थात मूळ मुद्दा हा नाही. सुखाशी ३६ चा आकडा असलेली भानुरेखा गणेशन आज ६३ वर्षांची झाली आणि त्या आकड्यांनी आज पहिल्यांदा एकमेकांकडे तोंड फिरवून बघितलं. तिच्या बापाने, शिवाजी गणेशनने आधी तिचं पितृत्वं नाकारलं होतं. अनौरस पोरटी बंडखोर असतात काय? तो महेश भट एक असाच हुकलेला आहे. बंडखोरी उतरत असावी गुणसूत्रात. आताच्या 'मी टू'च्या चळवळीत तिने उडी घेतली तर तिला किसणा-या विश्वजीतला (८१) या वयात पेप्रात नाव यायचा चान्स आहे. असो! मूळ मुद्दा हा नाही, तर सोनाली बेंद्रेच्या सास-याने, रमेश बहलने, लीला फणसळकरांच्या कथेवर काढला होता 'बसेरा'. आता यात रेखाच्या वाढदिवसाचा काय संबंध.

या सिनेमात रेखाचा वावर बघाल. एक आदर्श गृहिणी. त्यात राखी शहाणी असताना शशीकपूरची ती मेव्हणी असते तेंव्हा त्याचं ओलं डोकं पुसते टॉवेलने. कुठेही ती मेव्हणी आहे हे दिसत नाही त्या शॉटला, पुढे घडणारी घटना इतकी सहज आहे सिनेमात की ह्या शॉटला रेखाच्या, विधवा मेव्हणीच्या, चेह-यावर जर वेगळे भाव दिसले असते तर कथेची माती झाली असती. आपलं घर, नवरा, मुलं आणि संसार हे म्हणजेच जग. वैधव्यातून परत एकदा सधवा होण्याची नशीबाने मिळालेली संधी आहे तिला. ते अपुरेपण पूर्णत्वाला गेल्यावर तिच्या चेह-यावर संपूर्ण सिनेमात जी तृप्तता दिसते ना ती बघाल. जे तिला कधी जगायला मिळालं नाही ते तिने जगून घेतलं असेल का काही सिनेमातून? मानेपर्यंत मोकळे सोडलेले केस, त्याखाली घट्ट पेड घातलेली एक वेणी, मोठं कुंकू, कोपरापर्यंत हाताचा ब्लाउज आणि प्लेन, काठ असलेली साडी यातली रेखा मला कायम आदर्श गृहिणी वाटत आलेली आहे. तिचा अशा सिनेमातला वावर अत्यंत सुंदर, प्रेमळ आहे. बाकी ते प्लास्टिक सर्जरी, मेकअप या वार्ता सोडा. मोठ्या कुंकवावरून आठवलं, त्या 'छुडाके बैय्या न जाओ सैय्या' गाण्यात ठसठसशीत कुंकू लावलेली मीनाकुमारी बघाल, काय मादक आव्हान दिसते ती. साडीतली बाई जास्ती मादक असते ओ, विद्या बालन, स्मिता पाटील, वहिदा, 'मिले सूर'मधली शर्मिला बघा.

आपल्याकडे रंग, आकार उकार यावरून सौंदर्य ठरवतात. रेखा काळी असेल, मेकअप असेल, सर्जरी असेल आत्ता पण मी तिला जे आधीच्या सिनेमातून पाहिलंय ती रेखा मला परिपूर्ण स्त्री म्हणून तुफान आवडली आहे. 'रामपूरका लक्ष्मण'चा दंडगोल ते 'उत्सव'ची मदनिका हा तिचा प्रवास कायच्याकाय भन्नाट आहे. रेखा सुंदर नाही, ती मादक आहे. तिच्या देहात आवाहन नाही, आव्हान आहे. भूमिकेनुसार ती अत्यंत सोज्वळ पण वाटू शकते आणि मादक, जहरी पण वाटू शकते. एक खुनशी थंडपणा तिच्यात अंगभूत आहे. अमिताभच्या आधीची रेखा जास्ती एक्स्प्रेसिव्ह होती, नंतरची रेखा मॅच्युअर्ड आहे. कमी शब्दात, आरडाओरडा न करता ती चेह-याने बोलते. तो अनुभवण्याचा विषय आहे. आक्रसलेल्या चेह-याने श्रीदेवीने केलेला 'मॉम' तिला मिळायला हवा होता असं मला वाटलं होतं. थंड नजरेने तीने बघितलं असतं त्यात, मरणापेक्षा मरणाची भीती जास्ती भयानक असते. शिकली ती अमिताभकडून बरंच. 'अग्निपथ'मधे तो भाजलेल्या हाताने 'काट डालेगा' म्हणतो, ते कसं होतं तसंच तिने काहीतरी केलं असतं.

