*किशोरजींच्या खंडव्याची अविस्मरणीय आठवण*
एखाद्या व्यक्तीचे फॅन होणे म्हणजे काय असते हे पहायचे अनुभवयाचे असेल तर 4 ऑगस्ट अथवा 13 ऑक्टोबरला किशोरजींचे जन्मगाव असलेल्या खंडव्याला (मध्यप्रदेश) भेट दिली पाहिजे. या दोन्ही दिवस या गावासाठी एखाद्या उत्सवासारखे असतात. आपल्याकडील गणपती मंडळांप्रमाणे खंडवा येथे किशोर कुमार यांच्या नावांची मंडळे आहेत. *-किशोरजींच्या जयंती, पुण्यतिथीला ही मंडळी चौकाचौकात किशोरजींची गाणी ध्वनीक्षेपकावर लावतात. जोडीला एक मोठा टेबल लावून किशोरजींचे आवडते व्यंजन मसाले दूध व जिलेबीचे सर्वांना वाटप केले जाते. अक्षरश: भारावून टाकणारे वातावरण त्यादिवशी खंडवा येथे असते.* येथील रहिवाशी किशोरजींवर किती प्रेम करतात याचीच प्रचिती येते. माझ्या भाग्याने मला तीन चार वेळा खंडवा दर्शनाचा योग आला. एकदा आम्ही खंडव्याला गेलो असताना किशोरजींच्या पारंपरिक निवासस्थानाला भेट दिली. तेव्हा त्या घराच्या परिसरात खूपच अस्वच्छता होती. किशोर कुमार यांचे कुटुंबिय मुंबईतच स्थायिक असल्याने या घराकडे तितके लक्ष दिले जात नसल्याचे दिसून आले. एक केअर टेकर होते *रामलाल*, ते एकटे एवढा मोठा पसारा सांभाळू शकत नव्हते. आम्ही त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांची हतबलता लक्षात आल्यावर आम्ही तिथून उठलो व बाजारात गेलो. आम्ही येताना एक झाडू, रामलाल यांच्यासाठी कपडे व थोडी मिठाई घेवून आलो. आम्ही झाडू घेवून किशोरजींचे घर व परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. आजूबाजूचे आमच्याकडे पाहत होते, पण आम्ही उत्स्फूर्तपणे लाडक्या किशोरजींचे स्मारक स्वच्छ करत होतो. आम्ही प्रेमाने रामलालजी यांना नवीन कपडे व मिठाई दिली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, त्यांना थोडे पैसेही दिले. किशोर कुमार ज्या खोलीत जन्मले ती खोली आम्ही डोळे भरुन पाहिली. भरुन पावणे म्हणजे काय असते, याचा अनुभव मला खंडवा भेटीत आला. सुदैवाने नंतरही तीन चार वेळा तेथे जाणे झाले. पण किशोरजींच्या जयंती, पुण्यतिथीदिनी खंडव्यात असणारे वातावरण खरोखर मंत्रमुग्ध करणारे असते. *- प्रमोद कांबळे,चित्र शिल्पकार*
*अ.नगर*
No comments:
Post a Comment