'अगर तुम न होते'मधे राज बब्बर तिच्यावर आरोप करतो तेंव्हा तिचा चेहरा बघाल. ती चिडत नाही, ती उद्विग्न होते. एवढं करून हा माणूस संशय घेतोय याचा हताशपणा तिच्या चेह-यावर बघावा. रेखाचा मूकाभिनय बघावा. 'खून भरी माँग'मधे घाबरलेली, कुरूप दिसणारी, भोळी, मुलांवर, त्या घोड्यावर प्रेम असलेली रेखा बघाल आणि नंतर बदल झालेली, ठाम, कबीर बेदीकडे कुत्सिततेने बघणारी, सुडाने पेटून उठलेली रेखा बघाल. तो घोडा तिला ओळखतो तेंव्हाचा तिचा चेहरा बघा. 'मु का सि'वर याआधी लिहिलंय त्यामुळे इथे नाही पण त्या सिनेमात तिचा फक्तं चेहरा बघावा. 'सलामे इष्क'तर अभिनयाशाळेत अभ्यासक्रमात ठेवावं. भारावलेपण, खंत, नवीन काहीतरी गवसल्याचा आनंद सगळं सगळं आहे एकाच चेह-यावर. त्यात दिलावर आला तर लफडं होईल म्हणून ती सिकंदरला विनवण्या करते जाण्यासाठी, तेंव्हा तिचा चेहरा बघाल, काळजी, मनाची उलघाल कशी नेमकी दिसते. रेखा म्हटलं की थांबावंसं वाटत नाही. एकातून दुसरा सिनेमा आठवत जातो. एकदा एखाद्या व्यक्तीवर लिहून झालं की परत लिहिताना थोडं जड जातं. अमिताभ, रेखा, आरडी, पुलं, आशा, लता यांना तो नियम लागू होत नाही. अवीट गोडीचे विषय हे.

ओ रेखाजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परत लिहू काहीतरी पुढच्या वर्षी. तुम्ही आहात तोपर्यंत किंवा आम्ही आहोत तोपर्यंत.

जयंत विद्वांस
।.।।।।.।।.।।।।।.।।।।।।

जोहराजान... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

रेखाबद्दल काय बोलावं. 'सलामे इष्क'ला अमिताभ सुरु झाल्यावर तिच्या चेह-यावरचे हावभाव बघाल. त्या ओळींचे अर्थ तिच्या चेह-यावर स्क्रोल होतात, तिचं भारावून जाणं बघाल. अमर्याद, कशालाही तोंड देण्याची तयारी असणारं, क्वचित वेडं वाटणारं प्रेम, अर्पणभाव बघाल तिच्या चेह-यावर. असे कितीसे शॉट्स असतील तिला. पण आयुष्यात नवीन काहीतरी कळावं आणि हाच का तो कालचा माणूस असा आमूलाग्र बदल एखाद्या व्यक्तीत घडावा अशी दिसते रेखा त्यात. जितेंद्रने कादरखानबदल तक्रार केली होती, तो त्याच्या सिनेमासाठी चांगले संवाद लिहीत नाही म्हणून. असं नसावं काही. पुलं म्हणाले होते, काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय हे महत्वाचं असतं. 'आमा मिला लो हाथ' हा काही हिट होण्याचा संवाद नाही पण झाला. 'मकान उंचा बनानेसे इन्सान उंचा थोडी जो जाता है?', 'जिंदगीमें लोग मोहब्बत के सहारे जिते है, मै आपकी नफरतके सहारे जिऊंगा' आणि रेखाच्या तोंडी असलेला, विनोद खन्नाला निरुत्तर करणारा 'इतनी किमतपर तो मैं सिकंदरकी तस्वीरभी न बेचूं'. संवाद म्हणायला फक्त आवाज असून चालत नाही, चेहरा हलणारा हवा. 'इतनी किमतपे तो' म्हणताना रेखाच्या चेह-यावरची तुच्छता बघाल. खरंय, एवढ्याश्या रुपयांसाठी कोण सिकंदर बच्चन सोडणारे.

आता जोहराजानही म्हातारी झाली आणि सिकंदरपण. आमच्या डोळ्यापुढे मरताना शेवटी काही आनंदाचे क्षण फास्ट फॉरवर्ड होतील त्यात तुमचेही चेहरे असतील एवढं नक्की. 'मु का सि' परत बघणं आलं आता, आपणच आपले त्रास वाढवतो एवढं खरं.

जयंत विद्वांस

kकक्ककक्कककक्क
#रेखा
रामायणांत जनकनंदिनीच्या जन्माची जी कथा येते ना त्यांत अघोर दुष्काळ पडलांय ह्मणून राजर्षी जनक स्वत: मिथीलेंत नांगर घेऊन पीक घेण्याजोगी जमीन नांगरतांत. नांगरत असतांना, सोन्याच्या नांगराचा फाळ एका जागी अडखळतो; बैलं बुजतांत आणि मग मोठा खडक वगैरे असेल ह्मणून नांगर थांबवुन ती जमिन खोदुन एक पेटी सापडते, त्यांत वीर्यशुल्का भूमीकन्या आढळते. तिचं नाव काय ठेवावं असं जेव्हा  मिथिलानरेश विदेह ह्मणजे राजर्षी जनक त्यांचे कुलगुरु ऋषी (ऋषी गौतम आणि अहिल्येचे पुत्र) शतानंदांना  विचारल्यांवर, ते सांगतांत "ही भूमीकन्या आपल्याला जमीन नांगरत असतांना आढळली ह्मणून  हिचे नाव #सीता! नांगरतांना फाळानें जमिनींवर जी रेघ उमटतें तिला मैथिली भाषेंत सीता ह्मणतांत! मला नेहमी वाटतं एक साधा ओरखडा तो काय जमिनीवरचा, पण जी भूमीकन्या तिचं पूर्ण आयुष्य त्या ओरखड्याचं नाव घेऊनच जगली, वाढली आणि पुन्हा त्यांच भुमींत जाऊन विसावली ती सीता, त्या ओरखड्याची मर्यादा जगतांना, अलम दुनियेला कित्येक हज्जारो पिढ्यांना स्त्रीत्वाची मर्यादा, पत्नीच्या, स्नुषेच्या, मातेच्या मर्यादा शिकवुन गेली पण तिच्या स्वत:च्या ईच्छा, आयुष्य तिच्या ईच्छेप्रमाणे जगायचं राहूनच गेलं, ह्याचा कधीही कुठे ही विचार किंवा उल्लेख आढळतच नाही.
काही लोकांचं आयुष्य असंच आपल्या रोजच्या जगण्यांत खूप सुखावह असतं, ते नसते तर काही फरक पडला नसता कदाचित पण ते आहेत तर जास्त सुखकर आहे! मधुबाला, दादा कोंडके आणि रेखाजी ही तीन नावं प्रकर्षानं मला अशीच त्या ओरखड्यानं मर्यादा जपत राहणारी आणि स्वत:च्याआयुष्यांत असंख्य दुखं घेऊन जगणारी वाटतांत.
रेखा! ह्यांना पाहिल्यांवर હય્યા માં કાઈ કાઈ થાય किंवा हृदयांत वाजे समथिंग समथिंग असं प्रत्येक पुरुषाला होतंच, त्यांच्या वयाच्या पुरुषांच्या तर त्या ह्मणजे पहिलं क्रश वगैरे नक्कीच असतील. बाकी साडींत ज्या काही हीरोईन्स अफाट सुंदर दिसतांत त्यांत वहिदाजी, रेखाजी, स्मिता पाटीलजी,  विद्या आणि दिपूडी पहिल्या पाचांतच!
सदैव मोठ्या फंक्शनला जाऊन आल्यासारखं फुटभर लांब जरी काठाच्या, प्योर सिल्कच्या कांजीवरम, धर्मावरम, बनारसी शालु किंवा तत्सम उंची साड्या, त्याला उत्तम साजेसा बटवा, कोपरांपर्यंत भरगच्च सोन्याच्या, काचेच्या बांगड्या, भरगच्च गळांभर पारंपारिक डिजाईन्स असलेला नेकलेस किंवा क्वचितच नाजुक नेकपीस, कपाळांवर बोटभर कुंकू आणि टप्पोऱ्या ओठांवर लालचुटुक लिपस्टिक वर आवर्जुन दिसेल असा जीवघेणा तीळ! कानांच्या पाळ्या लोंबतांत इतकी मोठी कर्णभूषणं असा एकुणच सरंजाम असणाऱ्या दुसरं कुणी असुच शकत नाही त्या फक्त आणि फक्त रेखाजीच!
आज त्यांचा ६६ वा वाढदिवस! पासष्ट वर्ष पूर्ण झालींत पण त्यांच्याविषयीचं असणारं आकर्षण जरा ह्मणून कमी नाही झालेलं. इंद्राघरची शापित अप्सरा असतील ह्मणूनच एवढं स्टारडम, इतकी प्रसिद्धी, करोडोंची फॅन फॉलोईंग असुनही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांत एकट्या-कोषांत जगतांत! जन्मापासुनच वादातींत, दुखद जगणं नशीबी आलंय,ज्यांच्यावर जीवतोडुन प्रेम केलं त्यांच्यासोबतप्रचलित संसारसुख, तो कडक वक्री मंगळ, लेकरं-बाळं वगैरे असली काही #रेखा_ओरखडा नसावांच त्यांच्या तळहातांवर!
रेखाजी तुह्मी नेहमीच लाडक्या आहांत, जोवर जीवांत जीव असेल तोवर तुमच्यावर जीव ओवाळुन टाकांवा असं वाटतच राहील. एकदा प्रत्यक्ष भेटायचंय तुह्माला! वयांत येतांना उत्सव पाहिलेला, जोहरा, उमरावजान पाहिलेली महत्वाचं ह्मणजे त्या लाल कंच नऊवारींत पोपटी ब्लाऊज आणि लालचुट्टुक ओठांनी विचारणाऱ्या कुटं कुटं जायाचं हनिमूनला रेखाजी तर आज ही जीव घेतांत, आणि ते मुजरे,त्या लावणी ती अदायगी मनस्वी आवडु लागली त्यांच बरोबर रेखाजी आवडु लागल्या त्या आजतांगायत आणि सदैवच! मॅनेजमेंट गुरु ह्मणून नेहमीच मानत आलोय ते ही उभं आयुष्य मानतच राहील.
तुह्माला निकोप, निरोगी उदंड आयुष्य लाभु देत! मराठी तारका कार्यक्रमांत आलेल्या सगळ्या तारकांना जसं मिठींत घेऊन गालांवर ते जीवघेणे ओठ टेकवतां ना तसं फक्त एकदांच मलाही करा बा लय नाही मागणं!
रेखाजी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन !! श्रींच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच श्रींचे चरणी प्रार्थना l स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु विद्याविवेककृतिकौशलसिद्धिरस्तु। ऐश्वर्यमस्तु बलमस्तु राष्ट्रभक्तिः सदास्तु।वंशः सदैव हि सुदीप्तोsस्तु। जीवेम शरदः शतम्। ब्रूयाम शरदः शतम्। शृणुयाम शरदः शतम्। नन्दामः शरदः शतम्।मोदामहे शरदः शतम्। कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेम शतं समाः।
ता. क. संसदेत नकाच जात जाऊ तो संसदेंतला फोटो पाहिलांय मी सगळे डोळे फाडफाडुन पाहत असतांत शेवटी काय तर इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं इन आँखों से वाबस्ता अफ़सानेहज़ारों हैं......

88888888
रेखा... जोहरा अप्रतिम होती !
रेखा... उमराव जान बेहद सुंदर !
रेखा... सिलसिला मधे चाँदनी !
रेखा... नटवरलालची शन्नो!
रेखा... सुहाग मधली बसंती!
रेखा... घरमधली आरती !
रेखा... नमक हराम मधली श्यामा !
रेखा... इजा़जत मधली सुधा !
रेखा... आस्था मधे मानसी !
रेखा... खूबसूरत मधे मंजू !
रेखा... उत्सव मधे वसंतसेना !
रेखा... झूठी मधे कल्पना !
रेखा... कलयुग मधे सुप्रिया !
रेखा... गंगा की सौगंध मधे धनिया !
रेखा... दो अंजाने मधे रेखा रॉय आणि सुनिता देवी !
रेखा... यात्रा मधे लाजवंती !

किती आठवायचं !

रेखा...

सलाम-ए-इश्क म्हणत जीव लावणारी... इन आँखो की मस्ती में म्हणत डोळ्यात विरघळवून टाकणारी... तेरे बिना जिया जाये ना अशी कबूली देणारी... आज कल पाँव जमीं पर नही पडते मेरे म्हणत आपल्यातच मश्गुल होऊन राहणारी... परदेसिया म्हणत अवखळपणे हुंदडणारी... रंग बरसे भीगे चुनरवाली म्हणल्यावर कावरीबावरी होऊन छानशी लाजणारी... दिल चीज क्या हैं आप मेरी जान लीजीये  म्हणत विनंती करणारी... गुम हैं किसी के प्यार में दिल सुबह शाम म्हणत रामपूर का लक्ष्मणला खुळं करणारी... तुमने किसी से कभी प्यार किया हैं असा सवाल करणारी... सुन सुन सुन दिदी तेरे लिये इक रिश्ता आया हैं म्हणत बहिणीच्या आनंदात सामील होणारी... आज इम्तिहान हैं म्हणणारी... आणि कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो असं सांगणारी...

रेखा !

सिलसिलातली चाँदनी तर वेडं करतेय अजूनही... उमराव जान तर डोळे स्थिरावत नाहीत अशीच ! आणि वसंतसेना तर लाजवाब !

ही सगळी एवढी का वेडी आहेत तिच्यासाठी हे तिलाही चांगलंच  ठाऊक आहे... तरीपण ही बया विचारतेच आहे...

मन क्यूँ बहका रे बहका
आधी रात को...
बेला महका रे महका आधी रात को...

कसं सांगायचं गं बै तुला की तू आमच्यासाठी काय आहेस ते ! तुला बघता बघताच आम्ही मोठे झालो... बच्चनला तुझ्याबरोबर बघितला की काळजात कळ उठायची जी आजही तशीच येते !

कॉलेजच्या दिवसात रात्री अभ्यास सोडून बच्चन भारी की तू भारी यावर भरपूर चर्चा झाल्यात !

बच्चनची आणि तुझी केमिस्ट्री तर अफलातून मॕच झालेली... आजच्या पिढीतही तुम्हां दोघांच्याच जोडीचे दाखले समोर येतात... बॉलीवूडमधल्या परफेक्ट पेअर असं कुणीही लिहायला बसलं की बच्चन आणि रेखा यांना बाजूला करताच येत नाही !

पण जेव्हा तुला उत्सव, खूबसूरत, घर, उमराव जान, कलयुग, यात्रा, इजा़जत अशा तुझ्या आणि फक्त तुझ्याच रोलमधे बघितले तेव्हा समजून आले की रेखा म्हणजे फक्त रेखाच ! नो अॉप्शन !

आज दहा अॉक्टोबर...
तुझा वाढदिवस !

आणि

उद्या अकरा अॉक्टोबर... आपल्या शहेनशाहचा वाढदिवस !

No comments:

Post a Comment